' आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही “नो बॉल” नं टाकणारे हे ५ दिग्गज गोलंदाज तुम्हाला माहित आहेत का..? – InMarathi

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही “नो बॉल” नं टाकणारे हे ५ दिग्गज गोलंदाज तुम्हाला माहित आहेत का..?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे असे म्हणतात. नुसते फलंदाज चांगले असून चालत नाहीत. फलंदाजांनी उत्तम खेळी करून प्रतिस्पर्धी संघापुढे धावांचा डोंगर रचला म्हणजे काम झाले असे होत नाही तर त्यानंतर गोलंदाज व क्षेत्ररक्षक ह्यांची जबाबदारी असते की प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या जास्तीत जास्त धावा रोखायच्या.

परंतु क्षेत्ररक्षकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली नाही तर हातात आलेला सामना निसटून जातो ह्याची असंख्य उदाहरणे क्रिकेटच्या इतिहासात बघायला मिळतात.

क्षेत्ररक्षक आपले काम चोख बजावत असतील पण गोलंदाजच चुकीची गोलंदाजी करत असतील तरीही त्याचे परिणाम संघाला भोगावे लागतात.

 

Superstition Of Cricketers.Inmarathi4
quoracdn.net

गोलंदाच्या एका चुकीमुळे समोरच्या संघाला वाईड बॉल, नो बॉल पडून एक धाव आणि एक जास्तीचा बॉल मिळतो आणि त्यावर जर का चौकार किंवा षटकार गेला तर त्या अश्या जास्तीच्या धावांमुळे प्रतिस्पर्धी संघाचा चांगलाच फायदा होतो आणि आपल्या संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागतो.

अनेक सामन्यांत असे झाले की गोलंदाजांना त्यांचा सूर नीट न सापडल्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला धावांची खिरापत वाटली आणि सामना हातचा घालवला.

म्हणूनच क्रिकेटमध्ये संघातील प्रत्येक खेळाडूचे उत्तम प्रदर्शन सामना जिंकण्यासाठी आवश्यक असते.

सामना जर अटीतटीचा असेल तर एकही नो बॉल , वाईड बॉल पडून चालत नाही.अश्या परिस्थितीत जर एखाद्या बॉलर कडून एकही नो बॉल पडला तर तो मोठा गुन्हा ठरतो. कारण प्रतिस्पर्धी संघाला काहीही न करता एक धाव आणि शिवाय एक अतिरिक्त बॉल खेळायला मिळतो आणि सगळे गणितच बदलून जाते.

मागच्या वर्षी जोहान्सबर्गच्या वोन्डरर्स स्टेडियमवर १० फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजांनी वारंवार केलेल्या चुकांमुळेच आपल्याला सामना गमवावा लागला होता.

 

record-in-cricket-history-marathipizza02
crickbuzz.com

तसेच २०१६ च्या टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहराने सुरुवातीला विकेट घेऊन भारतासाठी विजय सोपा केला होता. पण सायमन्सला आउट करण्याच्या प्रयत्नात रविचंद्रन अश्विनने नो बॉल टाकला, जरी बुमराहने झेल घेतला तरी तो नो बॉल असल्याने सायमन्स बाद ठरला नाही.

त्यानंतर हार्दिक पंड्याने सुद्धा तीच चूक करत नो बॉल टाकला आणि सायमन्सला जीवदान दिले आणि त्यानेही संधीचा फायदा घेत नाबाद ८२ धावांची शानदार खेळी करत वेस्ट इंडिजला सामना जिंकवून दिला. तो नो बॉल भारताला खूप महागात पडला.

तसेच २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या खेळात भारताच्या जसप्रीत बुमराहने फखर झमानला अवघ्या तीन धावांवर यष्टीमागे झेल देऊन बाद केले होते पण दुर्दैवाने तो बाद ठरला नाही कारण बुमराहने नो बॉल टाकला होता आणि झमानला जीवदान मिळाले.

ह्याच मॅचमध्ये त्याने सणसणीत खेळी करून धावांचा डोंगर रचला व भारतीय फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीपुढे निष्प्रभ ठरले आणि आपण १८० धावांनी हरलो.

बुमराहनेच श्रीलंकेविरुद्ध धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यात उपुल थरंगाला असेच नो बॉल टाकून जीवदान दिले आणि थरंगाने श्रीलंकेला सामना जिंकवून दिला.

 

bumrah-inmarathi
ESPNcricinfo.com

अर्थात असे फक्त भारतीय गोलंदाजांबरोबरच घडते असे नाही तर प्रत्येक संघाला असा अनुभव कधी ना कधी येतोच. खेळाडूंना नेहमीच मैदानात सूर सापडेलच असेही नाही.

परंतु क्रिकेटच्या इतिहासात असेही काही दिग्गज खेळाडू झाले आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही नो बॉल टाकलेला नाही. त्यातील एक खेळाडू भारतीय देखील आहे ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

१. कपिल देव

कपिल देव राम लाल निखंज म्हणजेच आपले कपिल देव ह्यांनी १९८३ साली भारताला पहिला विश्वचषक जिंकवून दिला. कपिल देव राईड हँडेड बॅट्समन, राईट आर्म फास्ट बॉलर आणि अष्टपैलू खेळाडू आहेत.

