' निरीक्षण करताना चुकून नजर हटली आणि अपघाताने लागला होता या ग्रहाचा शोध!

निरीक्षण करताना चुकून नजर हटली आणि अपघाताने लागला होता या ग्रहाचा शोध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सतरावे शतक उजाडले आणि आपल्या सूर्यमालेत शनीच्या पुढेही आणखी ग्रह आहेत ह्याचा शोध लागला. १३ मार्च १७८१ रोजी सर विल्यम हर्षेलने त्याचे नेहमीचे निरीक्षण करता करता युरेनस ह्या ग्रहाचा शोध लावला होता.

प्राचीन काळी शनी पर्यंत आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचे शोध लागल्यानंतर अनेक वर्षांच्या मोठ्या अंतराळानंतर सर विल्यम हर्षेलला एका नव्या ग्रहाचा शोध लागला.

ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर विल्यम हर्षेल हा त्याच्या दुर्बिणीतून सगळ्या ताऱ्यांचा सर्व्हे करीत होता. हे तारे कमीत कमी मॅग्निट्युड आठ चे होते.

ताऱ्यांचे मॅग्निट्युड त्यांच्या प्रखरतेवर मोजतात. अतिशय प्रखर असलेले तारे हे फर्स्ट मॅग्निट्युड ह्या प्रकारात मोडतात आणि अतिशय मंद प्रकाश असलेले तारे जे नुसत्या डोळ्यांनी सुद्धा अवकाशात दिसतात ते सिक्स्थ मॅग्निट्युड ह्या प्रकारात गणले जातात. ही मॅग्निट्युड स्केल टॉलेमी आणि हिपेर्कसच्या काळापासून आहे.

ह्यांनी ताऱ्यांचे वर्गीकरण त्यांच्या मॅग्निट्युड प्रमाणे केले आहे. ह्याच प्राचीन स्केलप्रमाणे विविध ताऱ्यांचे त्यांच्या प्रखरतेनुसार वर्गीकरण केले जाते. ह्याच पद्धतीने आजही ताऱ्यांचे वर्गीकरण केले जाते, अर्थात त्यात काही सुधारणा झाल्या आहेत पण ताऱ्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत आजही टिकून आहे.

 

magnitude inmarathi
earthsky.com

 

सर विल्यम हर्षेल नेहमीप्रमाणे मॅग्निट्युड कमीत कमी आठ असणाऱ्या ताऱ्यांचे निरीक्षण करीत होते. हे तारे नुसत्या डोळ्यांना दिसणे कठीण असते ह्यासाठी टेलिस्कोपचीच गरज असते. ताऱ्यांचे निरीक्षण करता करता त्यांना अवकाशात एक फिकट वस्तू आढळली.

डोळ्यांना अगदी जेमतेम दिसू शकेल अशी ही अवकाशातील वस्तू निश्चित ठिकाणी कायम असणाऱ्या आणि कधीही जागा न बदलणाऱ्या ताऱ्यांच्या पुढून जाताना ही वस्तू विल्यम हर्षेल ह्यांच्या दृष्टीस पडली.

त्या वस्तूच्या अश्या प्रकारच्या हालचालीमुळे हे तर नक्कीच होते की ह्या वस्तूचे पृथ्वीपासून असलेले अंतर हे ताऱ्यांच्या अंतरापेक्षा नक्कीच कमी आहे.सुरुवातीला विल्यम हर्षेल ह्यांचा असा समज झाला की त्यांना एखाद्या धूमकेतूचे दर्शन झाले आहे.

परंतु नंतर त्यांना व इतर शास्त्रज्ञांच्या हे लक्षात आले की ती अवकाशातील वस्तू म्हणजे एक नवीन ग्रह आहे आणि तो त्याच्या कक्षेतून आपल्याच सूर्याभोवती भ्रमण करीत आहे.

प्राचीन काळी लोकांनी ग्रह शोधून काढले त्यानंतर बऱ्याच काळाने अठराव्या शतकात आपल्या सूर्यमालेत असलेल्या एका नव्या ग्रहाचा शोध लागला होता. नंतर खगोलशास्त्रज्ञांना हे लक्षात आले की त्यांना युरेनसने १६९० साली सुद्धा दर्शन दिले होते. पण त्यावेळी हा एक नवा ग्रह असू शकतो असे त्यांच्या लक्षातच आले नाही.

