' पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यामागचं खरं कारण 'हे' आहे..

पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यामागचं खरं कारण ‘हे’ आहे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे स्पष्ट केले की पाकिस्तानवर केलेल्या कारवाईदरम्यान २७ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताचे एक मिग २१ विमान कोसळले आणि भारतीय वायुसेनेतील एक पायलट पाकिस्तानच्या हद्दीत उतरला.

ह्या सगळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण सगळ्यांनीच बघितले आहेत.

हे व्हिडीओ सगळीकडे पाकिस्तानमुळे व्हायरल झाले. आमच्या जखमी पायलटचे असे व्हिडीओ सगळीकडे प्रसिद्ध करणे थांबवा. हे असे व्हिडीओ प्रसारित करणे हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा आणि जिनेव्हा कन्वेंशनच्या नियमांच्या उल्लंघन आहे अशी स्पष्ट समज भारतातर्फे देण्यात आली.

हे व्हिडीओ बघितल्यावर सर्वांनाच विंग कमांडर अभिनंदन ह्यांची चिंता वाटू लागली. पाकिस्तानचा क्रौर्याचा आणि हलकटपणाचा इतिहास बघता ते आपल्या विंग कमांडर अभिनंदन ह्यांना त्रास देणार ह्याची सर्वांना भीती होती.

जिनिव्हा कन्व्हेंशननुसार त्यांच्या ताब्यात असताना आपल्या पायलटला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची चांगली काळजी घेणे पाकला बंधनकारक होते.

 

geneva-convention-inmarathi
history.com

तसेच विंग कमांडर अभिनंदन ह्यांना ताबडतोब सुरक्षितपणे भारतात परत पाठवण्यात यावे अशी भारताची मागणी होती. ती मागणीही पाकिस्तानने मान्य केली आणि इम्रान खान यांनी अभिनंदन यांना परत पाठवणार असल्याचे सांगितले.

पण त्यांच्या हद्दीत गेलेल्या आणि शत्रूच्या ताब्यात असलेल्या आपल्या सशस्त्र दलातील व्यक्तींना परत आणण्याची प्रक्रिया काय आहे? ह्यासाठी जिनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये पुढील मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.

जिनिव्हा कन्व्हेंशन म्हणजे १८६४ ते १९४९ ह्या सालांदरम्यान झालेली करारमालिका होय. ह्यातील शेवटचा करार जिनिव्हा मध्ये झाला म्हणून ह्या कराराला जिनिव्हा कन्व्हेंशन असे म्हणतात. युद्धाचे सामान्य नागरिक व सैनिकांवर गंभीर परिणाम होऊ नयेत किंवा त्रास होऊ नये म्हणून हे करार केले गेले.

रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनन्ट ह्यांनी १८६४ साली झालेल्या युद्धाच्या वेळी जखमींना मदत करण्यासाठी वाटाघाटी केल्यामुळे हे करार करण्यात आले

एकूण चार जिनिव्हा कन्व्हेन्शन्स आहेत. त्यातील तिसऱ्या जिनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये युद्धकैद्यांबद्दल मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.ह्यात कुणाला युद्धकैदी समजण्यात यावे आणि त्यांना कशी वागणूक मिळावी व त्यांना कुठल्या प्रकारची वागणूक देण्यात येऊ नये ह्याबद्दलचे नियम देण्यात आले आहेत.

पहिल्या जिनिव्हा कन्व्हेन्शन मध्ये आजारी किंवा जखमी सैनिकांना पकडण्यापासून संरक्षण, तसेच आजारी व जखमी सैनिकांना उपचार ह्याबद्दल नियम आहेत.

 

wounded-soldier-inmarathi
wordsarework.com

दुसऱ्या जिनिव्हा कन्व्हेंशनमध्ये सर्व सैनिकांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता चांगली व समान वागणूक देणे ह्याबद्दल नियम आहेत.

तिसऱ्या जिनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांचे संरक्षण ह्याबाबतीत नियम आहेत आणि चवथ्या जिनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये रेड क्रॉसच्या चिन्हाचा उपयोग माणसांना ओळखण्यासाठी व रेड क्रॉसच्या उपकरणांची ओळख पटवण्यासाठी करणे ह्याबाबत नियम आहेत.

तिसऱ्या जिनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये युद्धकैद्यांना विस्तृत संरक्षण देण्यात आले आहे. युद्धकैद्यांच्या हक्कांबाबत ह्यात विस्तृतपणे माहिती देण्यात आली आहे.

तसेच त्यांना सोडून देण्याबाबत माहिती व ते ताब्यात असताना त्यांना देण्यात येणारी वागणूक ह्याबाबत विस्तृतपणे नियमावली देण्यात आली आहे. युद्धकैदी ही संज्ञा सुद्धा ह्यात स्पष्ट केली आहे.

आंतरराष्ट्रीय युद्धादरम्यान पकडल्या गेलेल्या सैनिकांनाच युद्धबंदी किंवा युद्धकैदी ही संज्ञा लागू पडते.

जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या नियमांप्रमाणे युद्धकैद्यांनी शत्रूवर थेट कारवाई केलेली असली तरी त्या गुन्ह्याअंतर्गत शत्रूराष्ट्र त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. त्यांना फक्त ह्यासाठी त्याब्यात घेण्याची परवानगी असते की त्यांना अधिक कारवाई करता येऊ नये. त्यां

ना शिक्षा म्हणून शत्रू डांबून ठेवू शकत नाही. युद्ध संपल्यानंतर लगेच ह्या युद्धकैद्यांना सोडून देण्यात यावे असा नियम आहे.

