' 'सुपरहिरो' पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या 'ब्लॅक पॅन्थर'मध्ये इतकं खास काय आहे?

‘सुपरहिरो’ पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या ‘ब्लॅक पॅन्थर’मध्ये इतकं खास काय आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्न मॅन आणि इतर सुपर हिरोचे सिनेमे म्हणजे काहीतरी काल्पनिक जगात घडणाऱ्या अतिशयोक्तीपूर्ण गोष्टी, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, किंवा लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी, तार्किक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी, त्यांचा प्रेक्षकवर्ग ठराविक असतो हा समज अनेक लोकांमध्ये अजूनही आहे.

अनेकांना उडणारे, फास्ट पळणारे किंवा काहीतरी “खास” शक्ती असलेले आणि सतत सामान्य लोकांना मोठमोठ्या शक्तिशाली व्हिलन्सच्या भयानक कृत्यापासून वाचवणारे हे सुपरहिरो आवडत नाहीत.

पण हे सगळे जगावेगळे बघायला आवडणारे लोक सुद्धा प्रचंड आहेत.

म्हणूनच एकामागून एक सुपरहिरो चित्रपट येतात आणि कोट्यवधी रुपये कमावतात. पण हे चित्रपट ऑस्कर सारख्या “स्पेशल” पुरस्कारांच्या स्पर्धेत कुठेच दिसत नाहीत.

 

oscar-awards-marthipizza03
nyfa.edu

ऑस्कर नामांकन मिळवणारे चित्रपट म्हणजे काहीतरी वास्तविकता दाखवलेले गंभीर विषय हाताळणारे चित्रपट असाच आपला समज असतो.

पण आता मात्र “सुपरहिरो” पठडीतल्या चित्रपटांची सुद्धा ऑस्कर पुरस्कार देणाऱ्यांनी दखल घेण्यास हळूहळू सुरुवात केली आहे असे म्हणावे लागेल कारण आता पहिल्यांदाच एखाद्या “सुपरहिरो” छाप चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाले असे घडले आहे.

मार्व्हलच्या “ब्लॅक पॅन्थर” ह्या चित्रपटाला बेस्ट पिक्चर ह्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला. मार्व्हल कॉमिक्सच्या ब्लॅक पॅन्थर ह्या सुपरहिरोवर आधारित असा हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक रियान कुगलर आहेत आणि चॅडविक बॉसमन ह्या अभिनेत्याने ह्या चित्रपटात टी’चाल्ला ही भूमिका साकारली आहे.

ह्या चित्रपटाने जगभरात १.३ बिलियन डॉलर्सचा व्यवसाय केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कृष्णवर्णीय कलाकार असलेल्या चित्रपटांना फारसा प्रेक्षकवर्ग मिळत नाही हा हॉलिवूडमध्ये असलेला समज ह्या चित्रपटाने चुकीचा ठरवला आहे.

चॅडविक बॉसमन ह्यांच्यासह ह्या चित्रपटात मायकल बी जॉर्डन,ल्युपिटा न्योन्ग , दानई गुरिरा, मार्टिन फ्रीमन, डॅनियल कॅलुया, लेटिटिया राईट, विन्स्टन्ट ड्यूक, अँजेला बॅसेट यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.

 

black-oanther-inmarathi
theatlantic.com

ब्लॅक पॅन्थरचे कथानक असे की अनेक वर्षांपूर्वी व्हायब्रेनियम (व्हायब्रेशन्स शोषून घेणारे एक खनिज) पासून बनलेली एक उल्का वकाण्डा ह्या देशात पडते आणि त्यासाठी पाच आफ्रिकन जमातींमध्ये युद्धाची ठिणगी पडते.

त्यातीलच एक योद्धा चुकून त्या उल्केमुळे प्रभावित झालेली हृदयाच्या आकाराची एक वनस्पती खातो आणि त्यामुळे त्याला अलौकिक शक्ती मिळते. त्यामुळे तो पहिला “ब्लॅक पॅन्थर” बनतो.

