'लाखो वर्षांपूर्वीच्या स्त्रीला, पुरुषांच्या कोणत्या गोष्टीचं आकर्षण वाटलं? कथा उत्क्रांतीची...

लाखो वर्षांपूर्वीच्या स्त्रीला, पुरुषांच्या कोणत्या गोष्टीचं आकर्षण वाटलं? कथा उत्क्रांतीची…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक – आदित्य कोरडे 

आपण लहानपणी बऱ्याच गोष्टी ऐकल्या, वाचलेल्या असतात नाही का? पार्वतीने अंगाच्या मळापासून गणपती तयार केला ती गोष्ट ( नंतर उटी केली त्या मळाची डाम्बीस लोकांनी पण माझ्या आजीने मला मळच सांगितल्याचे आठवतंय.)

किंवा आदम च्या डाव्या बरगडी पासून इव तयार केली. असल्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या असतीलच. अगदी अशीच नाही पण एक छान गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे.

 

adam eve inmarathi
the history of israel

 

ही खूप खूप जुनी गोष्ट आहे. साधारण ३०-४० लाख वर्षांपूर्वीची तरी असेल, म्हणजे बघा किती जुनी ते. तेव्हा आजच्या सारखं काहीच नव्हतं. माणस नव्हती त्यांची संस्कृती नव्हती, देश, समाज, शहर, गाव काही काही नव्हत. संस्कृती नावाची गोष्टच नव्हती इतका जुना तो काळ, अगदी धर्म हि नव्हता.

धर्म नव्हता तर देव नव्हता, देवची काळजी घेणारे धर्मगुरू नव्हते. तेव्हा अगदी आदिम अवस्थेतला माणूस गुहेत राहायचा, त्यांच्या टोळ्या असतं. छोटेखानी कुटुंब म्हणा हवंतर!

नुकतच म्हणजे काही हजार वर्षापूर्वी हे माणूस लोक आग वापरायला शिकले होते आणि त्याचा वापर ते उब मिळवणे, अंधार दूर करणे, अन्न भाजून/ शिजवून खाणे, हिंस्त्र आणि क्रूर शिकारी प्राण्यांना दूर ठेवणे, निबिड दाट झाड झाडोरा जाळून जागा मोकळी करणे अशासाठी करतं.

 

adimanav inmarathi
prabhat khabar

 

हे माणूस लोक ओबड धोबड अशी दगडाची हत्यारे देखील बनवत, पण आधी ते दगडाची हत्यारे बनवू लागले की आधी आग पेटवू लागले हे सांगणे तसं कठीणच आहे. अन्न शिजवून खाऊ लागल्याने एक गम्मत झाली म्हणजे अशी की आता त्यांना जाड जाड बळकट अश्या दातांची आणि मजबूत जबड्याच्या स्नायूंची गरज राहिली नाही.

त्यामुळे लहान दात, लहान जबडे आणि तुलनेने लहान स्नायू असल्याने आता कवटी मध्ये बरीच मोकळी जागा निर्माण होऊ शकत होती आणि त्यात मोठा मेंदू सहज मावू शकत होता. तसेच हे अन्न पचवण सोप्प झाल्यामुळे आतड्याची लांबी ही कमी झाली.

 

fire inmarathi
Youtube

 

अन्न पोटात साठवून हत्ती प्रमाणे आंबवून खाणे किंवा गाई म्हशींप्रमाणे रवंथ करण्याची गरज संपली. त्यामुळे हे छोटे पोट ते दोन पायावर सहज घेऊन चालू शकत.

आता मोकळे झालेले दोन हात ते अनेक कामांसाठी वापरू लागले, त्यात कधी तरी यांचा अंगठा असा इतर बोटाच्या शेजारी आला आणि जणू चमत्कारच झाला. या अंगठ्यामुळे ते अनेक काम करू लागले त्यातच बहुधा दगडांचा वापर करू लागले.

दगडाची ओबड धोबड हत्यार बनवून वापरू लागले. ह्या एवढ्याश्या वाटणाऱ्या बदलाला सुद्धा काही हजार वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला बरं का! एकंदरीत पाहता असे मानायला जागा आहे की माणूस प्रथम आगीवर नियंत्रण आणि तिचा वापर करायला  शिकला असावा.

stone-age-man-marathipizza01

 

असो! आता त्यांच्या आहारात क्वचित कधी तरी मांसाहार येऊ लागला पूर्वी जेव्हा झाडावर राहत तेव्हा मांस खायला मिळणे दुरापास्तच! शिवाय पोट आणि दाताची रचना शाकाहाराला योग्य पण आता आग हाताशी आल्यावर तो प्रश्न मिटला.

भाजलेले मांस पचायला सोप्पे अधिक उर्जा देणारे आणि प्रथिनांनी भरपूर रेलचेल, त्यामुळे आता मांसाहार त्यांच्या आहाराचा मुख्य भाग झाला. सहज आणि मुबलक उपलब्ध होणाऱ्या प्रथिनांमुळे मेंदूची वाढ सुरु झाली.

