' २२ व्या वर्षीच कसोटी क्रिकेटचे अवघड विक्रम आपल्या नावावर करणारा अवलिया फलंदाज! – InMarathi

२२ व्या वर्षीच कसोटी क्रिकेटचे अवघड विक्रम आपल्या नावावर करणारा अवलिया फलंदाज!

  आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेटच्या चाहत्याला सर डॉन ब्रॅडमन हे नाव माहिती नसणे हे अशक्य आहे.

आज इतक्या वर्षांनंतरही ,क्रिकेटमध्ये इतक्या देशांचे उत्तमोत्तम खेळाडू येऊन देखील कसोटी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट, कसोटी क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सर डॉन ब्रॅडमन ह्यांचेच नाव घेतले जाते ह्यातच सर्वकाही आले.

ते जाऊन देखील १९ वर्षे झालीत, तरीही सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू म्हणून सर डॉन ह्यांचेच नाव सर्व लोक घेतात आणि ह्यावर कुणाचेही दुमत नाही.

त्यांचे कसोटी क्रिकेटमधील ९९.९४ इतके ऍव्हरेज गाठणे आजही कुठल्या फलंदाजाला शक्य झाले नाही.त्यांच्या ह्या ऍव्हरेज मुळेच लोक त्यांना क्रिकेटमधील “डॉन ” म्हणत असत.

ऑस्ट्रेलियन लोक त्यांच्या क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या लहान मुलांना सर डॉन ह्यांची गोष्ट सांगतात की कसे ते लहानपणी गोल्फ बॉल व क्रिकेट स्टम्प घेऊन एकटेच क्रिकेटचा सराव करीत असत.

त्यांनी “बुश क्रिकेट” ते ऑस्ट्रेलियन कसोटी संघ हा प्रवास अवघ्या दोनच वर्षात करून दाखवला.

त्यांच्या बाविसाव्या वाढदिवसापर्यंत त्यांनी कसोटी क्रिकेटचे अनेक विक्रम आपल्या नावे केले होते. आज इतक्या वर्षांनी सुद्धा त्यांचे काही रेकॉर्डस् अबाधित आहेत. ते मोडणे आजही क्रिकेटमधील उत्तमोत्तम फलंदाजांना सुद्धा शक्य झालेले नाही.

 

sir-inmarathi
crickinfo.com

 

ऑस्ट्रेलियातील जुनीजाणती मंडळी भूतकाळाच्या आठवणी सांगताना म्हणतात की १९३० च्या दशकात जेव्हा ऑस्ट्रेलिया “द ग्रेट डिप्रेशन”शी लढत होते तेव्हा सर डॉन ब्रॅडमन ह्यांचा उत्तम खेळ हीच लोकांच्या निराश मनाला उभारी देणारी एकमेव गोष्ट होती.

ह्यावरूनच सर डॉन ब्रॅडमन ह्यांचा खेळ कसा असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो.

त्यांच्या खेळाविषयी बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बिल वुडफॉल एकदा म्हणाला होता की, “ही इज वर्थ थ्री बॅट्समन टू ऑस्ट्रेलिया!”.

सर डॉन ह्यांची आक्रमक शैली असलेली फलंदाजी बघण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. अर्थात त्यांना इतकी गर्दी आवडत नसे, त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायला सुद्धा आवडत नसे.

एकांतात राहणे, अलिप्त राहणे त्यांना जास्त प्रिय होते.

सर डॉन ब्रॅडमन ह्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी कुटामुंड्रा, न्यू साऊथ वेल्स येथे झाला. त्यांचे वडील जॉर्ज ब्रॅडमन होते व त्यांच्या आईचे नाव एमिली होते.

सर डॉनल्ड ब्रॅडमन हे त्यांच्या भावंडांत सर्वात धाकटे होते. त्यांना एक मोठा भाऊ व तीन मोठया बहिणी होत्या. ब्रॅडमन ह्यांचे वडील व आई सुद्धा ब्रिटिश वंशाच्या होत्या. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड होती.