विल्यम हर्षेल ह्यांना पहिल्यांदा युरेनसचे अस्तित्व लक्षात आले. अवकाशात लांबवर अगदी मंद प्रकाश परावर्तित करणारी ही वस्तू म्हणजे युरेनस हा ग्रह आहे हे पहिल्यांदा त्यांच्याच लक्षात आले.

ह्या नव्या ग्रहाचे नाव सम्राट जॉर्ज तिसरे ह्यांच्या नावावरून जॉर्जियम सायडस असावे असा प्रस्ताव विल्यम हर्षेल ह्यांनी मांडला. पण ब्रिटनच्या बाहेरच्या लोकांना हे नाव अजिबातच रुचले नाही.

ह्यापेक्षा ग्रहांना नेहमीप्रमाणे प्राचीन देवतांचे नाव देण्याचीच पद्धत पाळावी असा सल्ला योहान एलर्ट बोड ह्या खगोलशास्त्रज्ञाने इतर खगोलशास्त्रज्ञांना दिला. आणि त्यांनी हा सल्ला विचारात घेऊन ह्या ग्रहाचे नामकरण युरेनस असे केले. युरेनस म्हणजे आकाशाचा देव होय.

 

urenus inmarathi
natgeokids.com

 

ग्रीक मायथॉलॉजीमधील सर्वात प्राचीन आणि पहिल्या देवांपैकी युरेनस ही अवकाशाची देवता म्हणून ओळखली जाते. ह्याच देवाच्या नावावरून ह्या नव्या ग्रहाला युरेनस हे नाव देण्यात आले. युरेनस ह्या देवाला फादर स्काय असेही म्हटले जाते.

फादर स्काय म्हणजेच युरेनस हा जिया म्हणजे मदर अर्थचा पती किंवा पुत्र असल्याचे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये सांगितले जाते.

हे नाव सम्राट जॉर्ज तिसरे ह्यांना आवडले. विल्यम हर्षेल ह्यांच्या ह्या शोधामुळे खुश होऊन त्याने हर्षेल ह्यांना नाईट ही पदवी दिली आणि त्यांची त्याच्या शाही दरबारात शाही खगोलशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केली. ह्यामुळे विल्यम हर्षेल ह्यांना नियमित वेतन मिळू लागले व त्यांची आर्थिक अडचण दूर झाली.

ते एका ठिकाणी संगीतकार म्हणून काम करीत होते ती नोकरी करण्याची त्यांची गरज संपली आणि ते त्यांचा पूर्ण वेळ अवकाशाचा अभ्यास करण्यात व्यतीत करू शकत होते.

त्यांनी त्यानंतर अवकाशाचा अभ्यास व निरीक्षण करताना गॅस जायंट्स म्हणजे वायुस्वरूपात असलेल्या ग्रहांच्या सभोवती असणारे अनेक चंद्र शोधून काढले. तसेच त्यांनी २५०० खगोलीय वस्तूंची सूची तयार केली. ह्या सूचीचा खगोलशास्त्रज्ञ अजूनही उपयोग करतात.

१९७७ साली खगोलशास्त्रज्ञांनी कुइपर एअरबॉर्न ऑबझर्व्हेटरीचा वापर करून आणखी एक महत्वाचा शोध लावला की युरेनस ह्या ग्रहाला शनीप्रमाणेच सभोवताली कडे आहे. आपल्या सूर्यमालेतील युरेनस हा कडे असणारा दुसरा ग्रह आहे.

 

williamherschel inmarathi
space.com

 

युरेनसच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन त्याची माहिती व्हॉएजर २ ह्या अंतराळयानाने आपल्याला २४ जानेवारी १९८६ रोजी पाठवली. व्हॉएजर २ हे अंतराळयान युरेनसच्या क्लाउडटॉप्सपासून ८१८०० किलोमीटर लांब इतक्या अंतरावर जाऊन पोहोचले आणि त्याने युरेनसची हजारो छायाचित्रे घेऊन पृथ्वीवर प्रसारित केली.

