' सलील कुलकर्णी : मराठी संगीताला श्रीमंत करणारा कलाकार – InMarathi

सलील कुलकर्णी : मराठी संगीताला श्रीमंत करणारा कलाकार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मराठी संगीत विश्व पूर्वीपासूनच श्रीमंत आहे. मोठ मोठे महान संगीतकार पूर्वीही होऊन गेले आणि नव्या पिढीत सुद्धा उत्तमोत्तम संगीतकारांनी मराठी संगीतविश्वास मोलाची भर घातली आहे. नवनवे प्रयोग करून, आधुनिक तंत्राचा वापर करून हे ताज्या दमाचे नवे संगीतकार मराठी संगीतविश्व दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध करीत आहेत.

काही वर्षांपुर्वी अश्याच एका जोडीने तरुणांच्या मनावर मोहिनी घातली ती अजूनही कायम आहे. त्यांच्या गाण्यांनी तरुणांच्या भावना अगदी नेमकेपणाने मांडल्या आणि “आयुष्यावर बोलू काही” म्हणत ते अजूनही सुंदर सुंदर रचना देत आहेत आणि रसिकांची व संगीताची सेवा करीत आहेत.

आपण बोलत आहोत ते कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी ह्यांच्याविषयी.

 

Dr_Saleel_Kulkarni-inmarathi
wikipedia

 

महाराष्ट्रात असे फार कमी लोक असतील ज्यांनी सलील कुलकर्णी ह्यांच्या रचना ऐकल्या नसतील. त्यांच्या साध्या, सोप्या, गोड आणि मनाला भावणाऱ्या रचना ऐकून मनाची मरगळ दूर होते. मनात उत्साह संचारतो.

त्यांच्या काही रचना तर खूप प्रेरणादायी आहेत. विश्वास नसेल बसत तर त्यांची “व्यर्थ हे सारेच टाहो” ही रचना ऐकून बघा..

ह्या गाण्याचे संगीत संदीप खरेंच्या काव्याला अगदी योग्य न्याय देते. ह्या गाण्याचे शब्द जितके प्रभावी आहेत तितकेच ह्या गाण्याचे संगीत देखील आपल्या हृदयाला भिडते.

अंगावर रोमांच उभे राहतात. आणि त्या महापुरुषांसारखे आपणही काहीतरी करून दाखवावे असा विचार नक्कीच मनात येतो.

ज्या व्यक्तीचे लक्ष गाण्याच्या शब्दांबरोबरच त्याच्या संगीताकडे देखील असते, त्या व्यक्तीला हे गाणे आवडणार नाही असे होणार नाही. आजच्या प्रत्येक मराठी संगीतप्रेमी तरुणांच्या संग्रही सलील कुलकर्णी ह्यांचा अल्बम असतोच. कारण ते सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतात.

त्यांच्या रचना ऐकल्या तर तर त्या आपल्या मनात कायमच्या जाऊन बसतात. ह्याचे कारण असे आहे की, रसिकांच्या मनांची संवेदनशीलता, तरलता आणि त्यांच्या मनातील भाव सलील कुलकर्णींनी अचूक हेरले आहेत.

संदीप खरेंचे सुंदर आणि थेट मनाला भिडणारे शब्द आणि त्याला सोनेरी कोंदण देणारे सलिलजींचे संगीत हा एक अमूल्य ठेवा ह्या दोघांनीही मिळून रसिक कानसेनांना दिला आहे.

 

sandip-inmarathi
lyrics.com

 

साधी,सोपी सरळ चाल आणि तरल भाव ह्यांचा अचूक मेळ साधत सलीलजी आपल्या मनातील भावना त्यांच्या संगीतातून उलगडत जातात. आता तरुण हळव्या चंचल मनाचे वर्णन असलेल्या ह्या कवितेचेच बघा ना,

“मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यांत

मन नाजुकशी मोतीमाळ, तुझ्या नाजुकश्या गळ्यात”

हे गाणं ऐकताना एक हळव्या मनाचा प्रियकर त्याच्या गोड, सुंदर प्रेयसीचे वर्णन करतोय आणि त्याच्या मनाचे हिंदोळे तिच्यापुढे व्यक्त करतोय असे दृश्य आपल्यापुढे उभे राहते की नाही?

ह्या गाण्याची चालच किती गोड आणि हळुवार आहे. मन तळ्यात नंतरचा पॉझ आणि मळ्यात नंतरचा पॉझ खरंच तळ्यात मळ्यात विचार करणाऱ्या मनाची अवस्था सांगतो.

त्यासाठी अर्थात गाणं मन लावून ऐकायला हवं. तरच त्यातले दृश्य आपल्या डोळ्यापुढे उभे राहते.