ते स्वतःच गोल्फचा बॉल व क्रिकेटच्या स्टंपचा बॅटसारखा वापर करून ते घरातल्या पाण्याच्या टाकीचा भिंतीसारखा उपयोग करून एकटेच खेळत असत.

त्यामुळे त्यांना विविध ऍंगलचे बॉल कसे खेळायचे ह्याचा लहानपणीच सराव झाला. फॉर्मल क्रिकेट खेळताना वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी पहिले शतक काढले होते. बॉरल पब्लिक स्कुल कडून खेळताना त्यांनी नाबाद ११५ धावा काढल्या होत्या.

 

bradman-inmarathi
crickbuzz.com

 

१९२०-२१ सालच्या क्रिकेट सिझनमध्ये त्यांनी स्थानिक बॉरल संघासाठी स्कोररची भूमिका बजावली होती. ह्या संघाचे कर्णधार जॉर्ज व्हॉटमॅन हे सर डॉन ह्यांचे मामा होते.

१९२०च्या ऑक्टोबर मध्ये सर डॉन ह्यांना त्याच टीम मध्ये घेण्यात आले कारण त्यांच्या टीम साठी एक माणूस कमी पडत होता.

पदार्पणाच्याच सामन्यात त्यांनी ३७ व २९ धावा केल्या. ह्याच काळात डॉन ह्यांचे वडील त्यांना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाचवा ऍशेस सामना बघण्यासाठी घेऊन गेले.

त्याच वेळी डॉन त्यांच्या वडिलांना म्हणाले की “ह्या ग्राऊंडवर सामना खेळल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही.”

त्यानंतर बॉरल क्रिकेट संघात ब्रॅडमन ह्यांना बऱ्याच वेळा संधी मिळत गेली आणि त्यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत सिडनी डेली प्रेसचे लक्ष वेधून घेतले.

कॉंक्रिट पीच वर ह्या मॅचेस खेळल्या जात असत. बॉरल संघ अनेक गावांत मॅचेस खेळत असे. बेरीमा डिस्ट्रिक्ट स्पर्धेत एकदा त्यांचा सामना विंजेलो संघाशी झाला.

ह्याच संघात बिल ओ-रेली सुद्धा खेळत होता जो नंतर प्रसिद्ध कसोटी गोलंदाज म्हणून नावारूपाला आला.

ह्याच सामन्यात डॉन ह्यांनी २३४ धावा केल्या तर ह्या सीरिजच्या अंतिम सामन्यात त्यांनी नाबाद ३२० धावा केल्या.

१९२६ साली ऑस्ट्रेलियन संघ ऍशेस मध्ये पराजित झाला आणि त्यानंतर कसोटी संघातील अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी निवृत्ती घेतली. त्यामुळे न्यू साऊथ वेल्स क्रिकेट असोसिएशनने ताज्या दमाच्या खेळाडूंचा शोध घेणे सुरु केले.

बॉरल साठी खेळताना केलेल्या धावा ध्यानात ठेवून असोसिएशनने त्यांना सिडनीच्या प्रॅक्टिस सेशनला येण्याची विनंती केली.

त्यांची कंट्री वीक टूर्नामेंटमध्ये टेनिस व क्रिकेट ह्या दोन्हीसाठी निवड करण्यात आली होती. परंतु डॉन तेव्हा नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या बॉसने त्यांना फक्त एकच आठवड्याची सुटी दिली.

त्यामुळे त्यांना कुठल्यातरी एकाच खेळाची निवड करणे भाग होते. त्यांनी क्रिकेटची निवड केली आणि पुढचा इतिहास तर सर्वांनाच ठाऊक आहे.

