' “ओपन” : “जगातील सर्वात नावडती गोष्ट” असणाऱ्या टेनिसवर राज्य करणाऱ्या अवलियाचं आत्मचरित्र! – InMarathi

“ओपन” : “जगातील सर्वात नावडती गोष्ट” असणाऱ्या टेनिसवर राज्य करणाऱ्या अवलियाचं आत्मचरित्र!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : चारुहास अरुण गोगटे 

===

मला आठवतंय, त्याप्रमाणे आम्ही बोरिस बेकर मुळे टेनिस पहायला लागलो. स्टेफी ग्राफ मुळे तिच्या… आणि ह्या खेळाच्यासुद्धा प्रेमात पडलो. आणि पुढे सँप्रस, आगासी, इवानिसेविक वगैरे लोकांमुळे हे प्रेम उत्तरोत्तर वाढतच गेलं.

ह्या सगळ्यांमध्ये एक खेळाडू असा होता, जो त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात मला कधीच आवडला नाही.

अर्थात तो न आवडण्याचं कारणही जरा गमतीशीरच होतं. मला केस वाढवलेले पुरूष अजिबात आवडत नाहीत. किंबहुना त्यांची किळसच येते. त्यामुळे आगासी सुद्धा मला आधी अजिबात आवडायचा नाही.

पण नंतर मात्र त्याने आधी केलेल्या प्रमादाचं पापक्षालन म्हणून पार टक्कलच करून टाकलं होतं. त्यानंतर मात्र त्याचा खेळ मला आवडायला लागला. आणि नंतर नंतर तो सुद्धा.

तर हे इतकं सगळं सांगायचं कारण म्हणजे, मधे मी ह्याच अवलिया खेळाडूचं आत्मचरित्र वाचलं. Open नावाचं.

 

open-andre-agassi-inmarathi
peanutbutter.com

 

मला मुळातच आत्मचरित्र किंवा चरित्र वाचायला आवडतात. त्या त्या व्यक्तीच्या आयुष्याचा पट उलगडत जाताना, आपणसुद्धा त्यांच्या भावविश्वाचा एक भाग होऊन जातो.

त्या त्या कालखंडातल्या कौटुंबिक, सामाजिक आणि एकूणच व्यवस्थेचे साक्षीदार बनत जातो.

आणि त्याचबरोबर आपण ज्या प्रसिद्ध व्यक्तीचं आत्मचरित्र वाचत असतो, ती व्यक्ती त्या विशिष्ट स्थानावर पोचण्यापूर्वी पुलाखालून नेमकं किती पाणी वाहून गेलंय, हे सगळं वाचणं फार रंजक असतं. Open सुद्धा आपल्याला एक असाच रंजक प्रवास घडवतं.

आपल्या स्वतःची अपुरी राहिलेली स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावीत ही इच्छा कमीअधिक प्रमाणात प्रत्येक पालकाची असते.

काही पालक ती इच्छा मनातच ठेवतात, काही पालक मुलांना या ना त्या निमित्ताने बोलून दाखवतात, तर काही पालक अक्षरशः ती मुलांवर लादतात.

Open वाचायला सुरुवात केल्यावर जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याइतकी दैदिप्यमान कारकीर्द असणारा आंद्रे आगासी, अशाच एका लादल्या गेलेल्या इच्छेचं फलित आहे, हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा एकाच वेळी काहीसं आश्चर्य, काहीसा विषाद आणि बऱ्याचशा प्रमाणात आदर अशा अनेक भावना आपल्या मनात दाटून येतात आणि अधिकच उत्सुकतेने आपण हे पुस्तक वाचायला लागतो.

 

andre-inmarathi
eurosport.com

 

खूप साध्या, सरळ, प्रामाणिक आणि तरी ओघवत्या आणि चित्रमय शैलीमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलंय.

त्यामुळे अगदी लहान वयात केवळ वडिलांच्या हट्टापायी टेनिसची रॅकेट हातात धरावी लागणाऱ्या आंद्रेपासून, ते तो जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीत अत्युच्च स्थानाला पोचुन आणि त्यानंतरही त्याच्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत, त्याच्या एक खेळाडू आणि एक व्यक्ती, ह्या दोन्ही प्रवासांचे आपण साक्षीदार बनत जातो.

नुसते साक्षीदार नाही तर कळत नकळत आपण त्याची सह-अनुभूती सुद्धा घेतो.

वयाच्या जेमतेम बाराव्या तेराव्या वर्षापासून अत्यंत खडतर, प्रसंगी निर्दयी म्हणता येईल अशा टेनिस प्रशिक्षणाला आंद्रेला सामोरं जावं लागलं.

आणि यातूनच त्याच्या मनात ह्या खेळाविषयी एक अढी निर्माण झाली. The thing I hated most throughout my life, is Tennis असं हा जगज्जेता खेळाडू म्हणतो. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात जे असतं ते घडतंच.

