' १५,००० मराठी शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी – InMarathi

१५,००० मराठी शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली अनेक वर्षे पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्याचे वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे.

मराठवाड्यात अनेक छोटे मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत पाण्याचा थेंब देखील शिल्लक नाही. शेतीचा प्रश्न आ वासून शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

गेली अनेक वर्ष सातत्याने ह्या भागावर निसर्गाची अवकृपा आणि दुष्काळाचे सावट आहे.

२०१४-१५ साली तर काही लिटर पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती ह्या भागात निर्माण झाली होती. ह्यामुळे बळीराजाला अतोनात नुकसान सोसावे लागले.

ह्यामुळे बीड जिल्हा तसेच इतर भागात सुद्धा शेती जवळजवळ संपल्यात जमा होती.

हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या तोंडचे घास ह्या दुष्काळाने काढून घेतले.

शेकडो शेतकरी आपापली कुटुंबे घेऊन इतर ठिकाणी गेले. तिथे त्यांनी उपजीविकेसाठी शेतमजुरी व इतर कामे करणे सुरु केले.

 

bid distric inmarathi

 

मागच्या वर्षी सुद्धा पावसाने पाठ फिरवली परंतु ह्या वर्षी मात्र परिस्थिती मागच्या सारखी अवघड नाही.

पाऊस न पडून सुद्धा ह्यावेळी बीड जिल्ह्यातल्या विहिरींना पाणी आहे आणि शेतकऱ्यांचे पीक सुद्धा शेतात सुस्थितीत आहे.

पण हे सगळे कसे काय शक्य झाले? मागच्या वेळची दुष्काळाची भयाण परिस्थितीत अनुभवल्यानंतर इथले अनेक लोक परिस्थिती कशी बदलता येईल ह्याचा विचार करू लागले आणि त्यांनी त्यांच्या परीने उपाययोजना केली.

मुळातूनच दुष्काळाची परिस्थिती कशी बदलता येईल ह्यावर उपाय शोधला गेलाच पाहिजे ह्यावर इथल्या शेतकऱ्यांचे व रहिवाश्यांच्या एकमत झाले आणि एल अँड टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या (LTFS) मदतीने गावकऱ्यांनी “जलवैभव प्रकल्प” राबवून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला.

 

agriculture-inmarathi
deccanchronicle.com

 

एखाद्या वर्षी पावसाने पाठ फिरवली तरी गावात पाण्याचा प्रश्न उभा राहू नये आणि पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काहीतरी कायमचा टिकाऊ उपाय शोधायला हवा असे LTFS व गावकरी ह्यांचे ध्येय होते.

म्हणूनच गावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चार वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला.

तब्बल ३२ गावांतील १५००० शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ह्या प्रकल्पाद्वारे प्रयत्न करण्यात आले. सुरवातीला केवळ १२ गावांपासून सुरु झालेला हा प्रकल्प पुढे १०१६-१७ साली इतर २० गावांसाठी सुद्धा विस्तारण्यात आला.

जलक्रांतीच्या दिशेने उचललेली पावले

जलवैभव ह्या प्रकल्पामध्ये इंटीग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट (आयडब्ल्यूआरएम) सिस्टीम तयार करण्यात आली.

एक्स सिटू म्हणजे सामान्यत: पावसाचे पाणी साठवण्यासाठी कालवे किंवा झरे आणि पडीक जमिनींचा वापर केला जातो.

तसेच इन सिटू म्हणजे शेताच्या सभोवती आणि शेतात पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी उपाय केले जातात जेणे करून भूजल पातळी वाढेल आणि जमिनीचा ओलावा कायम राहील. ह्या सगळ्यासाठी वॉटरशेड बांधण्यात आले.

 

watershade-inmarathi
youtube.com

 

हा प्रकल्प मानवलोक आणि दिलासा प्रतिष्ठान ह्या दोन संस्थांची मदत घेऊन पूर्ण करण्यात आला.

ज्या गावांत हे प्रकल्प बांधण्यात आले त्या ठिकाणी ह्या एनजीओच्या टीमबरोबर LTFS च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या टीमने सुद्धा भेट दिली आणि तिथल्या लोकांच्या काय समस्या आहेत व त्यासाठी नेमका काय उपाय केला पाहिजे व काय पाऊले उचलायला हवीत हे जाणून घेतले.

शेतकऱ्यांची मुख्य चिंता होती की ह्या सिंचन प्रकल्पात त्यांच्या शेतजमिनी कायम राहाव्यात. त्या दृष्टीने हा प्रकल्प तयार करण्यात यावा.

ह्यासारख्या इतर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकऱ्यांनाच ह्या प्रकल्पात सामील करून घेण्यात आले जेणे करून त्यांच्या गरजा काय आहेत हे कळेल आणि उपलब्ध असलेल्या स्रोतांची माहिती होईल.