तसेच भरपूर प्रमाणात युरेनसची वैज्ञानिक माहिती आपल्याला पाठवली. ह्या मोहिमेमुळे युरेनसचे चंद्र, त्याच्या सभोवताली असलेले कडे, त्या ग्रहावर असलेले वातावरण, तसेच युरेनसच्या अवतीभवती व आत असलेले चुंबकीय वातावरण ह्या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळाली.

युरेनस हा आपल्या सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे. हा ग्रह बराचसा वायुस्वरूपात आहे. वस्तूमानांनुसार तो आपल्या सूर्यमालेतील तो चौथा मोठा ग्रह असून व्यासानुसार त्याचा तिसरा क्रमांक आहे.

हा ग्रह पृथ्वीपेक्षा ४ पटींनी मोठा आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ८४ वर्षे लागतात. पृथ्वीपासून त्याचे अंतर अंदाजे २. ६ अब्ज किमी आहे. व्हॉएजर २ हे यान १९७७ साली पृथ्वीवरून प्रक्षेपित करण्यात आले होते ते २४ जानेवारी १९८६ साली युरेनसच्या सर्वात जवळ पोहोचले होते. तेथून ते नेपच्यूनच्या प्रवासासाठी निघून गेले.

आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. ह्यापूर्वी ह्या ग्रहाला एक तारा समजले जाई. हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह मानला जातो.

त्याचे किमान तापमान -२२४ डिग्री सेल्सियस आहे. युरेनसच्या वरच्या भागातील वातावरणात मिथेन वायूचे दाट धुके आहे. त्यामुळे त्याच्या क्लाउड डेक्समध्ये जी मोठमोठी वादळे येतात ती दिसत नाहीत.

युरेनस हा अनेक प्रकारचे वायू आणि बर्फाचा बनलेला आहे. ह्याच्या अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजनची संयुगे आहेत तसेच काही भाग खडकाळ पदार्थांनी व्यापलेला आहे. युरेनसला २७ चंद्र आहेत. त्यातील मिरांडा, एरियल, ओबेरॉन, टायटॅनिया, अम्ब्रियल हे प्रमुख चंद्र आहेत.

ही नावे शेक्सपियर आणि अलेक्झांडर पोप ह्यांच्या कथानकांतील पात्रांच्या नावांवरून घेतली आहेत.

 

moon inmarathi
youtube.com

 

हा ग्रह इतर ग्रहांच्या तुलनेत उलट दिशेने भ्रमण करतो. इतर सर्व ग्रह अँटीक्लॉकवाईज फिरतात पण युरेनस मात्र क्लॉकवाईज फिरताना आपल्याला दिसतो. युरेनसचे सर्वात खास वैशिष्टय म्हणजे तो दर १७ तास , १४ मिनिटांनी त्याच्या अक्षावर फिरतो. म्हणजे त्याचा एक दिवस हा १७ तास १४ मिनिटांचा असतो.

ह्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रहाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे ह्या ग्रहाची ऍक्सिस ऑफ रोटेशन (अक्ष) ही एका बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे.

आपली पृथ्वी जी २३.४ डिग्रीला थोडीशी झुकलेली आहे तसा युरेनस हा ग्रह ९८ डिग्रीच्या ऍंगलला झुकलेला आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचे झाल्यास इतर ग्रह उभे आहेत तेव्हा युरेनस हा आडवा झोपलेला आहे.

इतर सर्व ग्रह हे उभ्याने किंवा किंचितसे झुकून स्वतःभोवती फिरत असताना सूर्याला प्रदक्षिणा घालत असतात तेव्हा युरेनस हा एखाद्या चेंडूप्रमाणे आडवा फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसतो. म्हणूनच जिथे इतर ग्रहांचे विषुववृत्त असते तिथे युरेनसचे उत्तर व दक्षिण ध्रुव असतात.

म्हणूनच युरेनसचे वर्णन करताना “rolling around the Sun on its side” असे म्हटले जाते. म्हणजे ह्याच्या सर्वच गोष्टी इतर ग्रहांपेक्षा उलट आहेत.

तर असा हा युरेनस ज्याला आपण हर्षल किंवा हिंदीत अरुण म्हणून ओळखतो हा एक अद्वितीय ग्रह आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?