' "माओवाद समर्थकाला पक्ष प्रवेश मिळतोच कसा?" भाजप समर्थकाचा खडा सवाल!

“माओवाद समर्थकाला पक्ष प्रवेश मिळतोच कसा?” भाजप समर्थकाचा खडा सवाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : डॉ. मोहन पवार

===

निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे त्याचसोबत डबके बदलणाऱ्या बेडकांप्रमाणे राजकीय नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या घेण्याचा राष्ट्रीय कार्यक्रमही सुरू झाला आहे..

तसेही वर्तमान राजकारण अतिशय गलिच्छ पातळीला पोहचले आहे, साधनशुचिता वगैरे शब्दांशी तर आजच्या राजकारणाशी दुरदूरपर्यंत संबंध नाही.

‘निवडून येण्याची पात्रता’ या एकमेव निकषावर सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार निश्चित करत असतात व इतर पक्षांमधून उमेदवार आयतही करत असतात..

 

BJP-NCP-inmaratrhi
india.com

ज्यांना आपण पक्षात प्रवेश देत आहोत तो व्यक्ती कोणत्या विचारसरणीचा आहे,त्याच्यावर किती भ्रष्टाचाराचे किंवा बलात्काराचे आरोप दाखल झालेले आहेत या सगळ्याचे राजकीय पक्षांना काहिही घेणेदेणे नसते.

परंतु शेवटच्या फळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मात्र या प्रश्नांची उत्तरे समाजाला द्यावी लागत असतात.

त्यामुळे अशा लोकांना प्रवेश देताना आपण थोडेसे का होईना तारतम्य बाळगले पाहिजे याची जाणीव प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवी.

आजपर्यंत राष्ट्रवादीचा दलित चेहरा म्हणून मिरवणारे तसेच हयातभर भाजप संघाच्या विचारसरणीला टोकाचा विरोध करणारे प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी आज भाजपात प्रवेश केला व राजकारणात ‘विचारसरणी’ हा शब्द फक्त चवीपुरता उरलाय याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली..

 

jaimaharashtra-inmarathi
jaimaharashtra.com

राजकीय ताकत वाढवणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची अपरिहार्यता आहे हे जरी लक्षात घेतले तरी या नादात बर्याच वेळा केवळ विचारधारा म्हणून पक्षाशी इमान राखत शेवटच्या स्तरात काम करणारा कार्यकर्ता मात्र अशा निर्णयांमुळे पक्षापासून दुरावणार नाही याची काळजी घेणे हेही राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे.

कारण तो कार्यकर्ता राजकीय नेत्यांप्रमाणे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता तुमच्या वतीने जनतेत वावरत असतो,लोकांना उत्तरे देत असतो वेळप्रसंगी तुमच्यासाठी भांडतही असतो असे निर्णय त्या शेवटच्या कार्यकर्त्याला तोंडावर पाडत असतात.

आता बर्याच लोकांना वाटू शकते की इतर नेते घेतलेले चालतात मग लक्ष्मण ढोबळेंनाच एवढा टोकाचा विरोध का?

त्यांना मी २ जानेवारी २०१६ ची आठवण करून देऊ इच्छितो..

या दिवशी या ढोबळे महाशयांनी त्यांच्या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयात नक्षल समर्थक म्हणून ओळख असलेल्या व नक्षलवादी चळवळीचा प्रचार प्रसार करण्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगून आलेल्या शीतल साठे यांच्या ‘कबीर कला मंच’ चा कार्यक्रम आयोजित केला होता…

 

sheetal-sachin-inmarathi
news18.com

एवढेच नाही तर त्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी गेलेल्या उजव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मारझोड करून तिथून काढून दिले होते.

हा प्रसंग ढोबळेंची विखारी मानसिकता लक्षात घेण्यासाठी पुरेसा आहे..इतरही अनेक प्रसंगी वेळोवेळी ढोबळेंनी नक्षलवादाला आपले समर्थन असल्याचे दाखवून दिलेले आहे.

ज्या नक्षलवादाशी लढताना आजपर्यंत हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या सहानुभूतीदारांना प्रवेश देऊन सामान्य कार्यकर्त्यांकडून त्याच्या समर्थनाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे?

सत्तेच्या हव्यासापायी राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा स्वाभिमान एवढ्या स्वस्तात विकत असतील तर पक्षासाठी कष्ट उपासणार्या कार्यकर्त्यांसाठी यापेक्षा मोठी शोकांतिका ती कोणती?

 

bjp-marathipizza01
ste.india.com

भाजपा स्वतःला ‘पार्टी विथ डिफ्रंन्स’ म्हणवते याची थोडीतरी बुज अशा लोकांना पक्षात प्रवेश देताना वरिष्ठ लोक बाळगतील अशी अपेक्षा करण्याशिवाय आपण दुसरे करू तरी काय शकतो?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?