' बॅट्समनला 'शून्यावर बाद करण्याची' सेंच्युरी ठोकणाऱ्या या अवलिया गोलंदाजाबद्दल जाणून घ्या

बॅट्समनला ‘शून्यावर बाद करण्याची’ सेंच्युरी ठोकणाऱ्या या अवलिया गोलंदाजाबद्दल जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान फलंदाज आणि गोलंदाज होऊन गेले.

त्या प्रत्येक महान खेळाडूच्या नावावर काही ना काही विक्रम आहेत.

आज आपण ज्या खेळाडूबद्दल बोलतोय त्याच्या नावावर असाच एक विक्रम आहे. ह्या गोलंदाजाने तब्ब्ल शंभर फलंदाजांना शून्यावर बाद करण्याचा विक्रम केला आहे.

चौदा वर्ष त्याने खेळपट्टी गाजवली आहे. त्याचे नाव ऐकताच भल्या भल्या फलंदाजांना घाम फुटत असे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.

हा फास्ट मिडीयम पेस बॉलर म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ग्लेन डॉनल्ड मॅकग्रा होय. जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून ग्लेन मॅकग्राला ओळखले जाते.

त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने टेस्ट सामन्यांत १०४ फलंदाजांना शून्यावरच माघारी पाठवले. म्हणूनच त्याला चीफ डक हंटर असेही म्हणतात.

 

mcgrath-inmarathi
RapidLeaks.com

 

ह्या यादीत ऑस्ट्रेलियाच्याच फिरकीपटू शेन वॉर्न आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचेही नाव आहे.

ह्या दोघांनीही १०२ फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे तर त्यांच्यानंतर ह्या यादीत वसीम अक्रम आणि कोर्टनी वॉल्श ह्यांचा क्रमांक लागतो. ह्या दोघांनी ७९ फलंदाजांना शून्यावर बाद करण्यात यश मिळवले आहे.

अर्थात एकदिवसीय सामन्यांत सर्वात जास्त फलंदाजांना शून्यावर बाद करण्याचा विक्रम वसीम अक्रमकडे आहे. ह्या यादीत सुद्धा ग्लेन मॅकग्राचे नाव आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांत ७१ फलंदाजांना शून्यावरच मैदानातून निरोप दिला आहे.

वेगवान गोलंदाजांसाठी सगळ्यात अवघा गोष्ट म्हणजे दुखापती टाळून आपला फिटनेस जपणे!

ग्लेन मॅकग्राकडे वसीम अक्रमसारखी खतरनाक स्विंग नसू देत, किंवा जेफ थॉमसन सारखा वेग नसू देत, पण मॅकग्राकडे अचूक लाईन आणि लेन्थची जी हातोटी आहे त्यामुळे त्याने मोठं मोठ्या फलंदाजांना पाणी पाजले आहे.

त्याच्याकडे इतकी अचूकता आहे की ऑफ स्टम्पवर एक छोटंसं नाणं जरी ठेवलं तरी तो अचुकपणे त्या नाण्याचा वेध घेऊ शकत असे.

 

glenn-inmarathi
abc.com

 

त्याच्या कारकिर्दीत त्याने “कॉरीडॉर ऑफ अनसर्टन्टी” असणाऱ्या ऑफ स्टम्पच्या एरियात राज्य केले. टेस्ट क्रिकेटमधील तो सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज मानला जातो.

१२४ टेस्ट सामन्यात त्याने ५६३ बळी घेतले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात सुद्धा अत्यंत यशस्वी कामगिरी केली आहे. २५० एकदिवसीय सामन्यांत त्याने ३८१ बळी मिळवले आहेत.

त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाने १९९९,२००३ आणि २००७ असे तीन विश्वचषक जिंकले आणि हे विश्वचषक जिंकवून देण्यात मॅकग्राने मोठे योगदान दिले. त्याने विश्वचषकात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

त्याने विश्वचषक स्पर्धेत ७१ फलंदाज बाद करण्यात यश मिळवले आहे. तसेच २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

ह्या स्पर्धेत त्याने २६ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकासाठीचा मार्ग मोकळा केला होता.

