अमेरिकेतली नोकरी सोडून ‘हा’ तरुण सेंद्रिय शेती करून कामावतोय लाखो रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपल्याकडे शेती हा व्यवसाय फायद्याचा नाही असा समज सर्वसाधारण लोकांमध्ये आढळतो.

कारण शेतीमध्ये आपल्याला मेहनत तर प्रचंड करावी लागतेच, पण आपल्या मेहनतीला यश द्यायचे की नाही हे निसर्गराजाच्या कृपेवर अवलंबून असते.

निसर्गराजाने कृपा केली तर शेतकऱ्याच्या घरी आनंद येतो पण निसर्गाची अवकृपा झाली तर उभे पीक वाया जाते आणि निराश होऊन नुकसान सहन करणे इतकेच शेतकऱ्याच्या हातात असते.

 

agriculture InMarathi


त्यामुळेच परंपरागत शेतीचा व्यवसाय नसेल तर सहसा कुणी ह्या व्यवसायात उतरण्याचा धोका पत्करत नाही.

पण तेलंगणाच्या ह्या तरुणाने आपली अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून भारतात परत येऊन एका नापीक जमिनीवर शेती करणे सुरु केले!

आणि आज त्या व्यवसायातून तो तरुण लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवतो आहे.

 

farmer-inmarathi
thebetterindia.com

 

तेलंगणाच्या हरी कृष्ण देवरापल्ली ह्याने त्याची अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून केवळ शेती करण्यासाठी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला बऱ्याच जणांनी वेड्यात काढले. त्याच्या घरच्यांना सुद्धा त्याचा हा निर्णय पटला नाही.

घरची ३०० एकर शेती करण्यासाठी अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची आरामदायक नोकरी कोण सोडेल? पण असा विचार हरीकृष्ण देवरापल्लीने केला नाही.

हैद्राबादपासून ३५० किमी लांब असलेल्या भद्रारी कोथागुडम ह्या जिल्ह्यातील मंडलापल्ली गावात हे शेतजमीन आहे.

ही शेतजमीन सुद्धा सुरुवातीला सुपीक नव्हती. ह्या जमिनीवर तब्बल पाच वर्ष मेहनत घेतल्यानंतर आज त्या मेहनतीचे फळ हरीकृष्णला मिळते आहे.

 

agriculture 1 InMarathi

 

पार्ट टाइम इंजिनिअर आणि फुल टाइम शेतकरी असलेला हरिकृष्ण सेंद्रिय शेती करतो आणि तांदूळ, कोको, ऑइल पाम आणि नारळ ह्यांचे उत्पादन घेऊन त्यातून जवळजवळ १० ते १५ लाख रुपये वर्षाला कमावतो.

त्याचे संपूर्ण कुटुंबच शेतकरी आहे. लहानपणापासूनच त्याला शेतीची अत्यंत आवड होती तसेच घरातील गाईगुरांवर त्याचे अतिशय प्रेम आहे. त्याचे वडील आणि आजोबा सुद्धा शेतीच करत असत.

त्याला मोठेपणी कृषीविज्ञानाचेच शिक्षण घ्यायचे होते परंतु घरची जी ३० एकर शेतजमीन होती ती हळूहळू नापीक होऊ लागल्याने त्याला बी.टेक करावे लागले.

 

India-Drought-inmarathi
indianexpress.com

 

हरी म्हणतो की,

“नैसर्गिक उत्पादने वापरून सेंद्रिय शेती केल्याने माझे आजोबा व त्यांच्या सात भावंडांनी एका छोट्या शेतजमिनीपासून सुरुवात केली आणि नंतर २०० एकर जमीन मिळवली.

परंतु ह्याउलट माझ्या वडिलांनी रासायनिक उत्पादने वापरली आणि आमच्या तीस एकर शेतजमीनीवर त्याचा परिणाम होऊन ती जमीन जवळजवळ नापीक झाली!

आणि त्यामुळे माझ्या वडिलांना त्रास सहन करावा लागला. ”

हरीने शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेत चार वर्ष नोकरी केली परंतु त्याच्या डोक्यात कायम एकच गोष्ट होती की परत जाऊन शेतजमिनीवर काम करून शेतीचाच व्यवसाय करायचा.

म्हणूनच त्याने भारतात परत येण्याचा निर्णय घेतला.

 

telangana farmer InMarathi

 

त्याने हैद्राबादजवळ काम करून आपल्या वडिलांसह नियमितपणे शेतात जाणे सुरू केले. तोपर्यंत त्याच्या लक्षात आले होते की रासायनिक शेती केल्याने जमिनीची सुपीकताच नष्ट झाली आहे.