 

bradman-pics-inmarathi
india.com

 

डॉन ब्रॅडमन ह्यांनी कंट्री वीक टूर्नामेंटमध्ये उत्तम खेळ खेळल्यामुळे त्यांना १९२६-२७ साली सिडनीमध्ये सेंट जॉर्जसाठी ग्रेड क्रिकेट खेळण्याचे आमंत्रण मिळाले. त्यांच्या ग्रेट क्रिकेटच्या पदार्पणातच त्यांनी ११० धावा काढल्या.

त्यानंतर लगेचच त्यांना न्यू साऊथ वेल्स कडून खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी त्यांचे फर्स्ट क्लास क्रिकेटचे पदार्पण फक्त एकोणिसाव्या वर्षी ऍडलेड ओव्हल वर केले.

ह्या सामन्यात सुद्धा त्यांनी शतक काढले. ह्या सामन्यात त्यांनी ११८ धावा काढून सगळ्यांना आपला उत्तम खेळ दाखवून दिला. त्यांची खासियत असलेले फास्ट फुटवर्क, आत्मविश्वास दाखवणारा खेळ आणि वेगवान स्कोरिंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती.

फक्त दहा फर्स्ट क्लास सामने खेळून त्यांनी त्यांची चमक दाखवली व लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात केली. त्यांचे संघ सहकारी त्यांना ब्रॅडल्स म्हणत असत.

इतके उत्तम खेळाडू असून देखील त्यांचा पहिला कसोटी सामना हा त्यांच्यासाठी चांगला अनुभव ठरला नाही. त्यांच्या कसोटी पदार्पणात त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये फक्त १८ धावा केल्या व दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांना फक्त एकच धाव काढता आली.

हा सामना ३० नोव्हेम्बर १९२८ राजी इंग्लंड विरुद्ध झाला. अर्थातच ह्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ सपशेल अपयशी ठरला आणि इंग्लंड हा सामना जिंकले.

साहजिकच डॉन ब्रॅडमन ह्यांची वर्णी बाराव्या खेळाडूच्या स्थानी लागली. पण बिल पॉन्सफोर्ड ह्या सामन्यात जखमी झाला आणि ब्रॅडमन ह्यांना सब्स्टीट्युट फिल्डर म्हणून ह्या सामन्यात संधी मिळाली.

सुरुवातीचे दोन सामने त्यांना सूर सापडला नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर मात्र त्यांना सूर गवसला आणि त्यांनी ७९ व ११२ धावा केल्या.

हा सामना ऑस्ट्रेलियाने गमावला असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये शतक काढणारे डॉन ब्रॅडमन हे वयाने सर्वात लहान खेळाडू ठरले.

त्यानंतरच्या सामन्यात सुद्धा ऑस्ट्रेलियाला पराजयाचा सामना करावा लागला. दुसऱ्या इनिंगमध्ये ब्रॅडमन ह्यांनी ५८ धाव केल्या आणि आता ऑस्ट्रेलिया जिंकणार असे वाटत असताना ते रन आउट झाले.

पण ही चुक त्यांच्याकडून परत कधीही घडली नाही.

 

Livemint.com

 

हा एकमेव सामना होता ज्यात ते रन आउट झाले. पुढच्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलिया संघाने चांगला खेळ केला. ब्रॅडमन ह्यांनी ह्या सामन्यात शानदार १२३ धावा केल्या. आणि इंग्लंडला हरवून हा सामना जिंकला.

हा सिझन संपता संपता ब्रॅडमन ह्यांनी १६९० फर्स्ट क्लास रन्स केले होते आणि त्यावेळी त्यांचे ऍव्हरेज ९३.८८ इतके झाले होते.

सर डॉन ब्रॅडमन ह्यांनी ५२ कसोटी सामन्यांत ६९९६ धावा केल्या आणि त्यांचे ऍव्हरेज ९९.९४ इतके होते. त्यांनी २० वर्षांच्या कारकिर्दीत ५२ कसोटी सामने व २३४ फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले.

