' १५ व्या शतकातील ह्या सम्राटाने लढण्यासाठी चक्क तृतीयपंथींची फौज ठेवली होती! – InMarathi

१५ व्या शतकातील ह्या सम्राटाने लढण्यासाठी चक्क तृतीयपंथींची फौज ठेवली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल आणि प्राचीन काळातील राजे-राजवटींच्या काळातील गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चीन चा इतिहास आवर्जून अभ्यासा!

चीनचा इतिहास हा इतक्या विचित्र आणि विक्षिप्त गोष्टींनी भरलेला आहे की वाचताना चेहऱ्यावर केवळ कुतुहलाचेच भाव असतात.

चीनच्या इतिहासामध्ये जेवढे राजे झाले त्यांनी जगाच्या इतिहासामध्ये आपलं एक वेगळ स्थान निर्माण केलंय. त्यांची स्वत:ची अशी एक ओळख आहे. काही राजे शूर होते, काही प्रेमळ होते तर काही अगदीच वेडे आणि विक्षिप्त होते.

चीनच्या इतिहासामधील असाच एक वेडा सम्राट म्हणजे चीनचा सम्राट झेंगडे होय!

 

king-zhengde-marathipizza00

स्रोत

सम्राट झेंगडे याचे मूळ नाव होते झु होझाओ! २६ ऑक्टोंबर १४९१ रोजी प्रसिद्ध मिंग साम्राज्यात त्याचा जन्म झाला.

त्याच्या वडिलांची संपूर्ण चीन साम्राज्यावर सत्ता होती. स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण चीन आपल्या कवेत घेतला होता.

अश्या या शूर राज्याचा अकस्मात मृत्यू झाला आणि अवघ्या १४ वर्षांचा त्याचा मुलगा झु हा गादीवर बसला आणि चीनचा सम्राट झाला. झु हा काही लहानपणापासून विक्षिप्त नव्हता. तो सर्वच बाबतीत हुशार होता.

विशेष करून धर्मशास्त्रामध्ये तो पारंगत होता. पण सत्त्तेची धुंदी भल्याभल्या विद्वानांना नादी लावते आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट करते हे काही उगाचचं म्हटले जात नाही. झु सोबत देखील तसेच काहीसे झाले.

मदिरा आणि मदिराक्षी यांच्या सहवासात तो स्वत:चे सम्राटपद विसरून गेला. जनानखाण्यात त्याने इतक्या वेश्या ठेवल्या होत्या की, हळूहळू जागा अपुरी पडू लागली. त्याला प्रत्येकीकडे जातीने लक्ष देता येईना. त्यामुळे अनेक जणींची उपासमार व्हायची.त्यामुळे काही जणींना मृत्यूने गाठले.

एकदा तर जनानखान्याला भलीमोठी आग लागली. अनेक स्त्रिया त्यात गुदमरून मृत पावल्या. ही आग सम्राज्ञीच्या आदेशावरून लावली गेल्याचे बोलले जाते. परंतु सम्राट झेंगडेला या गोष्टींची काहीही फिकीर नव्हती.

सम्राट झेंगडे हा जनानखान्यातून क्वचितच बाहेर यायचा. त्याचा दरबार हा जनानखान्यातच भरला जायचा असे म्हटले तरी वावगे ठरू नये. तेथूनच तो प्रजेबद्दलचे आणि राज्याबद्दलचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा.

निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत करण्याच्या भानगडीत तो कधीही पडायचा नाही. कोणताही प्रश्न सेकंदात सोडवायचा आणि त्यावर निर्णय देण्यात त्याचा हातखंडा होता.

अर्थातच बहुतांश निर्णयाचा त्याला फटका बसला परंतु काही निर्णय मात्र त्याच्या चांगलेच पथ्थावर पडले.