सलिलजींचे संगीत खूप वैविध्यपूर्ण आहे ह्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या “अल्कोहोल” ह्या गाण्यात येते.

 

 

“खुदा ने कहा है, बंदे तेरे खाने का जिम्मा मेरे सर पर है…

लेकिन पीने के बारे में उसने कुछ नही का, सो पीने की जिम्मेदारी मैने ही ले ली।”

अशी बिनधास्त सुरुवात करून “रात्रीच्या उदरात उदासीन तळमळणारे अल्कोहोल” अशी गाण्याची सुरुवात होते. प्रेमवीराची सोबत करणाऱ्या आणि त्याचे मन हलके करणाऱ्या मदिरेबद्दल तितक्याच बिनधास्त आणि आजच्या युवापिढीच्या “रिमिक्स” ढंगाच्या बिनधास्त चालीत बांधलेल्या ह्या गाण्यामुळे ऐकणाऱ्याला “मदिरा” न पिताच झिंग चढल्याचा अनुभव येतो. एकीकडे

“मी त्या पितो! ते मज पिते! दोघांमध्ये खेच सुरू…

पुरून उरूनी थडग्यापाशी भळभळणारे अल्कोहोल!” असे म्हणत मलंग आयुष्य जगणाऱ्या तरुणाला आपल्यापुढे उभे करतानाच सलीलजी त्यांच्या

“सांग सख्या रे आहे का ती, अजून तैशीच गर्द राईपरी..

सांग अजूनही तैशीच का ती अस्मानीच्या निळाईपरी..” असे हळुवार भाव जपणाऱ्या प्रियकराशी सुद्धा आपली ओळख करून देतात. ह्यातील संगीत ऐकले तर खरेच डोळ्यापुढे “नितळ ,निळ्या” आभाळाचे चित्र उभे राहते.

त्या “सयेचे” काल्पनिक चित्र डोळ्यापुढे येते. ज्यांची कहाणी खरंच दुर्दैवाने काही करणारे “अधुरी” राहिली ते आपल्या जिवाभावाच्या सख्याकडे आपल्या “सये”विषयी चौकशी करताना ज्या हळुवारपणे करतील, ते भाव ह्या गाण्यात सलीलजींनी अचूक टिपले आहेत.

 

 

आपल्या सयेपासून लांब “दूरच्या गावात” जाताना सखीला माझी आठवण तुला येईल ना” हे विचारताना तितक्याच मधुर भावनेने विचारणारा प्रियकर

‘कसे सरतील सये ,माझ्याविना दिस तुझे ,सरताना आणि सांग सलतील ना..

गुलाबांची फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर, मुसुमुसु पाणी सांग भरतील ना …भरतील ना..”

ह्या गाण्यातून आपल्याला दिसतो. हे गाणे तर महाराष्ट्रातील तमाम तरुणांनी त्यावेळी असंख्य वेळा लूप वर टाकून ऐकले असेल ह्यात शंका नाही. जितके सुंदर शब्द तितकीच सुंदर चाल आणि मधले म्युझिकपीस तर निव्वळ अप्रतिम!

इतके हळुवार, गोड प्रेमगीत देणारे सलीलजी सामान्य तरुणाचे रोजचे कंटाळवाणे चाकोरीबद्ध आयुष्य आपल्यापुढे उभे करतात ते ह्या गाण्यातून…

“आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो,

चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो..”

 

 

हे गाणे ऐकल्यावर आपल्याला आपलेही रटाळ आयुष्य डोळ्यापुढे दिसते. सरळ सोपी चाल, कुठलेही कठीण आलाप, ताना नाहीत. वाद्यांचा बडेजाव नाही, आधुनिक तंत्राची भाऊगर्दी नाही.. सरळ सोपे आयुष्य जगणाऱ्या माणसासारखी ही सरळ सोपी चाल आहे.

अगदी कुणालाही आवडीने गुणगुणता येईल अशी ही चाल.. खरे तर सलीलजी बहुतेकवेळा असेच संगीत देतात जे सामान्य लोकांना आवडेल, त्यांना आपले वाटेल.

सर्वसामान्य, संगीत न शिकलेल्या व्यक्तीलाही आवडले तर पटकन गुणगुणता येईल असे सलीलजींचे संगीत असते.

ह्याच गाण्यात पुढे हा रोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर न पडता येणारा तरुण आपली व्यथा सांगतो. ह्या तरुणाला त्याच्या ठरलेल्या चाकोरीतून बाहेर पडता येत नाही.

तो त्यातच अडकून पडला आहे. त्यामुळे त्याला एकूणच सगळ्याचाच कंटाळा आला आहे. त्याचे मन सुद्धा बधिर झाले आहे.