सर्वांच्या सहभागामुळे हा सामूहिक प्रकल्प झाला आणि सातत्याने कामे पूर्ण झाली.

जलवैभव प्रकल्पात काय करण्यात आले?

याचे प्रकल्प संयोजक म्हणाले,

“इथल्या सुपीक जमिनीची होणारी धूप थांबवणे हा ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. तसेच जमिनीचा ओलावा सुद्धा कायम ठेवणे महत्वाचे आहे. जमिनीचा ओलावा कायम राहिला तरच पिकांची वाढ व्यवस्थि होऊ शकते.

 

Water-Structure-inmarathi

 

जमिनीत जर आवश्यक तेवढा ओलावा असेल तर पिकांना पाणी सुद्धा तुलनेने कमी लागते.

जमिनीची धूप थांबवणे व ओलावा टिकवणे हे ध्येय डोळ्यांपुढे ठेवून LFTS ने कंपार्टमेंट बंडिंग आणि सिल्ट ऍप्लिकेशन तयार केले. तसेच डीप कन्टिन्युअस कॉन्ट्युर ट्रेंच, लूझ बोल्डर स्ट्रक्चर, गॅबियन आणि डोह असे वॉटरशेड स्ट्रक्चर्स तयार केले. तसेच पडीक जमिनी व खोऱ्यांतील गाळ उपसण्याचेही काम केले.

 

farmer inmarathi

 

त्यांनी झऱ्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी व तिथून ते उपसण्यासाठी डोह बांधले. ह्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची जमीन वापरली नाही. हे सगळे बांधकाम करण्यासाठी अत्यंत कमी खर्च आला.

हे डोह पावसाचे पाणी साठवण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. ह्याठिकाणी साठवलेले पाणी दुष्काळाच्या काळात वापरता येते आणि तब्बल एक कोटी लिटर पावसाचे पाणी ह्या ठिकाणी साठू शकते व नंतर ते पाणी गरजेच्या वेळी उपयोगात आणता येते.

“बीड जिल्ह्यात डोंगराळ तसेच सपाट भूप्रदेश दोन्ही आहेत. दोन्ही भूप्रदेशांत जमिनीची धूप प्रचंड होते. ह्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते तसेच शेतीसाठी आवश्यक असलेली सुपीक जमीन सुद्धा कमी मिळते. कमी पाऊस आणि जमिनीची धूप ह्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे”

असे समीर ह्यांनी सांगितले. जलवैभव प्रकल्पात हीच समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सिंचनाच्या विविध पद्धती वापरून गावात जमिनीत पाणी जिरवून नंतर ते भविष्यात वापरता येते.

दिलासा ह्या संस्थेचे टेक्निकल अधिकारी असलेले अंकुश अडसूळ ह्यांनी सांगितले की, “पावसाळ्यात पाणी जमा होऊन ते जमिनीत झिरपून विहिरींमध्ये साठते. भूजलपातळीचे प्रमाण वाढल्यामुळे बोरवेल्सचेही प्रमाण वाढले आहे.”

 

cct-inmarathi
thebetterindia.com

LTFS ने हा प्रकल्प सुरु करण्याआधीच शेतकऱ्यांशी ह्यासंदर्भात चर्चा केली आणि त्यामुळे गावकरी जलवैभव प्रकल्पात प्रत्यक्ष सहभागी झाले. ह्या प्रकल्पाच्या “मोर क्रॉप पर ड्रॉप” ह्या संकल्पनेत शेतकऱ्यांचे पारंपरिक ज्ञान व सिंचनाची आधुनिक पद्धती ह्यांचा सुरेख संगम झाला आणि ह्याचा परिणाम हिरव्यागार शेतांच्या रूपाने बघायला मिळाला.

LTFS ने ह्या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचे वाण बदलण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी गाई-गुरांसाठी गावात पाण्याच्या टाक्या सुद्धा बसवल्या आणि ह्या टाक्यांची जबाबदारी तसेच शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी पाण्यासाठी ह्या टाक्यांचा वापर करतील ही जबाबदारी प्रत्येकी एका व्यक्तीकडे सोपवली.

Water Tank Open Lot Cows inmarathi

ह्याशिवाय LTFS ने १३व्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलशी त्यांचा हा IWRM प्रकल्प संलग्न करून घेतला आहे. ह्या सस्टेनेबल डेव्हलमपेंट गोल मध्ये हवामानातील बदल व त्याचे परिणाम ह्यावर त्वरित कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

IWRM द्वारे LTFS ग्रामीण भागात व्यवसाय उभे करीत आहे आणि शिवाय पर्यावरण वाचवण्याचे कार्य देखील करीत आहे.