उंच आणि सडपातळ बांधा असलेल्या मॅकग्राला त्याचे सहकारी प्रेमाने पिजन म्हणत असत. विरुद्ध संघातील सर्वोत्तम फलंदाजाला टार्गेट करून बाद करणे त्याला आवडत असे.

 

gmcgrath-inmarathi
Sportskeeda.com

 

त्याने सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, मायकल अथर्टन अश्या महान फलंदाजांना अनेक वेळा बाद केले आहे.

मायकल अथर्टनला तर तब्बल १९ वेळा तंबूत परत पाठवण्याचा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे.

मोठमोठ्या फलंदाजांना सुद्धा मॅकग्राच्या आक्रमक गोलंदाजीचे दडपण यायचे. एकदा ब्रायन लारा स्वत: म्हणाला होता की,

“जर मॅकग्रा सहा ओव्हर टाकणार असेल तर त्यापैकी कमीत कमी बॉल्सला मी सामोरा जाईन आणि चंद्रपॉलला इतर बॉल्स फेस करायला लावेन.”

९ फेब्रुवारी १९७० साली न्यू साऊथ वेल्स मध्ये बेवर्ली आणि केविन मॅकग्रा ह्यांच्या पोटी ग्लेनचा जन्म झाला. ग्लेनची क्रिकेटची सुरुवात न्यू साऊथ वेल्समध्येच झाली.

सुरुवातीला डग वॉल्टर्स ह्यांनी ग्लेन मधील प्रतिभा ओळखली. त्यानंतर ग्लेनने सिडनीला जाऊन ग्रेड क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

त्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळल्यानंतर टेस्टच्या संघात त्याची निवड झाली आणि पहिला सामना तो न्यूझीलंड विरुद्ध १९९४ साली पर्थ येथे खेळला. त्यानंतर त्याच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली.

 

 

ग्लेन मॅकग्राची सर्वोत्तम गोलंदाजी २००४ च्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बघायला मिळाली. पर्थ मध्ये हा सामना सुरु होता आणि ह्या टेस्ट सामन्यात ग्लेनने आठ बळी घेऊन पाकिस्तानी संघाची दाणादाण उडवली.

पाकिस्तानी संघाला ५६४ धावांचे लक्ष्य गाठायचे होते. परंतु मॅकग्राच्या आक्रमक गोलंदाजीने पाकिस्तानी संघाची धूळधाण उडवली.

पारंपरिक विरोधी संघ असलेल्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ऍशेस सामन्यांत तर मॅकग्राने कायमच इंग्लंडच्या फलंदाजांना दडपण दिले. त्याने ३० ऍशेस टेस्ट सामन्यांत फक्त २०.९२ इतके ऍव्हरेज देत १५७ बळी घेतले.

फक्त शेन वॉर्नने ३६ ऍशेस सामन्यांत १९५ बळी घेऊन मॅकग्राचा विक्रम मोडला आहे. १९९७ सालच्या ऍशेस सामन्यात त्याने पहिल्या इनिंगमध्ये २०.३ ओव्हर्समध्ये ३८ धावा देत ८ बळी मिळवून संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले होते.

एका ऍशेसच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फक्त १९० धावा केल्या. पराजयाची नामुष्की येण्याची भीती ऑस्ट्रेलियन संघाला वाटत होती. अशा वेळी मॅकग्रा मैदानात उतरला. त्यावेळी त्याला ५०० बळी पूर्ण करण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती.

त्याला तो ५०० वा बळी इंग्लिश फलंदाज मार्कस ट्रेसकॉथिकचा असावा अशी इच्छा होती.

 

marcus-inmarathi
sportsabc.com

 

इंग्लिश फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी उतरताच ग्लेनने त्याची ही इच्छा पूर्ण करत पहिल्याच बॉलला मार्कस ट्रेसकॉथिकला स्लिप मध्ये झेल द्यायला भाग पाडत त्याला बाद केले.

आणि त्यानंतर आणखी चार बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडले. ऑस्ट्रेलियाने तो सामना २३९ धावांनी जिंकला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?