 

non veg inmarathi
YouTUbe

दात आणि जबड्यांच्या स्नायूंची ताकत व आकार कमी झाल्यामुळे मेंदूच्या वाढीला जागा उपलब्ध झाली होतीच पण मानव म्हणजे होमो सेपियन बनणे अजून खूप खूप दूर होते.

त्यांच्या कुटुंबात आता एक पद्धत येऊ लागली होती, त्यांच्या माद्या गुहेत राहून मुलांची आणि म्हाताऱ्यांची काळजी घेत. आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवत आणि मोठे सशक्त तरुण नर लोक बाहेर जाऊन शिकार, कंदमुळ, फळ वगैरे गोळा करून आणत.

बाहेरच जगणं अवघड होतं आणि अजून शारीरिक सामर्थ्याचीच बौद्धिक सामर्थ्यापेक्षा अधिक गरज होती त्यामुळे माद्यासुद्धा सर्वात शक्तिशाली नरांना निवडून त्यांच्याशी संग करीत. नवी शक्तिशाली प्रजा उत्पन्न करीत.

असे चालू असताना एक मोठी घटना घडली जिचा फार मोठा प्रभाव माणसाच्या उत्क्रांतीवर झाला.

 

stone-age-man-marathipizza02

 

हा गुहेतून राहणारा आदीमाणूस किंवा अर्धमानव आता बराच मोकळा झालं होता. रिकामा वेळ हाताशी असायचा. हा वेळ बरेच मानव-प्राणी आळसात, झोपेत, सुस्तावण्यात वाया घालवायचे. इतर प्राण्यांप्रमाणेच…!

पण काही महाभाग असतं ज्यांना स्वस्थ बसवत नसे. मग ते कुठे दगडावर दगड आपटून गाणं वाजव, गुहेच्या भिंतींवर चित्रच काढ असे उद्योग करू लागले. त्यांना कलेचे झटके येऊ लागले म्हणाना. या गुहेत राहून राहून बोर झालेल्या माद्यांना हे नवीन काहीतरी फार म्हणजे फार आवडलं.

त्यांना ती ओबडधोबड चित्र काढणारा, गाणी वाजवणारा तो नर आवडला. आता ही कला जी म्हणतात ती तशी काही जगण्याकरता आवश्यक नव्हती.

इतर अनेक प्राणी तिच्यावाचून जगत होतेच की, शिवाय ही कला फार जास्त प्रमाणात मेंदूची उर्जा खायची त्यामुळे हे कलाकार नर तसे कृश, अशक्तच असत. ते काही माद्यांचे पहिले चॉईस असण्याचे कारण नव्हते.

पण तरीही बहुसंख्य माद्यांनी या कलाकार नरांना निवडले. आता फक्त शारीरिक सामर्थ्य असून भागणार नव्हते, तुम्हाला तुमचा वंश वाढवायचा असेल तर कलाकार असणे, बुद्धिमत्ता असणे हळूहळू आवश्यक होऊ लागले.

stone-age-man-marathipizza03

 

बहुसंख्य माद्यांनी पिढ्यानुपिढ्या असे बुद्धिमत्ता/ अंगी कला असणारे नर आपल्या मुलांचे बाप म्हणून निवडले म्हणून हळू हळू आजचा बुद्धिमान माणूस पृथ्वीवर अवतीर्ण झाला.

त्या पहिल्या पहिल्या बुद्धीच्या ठिणगीला या माद्यांनी हवा दिली नसती तर आज ही आपण माकड सदृश्य एखाद्या जमातीतले गुहेतून राहणारे जीव बनलो असतो, मग कसला आला धर्म? कसला आलाय समाज, देश, संस्कृती आणि देव?

जवळपास सगळ्या धर्मांनी सांगितल्याप्रमाणे देवाने नर निर्माण करून त्याच्या मनोरंजनासाठी स्त्री निर्माण नाही केली तर स्त्रियांनी त्यांची उत्तम मनधरणी करणारा उत्तम मनोरंजन करणारा कलात्मक वृत्तीचा नर निवडला म्हणून आजचा माणूस तयार झाला.

त्या माणसातल्या नराने मग आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर धर्म निर्माण करून त्याला खऱ्या अर्थाने जन्म देणाऱ्या स्त्रीला कायमचे गुलाम करून टाकले. ही जरी एक गोष्ट असली तरी ती पूर्णत: काल्पनिक नाहीये, नव्हे ती काल्पनिक नाहीच.

देवाने त्याचा आवडता प्राणी म्हणून माणूस निर्माण नाही केला, तर स्त्री-वनमानवांनी त्यांच्या आवडीमुळे बुद्धिमान नर प्रजोत्पादनासाठी निवडला आणि आजचा माणूस निर्माण केला.

 

man inmarathi
pinterest

 

बघा विचार करा. गणपतीच्या जन्माच्या किंवा बायबल मधल्या आदमच्या गोष्टी प्रमाणे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाहीतर तुम्हाला पाप लागणार नाहीये की नरकवास भोगावा लागणार नाहीये. पण सत्य हे असेच काहीतरी आहे. एवढे नक्की.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?