' वाचा कहाणी भारतासाठी पहिलं व्यक्तिगत ऑलम्पिक पदक मिळवणाऱ्या मर्द गड्याची!

वाचा कहाणी भारतासाठी पहिलं व्यक्तिगत ऑलम्पिक पदक मिळवणाऱ्या मर्द गड्याची!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारताला ऑलम्पिक मधील पहिलं व्यक्तिगत पदक मिळवून देणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्यावर आपण महाराष्ट्रीयवासियांची छाती अभिमानाने फुलून येते!

त्यांनी आपल्या देशाला दिलेली ही अमुल्य भेट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

परंतु महाराष्ट्राच्या रांगड्या मातीमध्ये शरीर कमावत थेट ऑलम्पिक पदकाला गवसणी घालणाऱ्या या रांगड्या पैलवानाचा कुस्तीप्रवास लोकांना तसा फारसा परिचित नाही.

चला तर मग जाणून घेऊया या मराठी माणसाचा पैलवान गडी ते भारताचा पहिला ऑलम्पिक पदकवीर होण्यापर्यंतचा प्रवास !

 

khashaba-jadhav-marathipizza00

स्रोत

कराडजवळील गोळेश्वर गावात खाशाबा जाधवांचा जन्म झाला. खाशाबा जाधवांना त्यांच्या घरातूनचं कुस्तीचं बाळकडू मिळालं. त्यांचे आजोबा उत्तम पैलवान होते, त्यांचा वडिलांना देखील कुस्तीचा छंद होता. खाशाबांचं कुटुंब फार मोठं.

त्यांना तीन बहिणी आणि चार भाऊ अशी एकून सात भावंडे होती. एवढ्या मोठ्या कुटुंबाला सांभाळणे खाशाबांच्या वडिलांसाठी सोपे काम नव्हते.

त्यात घरातील पाचही बंधू कुस्ती खेळायचे, त्यामुळे त्यांच्यावर विशेष खर्च यायचा. परंतु त्यांनी कधीही परिस्थितीमुळे मुलांना कुस्ती सोडायला लावली नाही.

वयाच्या पाचव्या वर्षापासून कुस्तीच्या मैदानात उतरल्यापासूनचं खाशाबांनी आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. गावोगावी होणाऱ्या कुस्तीच्या सर्वच स्पर्धांवर त्यांनी आपले नाव कोरले.

त्यांच्यातील प्रतिभा पाहून कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी खाशाबांना पुढच्या शिक्षणासाठी कोल्हपुरला येण्याचे आमंत्रण दिले.

मुलाच्या जीवनात आलेली ही सुवर्णसंधी हाताची जाऊ द्यायची नाही म्हणून वडिलांनी शेती गहाण ठेवून खाशाबांना कोल्हापूरला पाठवलं.

 

khashaba-jadhav-marathipizza01

स्रोत

राजश्री शाहू महाराजांच्या कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये खाशाबांनी पाउल ठेवले आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कोल्हापुरात मराठा बोर्डिंग मध्ये राहून त्यांनी शिक्षण आणि तालीम दोन्ही सांभाळली.

कुस्तीच्या प्रवासामध्ये त्यांना गोविंद पुरंदरे या क्रीडा प्रशिक्षकाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि येथून सुरु झाली त्यांची ऑलम्पिक स्पर्धेच्या दिशेने वाटचाल!

१९४८ साली लंडनमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले.

कशीबशी पैश्याची जमवाजमव करत ते ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झाले खरे, परंतु आंतरराष्ट्रीय कुस्तीचा फारसा अनुभव नसल्याने यश काही त्यांच्या पदरी पडले नाही.

पदकाच्या आशेने खेळायला गेलेले खाशाबा अपयश झटकून उठले आणि पुढल्या वेळेस ऑलम्पिक पदक मिळवूनचं परतेन असा निर्धार करत ते पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात नव्या जोमाने उतरले.

खाशाबांना तालमीत राहून पैलवानाचा खुराक घेणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे खानावळीशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. घरातून त्यांना २५ रुपये मिळायचे, त्यापैकी १५ रुपये खानावळीमध्ये खर्च व्हायचे आणि १० रुपये इतर खर्चांसाठी!