अजिबात आवडत नसलेला हा खेळ खेळण्यासाठीच या खेळाडूचा जन्म झालाय, ही त्याच्या वडिलांची ठाम समजूत असते आणि म्हणून ते त्याच्या विरोधाला न जुमानता त्याचं प्रशिक्षण चालूच ठेवतात. अगदी निष्ठुरपणे.

ह्यातूनच, प्रस्थापित व्यवस्थेच्या उफराटं वागणारा बंडखोर आंद्रे जन्माला येतो. खेळाबद्दलचा, वडिलांबद्दलचा राग तो स्वतःवर काढत राहतो.

मग तो व्यक्त करण्यासाठी केस वाढवणं, पांढरे कपडे घालून टेनिस खेळणं शिष्टसंमत असण्याच्या काळात रंगीबेरंगी कपडे घालून कोर्टवर उतरणं, हे प्रकार करत जातो.

 

agassi-inmarathi
Scroll.in

 

पण हे सगळं करत असताना अविरत कष्ट आणि प्रशिक्षण ह्याच्या परिणामस्वरूप तो त्याला न आवडणाऱ्या खेळात मात्र यशाची नवनवीन शिखरं पार करत जातो. अर्थात हे सगळं करत असताना अगणित पराभव सुद्धा त्याला पचवावे लागतातच.

पुस्तकामध्ये आंद्रे खेळलेल्या अनेक सामन्यांचं वर्णन आहे. अगदी विस्तृत म्हणावं असं, परंतु अतिशय चित्रमय. जणू आपण तो सामना आंद्रेच्या डोळ्यातून पाहतोय.

त्यामध्ये सहजगत्या जिंकलेल्या सामन्यांचं वर्णन तर आहेच, पण त्याचबरोबर जिंकता जिंकता हरलेल्या सामन्यांचं वर्णन सुद्धा आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस सारखे वैयक्तिक प्रकारातले खेळ खेळताना शारीरिक तंदुरुस्ती च्या बरोबरीनेच किंबहुना थोडी जास्तच मानसिक तंदुरुस्तीची गरज असते हे अशा सामन्यांचं वर्णन वाचताना आपल्याला प्रकर्षाने जाणवतं.

“सामना चालू असताना त्या कोर्टवर इतके प्रेक्षक, प्रतिस्पर्धी खेळाडू वगैरे सगळे असताना सुद्धा जो एकटेपणा जाणवतो, तो शब्दात मांडता येणार नाही” असं आंद्रे ने लिहिलंय. आणि ते आपल्याला पटतं.

तसंच एखाद्या सामन्यात सगळं काही व्यवस्थित चालू असताना निव्वळ एकाग्रता भंग पावल्यामुळे सामना हातातून निसटून जाण्याचं शल्य, त्या खेळाडुकरता किती मोठं असत असेल हे आपल्याला आंद्रेचे सहप्रवासी बनून जगताना अनुभवायला मिळतं.

 

andre agassi inmarathi
tennis365.com

 

आंद्रे आणि सँप्रस ह्यांची समांतर चालणारी कारकीर्द, त्यांच्या स्वभावातला आणि त्यामुळे खेळातला देखील टोकाचा विरोधाभास आणि त्यांच्यामधली स्पर्धा हे सगळं आपल्याला यात अनुभवायला मिळतं.

उच्च स्तरावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीचा दुखापती हा अविभाज्य घटक असतो.

त्यावर मात करण्यासाठी लागणारा पराकोटीचा मनोनिग्रह, योग्य मार्गदर्शन आणि परिश्रम हे पडद्यामागे घडणारे घटक किती महत्वाचे असतात हे सुद्धा यात अगदी विस्तृत पध्दतीने आलंय.

आंद्रेचं सिने अभिनेत्री ब्रूक शिल्ड्स बरोबरचं अल्पकाळ टिकलेलं लग्न आणि त्यानंतर स्टेफी ग्राफ बरोबरचं हळुवारपणे खुलत जाणारं नातं आणि त्याचा परिणाम म्हणून आंद्रे नामक वादळाच्या आयुष्यात येणारं स्थैर्य ह्या सगळ्या गोष्टी वाचायला मजा येते.

एकंदरीतच एका आत्यंतिक वलयांकित खेळाडूच्या आयुष्यातल्या झगमगाटाच्या पलीकडे किती विरोधाभास, यशपयशाचे चढउतार, कष्ट, आनंदाचे क्षण आणि त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असलेले पराकोटीच्या नैराश्याचे क्षण हे सगळं असू शकतं हे सगळं आपल्याला Open मधून वाचायला मिळतं.

आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण परत एकदा आंद्रे आगासी नावाच्या खेळाडूच्या करकिर्दीवर, त्याने जिंकलेल्या विविध टायटल्स वर नजर टाकतो, तेव्हा एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणून, एक नवरा म्हणून, मुलांसाठी हळवा होणारा एक बाप म्हणून तो आपल्याला अजूनच आवडायला लागतो.

अगदी तरुण वयात त्याने वाढवलेल्या केसांसकट.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?