बीडमध्ये स्थानिक नागरिकांना हवामानाशी जुळवून घेण्याचे तसेच दुष्काळाची चिन्हे ओळखून त्यादृष्टीने तयार राहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

जेव्हा दुष्काळाची चिन्हे दिसू लागतात तेव्हा लोकांना एकत्रित जलसंधारण व्यवस्थापनासाठी व दुष्काळजन्य परिस्थितीत आकस्मिक योजना तयार करण्यास व पिकांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. अश्या रीतीने शेतकरी बांधव दुष्काळातही आपले आयुष्य समान्यपणे जगू शकतात आणि फारसे नुकसान न होता त्यांची शेतीही करू शकतात.

गेल्या काही वर्षांपासून केलेल्या कष्टांना आता फळ येऊ लागले आहे.

 

news-inmarathi
newsd.com

बीडमध्ये राहणारे शेतकरी बंधू संभाजी नेहरकर सांगतात की,

“ह्यावर्षी आमच्या भागात फारसा पाऊस झाला नाही. तरीही आमचे कापसाचे पीक सुरक्षित आहे व बहरते आहे. सामान्य परिस्थितीत जर असा दुष्काळ आला असता तर आम्हाला आमचे उभे पीक कापून टाकावे लागले असते कारण कापसाचे काहीही उत्पादन झाले नसते. परंतु LTFS च्या साहाय्याने आणि त्यांनीच सुचवलेल्या कापसाच्या नव्या वाणामुळे माझ्या शेतात चांगले पीक आले आहे.

cotton inmarathi

मी LTFS बरोबर काम करून इतर शेतकऱ्यांनाही LTFS च्या प्रकल्पाबद्दल माहिती देतो. ह्या सगळ्या प्रयत्नांना आज यश आलेले दिसून येत आहे.भूजलपातळी वाढली आहे आणि आमच्या शेतजमिनीची उत्पादनक्षमता देखील वाढली आहे.”

ह्यांच्याप्रमाणेच बीडचे शेतकरी असलेले जयराज मुंडे सुद्धा सांगतात की आता पाण्याचा प्रश्न खूप कमी झाला आहे. मुंडे दोन एकर शेतजमिनीचे मालक आहेत आणि त्यातील अर्ध्या जमिनीत ते कापसाचे पीक घेतात. त्यांच्या अर्ध्या शेतजमिनीची सुपीकता भूजलपातळी कमी झाल्याने अत्यंत कमी झाली आहे. LTFS ने त्यांची मदत केली.

त्यांना व त्यांच्यासारख्या इतर शेतकऱ्यांना जमिनीतून गाळ काढून ती गाळयुक्त माती शेतात टाकण्यासाठी दिली. ह्याने त्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली.

अर्थात ह्यासाठी मुंडेंना त्या मातीच्या वाहतुकीचा खर्च भरावा लागला परंतु ते म्हणतात की हा त्यांच्यासाठी फायद्याचा सौदा ठरला कारण त्यांच्या जमिनीचा पोत हळूहळू सुधारतो आहे.

गाळ काढल्याने त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे आणि त्यांना ते पाणी त्यांच्या कापसाच्या पिकासाठी उपयोगी ठरत आहे.

 

india.com

तर थोडक्यात सांगायचे तर आता इथल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. कारण त्यांची शेतेच त्यांनी स्वयंपूर्ण बनवली आहेत. ह्या भागातील पाण्याच्या पातळीचे प्रमाण हळू हळू वाढू लागले आहे आणि जमिनीची नापिकता कमी होऊन जमिनीची गुणवत्ता सुधारते आहे.

शेतकऱ्यांचे हे तीन मोठे प्रश्न आता हळूहळू सुटू लागले आहेत कारण त्यांनी जलवैभव प्रकल्पात सहभाग घेतला.

ह्या सगळ्याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे इथल्या शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती सुद्धा आता बदलू लागली आहे. कारण एकच! पाण्याच्या पातळीत वाढ, त्यामुळे पिकांचे चांगले उत्पादन व शेतीचे कमी होणारे नुकसान…

जलवैभव ह्या प्रकल्पाने हे दाखवून दिले आहे की एकत्र येऊन योग्य दिशेने प्रयत्न केल्यास नैसर्गिक आपत्तीवर सुद्धा उपाय काढता येतो. दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीवर सुद्धा मात करता येते.

बीडच्या शेतकऱ्यांचे हे उदाहरण इतर भागातील शेतकरी बांधवांनी सुद्धा घ्यायला हरकत नाही. ह्यामुळे त्यांचेही शेतीच्या पाण्याचे, जमिनीचे, सिंचनाचे प्रश्न सुटतील आणि त्यांचे नुकसानही होणार नाही.

===

स्रोत : बेटरइंडिया या वेबसाइटने केलेला खास रिपोर्ट

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?