' हिटलरने केली होती नॉर्थ अमेरिकन लोकांच्या सामूहिक कत्तलाची योजना : धक्कादायक माहिती उघड – InMarathi

हिटलरने केली होती नॉर्थ अमेरिकन लोकांच्या सामूहिक कत्तलाची योजना : धक्कादायक माहिती उघड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

हिटलर हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो एक क्रुर चेहरा. त्यामुळे हिटलरने युध्दात केलेला संहार आणि ज्यू लोकांची केलेली कत्तल हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. हिटलरची क्रुरता दर्शविणारा असाच एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे.

हिटलरने उत्तर अमेरिकन नागरिकांची सामूहिक हत्या घडविण्याची योजना आखली होती, असे एका अहवालातून समोर आले आहे.

 

adolf hitler inmarathi
History on the Net

 

नेमके काय दर्शवतो हा अहवाल? जाणून घेऊया, त्याबाबतची सविस्तर माहिती…

हिटलरने आपल्या राष्ट्रभक्तीसाठी क्रुरतेची परिसिमा गाठली होती. अलिकडेच कॅनडा येथील ग्रंथालय आणि अभिलेखागाराने अॅडाॅल्फ हिटलर याच्या मालकीची १९४४ मधील पुस्तके व काही वादग्रस्त कागदपत्रे विकत घेतली आहेत.

“स्टॅन्टीस्टिक्स, मीडिया अॅण्ड आॅर्गनायझेशन्स आॅफ ज्युरी इन द युनायटेड स्टेटस् अॅण्ड कॅनडा” असे शीर्षक असलेला एक संशोधन अहवालही त्यात समाविष्ट आहे. संशोधक हेन्झ क्लाॅस यांनी लिहिलेल्या या अहवालातून हिटलरने कॅनेडियन व उत्तर अमेरिकन नागरिकांच्या सामूहिक हत्येसाठी तयार केलेल्या योजनेचा उलगडा झाला आहे.

क्लाॅस यांनी १९३६ आणि १९३७ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती व उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या ज्यू जनतेवर काही संशोधने केली होती.

जनगणनेनुसार, ज्यू नागरिकांची संख्या गोळा करणे, तेथील यहुदी नागरिकांची संख्या स्पष्ट करणे, त्याठिकाणी नाझींविषयी सहानुभूति असलेल्या नागरिकांचे जाळे तयार करणे, भाषा व राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभ्यास करणे व हिटलरने आखलेल्या प्राणघातक योजनांमध्ये योगदान देणे हा या संशोधनाचा उद्देश होता.

 

Adolf-Hitler inmarathi
the algemeiner

 

जर, हिटलरने आखलेली ही अंतिम पर्यायाची योजना सत्यात उतरवली असती तर त्याचे भयंकर परिणाम झाले असते.

पण आजही नाझी लोक इतिहासाचा अभ्यास करून ज्यू लोकांचा आहे तिथे संहार करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगू शकतात. त्यामुळे, आताच्या पिढीला त्याबाबत सावध करायला हवे, असे होलोकाॅस्ट शिक्षण मंडळाला (कॅनडा) वाटते.

परंतु, हिटलरच्या मनात ज्यू लोकांविषयी इतका आकस असण्याचे कारण काय? हे ही आपण समजून घेऊ..

हिटलर जेव्हा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष झाला. तेव्हा त्याने सर्वप्रथम देशातील जनतेसाठी आवश्यक महत्त्वाचे निर्णय घेत विकासाला गती दिली होती.

ज्यात त्याने शिक्षणव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविले, शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवून शेतकऱ्यांना शेती करण्यास बांधील केले. रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना करमाफी दिली, शस्त्रोत्पादन वाढविले व अवघ्या पाच वर्षातच देशाचा कायापालट केला.

हे सगळं करत असतांनाच त्याने जर्मनी हे राष्ट्र बलवान करत तेथे आर्य संस्कृती प्रस्थापित केली. महिलांचे स्थान घरातच असून त्यांनी केवळ “चूल-मूल” सांभाळावे व पुरुषांनी बाहेरच्या जगात पराक्रम गाजवावा ही त्याची शिकवण होती.

 

hitler-inmarathi

 

वंश हा रक्तातूनच प्रवाहित होत असतो त्यामुळे रक्त शुद्ध राहणे आवश्यक असते व असा शुद्ध वंश आर्यांचा आहे, असे हिटलरचे विचार होते. पण, हा शुद्ध वंश दडपण्याचा प्रयत्न जगभरातून होत होता. हिटलरच्या क्रुर वृत्तीमुळे सारे जगच त्याच्या विरोधात होते व त्यात ज्यू लोकांचा पुढाकार होता.

