' २०० वर्षानंतरही आपल्या मनावर राज्य करणारे मिर्झा गालिब; १० अज्ञात गोष्टी! – InMarathi

२०० वर्षानंतरही आपल्या मनावर राज्य करणारे मिर्झा गालिब; १० अज्ञात गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

बस-कि दुश्वार है हर काम का आसाँ होना

आदमी को भी मयस्सर नहीं इंसाँ होना

किंवा

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन

दिल के ख़ुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है

तसेच

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले

बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

असे सुंदर शेर लिहिणारे महान कवी मिर्झा असद-उल्लाह बेग खां वर्ग मिर्झा गालिब हे उर्दू आणि फारसी भाषेतले महान कवी व शायर होते. ते जाऊन आता दोन शतके लोटली तरी त्यांच्या शब्दांची जादू अजूनही कायम आहे.

उर्दू भाषेतील सार्वकालिक महान शायर म्हणून मिर्झा गालिब ह्यांचे नाव घेतले जाते.

 

mirza-galib-inmarathi

 

२७ डिसेंबर  १७९६ साली आग्रा शहरातील काला महाल परिसरात एका सैनिकी पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. इतक्या जुन्या काळात जन्म होऊन सुद्धा ते सुधारक वृत्तीचे होते.

ते सर्व धर्मांचा समान आदर करीत असत. ते अजिबात कर्मठ नव्हते. त्या काळात सुद्धा ते नमाज पढत नसत आणि रोजे सुद्धा ठेवत नसत.

त्यांची केवळ कलेवर भक्ती होती. ते फक्त चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोबांनी केले. लहानपणीच त्यांनी इस्लामचे शिक्षण घेतले व ते फारसी भाषा शिकले.

असे म्हणतात की मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांच्या पत्नी मस्तानीबाई साहेबांच्या वंशातील होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

लहानपणीच भाषेवर प्रभुत्व मिळवल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच फारसी भाषेत लिखाण सुरु केले. वयाच्या केवळ अकराव्या वर्षांपासून त्यांनी शेर लिहिणे सुरु केले होते. आपल्या साहित्यातून त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान मांडले.

आयुष्यात लहानपणापासूनच दु:ख बघितल्याने त्यांना जीवनाचा खरा अर्थ उमगला होता. तो अर्थ त्यांनी त्यांच्या सुंदर शब्दांत काव्यातून व्यक्त केला.

 

ghalib-inmarathi

 

त्यांनी अठरा हजारांच्या वर शेर फारसी भाषेत लिहिले. त्यांच्या मित्रांनी त्यांना उर्दूत सुद्धा शेर लिहिण्याचा आग्रह केला. म्हणून त्यांनी हजार पेक्षाही जास्त शेर उर्दू भाषेत लिहिले.

असे असूनही त्यांना प्रसिद्धीची अजिबात लालसा नव्हती. त्यांना मोगल काळातील राजांच्या किंवा अमीर उमरावांच्या दरबारात जाणे सुद्धा त्यांना आवडत नसे.

ते म्हणत असत की मी गेल्यानंतर सुद्धा माझे नाव माझ्या कवितांतून अजरामर राहणार आहे त्यामुळे ते आपोआपच सगळीकडे पसरेल.

त्यांच्या कवितांमध्ये एक बंडखोरीचे बीज होते. त्यांच्या काव्यावर अमीर खुसरो आणि मीर ह्यांच्या रचनांचा प्रभाव असलेला जाणवतो. १५ फेब्रुवारी १८६९ रोजी दिल्ली येथे वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांना जाऊन आज इतकी वर्षे झाली तरी त्यांनी लिहिलेल्या अनेक गझल व शेर आजही तरुणांना व प्रेमी युगुलांना आवडतात.

त्यांच्या कविता ह्या सरळ आणि लहान आहेत म्हणूनच त्या सामान्य लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचल्या. आज आपण ह्या महान कवीच्या आयुष्याबद्दल काही अज्ञात गोष्टी जाणून घेऊया.

१. मिर्झा गालिब ह्यांचे खरे नाव मिर्झा असदुल्लाह बेग खान असे होते. पण त्यांनी लिखाणासाठी सुरुवातीला असद हे नाव धारण केले होते. असद ह्याचा अर्थ होतो सिंह! त्यानंतर त्यांनी गालिब ह्या नावाने लिखाण करणे सुरु केले. गालिब म्हणजे प्रभावी होय.

