' भारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” यांच्याबद्दल १० गोष्टी – InMarathi

भारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” यांच्याबद्दल १० गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या विविधरंगी भारतीय संस्कृतीत, सगळ्याच गोष्टींमध्ये विविधता आहे. हीच विविधता वाद्यांमध्येही बघायला मिळते.

युद्ध म्हटले की शंखनाद, तुतारी, श्रीकृष्णाची आठवण आली की त्याची प्राणप्रिय बासरी, महादेवाचा डमरू, लग्नकार्यातील वरातीत ढोलक, ढोल यांच्या तालावर आनंद साजरा करणे, मैफिलीत गायकाच्या साथीला असणारा तानपुरा, तबला, हार्मोनियम, आणि शुभकार्यात आवर्जून ऐकायला येणारे सनईचे सूर!

वाद्यांची एक भलीमोठी यादीच तयार करता येईल.

लग्न, मुंज, पूजा असं कुठलंही शुभकार्य असेल, तर ते सनईच्या सुरांशिवाय अपूर्ण वाटतं. दिवाळीच्या मंगल पहाटे सुद्धा, अभ्यंगस्नानाच्या जोडीला सनईचे स्वर असतात.

सनईचे मंजुळ सूर, वातावरण मंगल करतात. वातावरणात पवित्र आणि आनंदी लहरी तयार करतात. सनई म्हटली, की आपल्याला आठवण होते फक्त आणि फक्त उस्ताद बिस्मिल्ला खान यांची!

सनई आणि उस्ताद बिस्मिल्ला खान हे समीकरण आपल्या मनात इतकं पक्कं बसलं आहे, की सामान्य माणसाला इतर कुठले सनईवादक आठवतच नाहीत.

 

bismillah khan inmarathi
thasianage.com

 

आज आपण शहनाई सम्राट उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तब्बल आठ दशके, सनईचे मंगल सूर आळवून, त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मंगल कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्या संगीतसेवेसाठी त्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मंचावरदेखील सन्मान करण्यात आला आहे.

२००१ साली त्यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या १०२व्या वाढदिवसाला गुगलने त्यांचे डुडल करून त्यांचा सन्मान केला.

१) उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म, २१ मार्च १९१६ रोजी, बिहार राज्यातील, बक्सर जिल्ह्यातील, डुमराव या गावी झाला. त्यांचे मूळ नाव कमरुद्दीन खान असे होते.

त्यांच्या कुटुंबात संगीताचे वातावरण होते. त्यामुळे त्यांच्याकडे संगीताचा वारसा चालत आला, असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या वडिलांचे नाव पैगंबर बक्श खान होते तर त्यांच्या आईचे नाव मीठ्ठन होते.

बिस्मिल्ला खान यांचे वडील, बिहारच्या डुमराव संस्थानाचे महाराज केशव प्रसाद सिंग, यांच्या दरबारी, शाही संगीतकार म्हणून सेवा करीत होते. त्यांचे आजोबा उस्ताद सालार हुसैन खान आणि रसूल बक्श खान हेसुद्धा डुमराव महालात संगीतकार होते.

 

ustad inmarathi
india.com

 

मोठ्या मुलाचे नाव शमसुद्दीन, म्हणून त्यांचे नाव कमरुद्दीन असे ठेवण्यात आले. त्यांचा जन्म झाल्यानंतर, रसूल बक्श खान या त्यांच्या आजोबांनी बिस्मिल्लाह हा शब्द उच्चारला होता.

त्यांचे आजोबादेखील सनईवादक होते. म्हणून उस्तादजींचे नाव बिस्मिल्ला असे पडले, असं म्हणतात.

सहा वर्षांचे असताना, ते वाराणसी येथे, त्यांच्या मामांकडे शिक्षणासाठी गेले. त्यांचे मामा अली बक्श विलायतु खान हेदेखील सनईवादक होते. ते काशी-विश्वनाथाच्या देवळात सनईवादन करत असत. १९३२ साली, वयाच्या सोळाव्या वर्षी, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा विवाह झाला.

भारतीय शास्त्रीय संगीतात, आणि जगभरात, सनई या वाद्याला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान कार्य, उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी केले.

१९३७ साली, कलकत्ता येथे झालेल्या, इंडियन म्युझिक कॉन्सर्टमध्ये त्यांनी अप्रतिम सनईवादन केले. या सादरीकरणामुळे, सनईला भारतीय संगीतात महत्वाचे स्थान मिळाले.

सनईवर तर त्यांचाच एकाधिकार असल्याचे कुणीही अमान्य करणार नाही. उस्ताद बिस्मिल्ला खान आणि शहनाई, हे जणू समानार्थी शब्दच असल्यासारखे त्यांचे सनईशी नाते होते.