असा हा खानावळीमध्ये जेवून शरीराची भूक भागवणारा पैलवान ऑलम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहत होता.

 

khashaba jadhav inmarathi
wordpress

 

स्रोत

चार वर्षांनी म्हणजेच १९५२ रोजी पुढची ऑलम्पिक फिनलँडकी राजधानी हेलसिंकी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेपूर्वी मद्रासमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशनतर्फे खाशाबा सहभागी झाले.

पण येथे त्यांच्यासोबत पक्षपात झाला आणि त्यांना ऑलम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आलं.

या स्पर्धेत पंजाबच्या काही मल्लांवर देखिला अन्याय झाला होता. त्यामुळे कुस्ती महासंघाने कलकत्याला ऑलम्पिकसाठी पुन्हा एकदा निवड चाचणी घेतली. या निवड चाचणीमध्ये खाशाबांनी सर्वांना पिछाडीवर टाकीत ऑलम्पिकचे तिकीट मिळवले.

आता गेल्या वेळेप्रमाणे पुन्हा एकदा खाशाबांना पैश्याची जुळवाजुवळ करणं भाग होतं.

त्यांच्या ओळखीच्या सर्व लोकांनी त्यांना जमेल तशी मदत केली.

शहाजी कॉलेजचे त्यावेळचे प्राचार्य दाभोळकर यांनी तर स्वत:चा बंगला गहाण टाकून चार हजार रुपयांची मदत खाशाबांना केली. कराडच्या टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक वळवडे यांनी आपला तीन महिन्यांचा पगार दिला.

पण एक निराशाजनक गोष्ट म्हणजे तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी मात्र खाशाबांना काडीचीही मदत केली नाही.

स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास खाशाबांनी अनेक ठिकाणचे उंबरे झिजवून देखील सरकार कडून त्यांना पैसे सोडा साधे बोलके प्रोत्साहन देखील लाभले नाही.

 

khashaba-jadhav-marathipizza05

स्रोत

एव्हाना खाशाबांकडे थोडेफार पैसे जमा झाले होते, परंतु त्यांना अजूनही तीन हजार रुपयांची गरज होती. यावेळी खाशाबांचे प्रशिक्षक गोविंद पुरंदरे धावून आले.

त्यांनी रात्रीच्या रात्री मराठा बँकेमधून तीन हजार रुपयांचे कर्ज काढीत कलकत्त्याला पाठवून दिले आणि शेवटी अनेक अडथळे पार करीत खाशाबा ऑलम्पिक स्पर्धेसाठी रवाना झाले.

ऑलम्पिकच्या रणांगणात उतरताच त्यांनी पहिल्या दोन लढतीमध्ये कॅनडा, मॅक्सीकोच्या मल्लांना चीतपट करीत स्पर्धेमधील आपली दावेदारी सिद्ध केली. तिसऱ्या लढतीमध्ये त्यांना पुढे चाल मिळाली.

चौथ्या लढतीमध्ये त्यांनी जर्मनीच्या मल्लावर गुणांनी मात केली. यापुढे त्यांची लढत होती रशियाच्या मल्लासोबत!

ही लढत खाशाबा जरी हरले असते तरी त्यांना कांस्य पदक मिळणार होतं. पण खाशाबांना सुवर्ण पदक खुणावत होतं. परंतु त्या आधी त्यांना रशियाच्या मल्लाला हरवत अंतिम लढतीमध्ये प्रवेश करणं भाग होतं.

लढत सुरु झाली आणि खाशाबा जिद्दीने लढले. परंतु लढतीचा निर्णय देताना त्यांच्यासोबत पक्षपात झाला. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फटका खाशाबांना सहन करावा लागला. पंचांनी रशियाच्या मल्लाला विजेता म्हणून घोषित केले.

 

khashaba-jadhav-marathipizza06

स्रोत

या पक्षपातामुळे खाशाबा निराश झाले. परंतु ही लढत हरले असले तरी त्यांच्या नावावर कांस्य पदक कोरलं गेलं.