कसोटी सामन्यांत त्यांनी ६९९६ धावा केल्या तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २८०६७ धावा केल्या.

त्यांनी कसोटी सामन्यांत एकूण १२ द्विशतके केली तर २९ शतके व १३ अर्धशतके केली आहेत. त्यांच्याबद्दलची एक आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या कसोटी करियर मध्ये त्यांनी फक्त सहा षटकार ठोकले आहेत.

त्यांचा कसोटी मधील १२ द्विशतकांचा विक्रम आजतागायत कोणीही मोडू शकलेले नाही. कुमार संगकाराने ११ द्विशतके केली पण ब्रॅडमन ह्यांचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

सर ब्रॅडमन ह्यांची सर्वोत्तम खेळी ही ३३४ धावांची आहे तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी ४५२ धावांची शानदार खेळी केली आहे.

त्यांच्या ह्या सर्वोत्तम खेळामुळेच १९ नोव्हेम्बर २००९ रोजी त्यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.

ते १९४८ साली निवृत्त झाले. त्यांचा शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध होता.

१४ ऑगस्ट १९४८ रोजी झालेल्या ह्या सामन्यात पहिल्याच इनिंगमध्ये सर ब्रॅडमन कधी नव्हे ते शून्यावर बाद झाले आणि त्यांचे ऍव्हरेज ९९.९४ झाले.

ते बाद झाले नसते तर त्यांचे ऍव्हरेज १०० राहिले असते. ऑस्ट्रेलियाने हा सामना एक इनिंग व १४९ धावांनी जिंकला.

 

don-bradman-inmarathi
essential.com

 

त्यानंतर सर ब्रॅडमन ह्यांनी निवृत्ती स्वीकारली. क्रिकेट खेळत असतानाच त्यांनी ‘डॉन ब्रॅडमन्स बुक’, ‘माय क्रिकेटिंग लाईफ’ आणि ‘हाऊ टू प्ले क्रिकेट’ ही पुस्तके लिहिली. तर निवृत्तीनंतर ‘फेअरवेल टू क्रिकेट’ हे आत्मचरित्र लिहिले.

तर १९५८ साली खेळाडू व चाहत्यांना क्रिकेटची शास्त्रशुद्ध माहिती असावी म्हणून त्यांनी ‘द आर्ट ऑफ क्रिकेट’ हे पुस्तक लिहिले.

ब्रॅडमन ह्यांचा जेसी मार्था मेंझिस ह्यांच्याशी ३० एप्रिल १९३२ रोजी विवाह झाला. जेसी व डॉन दोघांनीही एकमेकांना अखेरपर्यंत साथ दिली. डॉन एकदा म्हणाले होते की ,”मी आजवर जे मिळवले त्या मागे जेसीचे खूप मोठे योगदान आहे.”

त्यांना तीन अपत्ये झाली. पण त्यांचा पहिला मुलगा हा बालपणीच गेला. तर दुसऱ्या मुलाला पोलियो झाला. त्यांच्या मुलीला बालपणीच सेरेब्रल पाल्सी ह्या आजाराने ग्रासले होते.

त्यामुळे खाजगी जीवनात त्यांना खूप दुःखाचा सामना करावा लागला.

१९९७ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांना आयुष्यात रस उरला नाही. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी ते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना म्हणजेच शेन वॉर्न व सचिन तेंडुलकर ह्यांना भेटले होते.

 

bradman warne sachin inmarathi
smh.com.au

 

त्यांना नंतर न्यूमोनिया झाला पण त्यातून ते बरे झाले.

अखेर अलिप्त आणि प्रसिद्धीपासून लांब असलेले आयुष्य जगणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन ह्यांनी ९२ व्या वर्षी २५ फेब्रुवारी २००१ रोजी ह्या जगाचा निरोप घेतला.

त्यांच्यासारखा महान क्रिकेट खेळाडू पुन्हा झाला नाही आणि कदाचित होणार सुद्धा नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?