 

pow-inmarathi
scientificamerican.com

शत्रू देश त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर युद्धादरम्यान घडलेल्या गुन्ह्यांसाठी कारवाई करू शकतो पण जी कृत्ये आंतरराष्ट्रीय मानवता कायद्याअंतर्गत कायद्याने करण्यास परवानगी आहे त्या कृत्यांसाठी शत्रू देश युद्धकैद्यांवर कारवाई करू शकत नाही. युद्धकैद्यांना कुठल्याही परिस्थिती अमानवी वागणूक दिली जाऊ नये.

त्यांना मानवतापूर्ण वागणूकच दिली जावी. ह्या कायद्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून संरक्षण आहे. तसेच ह्या कायद्यानुसार त्यांना धमकावणे, त्यांचा अपमान करणे व त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे ह्यापासून सुद्धा युद्धकैद्यांना संरक्षण देण्यात आले आहे.

सध्याच्या परिस्थतीत ह्या कराराचा आपल्याला कसा फायदा झाला?

हे १८६४ सालचे कन्व्हेन्शन जवळजवळ तीनच वर्षांत जवळपास सगळ्याच मोठ्या युरोपियन राष्ट्रांनी स्वीकारले. १९०६ साली १८६४ सालच्या कन्व्हेन्शनमध्ये काही सुधारणा करण्यात आला आणि त्यात दुसरे जिनिव्हा कन्व्हेन्शन समाविष्ट करण्यात आले.

ह्या कायद्यानुसार नौसेनेच्या सर्व सैनिकांना व समुद्री वाहतूक करणाऱ्यांसाठी हा कायदा लागू होईल ह्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

तिसऱ्या जिनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये युद्धकैद्यांना मानवतेची वागणूक देणे, त्यांच्याबद्दल माहिती देणे आणि तटस्थ राष्ट्रांच्या प्रतिनिधींना जेल कॅम्पला अधिकृतपणे भेट देण्याची परवानगी देणे हे बंधनकारक करण्यात आले.

१९२९ साली जे युद्ध झाले त्यात युद्धकैद्यांच्या उपचारांसाठी हा करार केला गेला म्हणून त्याच नावाने हा करार ओळखला जातो.

 

geneva-logo-inmarathi
indiatoday.com

ह्या कायद्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे की युद्धकैद्यांना मानवतेची वागणूक, पुरेसे अन्न देणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शत्रूराष्ट्रांना युद्धकैद्यांकडून जरुरीपेक्षा जास्त माहिती काढून घेण्यासाठी त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव आणण्यास ह्या कायद्याअंतर्गत मज्जाव आहे.

१२ ऑगस्ट १९४९ रोजी ह्या चार कन्व्हेन्शन्सना जिनिव्हामध्ये मान्यता देण्यात आली. १९७७ साली ह्या कायद्याअंतर्गत सैनिकांसह सामान्य नागरिकांनाही संरक्षण मिळावे ह्यावर शिक्कामोर्तब झाले. ह्यासाठी रेड क्रॉसने वाटाघाटी केली.

आपले अभिनंदन वर्थमान हे युद्धबंदी आहेत का?

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान ह्यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालय व पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा युद्धकैदी असे संबोधले नाही. परंतु जिनेव्हाच्या तिसऱ्या कन्व्हेशनप्रमाणे हे कन्व्हेंशन घोषित युद्ध किंवा इतर कोणत्याही सशस्त्र लढ्यात लागू होते.

ज्या दोन किंवा त्याहून अधिक स्वाक्षरीकर्त्यांत ही युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल ,त्यातल्या एकाने जरी युद्ध मान्य केले नसले तरीही त्याला ह्या जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे.

जर आपल्या वायुसेनेच्या वैमानिकाला अधिकृतपणे युद्धकैदी म्हणून घोषित करण्यात आले तर त्याला सुरक्षितपणे परत भारताच्या हवाली करणे हे तिसऱ्या जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या आर्टिकल ११८ अंतर्गत पाकिस्तानला बंधनकारक आहे.

 

abhinandan-inmarathi
dainikbhaskar.com

त्या वैमानिकाची जर तात्काळ सुटका करण्यात आली नाही आणि काहीही कारण स्पष्ट न करता त्यात विलंब झाला किंवा त्याचा अमानवी छळ झाला किंवा त्याला अमानवी पद्धतीने वागणूक देण्यात आली तर तर ते ह्या कन्व्हेन्शनचे उल्लंघन ठरेल.जी अत्यंत गंभीर बाब आहे.

ह्यापूर्वी सुद्धा कारगिल युद्धाच्या वेळी फ्लाईट लेफ्टनन्ट नचिकेता ह्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. नचिकेता ह्यांचे मिग २७ हे विमान युद्ध कारवाई दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले होते.

फ्लाईट लेफ्टनन्ट नचिकेता ह्यांना पाकिस्तानने २७ मी १९९९ रोजी ताब्यात घेतले आणि एक आठवडा त्यांच्या कस्टडीत ठेवून नंतर ३ जून १९९९ रोजी त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.

त्यामुळे आपल्या विंग कमांडर अभिनंदन ह्यांची सुटका करणे पाकिस्तानला भाग होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला गेला तर ते पाकिस्तानकडून नियमांचे उल्लंघन ठरले असते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?