एकेकाळी त्याच्या आजोबांनी सेंद्रिय शेती करून, नैसर्गिक उत्पादने वापरून जमिनीची गुणवत्ता सुधारली होती, ती सगळी सुपीकता नष्ट झाली होती.

हरीने जमिनीचा कायापालट करण्याचे ठरवले.

“सुरुवातीला माझ्या वडिलांना माझ्या ह्या निर्णयाबाबतीत शंका होती. पण जेव्हा मी त्यांना समजावून सांगितले की जमिनीची गुणवत्ता जर सुधारायची असेल आणि शेतीमधून फायदा मिळवायचा असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही.

त्यांना हे समजले आणि त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला”, हरी सांगतो.

इतर कुणाचीही मदत न घेता हरी व त्याच्या वडिलांनी काम करणे सुरु केले आणि प्रत्येक एकरातून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

हरीने सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा त्या ठिकाणी करवून घेतल्या.

 

sendriya-inmarathi
smeartudyojak.com

 

सुरुवातीला त्याने त्याची नोकरी सुद्धा सुरु ठेवली आणि मधून मधून तो शेतावर जाऊन कामावर लक्ष ठेवीत असे.

पण दोन वर्षांनंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याला पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शेती ह्यातील एकच निवडणे भाग होते.

त्याने गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि शेती करणे सुरु केले. पण त्याने त्याची नोकरी पूर्णपणे सोडली नाही.

अर्थात ह्यामुळे त्याच्या पगारात घट झाली. पण त्याने गावातूनच त्याच्या कंपनीसाठी ओरॅकल कन्सलटंट म्हणून काम करणे सुरु ठेवले व त्याबरोबरच शेतीचे काम सुद्धा सुरु ठेवले.

जेव्हा हरीचे वडील शेती करत होते तेव्हा ते रासायनिक उत्पादने वापरत होते, त्यामुळे ऑइल पामचे उत्पादन १० टन पर एकर इतके होते.

 

telangana farmer 1 InMarathi

 

पण ह्या सगळ्यासाठी खर्च खूप जास्त येत होता. हरीने ठरवले होते की सुरुवातीला पाच एकर जमिनीत ऑइल पामचे पीक घेऊन प्रत्येक एकरातून किमान सात ते आठ टन उत्पादन काढायचे.

पण ह्या सगळ्यासाठी कुठलेही रासायनिक खत किंवा कीटनाशक वापरायचे नाही.

त्याने शेतातच पिकांचा टाकाऊ भाग वापरून जमिनीची गुणवत्ता सुधारली आणि पीक घेणे सुरू केले. सुरुवातीची दोन वर्ष त्याला खूप कष्ट करावे लागले.

पण त्याच्या कष्टाला अखेर फळ मिळाले. तिसऱ्या वर्षी हरीने संपूर्ण ३० एकरात सेंद्रिय शेती करणे सुरु केले.

 

farmer.jpg-inmarathi
indiatoday.com

 

पाच वर्षात शेतीचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी वाढले. ज्या जमिनीत प्रत्येक एकरात १० टन उत्पादन होत होते, त्याच जमिनीत आता प्रत्येक एकरातून १५ टन उत्पादन होऊ लागले आहे.

आणि ह्या सगळ्यासाठी होणाऱ्या खर्चात ३० ते ४० टक्क्यांनी कपात झाली आहे.

हरी १२ एकर जमिनीत ऑइल पामचे उत्पादन घेतो, १२ एकरात नारळ आणि पाच एकरात तांदुळाचे पीक घेतो. अर्थात हा सगळं शेतमाल विकण्यासाठी त्याला त्याचे मार्केटिंग स्किल्स वापरावे लागले.

पण जेव्हा लोकांना ह्या शेतमालाची चांगली गुणवत्ता लक्षात आली तेव्हा त्याच्याकडे ग्राहकांची रीघ लागली.

त्याच्याकडून शेतमाल विकत घेणारे लोक म्हणजे इतर शेतकरी, त्याची मित्रमंडळी आणि नातेवाईक हे आहेत.

आता हरीला त्याच्या शेतीतून दर वर्षी दहा ते पंधरा लाख इतकी कमाई मिळते. पण पुढच्या तीन वर्षात हे उत्पन्न ३० लाखांपर्यंत नेण्याचा हरीचा विचार आहे.

हरी सांगतो की ,”जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतीतूनच उत्पन्न झालेला टाकाऊ माल रिसायकल करून वापरता येतो.