सम्राट झेंगडेला शिकारीचा देखील नाद होता. पण शिकार करण्यासाठी जंगलात जाणे त्याला कंटाळवाणे वाटे, म्हणून त्याने राजमहालातच अनेक श्वापदे आणून ठेवली होती.

लहर आली की तो त्यांना पिंजऱ्याबाहेर सोडण्याचे आदेश द्यायचा आणि त्यांचा जीव घेऊन शिकार केल्याचा आनंद मिळवायचा.

सम्राट झेंगडेच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नव्हतं. अचानक या सम्राटाला तृतीयपंथी लोकांबाबत कळवला वाटू लागला. चीनमधीलच नाही तर विदेशातील तृतीयपंथीयांना देखील आपल्या साम्राज्यात येण्याचे आमंत्रण त्याने पाठवले आणि त्यांची एक फौज बनवून त्यांना आपल्या सेवेत ठेवून घेतले.

त्याने आठ तृतीयपंथी लोकांची निवड केली आणि त्यांची एक सल्लागार समिती स्थापन केली.

या आठ जणांना ‘एट टायगर्स’ म्हटले जायचे. त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचे तो पालन करायचा. सम्राटाने त्यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल केला होता.

या अधिकाराचा एट टायगर्सने बराच गैरफायदा घेतला.

या गटाचा प्रमुख होता ‘लिऊ जीन’! सम्राट झेंगडेच्या अतिशय मर्जीतला माणूस म्हणून सगळे त्यांना घाबरून असायचे. हा लिऊ जीन वाटायचा तितका साधा नव्हता.

सम्राट झेंगडेची हत्या करून आपल्या भावाच्या नातवाला गादीवर बसवायचे आणि संपूर्ण राज्य आपल्या हाती घ्यायचे असा कट त्याने रचला. पण एट टायगर्स पैकी कोणा एकाला लिऊ जीनचे हे कट कारस्थान कळले आणि त्याने थेट सम्राट झेंगडेला या कटाबद्दल सांगितले.

 

king-zhengde-marathipizza01

स्रोत

 

हे ऐकून सम्राट झेंगडेची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने लिऊ जीनची चौकशी करण्याचे आदेश दिले. लिऊ जीनने घाबरून आपला गुन्हा कबूल केला.

अर्थातच सम्राट झेंगडे हा काही मृदु मनाचा नव्हता, त्याने लिऊ जीनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. १५१० साली लिऊ जीनला प्रजेसमोर ठार मारण्यात आले.

या घटनेनंतर तरी सम्राट झेंगडे बदलतील अशी दरबारातील काही एकनिष्ठ लोकांना आशा होती. परंतु सम्राट झेंगडेच्या स्वभावात काहीही बदल झाला नाही. त्याने विनाकारण सभोवतालच्या राज्यांवर आक्रमणे केली.

सम्राट झेंगडेच्या या स्वभावामुळे त्याच्याबद्दल इतर साम्राज्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. प्रजा देखील सम्राटाच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळली होती. अनागोंदीच्या या वातावरणाचा हिजड्यांच्या फौजांनी बराच फायदा घेतला. त्यांनी सम्राट झेंगडेचे साम्राज्य अगदी धुळीला मिळवून टाकले.

मिंग साम्राज्य अस्ताच्या उंबरठ्यावर उभे होते. अचानक २० एप्रिल १५२१ रोजी सम्राट झेंगडे नाहीसा झाला. सगळीकडे त्याची शोधाशोध सुरु झाली. तेव्हा महाला जवळच्या एका तलावात त्याचे मृत शरीर आढळले.

सम्राट झेंगडेची हत्या कोणी केली याचे सत्य शेवटपर्यंत गुलदस्त्यातचं राहिले. त्याच्या विश्वासातल्या तृतीयपंथी लोकांनीच संपत्तीच्या लोभापायी त्याचा काटा काढला अशी कुजबुज सुरु होती. परंतु ठोस असे काही निष्पन्न होऊ शकले नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?