रशियाच्या मल्लाला उजवं माप देत पंचांनी जो पक्षपात केला. तो जर घडला नसता तर कदाचित खाशाबा अंतिम लढतीत गेले असते आणि त्यांनी भारतासाठी पहिलं वैयक्तिक आणि ते देखील सुवर्णपदक पटकावलं असतं.

भले ते अंतिम लढतीमध्ये हरले असते तरी भारताच्या नावावर पहिलं रौप्य पदक तरी नक्कीच लिहिलं गेलं असतं. पण जणू नशिबाची साथ कुठेतरी कमी पडली आणि खाशाबांना आणि किंबहुना भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

 

khashaba-jadhav-marathipizza03

स्रोत

इतकं होऊनही त्यांनी केलेली ही अचाट कामगिरी भारतीयांनी अगदी डोक्यावर घेतली. कारण आजवर जे कोणालाही करता आलं नव्हतं ते या भारताच्या सुपुत्राने करून दाखवलं.

एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने भारतासाठी पहिलं ऑलम्पिक पदक मिळवलं होतं.

भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवण्याचा खाशाबांचा हा विक्रम सुमारे ४४ वर्षे अबाधित राहिला. १९९६ साली लियांडर पेसने टेनिसमध्ये भारतासाठी वैयक्तिक कांस्य पदक मिळवीत या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

पण भारताचे पहिले ऑलम्पिकवीर म्हणून खाशाबा जाधव यांनी जगभर जी ओळख मिळवली ती कायमचीच!

 

khashaba-jadhav-marathipizza07
Ranjit Jadjav (Son of Khashaba Jadhav)

स्रोत

खाशाबा जाधव तुमचा आणि तुमच्या अतुल्य कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे !!!

 

khashaba jaadhav InMarathi

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “वाचा कहाणी भारतासाठी पहिलं व्यक्तिगत ऑलम्पिक पदक मिळवणाऱ्या मर्द गड्याची!

 • April 9, 2017 at 11:13 am
  Permalink

  *जाणता राजा कुस्ती केंद्र पैलवान दत्तक योजना*
  ………………………………………………….
      दात आहे तर चणे नाहीत…
      चणे आहे तर दात नाहीत…
             ही अवस्था ब-याच कुस्ती खेळाडुंची होते. अंगात कुस्ती असते , मेहनत करण्याची क्षमता असते परंतु बरेच पैलवान घरच्या गरीब परीस्थितीमुळे पैलवानकी व कुस्ती केंद्र  सोडुन घरचा रस्ता धरतात…
       या सर्व गोष्टीचा विचार करुन गुणवंत पैलवानास आधार देण्यासाठी व महाराष्ट्राला ऑलिपिंकचे सुवर्णपदक मिळवुन देण्यासाठी जाणता राजा कुस्ती केंद्र , लोणीकंद  पुणे येथे *पैलवान दत्तक*  योजना कार्यन्वीत करण्यात आली आहे त्यासाठी  रविवार दी. १६ एप्रिल २०१७ रोजी कुस्ती केंद्रावर  चाचणी स्पर्धा आयोजित केली आहे. तरी गरजु व नामांकीत पैलवानांनी सहभागी व्हावे..
  ………………………………………………………..
  *पात्रता*
  राज्य कुस्ती स्पर्धेतील पदक विजेता.

  जन्मतारीख – १.१.१९९८ नंतरची असावी….
  ……………………………………………………….
  *वजन गट*
  ५५ किलो , ६० किलो , ६५ किलो , ७० किलो , ७५ किलो , ८५ किलो व ८५ किलोवर….
  ……………………………………………………….
  *सुविधा*
  १] एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक
  २] मॅट व जिम हाॅल
  ३] मोकळे मैदान
  ४] मेस ची व्यवस्था
  ………………………………………………………
  *संपर्क*
  पै.संदीप आप्पा भोंडवे – ९९२१६६५५५५
  अध्यक्ष – पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ

  टीप – वरील मेसेज गरजवंत पैलवाना पर्यंत पोहचवावा..
  हा मेसेज ब्राॅडकास्ट असुन कोणी वैयक्तित घेऊ नये…

  Reply
 • April 26, 2017 at 9:09 am
  Permalink

  mi khashaba jadhav yanna nyay milvun denyacha prayatn krel

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?