 

salil-inmarathi

 

“व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे

उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे

ह्या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला

मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला

बधिरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो”

हे गाणे ऐकल्यावर खरंच सामान्य माणसाला आपलेच आयुष्य पुढे दिसू लागते. सलीलजींच्या गाण्यांची हीच सिम्पल बट स्वीट शैली रसिकांच्या मनाला भावते.

प्रेयसी आपल्यापासून दूर जाताना प्रियकराच्या मनात ज्या भावना दाटून येतात त्या “हे भलते अवघड असते” ह्या गाण्यातून आपण त्याच्या मनाची अवस्था समजून घेऊ शकतो.

तर “जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,अन वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर” ह्या गाण्यातून एक क्रांतिकारी, व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून उठणारा तरुण आपल्याला दिसतो.

तर कुणाची साथ मिळाली नाही म्हणून निराश झालेल्या तरुणाच्या मनातली व्यथा सलीलजी “दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही”ह्या गाण्यातून आपल्यापुढे मांडतात.

त्यांच्या “नसतेस घरी तू जेव्हा” ह्या गाण्यातून तर खरंच जगातल्या सर्व नवऱ्यांच्या मनात असलेल्या आपल्या बायकोविषयीच्या भावना किती सुरेखरित्या मांडल्या आहेत.

तर एक मित्र व मैत्रीण ह्यांच्यातील सुंदर ,नाजूक नाते “तुझे नी माझे नाते काय” ह्या गाण्यात उलडताना आपल्याला दिसते. ह्या गाण्याचे संगीत तर अप्रतिम आहे.

 

Kulkarni-inmarathi
Djmarathi.com

 

शब्दांना इतके मॅचिंग संगीत क्वचितच निर्माण होते ती किमया सलीलजी वारंवार करून दाखवतात.

सलीलजींच्या संगीतातून आपल्याला निसर्ग सुद्धा भेटतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर

“दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर,

निळेनिळे गारगार पावसाचे घरदार ..

सरीवर सर… ” हे गाणे मन लावून ऐकून बघा..

 

marathi-inmarathi
marathishow.blogspot.com

 

ह्या गाण्यातून आषाढ किंवा श्रावणातला हिरवागार निसर्ग डोळ्यापुढे उभा राहतो. निळेशार आकाश, गार ,सर्द हवा, त्या वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार गवताची पाती, हलके हलके बरसणारी पावसाची सर, झुळझुळ वाहणारे झरे हे चित्र ह्या गाण्यातून उभे न राहिल्यास त्या माणसाला संगीत आणि साहित्यात रसच नाही असे म्हणावे लागेल.

मराठी संगीतविश्वात सर्वांसाठी गाणी येतात,पण छोट्या दोस्तांच्या विचार मात्र क्वचितच होतो.

संदीपजी व सलीलजी ह्यांनी मात्र छोट्या दोस्तांसाठी सुद्धा मजेदार त्यांना आवडतील अशी गाणी आणली. “अग्गोबाई, ढग्गोबाई” ऐकताना लहान मूल झाल्यासारखे वाटते.

तर “दूर देशी गेला बाबा” ऐकताना आपल्याच आईबाबांची आठवण आल्यावाचून राहत नाही. “दमलेल्या बाबाची कहाणी” ऐकताना जर डोळे नाही पाणावले तरच नवल!

 

 

चिंटू मधील “एकटी एकटी घाबरलीस ना..” हे गाणे ऐकून प्रत्येक आईला आपल्या बाळात खट्याळ ,गोंडस ,निरागस चिंटू दिसतो.

त्यांनी संगीतबद्ध केलेले “भीमरूपी महारुद्रा” ऐकून अंगावर रोमांच उभे राहतातच.

सलीलजींनी “एक उनाड दिवस, चॅम्पियन, धागे दोरे, निशाणी डावा अंगठा, विठ्ठल विठ्ठल, पांढर आणि अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे आणि त्यातील अनेक गाणी सर्वांना आवडतील अशीच आहेत.

तसेच त्यांचे अल्बम्स “क्षण मोहरते, बरसे बदरिया, माझ्या मना, हरीभजन, क्षण अमृताचे आणि इतर अनेक अल्बम्समधील सर्वच गाणी मनाचा ठाव घेतात.

लहान मूल असो की तरुण, की ज्येष्ठ नागरिक असोत, सलीलजींच्या संगीताचे चाहते सर्व वयोगटातील आहेत आणि सलीलजी त्यांच्यासाठी सुंदर सुंदर रचनांची पर्वणी कायम घेऊन येत असतात. त्यांची गाणी अर्थपूर्ण, हृदयात घर करणारी असतात म्हणूनच ते आज “युथ आयकॉन” आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?