' संगीतातून लोकांना जगण्याची प्रेरणा देणारा रेहमान चक्क स्वतःला संपवणार होता… – InMarathi

संगीतातून लोकांना जगण्याची प्रेरणा देणारा रेहमान चक्क स्वतःला संपवणार होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

 

===

ए आर रहमान म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा संगीतकार आहे. त्याचे संगीत अतिशय सुंदर व वैविध्यपूर्ण असते. त्याच्या संगीताने श्रोत्यांच्या मनावर जादू केलेली आहे. कित्येक चित्रपटांना रहमानने संगीत देऊन यशाचा मार्ग दाखवला आहे. असा हा सर्जनशील कलावंत मानाच्या ऑस्कर पुरस्काराचाही विजेता ठरलेला आहे.

त्याने संगीतासाठी देशात तर अनेक पुरस्कार जिंकले आहेतच, त्याबरोबरच तो अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचाही मानकरी ठरला आहे.

पण हे सगळे घडण्याआधी रहमानच्या आयुष्यात कधी असाही काळ आला होता की त्याला त्याचे आयुष्यच संपवून टाकावेसे वाटत होते. नैराश्याने त्याच्या मनात घर केले होते आणि त्यामुळे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते.

परंतु सुदैवाने तसे काही घडले नाही आणि रहमानची अनेक सुंदर गाणी रसिकांना ऐकायला मिळाली आणि पुढेही मिळत राहतील.

 

ar-inmarathi
dawn.com

 

त्याच्या करियरच्या सुरुवातीला यश न मिळाल्यामुळे नैराश्य येऊन रोज मनात असे टोकाचे विचार येत होते असे रहमानने सांगितले. परंतु याच संघर्षाने मला आयुष्यातल्या संकटांचा धैर्याने सामना करण्याची ताकद दिली असेही तो सांगतो.

“वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत मी रोज आत्महत्येचा विचार करत होतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा समज असतो की त्यांना काही जमणार नाही, किंवा यश मिळवण्याची कुवत त्यांच्यात नाही. पण असे नसते. माझे वडील गेल्यामुळे माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. आणि मी नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊ लागलो होतो,” असे हा म्युझिक माइस्ट्रो म्हणतो.

ह्या नकारात्मक विचारांशी झगडत असतानाच त्याने त्याचा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ त्याच्या घराच्या मागच्या अंगणातच उभारला. “पंचथन रेकॉर्ड इन” असे या स्टुडिओचे नाव आहे.

त्याच्या चेन्नईतील घराच्या मागच्या अंगणातच त्याने हा स्टुडिओ बांधून त्याचे संगीताचे काम सुरु ठेवले.

रहमानचे वडील रहमान केवळ नऊ वर्षांचा असतानाच गेले. त्याला ही संगीताची देण त्याच्या वडिलांकडूनच मिळाली. त्याचे वडील आरके शेखर हे सुद्धा चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून काम करीत असत.

 

rehman-father-inmarathi
Rahmaniac – WordPress.com

 

वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे रहमानच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. तेव्हा पैश्यांसाठी वडिलांची वाद्ये भाड्याने देण्याची वेळ त्यांच्यावर आली. यातूनही संघर्ष करत रहमानने आपले संगीताविषयीची प्रेम आणि आवड जपली आणि वडिलांसारखेच संगीत निर्माण करणे सुरु केले.

पण सुरुवातीला त्याच्या वाट्याला यश आले नाही. म्हणून तो निराश झाला.

आपल्या आयुष्यात वाट्याला आलेला संघर्ष, संगीताची आवड आणि नैराश्यावर मात करत रसिकांच्या मनावर संगीताची मोहिनी घालत मिळवलेले उत्तुंग यश याबाबतीत बोलताना रहमान म्हणाला की,

“माझे वडील गेल्यामुळे आणि ज्या पद्धतीत ते काम करत त्यामुळे मी जास्त काम करू शकलो नाही. मला ३५ चित्रपट मिळाले पण त्यातील फक्त २ चित्रपटांवर मी काम करू शकलो.”

कृष्णा त्रिलोक या लेखकाने शब्दबद्ध केलेले ए आर रहमानचे आत्मचरित्र “नोट्स ऑफ अ ड्रीम : द ऑथराईज्ड बायोग्राफी ऑफ ए आर रहमान” या पुस्तकात रहमानच्या आयुष्यातील घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

नैराश्य हा मानसिक आजार भल्या भल्यांना आयुष्यातून उठवतो. सामान्य माणूस असेल की एखादी दिग्गज व्यक्ती, नैराश्य कुणालाही येऊ शकतं!

मागे दीपिका पदुकोणनेसुद्धा तिला आलेल्या नैराश्याबद्दल जाहीरपणे सांगत याबाबतीत जनजागृती केली होती.

 

deepika-inmarathi
india.com

 

नैराश्य ज्याला आपण डिप्रेशन असेही म्हणतो हा मानसिक आजार जगात सगळीकडे आढळतो. नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणाव ही समस्या बऱ्याच जणांमध्ये आढळून येते आणि तो तणाव नीट हाताळण्यात आला नाही तर हळूहळू माणसाला नैराश्य येऊ लागते.

