' अद्रिका-कार्तिक यांनी जे साहस दाखवले त्यामुळे लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल

अद्रिका-कार्तिक यांनी जे साहस दाखवले त्यामुळे लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

केंद्र सरकार आणि स्वयंसेवी संस्थेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी २६ जानेवारीला राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुले राजपथावर संचलनात सहभागी होतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती.

सरतेशेवटी निवड झालेली ही २६ मुले राजपथावर संचलनात सहभागी झाली. यातील ३ जणांना त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी पुरस्कार मिळाला होता.

कठीण प्रसंगात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. गतवर्षी राष्ट्रीय शौर्य पुरस्काराची निवड केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून करण्यात आली होती.

अद्रिका गोयल आणि कार्तिक गोयल या भावंडाना शौर्य पुरस्कार मिळाला.

 

bravery-inmarathi
indianeagle.com

 

अद्रिका आणि कार्तिक यांनी वयाच्या १०व्या आणि १३व्या वर्षीच जे साहस दाखवले आहे त्यामुळे केवळ लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल.

अनुसूचित जाती/जमातीच्या बांधवांवर होत असलेल्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी लागू असलेला अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतूदी सैल केल्याबद्दल देशभर मोठा क्षोभ निर्माण झाला होता.

त्याचाच एक भाग असलेले आंदोलन मध्य प्रदेशातील मोरेना रेल्वे स्थानकावर होत होते. मात्र या आंदोलनाने पेट घेतला आणि हिंसाचाराला सुरुवात झाली.

जमाव अनियंत्रित झाला होता. परिणामी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. छत्तीसगढ एक्सप्रेस वर दगडफेक सुरु झाली होती. समोरच आग पेटवण्यात आली होती.

बराच वेळ झाला तरी जमाव काही नियंत्रणात येत नव्हता. परंतु यामुळे रेल्वेतील प्रवासी मात्र निष्कारण भरडले जात होते.

 

bharat-bandh-inmarathi
NDTV.com

 

बराच वेळ उलटूनही रेल्वे एकाच ठिकाणी थांबल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते. प्रवासात लागणारे जे काही थोडे खाद्यपदार्थ – पाणी होते ते देखील संपले होते. रेल्वेतील पॅन्ट्री सुद्धा रिकामी झाली होती.

अशावेळी मोरेना रेल्वे स्थानकापासून २०० मीटर अंतरावर राहणाऱ्या अद्रिका आणि कार्तिक या भावंडांनी अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

त्यांनी घरून खाण्याचे पदार्थ, जसे की बिस्कीट, फरसाण घेतले त्याचसोबत पाणी आणि प्रथमोपचाराचे त्यांच्याजवळ असलेले साहित्य एकत्र केले आणि प्रवाशांना देऊ केले. यावेळी बाहेर सुरु असलेला हिंसाचार थांबला नव्हता.

रेल्वेतील काही प्रवाशांना देखील दुखापत झाली होती. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण होते. इतके सर्व असतांना देखील या बहीण भावाने आपल्या परीने मदतकार्य सुरु केले.

ही मुले एका कोच पासून दुसऱ्या कोच कडे धावत पळत मदत करत होती. साहजिकच प्रवाशांना तो एक दिलासा होता. ते मदत करतांनाचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

 

adrika-inmarathi
Indiatimes.com

 

संकटकाळात निडरपणे प्रवाशांच्या मदतीला धावून गेल्याची लहानग्यांची ही कृती चांगुलपणाला बळ देऊन गेली आणि इतरांकडून देखील मदतीचा ओघ सुरु झाला.

कार्तिक या घटनेविषयी सांगतो की,

“आम्ही प्रवाशांच्या जागी स्वतःला ठेऊन पाहिले, जर आम्हाला मदत मिळाली नसती तर आम्हाला काय वाटले असते”?

या विचारांमुळेच आपण त्या प्रवाशांना मदत करावी असा निर्णय या दोघांनी घेतला. अद्रिका सांगते, “अशा संकटाच्या वेळेस आपण होऊन लोकांनी पुढे आले पाहिजे, तरच शांतता निर्माण होण्यास मदत होईल.”

या घटनेनंतर अद्रिका आणि कार्तिक यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण जेव्हा या बहीण भावाबद्दल अजून माहिती मिळाली तेव्हा त्यांच्याबद्दलचे कौतुक अजून वाढले. कारण देखील तसेच आहे.

काही वर्षापूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत अद्रिका जखमी झाली होती. यात तिचे दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी झाले होते.

डॉक्टरांना ती परत चालू शकेल की नाही याची खात्री नव्हती एवढंच पुरेसं नव्हतं म्हणून की काय यामुळे तिला नैराश्य येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली होती.

 

award-inmarathi
Twitter

 

“माझ्या मुलीला अशा मोठ्या समस्यांना तोंड देताना मला खूप वेदना होत होत्या. डॉक्टरांनी सांगितले की, मी तिला मदत करण्याची गरज आहे. अशानेच अद्रिका नैराश्यातून बाहेर येईल”. तिचे वडील अक्षत गोयल यांनी त्याबद्दल सांगितले

अद्रिका देखील त्या दिवसांबद्दल आठवून हळवी होते.

“उपचारानंतरही, मी योग्य रितीने उभे राहू शकले नाही. अनेक लोक माझ्या परिस्थितीवर दया दाखवू लागले. मी खूप निराश झाले होते. “

पण इथेही तिच्या बहादूरीची झलक बघायला मिळाली. घरच्यांच्या मदतीने तिने मार्शल आर्ट्स शिकण्याचा निर्णय घेतला. तिने तायक्वांदो च्या वर्गात आपले नाव नोंदवले.

“मला तायक्वांदो वर्ग चालू ठेवण्यासाठी तिला अनेक वेळा सक्ती करावी लागली. पण लवकरच, ती पुन्हा चालू झाली.”  तिचे वडील सांगतात.

या अवघड प्रवासात तिचे समर्पण देखील असे होते की, तिने वयाच्या आठव्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवले आणि यामुळे तिच्या आत्मविश्वास वाढला. याशिवाय आपल्या वडिलांप्रमाणे तिने आतापर्यंत २०,००० मुलांना प्रशिक्षण दिले आहे.

 

thebetterindia.com

 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिने आंतरराष्ट्रीय इंग्रजी ओलंपियाडमध्ये सुवर्णपदक देखील जिंकले आहे. आता अद्रिका तिच्या जिल्ह्यातील “बेटी बचाओ, बेटी पढाओ” मोहिमेची सदिच्छादूत देखील आहे.

तिचा मोठा भाऊ कार्तिक देखील मागे नाही. कार्तिकच्या नावावरही राष्ट्रीय विक्रम आहे. सर्वांत लहान वयाचा चित्रकार म्हणून तो नावाजला गेला आहे.

कार्तिक आणि अद्रिका यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तसेच सदैव त्यांच्यामागे असणारे त्यांचे वडील अक्षत गोयल यांचेही अभिनंदन!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अद्रिका-कार्तिक यांनी जे साहस दाखवले त्यामुळे लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल

  • February 1, 2019 at 4:07 pm
    Permalink

    ok

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?