 

galib-inmarathi

 

२. मिर्झा गालिब ह्यांनी अनेक पत्रे सुद्धा लिहिली होती. त्यांच्या पत्रांत बदल घडवून आणण्याची क्षमता आजही आहे. त्यांची पत्रे कालातीत आहेत, आणि सर्वांना ती पत्रे आपलीशी वाटतात. त्यांच्या पत्रांमधून ते वाचकांशी अनौपचारिक संवाद साधतात.

३. मिर्झा गालिब ह्यांनी काही काळ सम्राटाच्या दरबारात शिक्षक म्हणून सुद्धा काम केले. त्यांना मिर्झा नोशा ही पदवी देण्यात आली होती. ह्याच मुळे त्यांच्या नावाशी मिर्झा हा शब्द जोडला गेला.

त्यांनी सम्राट बहादूर शाह दुसरा आणि त्याचा ज्येष्ठ मुलगा राजपुत्र फक्र उद -दिन मिर्झा ह्यांना काव्य शिकवले.

४. मिर्झा गालिब ह्यांचे वडील व काका ते अगदी लहान असतानाच गेले. त्यामुळे त्यांचे बालपण त्यांच्या आजोळी गेले. त्यामुळे ते सगळ्याच बाबतीत त्यांच्या आजी आजोबांवर अवलंबून होते.

५. मिर्झा गालिब ह्यांचे लग्न त्याकाळच्या प्रथेनुसार लवकरच झाले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा नवाब इलाही बक्श ह्यांच्या मुलीशी उमराव बेगम ह्यांच्याशी निकाह झाला. त्यांना सात अपत्ये झाली परंतु दुर्दैवाने त्यांचे एकही अपत्य फार काळ जगले नाही.

६. गालिब हे असामान्य बुद्धिमत्ता आणि कलेची देणगी लाभलेले एक कवी होते. त्यांनी लहानपणापासूनच लिखाण सुरु केले आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत भरपूर लिखाण केले होते जे आज जगात सगळीकडे प्रसिद्ध आहे.

 

Mirza-Ghalib-inmarathi

 

७. ज्या घरात गालिब राहत होते ते ,”गली कासीम जान, चांदनी चौक, दिल्ली” इथले त्यांचे घर “गालिब की हवेली” म्हणून ओळखले जाते. आज ह्या ठिकाणी गालिब मेमोरियल बांधण्यात आले आहे. ह्या ठिकाणी कायमच वर्षभर गालिब ह्यांच्या साहित्याचे प्रदर्शन असते.

८. मिर्झा गालिब ह्यांच्या गझलांचे पहिले भाषांतर सरफराझ नियाझी ह्यांनी केले होते. त्यांनी गालिब ह्यांच्या प्रेम कवितांचे इंग्रजी भाषेत पहिल्यांदा संपूर्ण भाषांतर केले.

९. बहादूरशाह झफर दुसरा ह्याने मिर्झा गालिब ह्यांना पहिल्यांदा दबीर -उल-मुल्क ही पदवी दिली आणि नंतर नज्म-उद-दौला ही पदवी देऊन दिल्लीतील उमरावांच्या गटात सामील करून घेतले. त्यांची सम्राटाच्या दरबारात शाही इतिहासकार म्हणून नेमणूक झाली होती.

१०. मिर्झा गालिब ह्यांनी उपजीविकेसाठी कधीही नोकरी किंवा व्यवसाय केला नाही असे म्हणतात. त्यांची उपजीविका त्यांच्या मित्रांच्या भरवशावर चालायची किंवा मुघल सम्राटाने खुश होऊन दिलेल्या बक्षिसावर ते गुजराण करीत असत.

गालिब ह्यांची शेवटची काही वर्षे जवळजवळ अज्ञातवासातच गेली. ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हजरजबाबी होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नीचेही एकाच वर्षात निधन झाले.

 

ghalib-inmarathi

 

गालिब त्यांच्या कवितांतून असे सांगतात की जीवन हा एक सततचा संघर्ष आहे जो मृत्यूबरोबरच संपतो. तर असे हे महान कवी होते ज्यांनी उर्दू आणि फारसी कविता भारतीय जनमानसात रुजवल्या. त्यांचे काही प्रसिद्ध शेर म्हणजे

रंज से ख़ूगर हुआ इंसाँ तो मिट जाता है रंज

मुश्किलें मुझ पर पड़ीं इतनी कि आसाँ हो गईं |

रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो ‘ग़ालिब’

कहते हैं अगले ज़माने में कोई ‘मीर’ भी था |

रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल

जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है …..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?