रोजच्या आयुष्यात जर आर्थिक समस्या, अपयश, नकार, शारीरिक त्रास ह्यांचा सामना करावा लागत असेल तर माणसाच्या मनावरचा ताण वाढतो.

किंवा काही तणावपूर्ण प्रसंग , अपघात,दुर्दैवी घटना, एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानकपणे मृत्यू असे प्रसंग आयुष्यात आले तरीही ताण वाढतो. असा ताण मनावर सतत येत असेल तर ठराविक हॉर्मोन्सचे शरीरात उत्सर्जन होते आणि मेंदूवरसुद्धा परिणाम होतो.

अशी अतिरिक्त ताण आलेली व्यक्ती उत्तेजित होते, मलूल होते किंवा सतत रडते , गोंधळल्यासारखी वागते.

अशा वेळी त्या व्यक्तीस जर जवळच्या व्यक्तीचा आधार आणि सुरक्षित आपलंसं वातावरण आणि योग्य ते उपचार मिळाले तर ती व्यक्ती परत पहिल्यासारखी नॉर्मल होते.

पण काही माणसे ताणातून बाहेर येऊ शकत नाहीत. सतत तणावपूर्ण घटनांचा खूप जास्त विचार करतात आणि घडलेली घटना परत परत आठवून त्यावेळी झालेला त्रास पुन्हा पुन्हा भोगतात.

 

depression_inmarathi
food.ndtv.com

 

अशी ताणग्रस्त व्यक्ती साध्या-साध्या गोष्टींनाही घाबरते. स्वभावात चिडचिडेपणा येतो, उदासीन वृत्ती निर्माण होते. रोज सकाळी उठण्याचाही उत्साह वाटत नाही. कशाचाच उत्साह वाटत नाही. नवा दिवस नवे संकट घेऊन येतो अशी भावना त्यांच्या मनात घर करते.

अश्या व्यक्ती एकट्याने घराबाहेर सुद्धा पडायला घाबरतात. अशा वेळी मनाला उभारी येईल असे काही केल्यास थोड्यावेळ बरे वाटते पण त्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी समुपदेशन आणि उपचारांची आवश्यकता असते.

आपल्याला नैराश्य आले आहे हे त्या व्यक्तीलाही लवकर कळत नाही त्यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांनाही हे लक्षात येण्यास वेळ लागतो.

नैराश्यात मानसिक तीव्र वेदना हे सर्वात महत्वाचे लक्षण आहे हे लक्षात ठेवायला हवे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कमीअधिक प्रमाणात नैराश्य येते. पण मन खंबीर असलेली माणसे त्यातून लगेच बाहेर पडतात.

पण काही कमकुवत मनाच्या व्यक्ती त्या आजाराशी लढू शकत नाहीत. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये नैराश्य येण्याचे प्रमाण जास्त आहे.

स्त्रियांनी तर दु:ख सहन करत राहावे असा गैरसमज आपल्याकडे आढळतो. त्यामुळेही कोणाला न सांगता स्त्रिया पदरात येईल ते दु:ख सहन करत राहतात आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात नैराश्याला बळी पडतात.

नैराश्य येणे म्हणजे काहीतरी जीवघेणे प्रकरण आहे असे नाही. त्यावर योग्य उपचार आणि समुपदेशनाची मदत घेतल्यास आयुष्य परत सुरळीत होते.

पण या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते. म्हणूनच नैराश्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. त्यावर संपूर्ण उपचार घेतले पाहिजेत.

 

DEPRESSION-marathipizza
huffingtonpost.in

 

पूर्वी मानसिक आजार म्हणजे वेडेपणा असाच समज सगळीकडे होता. आता मात्र लोकांमध्ये त्याविषयी जागरूकता वाढते आहे. लोक मानसिक आजार सुद्धा गांभीर्याने घेऊन त्यावर उपचार घेऊ लागले आहेत. मानसिक आजार ही काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही.

सर्दी-खोकला, ताप, मधुमेह, रक्तदाब याप्रमाणेच हा सुद्धा एक आजार आहे असा बहुतांश लोक विचार करू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे.

म्हणूनच रहमान, जे के रोलिंग, लेडी गागा, द रॉक आणि दीपिका पदुकोण सारखे ख्यातनाम लोक जगापुढे आपल्या नैराश्याविषयी मोकळेपणाने बोलत आहेत. दुर्दैवाने, जगाला कायम हसवणारे रॉबिन विल्यम्स मात्र नैराश्यावर मात करू शकले नाहीत आणि नैराश्य व त्यानिगडीत इतर मानसिक आजारांनी ग्रस्त होऊन त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

प्रसिद्ध आणि यशस्वी लोक जर ह्याविषयी मोकळेपणाने बोलू शकतात, तर सामान्य माणसाने त्याला भेडसावत असलेल्या या नैराश्याच्या समस्येबद्दल आपल्या कुटुंबाशी किंवा मित्रमंडळींशी बोलून योग्य उपचार सुरु करायला हवेत.

नैराश्य, तणाव यात लपवण्यासारखे काहीही नाही आणि लाज वाटण्यासारखे तर अजिबात काहीही नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?