त्यांनी १९७८ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते तर त्यांचा पहिला एकदिवसीय सामना १९७८ साली पाकिस्तान विरुद्धच होता.

 

kapil-dev-marathipizza
pinterest.com

कपिल देव शेवटचा टेस्ट सामना १९९४ साली न्यूझीलंड विरुद्ध खेळले तर शेवटचा एकदिवसीय सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळले. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी १३१ टेस्ट सामने तर २२५ एकदिवसीय सामने खेळले.

ह्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एकही नो बॉल टाकलेला नाही. लिटिल मास्टर सुनील गावस्कर ह्यांनी एकदा सांगितले होते की कपिल देव सराव करताना सुद्धा कधी नो बॉल टाकत नसत.

२) डेनिस लिली

डेनिस कीथ लिली हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांच्या पिढितील सर्वोत्तम फास्ट बॉलर्सपैकी एक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत.

त्यांच्या तापट स्वभावासाठी व कधीही हार न मानणाऱ्या त्यांच्या लढाऊ वृत्तीसाठी ते त्या काळी प्रसिद्ध होते.

 

dennis-lilee-inmarathi
sportskeeda.com

१९७१ सालच्या इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात त्यांनी पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळात ते अत्यंत वेगवान बॉलिंग करत असत. त्यांचा शेवटचा टेस्ट सामना हा १९९८४ पाकिस्तान विरुद्ध होता तर शेवटचा एकदिवसीय सामना १९८३ साली वेस्ट इंडिज विरुद्ध होता.

ते राईट हँडेड बॅट्समन आणि राईट आर्म फास्ट बॉलर होते.

एकेकाळी पाठीच्या दुखण्यामुळे त्यांचा खेळ संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आत्यंतिक कष्ट करून त्यांनी आपला फिटनेस परत आणला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भल्या भल्या फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले.

७० टेस्ट मॅचेस आणि ६३ एकदिवसीय मॅचेस खेळलेल्या डेनिस लिलींनी संपूर्ण कारकिर्दीत एकही नो बॉल टाकला नाही.

३) इम्रान खान

पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान कायम विविध कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. त्यांनी ३ जून १९७१ रोजी इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यांचा पहिला एकदिवसीय सामना ३१ ऑगस्ट १९७४ साली इंग्लंडविरुद्धच झाला. ते राईट हँडेड बॅट्समन आणि राईट आर्म फास्ट बॉलर होते.

 

imran-khan-inmarathi
CricketCountry.com

ते एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विख्यात होते. ते एकूण ८८ टेस्ट सामने तर १७५ एकदिवसीय सामने खेळले व त्यांत अनुक्रमाने ३६२ व १८२ बळी घेतले.

हे पाकिस्तानचे एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही.

४) ईयन बॉथम

इंग्लंडचे महान अष्टपैलु खेळाडू म्हणून सर ईयन टेरेन्स बॉथम ह्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकही नो बॉल टाकला नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता ते क्रिकेट सामन्यांत समालोचन करतात.

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून सर ईयन बॉथम ह्यांचे नाव घेतले जाते.

त्यांनी २८ जुलै १९७७ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट मॅचमधून पदार्पण केले. तर २४ ऑगस्ट १९९२ रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

 

ian-botham-inmarathi
skysports.com

ते राईट हँडेड बॅट्समन आणि राईट आर्म फास्ट-मिडीयम बॉलर होते. त्यांनी एकूण १०२ टेस्ट सामन्यांत , तसेच ११६ एकदिवसीय सामन्यांत भाग घेतला.

ते त्यांच्या स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध होते आणि कायम स्लिपमध्ये उभे राहून क्षेत्ररक्षण करीत असत.

५) लान्स गिब्स

वेस्ट इंडिजचे लॅन्सलॉट रिचर्ड गिब्स म्हणजे लान्स गिब्स हे क्रिकेटच्या इतिहासात टेस्टमॅच मधील सर्वोत्कृष्ट स्पिन बॉलर्सपैकी एक मानले जातात. त्यांचा इकॉनॉमी रेट (प्रत्येक ओव्हरला दिले जाणारे रन्स) उत्कृष्ट होता.

टेस्ट क्रिकेटमध्ये ३०० बळींचा टप्पा पार करणारे ते पहिले फिरकीपटू आहेत. ते राईट हँडेड बॅट्समन आणि राईट आर्म ऑफ स्पिनर आहेत.

१९५८ सालच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर ५ फेब्रुवारी १९७६ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले.

 

lance-gibbs-inmarathi
Sportskeeda.com

ते एकूण ७९ टेस्ट सामने तर ३ एकदिवसीय सामने खेळले आणि टेस्टमॅचेस मध्ये त्यांनी एकूण ३०९ बळी घेतले. त्यांच्या संपूर्ण करियर दरम्यान त्यांनीही एकही नो बॉल टाकला नाही.

असे हे पाच दिग्गज खेळाडू आहेत. ह्या सर्वांच्या डिक्शनरीमध्ये नो बॉल हा शब्दच नव्हता आणि त्यांच्या ह्या खेळाप्रती असलेल्या समर्पणामुळे त्यांनी संघाला वेळोवेळी सामने जिंकवून दिले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?