जबारी नावाची जमात सोडल्यास इतर सर्व जमाती एकत्र येतात आणि त्या योद्ध्याला नवनिर्मित वकाण्डा देशाचा राजा म्हणून घोषित करतात. नंतर ते लोक त्या व्हायब्रेनियमचा उपयोग करून अत्याधुनिक प्रगती करतात आणि हे सर्व जगाला कळू नये म्हणून त्यांचा देश सुरक्षित ठेवण्यासाठी “थर्ड वर्ल्ड” मध्ये समाविष्ट करतात.

वर्तमानात व्हिएन्नामध्ये टी’चाकाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टी’चाल्ला (ब्लॅक पॅन्थर) राजा म्हणून सिंहासनावर बसण्यासाठी वकाण्डा मध्ये परत येतो.

परंतु परत आल्यावर त्याचा सामना एका जुन्या शत्रूशी होतो. हा शत्रू टी’चाल्लाचे सार्वभौमत्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो आणि टी’चाल्ला व त्याच्या शत्रुमध्ये युद्ध होते असे थोडक्यात ब्लॅक पॅन्थरचे कथानक आहे.

ह्या पूर्वीही २००९ साली डार्क नाईट ह्या चित्रपटाला सर्वतोपरी उत्कृष्ट चित्रपट असून सुद्धा ऑस्करचे नामांकन मिळाले नव्हते त्यामुळे हा पुरस्कार देणाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागले.

ह्यापासूनच धडा घेऊन ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणी वाढविण्यात आल्या. ह्यामुळे अनेक विविध विषयांवरचे चित्रपट ऑस्करच्या नामांकन यादीत समाविष्ट होऊ शकतील अशी आशा चित्रपटनिर्माते व प्रेक्षक ह्यांना वाटली. त्यानंतर दहा वर्षांनी पहिल्यांदाच “ब्लॅक पँथर” ह्या एका सुपरहिरो पठडीतल्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी साठी “सर्वोत्कृष्ट” चित्रपटाच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

 

black-panther-inmarathi
marvel.com

ह्यामुळे भविष्यात जे असे सुपरहिरो टाईपचे चित्रपट येतील त्यातील चांगल्या चित्रपटाला ऑस्कर मिळेल अशी आशा करावी का?

खरं तर “डार्क नाईट” ह्या चित्रपटानंतर जी चर्चा झाली त्यानंतर “ब्लॅक पॅन्थर”ला ऑस्कर नामांकन मिळायलाच दहा वर्षे लागली.

आणि एका कॉमिक बुक चित्रपटाला “बेस्ट पिक्चर” साठी नामांकन मिळणे हा एक अपवाद आहे, ह्याचा अर्थ भविष्यात असे कॉमिक बुक किंवा सुपरहिरो प्रकारातले कितीही उत्कृष्ट चित्रपट आले तरी त्यांना ऑस्कर मिळेलच असे नाही.

ब्लॅक पँथरला नामांकन मिळाले म्हणजे ऑस्कर ज्युरी आता कॉमिक बुक चित्रपटांना त्यांच्या यादीत स्थान द्यायला तयार आहेत असेही नाही. पण असेही म्हणता येणार नाही की आधीसारखे ते असे चित्रपट विचारांत सुद्धा घेणार नाहीत.

नेहमीची चाकोरी सोडून अश्या चित्रपटांना जर ऑस्करमध्ये स्थान मिळवायचे असेल तर तो चित्रपट खरंच उत्कृष्ट आणि खास असायला हवा.

त्यात काहीतरी वेगळे असायला हवे. ह्यापूर्वी ह्या कॉमिक बुक चित्रपटांनी दोन वेळा ऑस्कर ज्युरींना दखल घेण्यास भाग पाडले होते पण त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले नाही. “डार्क नाईट” हा चित्रपट सगळीकडे खूप यशस्वी झाला.

त्यातील हीथ लेजरने केलेले जोकरचे काम सर्वांना फारच आवडले. दुर्दैवाने हीथ लेजरचा अकाली मृत्यू झाला आणि त्यामुळे तो चित्रपट आणखी गाजला. ऑस्करने सुद्धा त्याची दखल घेतली. पण नामांकन मात्र मिळाले नाही.