पूर्वी फक्त लग्नकार्यात वाजवण्यात येणाऱ्या या वाद्याला, बिस्मिल्ला खान यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व मिळवून दिले.

२) उस्ताद बिस्मिल्ला खान लहानपणापासूनच सनई वादनाच्या कार्यक्रमांना जात असत. मात्र, त्यांच्या धार्मिक श्रद्धा त्यांच्या मार्गात अडथळा आणत होत्या. ते जन्माने शिया मुसलमान होते. त्यांच्या धर्मात संगीत वर्ज्य आहे.

 

islam-marathipizza00

 

शिया पंथीय मुसलमान, संगीताला हराम मानतात पण उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सरस्वतीदेवीची उपासना सुरु केली. त्यांना त्यांच्या नमाझात सात स्वर प्राप्त करायचे होते, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.

‘जगाचा अंत झाला तरी संगीत कधीच नष्ट होणार नाही’ असं ते नेहमी म्हणत असत. संगीताला कुठलाही धर्म, जात नसते, असे त्यांचे म्हणणे होते.

३) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, १९४७ साली लाल किल्ल्यावर सनईवादन करण्यासाठी, उस्ताद बिस्मिल्ला खान यांना आमंत्रण दिले होते. ही दुर्मिळ संधी फार थोड्या लोकांना मिळाली आहे.

 

bismillah inmarathi
dentalindia.com

 

४) उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी, फक्त भारतीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा सनईवादन केले आहे. देशविदेशातील रसिकांचे कान तृप्त केले आहेत.

त्यांनी कान्स आर्ट फेस्टिव्हल, ओसाका ट्रेंड फेअर आणि मॉन्ट्रिअल येथील वर्ल्ड एक्सपोझीशन मध्ये सनईवादन केले आहे.

५) त्यांनी अनेक चित्रपटांसाठी देखील सनईवादन केले आहे. १९५९ सालचा “गूंज उठी शहनाई” हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘स्वदेस’ सिनेमामधील, सनईची जी प्रसिद्ध धून आपल्याला सर्वांनाच नेहमी आठवते, ती उस्ताद बिस्मिल्ला खान यांचीच आहे.

 

 

६) उस्ताद बिस्मिल्ला खान यांना २००१ साली भारतरत्न, १९८० साली पद्मविभूषण , १९६८ साली पद्मभूषण आणि १९६१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

७) उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कुटुंब मोठे आहे. त्यांना पाच मुली, तीन मुले आणि अनेक नातवंडे आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका, डॉक्टर सोमा घोष या उस्तादजींच्या मानसकन्या आहेत.

८) बिस्मिल्ला खान यांनी कधीही, कुणालाही त्यांचा शिष्य करून घेतले नाही. ‘शिष्यांना देण्याइतके संगीताचे ज्ञान अद्याप माझ्याकडे नाही’, असं त्यांचं म्हणणं होतं.

ते संगीताचे जे ज्ञान देऊ शकतील, ते शिष्यांसाठी पुरेसे नाही असेही ते म्हणत असत. त्यांचे पुत्र नाझीम हुसैन आणि नय्यर हुसैन, या दोघांव्यतिरिक्त इतर कुणालाही, त्यांनी त्यांच्याकडील संगीतकलेचे शिक्षण दिले नाही.

९) इतके महान कार्य करून, अमाप प्रसिद्धी आणि कीर्ती मिळवून देखील, त्यांना कसलाही गर्व नव्हता. अनेक पुरस्कार मिळवलेला हा महान माणूस, अगदी साधे आयुष्य जगत असे.

वरणभाताचे साधे जेवण, ते जेवत असत. प्रतिभावंत असूनदेखील ते कायम सायकलरिक्षाने प्रवास करीत असत. त्यांना कधीही महागड्या गाड्यांचे, किंवा ऐषोरामाचे इतर उंची शौक नव्हते.

 

bismillah-khan-inmarathi
india.com

 

१०) त्यांची सनई ही त्यांची जीवनसंगिनीच होती. ते सनईला बेगम म्हणत असत. यातून त्यांचे सनईवरील प्रेम आणि मिश्किल स्वभाव दिसून येतो. २१ ऑगस्ट २००६ रोजी, वाराणसी येथे, वृद्धापकालाने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर त्यांची आवडती सनई सुद्धा त्यांच्या जवळ ठेवण्यात आलेली आहे. त्यांच्याबरोबरच त्यांची सनई सुद्धा वाराणसीत दफन करण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी, भारतीय सेनेकडून त्यांना २१ फैरींची सलामी देण्यात आली होती.

 

भारतीयांचे शुभकार्य मंगलमय करणाऱ्या, आणि सनईचे सूर जगभरात प्रसिद्ध करणाऱ्या या शहनाईसम्राटाला विनम्र अभिवादन!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?