हे बायोमास जमिनीत टाकले तर जमिनीला फायदा होतो. ह्या प्रक्रियेला मल्चिंग असे म्हणतात.

 

telangana farmer 2 InMarathi

 

हे मल्च म्हणजे झाडांची सुकलेली पाने, गवत, सव्यंपाकघरातील ओला कचरा, शेण आणि वाळलेलं गवत असतं. मल्चिंग केल्याने जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

त्याने जमिनीचा पोत सुधारतो व सुपीकता वाढते. ह्याने जमिनीत होणारी तणांची वाढ सुद्धा कमी होते.”

त्याच्या शेतातील गुरे आणि कोंबड्या ह्या काही व्यावसायिक विक्रीसाठी नाहीत. त्यांच्या घरच्यासाठी त्या गाई-म्हशींचे दूध वापरले जाते.

आणि त्यांच्या शेणापासून शेतात वापरण्यासाठी शेणखत तयार केले जाते. शेणखत वापरणे अतिशय फायदेशीर आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. तसेच मिश्र पिके घेणे सुद्धा शेतीसाठी फायदेशीर आहे.

 

sendriya-sheti-inmarathi
prahaar.com

 

हरीचे असे म्हणणे आहे की,

“तुमचे शेत कितीही लहान असू द्या. पण एकाच प्रकारचे पीक घेत राहणे शेतजमिनीसाठी फायद्याचे नाही.

शेतात एकाच वेळी दोन किंवा अधिक प्रकारची पिके घेतली पाहिजेत अशाने अस्मानी संकटाच्या वेळी जास्त नुकसान होत नाही.

एक पीक नीट नाही पिकले तर दुसऱ्या पिकातून तुमचा फायदा होईल.तसेच तुमच्या पिकांचे चांगल्या प्रकारचे मार्केटिंग होणे सुद्धा गरजेचे आहे.

त्यातूनच तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल. माऊथ पब्लिसिटी ही खूप फायदेशीर ठरते.”

हरी आता सोशल मीडियाचा वापर करून आपल्या पिकांचे मार्केटींग करतो व उत्तम फायदा मिळवतो. त्याच्या पाच वर्षांच्या मेहनतीचे फळ त्याला आता मिळू लागले आहे.

त्याच्या घरच्या वापरासाठी त्याला भाज्या, फळे, मसाले, डाळी, धान्ये ह्यासाठी बाजारात जावे लागत नाही तर तो हे सगळे त्याच्या घरच्यापुरते त्याच्या शेतातच पिकवतो.

ह्या सगळ्यासाठी त्याने खास वेगळी जमीन ठेवली आहे.

 

telangana farmer 3 InMarathi

 

“जेव्हा मी माझ्या शेतात जेवायला बसतो, तेव्हा त्यातील सर्व गोष्टी ह्या माझ्याच शेतातल्या आहेत हे बघून मला समाधान मिळतं. मला माझ्या ताटातल्या सर्व गोष्टी माझ्याच शेतात पिकवायला आवडतं!” असे तो सांगतो.

हरीच्या ह्या सर्व प्रवासात त्याच्या घरच्यांनी त्याला साथ दिली आहे. त्याच्या कुटुंबाला त्याचा खूप अभिमान आहे. त्याची पत्नी रेखा त्याच्या बरोबर खंबीरपणाने उभी आहे. हरी सांगतो की,

“आधी माझ्या घरच्यांना माझा हा निर्णय पटला नाही. पण नंतर त्यांचा मला खूप आधार मिळाला. तुम्हाला ह्या व्यवसायात उतरायचे असेल तर तुम्हाला ह्याची आवड असल्यास आणि १०० टक्के कष्ट आणि प्रयत्न करण्याची तयारी असल्यासच ह्या व्यवसायात उतरा.

लोकांचा असा गैरसमज आहे की शेतीतून फायदा होत नाही उलट नुकसानच होते. परंतु इतर व्यवसायांप्रमाणेच शेतीतून सुद्धा फायदा मिळवता येतो.

 

farmer-inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

जर तुम्ही योग्य पद्धतीने शेती केली, तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल. तुम्ही चाकोरीच्या बाहेर काही करायला गेलात तर लोक तुम्हाला बोलतीलच!

पण तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही यशस्वी झालात तर तीच माणसे उद्या तुमचे कौतुक सुद्धा करतील. मी ही हेच करतोय . तुम्हीही करू शकता.”

हल्ली शेतीतून नुकसान झाल्यामुळे असलेले शेतकरी सुद्धा शेती सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत. अशा वेळी हरीचे उदाहरण सगळ्यांसाठीच प्रेरणादायक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?