 

joker-inmarathi
film.com

त्यानंतर २०१७ मध्ये आलेला रायन रेनॉल्ड्सचा “डेडपूल” सुद्धा खूप गाजला. डेडपूलला गोल्डन ग्लोब पुरस्काराचे “बेस्ट मोशन पिक्चर” ह्या श्रेणीत नामांकन सुद्धा मिळाले. ह्या चित्रपटाने दणकून व्यवसाय केला आणि अनेक नामांकने सुद्धा मिळवली. परंतु हा चित्रपट सुद्धा ऑस्कर पर्यंत पोहोचू शकला नाही.

“ग्रँड अकॅडमी प्रेक्षकांसाठी” डेडपूल हा चित्रपट थोडा बाष्कळ, थोडा विचित्र असाच ठरला.

त्यानंतर प्रेक्षकांना आशा होती की अत्याधुनिक काळातील पहिली महिला सुपरहिरो असलेला “वंडर वुमन” तरी ऑस्करच्या यादीत येईल. परंतु ह्या चित्रपटाकडे पुरस्कार देणाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले.

मग असे असताना ब्लॅक पँथर ह्या चित्रपटात असे काय वेगळे आहे ज्यामुळे ऑस्कर ज्युरींना ह्या चित्रपटाची दखल घ्यावीच लागली?

पहिली गोष्ट म्हणजे हा चित्रपट सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा आहे. ह्या चित्रपटात जो सुपरहिरो आहे तो एक आफ्रिकन अमेरिकन वंशाचा आहे. मार्व्हल युनिव्हर्समधील हा आधुनिक काळातील पहिलाच आफ्रिकन अमेरिकन सुपरहिरो आहे.

तसेच ह्या सुपरहिरोचे आणि चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षक ह्या दोघांनीही फार कौतुक केले. दोघांनाही हा चित्रपट आवडला.

एका वेगळ्याच काल्पनिक जगात घडणारा ब्लॅक पॅन्थर हा एक सुंदर चित्रपट आहे. ह्या चित्रपटातील सर्व अभिनेते आणि अभिनेत्री अभिनयाच्या बाबतीत अतिशय सरस आहेत. ह्या जगात एक कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून जन्माला येणे म्हणजे काय असते हे ह्या चित्रपटात उत्तमरीत्या मांडले आहे.

 

panther-oscar-inmarathi
movieweb.com

एखाद्या कॉमिक बुक चित्रपटातून किंवा टीव्ही कार्यक्रमातून अनेकवेळा महत्वाचे विषय जगापुढे मांडले गेले आहेत. परंतु ह्या वेळी ह्या सिनेमातून जो संदेश दिला गेला आहे तो अतिशय स्पष्टपणे मांडला आहे, तो विषय अत्यंत महत्वाचा आहे, आणि बदल घडण्यास प्रवृत्त करेल असा आहे.

तांत्रिकदृष्ट्या बघायचे झाल्यास त्या बाबतीतही हा चित्रपट अतिशय सरस आहे म्हणूनच ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नामांकन मिळाले आहे.

ह्या चित्रपटाने हे सिद्ध केले की चित्रपटाचा विषय, आशय आणि सादरीकरण जर उत्तम असेल, त्यात खरंच काही वेगळा संदेश दिलेला असेल तर तो कॉमिक बुक वर आधारित एखाद्या सुपरहिरोचा चित्रपट का असेना, ऑस्करला त्या चित्रपटाची दखल घ्यावीच लागते.

वॉर्नर ब्रदर्स, डीसी, मार्व्हल ह्यासारख्या मोठ्या चित्रपटनिर्मात्यांना ह्यातून असा संदेश मिळतो की सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे असलेले असे सुपरहिरोचे चित्रपट म्हणजे आजकाल “हिट फॉर्म्युला” आहेत.

त्यांच्यापर्यंत हा संदेश खरंच पोहोचला तर त्यांचे पुढील चित्रपट अधिक आशयघन असतील आणि त्यांची कथानके कल्पनेच्या पलीकडची असतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?