ज्यू लोकांनीच जर्मनीला तळागाळात नेऊन ठेवले त्यामुळे, ती अत्यंत धूर्त व लबाड जात असून त्यांना ठेचलेच पाहिजे तरच, जर्मनी बलवान बनू शकेल असे हिटलरला वाटत असे. परिणामी, संशोधक हेन्झ क्लाॅस यांनी तयार केलेला अंतिम पर्यायाचा अहवाल कॅनेडीयन व उत्तर अमेरिकन ज्यू लोकांची सामुहिक कत्तल करण्यात महत्त्वाची भूमिका  बजावेल, असे त्याला वाटत होते.

क्लोसने आपल्या संशोधनात विशिष्ट प्रदेश किंवा शहरेच नव्हे तर लहानशा शहरीवजा क्षेत्रांचे देखील मूल्यांकन करून ठेवले होते. ‘ती सर्व कागदपत्रे सुरक्षित आहेत’,असे या संशोधनाचे अभ्यासक मायकेल केंट सांगतात.

‘कॅनडाने या त्रासदायक अहवालाची खरेदी केली आणि नंतर ते संग्रहात ठेवले त्यामुळे, लोकांना वाईट गोष्टींसाठी किती लवकर बदलता येते याची आठवण करून देता येईल’, असे ते म्हणाले. तसेच, ‘लोकांना सामुहिक कत्तलीसारख्या योजनांप्रती तिरस्कार निर्माण करून दूर नेता येईल’, असे केंट यांना वाटते.

पण त्याचवेळी, ‘काही संघटना मात्र अशा गोष्टींवर प्रकाश टाकण्यास संकोच करीत आहेत’,असेही ते सांगतात. या अहवालावर एक स्वस्तिक, एक गरूड व ‘लिब्रिस अॅडाॅल्फ हिटलर’ असे शब्द लिहिलेले असून हा अहवाल हिटलरने बावारिया येथील अल्पाइन माउंटंट रिट्रीटमध्ये ठेवला असावा. याशिवाय, उत्तर अमेरिका केंद्रीकृत अहवालात हिटलरच्या मालकीच्या पुस्तकांची एक मोठी यादी आहे जी ब्राउन विद्यापीठ आणि काॅंग्रेरी येथील संग्रहालयांमध्ये संग्रहित आहे.

 

death-of-hitler-inmarathi

 

हा नवीन शोध पृथ्वीवरील ज्यू लोकसंख्येला पुसून टाकण्यासाठी नाझी शासनाने किती प्रयत्न केले, याचे धक्कादायक स्मरण म्हणून संग्रहित राहील. पण कुणाची कत्तल करून का होईना, राष्ट्राला मोठे करण्याचा विचार मांडणारी व्यक्तीही थोरच असणार व हिटलरही तसाच होता. “जगावर प्रभुत्व गाजविण्यासाठी असे क्रौर्य करणे भागच होते” असा एक मतप्रवाह उमटतांना दिसतो.

त्याचप्रमाणे, हिटलरने फ्रान्सशी केलेला व्हर्सायचा तह, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी हे केवळ धमकी देऊन जिंकून घेतलेले देश, पोलंडवर मिळवलेला विजय, डेन्मार्क व नाॅर्वेच्या राजाला पत्करायला लावलेली शरणागती, फ्रान्सचा पराभव, ब्रिटीशांशी केलेला सरळसरळ संघर्ष, बाल्कन प्रदेशात ग्रीकांना पराभूत करणे, रूसो-जर्मनी करार आणि पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात बजावलेली भूमिका याचे दाखले आजही दिले जातात.

 

hitler inmarathi
phys.org

 

वास्तविक, हिटलरची भारताबद्दलची भावना फार चांगली होती असे समजण्याचे काहीच कारण नाही. वैदिक संस्कृती ही मुळात आर्य संस्कृती असली तरी नंतर त्यांच्या रक्तात भेसळ झाली असे हिटलरला वाटत असे.

 

हिटलरने केलेले क्रौर्य लोकहितासाठीच होते त्यामुळे तो खरा राष्ट्रनेता होता, असे काही लोकांना वाटते. त्यामुळेच की काय अनेकदा राजकारणात नेतेमंडळींची तुलना हिटलरशी होत आल्याचे दिसून येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?