' पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : स्वप्नील श्रोत्री

===

काही महिन्यांपूर्वी, एका रात्रीतून भारतीय वायुसेनेच्या धाडसी वैमानिकांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश ए मुहम्मद च्या तळांवर १००० किलो बॉम्बचा वर्षाव करत पाकिस्तान आणि जैशला उचित धडा शिकवला आहे.

भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भारत शांत बसणार नाही ही गोष्ट या कारवाईने पुन्हा एकदा अधोरेखित केली.

या हल्ल्याचे श्रेय जाते ते भारतीय वायुसेनेला. वायुसेनेने केलेल्या या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर या लेखात वायुसेनेची ताकद आणि शस्त्रसज्जता याबद्दल जाणून घेऊया..

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ( २६ जानेवारी २९५० ) पूर्वी भारतीय वायु सेना ही रॉयल भारतीय वायु सेना ( रॉयल इंडियन एअर फोर्स ) या नावाने ओळखली जायची, परंतु स्वतंत्र भारताने २६ जानेवारी १९५० रोजी एक अध्यादेशाद्वारे वायु सेनेच्या नावातून ‘ रॉयल ‘ हा शब्द काढून ‘ भारतीय वायु सेना ‘ ( इंडियन एअर फोर्स ) असे नामकरण केले.

 

iaf-inmarthi
india.com

‘नभ स्पर्शं दीप्तम्’ हे भारतीय वायु सेनेचे ब्रीदवाक्य असून ते गीतेच्या ११ व्या अध्यायातून घेतले आहे, याचा अर्थ ‘ गौरवाने आकाशाला स्पर्श करा’ असा होतो.

संपूर्ण विश्वाला भारतीय वायुसेनेचे खरी ओळख दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाली. सन १९३९ ते सन १९४५ या काळात लढल्या गेलेल्या युद्धात ब्रिटीशांना विजय मिळवून देण्यात भारतीय वायु सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सन १९३२ च्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या ८६ वर्षाच्या काळात भारतीय वायु सेनेने अभिमानास्पद कामगिरी करत जगातील चौथी (अमेरिका, रशिया, चीन नंतर) शक्तिशाली वायुसेना होण्याचा मान मिळवला आहे.

स्थापनेपासून ते आजपर्यंत भारतीय वायुसेनेला ७३ प्रकारच्या वेगवेगळ्या विमानांना उडविण्याचा अनुभव असून त्यात अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या विमानांचा सुद्धा समावेश आहे.

भारतात सध्या वायु सेनेचे ५ विभाग असून पश्चिम विभागाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे मध्य विभाग आहे, शिलॉंग येथे पूर्व विभाग, जोधपूर येथे दक्षिण-पश्चिम विभाग तर तिरुवंतपुरम येथे दक्षिण विभाग असून हे सर्व विभाग हे लढाऊ विमाने व सशास्त्रांनी सज्ज आहेत.

 

airforce-mi-26-inmarathi
qph.ec.quoracdn.net

भारताच्या हवाई सीमेची सुरक्षा हे सर्व विभाग करीत असून जवळपास १,७०० विमानांसह १, २०,००० अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या मदतीस आहेत.

सन १९४७ मध्ये काश्मीरमधील युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणे तसेच १९६५, १९७१ व १९९९ च्या कारगिल च्या युद्धात विजय मिळविणे यांसारख्या लष्करी कारवाई मध्ये भारतीय वायु सेनेने निर्णायक भूमिका बजावली आहे.

सन १९६२ रोजी झालेल्या भारत -चीन युद्धाच्या बाबतीत भारताचा पराभवाची जी काही प्रमुख कारणे देण्यात येतात, त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे वायु सेनेचा वापर न करणे असे दिले जाते.

त्यानंतर ३ वर्षांत झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धात भारत सरकारने भारतीय वायु सेनेच्या बळाचा पुरेपूर वापर करून घेतला व त्याचा परिणाम फक्त विजयात न होता भारतीय लष्कराला लाहोर पर्यंत धडक मारण्यात झाला.

 

iaf-inmarathi
pakistandefence.com

एल १- ७८, सी – १३० जे सुपर हारक्यूलिस, बोईंग सी – १७ ग्लोबमास्टर, तेजस, जँग्वार, मीग – २७, मिराज २०००, मीग – २१, मीग – २९, सुखोई एस. यु – ३० एम. के. आय ही जगातील प्रतिष्ठित लढाऊ विमाने असून नव्याने येणारे राफेल हे विमान भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात भरच घालणार आहे.

त्याचबरोबर एम. आय – २५ / एम. आय – ३५, एम. आय – २६, एम. आय १७ व्ही ५, चेतक, चिताह ही लढाऊ हेलिकॉप्टर व पायथन ५, के. एच – ५९, आर : ५५० मॅजिक, ए. एस – ३०,मार्शल, मिका, आर ७३, अस्त्र, आसरम, एक्झोकेट, नाग ( रणगाडा विरोधी ) व रडार विरोधी ही क्षेपणास्त्रे भारतीय वायुसेनेची ताकद वाढवितात.

भारतीय वायुसेनेच्या बाबतीत काही खास गोष्‍टी…

१) स्वतंत्र भारताचे पहिले वायु सेना प्रमुख सुब्रतो राय मुखर्जी हे होते.

२) मार्शल अर्जुन सिंह हे भारतीय वायु सेनेचे पहिले व एकमेव पंच तारांकित ( 5 star ranked) अधिकारी होते. फिल्ड मार्शल किंवा मार्शल ही लष्करी अत्यंत दुर्मिळ पदवी असून ह्या पदावरील व्यक्तीचे सर्व अधिकार हे निवृत्ती नंतरही कायम राहतात.

 

arjan-inmarathi
twitter.com

३) ताकदीच्या बाबतीत भारतीय वायु सेना ही जगातील कोणत्याच देशाच्या मानाने कमी नसून जगातील चौथी ताकदवान वायुसेना असून सातवी सर्वात मोठी सेना आहे.

४) भारतीय वायु सेनेचे एकूण ६० ऐअर बेस असून ते संपूर्ण भारतभर पसरले आहेत.

५) वायु सेनेचा पश्चिम विभागात सर्वात मोठा विभाग असून त्याच्या अंतर्गत १६ ऐअर बेस येतात.

६) सीयाचीन युद्धभूमीवर भारतीय वायुसेनेचा ऐअर बेस असून जगातील सर्वात उंचावरील ऐअर बेस आहे, ज्याचे जमिनीपासून अंतर २२,००० फूट इतके आहे.

७) ताजकिस्तान जवळील ‘ फर्कहोर ‘ ऐअर बेस स्टेशन हा भारताचा पहिला ऐअर बेस आहे जो परदेशात आहे.

८) भारतीय वायु सेनेत जगातील इतर वायुसेनांपेक्षा महिलांची संख्या अधिक असून सन १९९० मध्ये हेलीकॉप्टर व मालवाहू विमान उडवण्यासाठी महिलांचा सर्वप्रथम वापर भारतात करण्यात आला.

 

women-jetpiloat-inmarathi
elle.in

९) भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट विंग मध्ये सहभागी होण्यासाठी ३ वेगवेगळी प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात, जी अत्यंत कठीण आहेत.

युद्धाच्या निर्णायक क्षणीसुद्धा संपूर्ण युद्धाचे पारडे फिरवण्याची क्षमता असलेली भारतीय वायु सेना पाकिस्तान व चीन यांसारख्या परंपरागत शत्रू उरात धडकी भरविण्यास आणि सार्वभौम भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास निश्चितच सक्षम आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?