' ऐतिहासिक वारसा जपणारं, मन शांत करणारं ‘एक’ ठिकाण, आजच ट्रिप प्लॅन करा – InMarathi

ऐतिहासिक वारसा जपणारं, मन शांत करणारं ‘एक’ ठिकाण, आजच ट्रिप प्लॅन करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

=== 

आपला देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. समुद्रापासून ते बर्फापर्यंत आणि वाळवंटापासून ते घनदाट जंगलांपर्यंत सगळ्यांचीच रेलचेल आपल्या देशात आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू सुद्धा आपल्या देशात ठिकठिकाणी दिमाखात उभ्या आहेत.

आपण ह्या सगळ्याची हवी तशी काळजी घेत नाही हा भाग वेगळा पण परदेशातील पर्यटनस्थळांच्या तोडीस तोड जागा आपल्या देशात सुद्धा आहेत हे आता परत सिद्ध झाले आहे.

असंच एक पर्यटनस्थळ आहे कर्नाटक राज्यातील हंपी हे शहर!

 

hampi-inmarathi

 

विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हंपी हे शहर तिथल्या नितांत सुंदर देवळांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी ह्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले गेले होते.

गोलाकार डोंगरांच्या मधोमध वसलेले हंपी हे स्थळ म्हणजे एक जागतिक वारसा स्थळ आहे. इथले विरुपाक्ष मंदिर जगप्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली १००० मंदिरे व स्मारके आहेत.

१५६५ साली झालेल्या तालिकोटच्या युद्धात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हे शहर उध्वस्त केले होते.

तरीही हे अवशेष आजही समृद्ध इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. हंपी हे गाव पम्पा क्षेत्र, भास्कर क्षेत्र किंवा किष्किंधा क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. तुंगभद्रा नदीलाच पूर्वी पम्पा नदी म्हणत असत.

ह्या नदीच्या नावावरूनच ह्या स्थळाला हंपी असे नाव पडले. हंपीलाच पूर्वी विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाई.

इथल्या विठ्ठल मंदिर परिसरातील मुख्य हॉलमध्ये असलेल्या ५६ स्तंभांवर हातांनी मारले असता त्यांतून संगीताच्या लहरी निघतात. ह्याच ठिकाणी प्रसिद्ध शिला रथ आहे जो पूर्वी खरंच दगडी चाकांवर चालत असे.

 

vittala-temple-hampi-inmarathi

 

हंपीला तुम्ही बस, रेल्वे किंवा विमानानेही जाऊ शकता.

जिंदाल ह्यांनी हैद्राबाद व बंगळुरू येथून हंपीजवळ असलेल्या त्यांच्या बेसपर्यंत जाण्यासाठी विमानसेवा सुरु केली आहे.

हंपीला आल्यावर पर्यटक इथली मंदिरे, स्मारके तर बघू शकतातच शिवाय रॉक क्लाइंबिंग आणि बास्केट बोट (कोराक) मध्ये नदीत बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.

तुंगभद्रा नदीच्या एका बाजूला विविधं मंदिरं, तर दुसऱ्या बाजूला हनुमंताचे जन्मस्थळ असलेल्या पर्वत आहे.

 

Hampi-hemakuta-inmarathi

 

ह्या जागतिक वारसा असलेल्या स्थळाचे व्यवस्थित जतन करणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे.

पर्यटक म्हणून आपण सुद्धा तिथे जाऊन विद्रुपीकरण न करता तिथल्या सुंदर शिल्पकलेचा आनंद लुटला पाहिजे आणि हे स्थळ अधिकाधिक चांगले कसे राहील ह्यासाठी सरकार आणि पुरातत्व विभागाला सहकार्य करायला हवे.

पुरातत्व विभाग सुद्धा येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कश्या उपलब्ध होतील ह्यासाठी उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात आहे. 

हंपी कन्नड विद्यापीठाचे प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक सी एस वासुदेवन ह्यांचे असे मत होते की,

“सरकारने पर्यटकांना ह्या ठिकाणी येणे सोपे व्हावे ह्यासाठी बदामी-पट्टाडकल-एहोल-हम्पी असा मार्ग तयार करायला हवा. तसेच येथे पायाभूत सुविधांचा विकास करायला हवा जेणे करून इथे पर्यटकांची संख्या वाढेल.”

परंतु हंपीचे रहिवासी आणि पर्यावरणवादी असलेले शिवकुमार मालागी म्हणतात, की “पायाभूत सुविधा, रस्ते वगैरे बांधताना हंपीचा निसर्ग सुद्धा जतन केला जावा. इथल्या निसर्गावर वाईट परिणाम होता कामा नये.”

 

Hampi_virupaksha_temple-inmarathi

 

आपल्या देशात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे तसेच ती स्थळे नितांतसुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. पण दुर्दैवाने आपल्याकडे ह्या स्थळांचे जतन झाले नाही.

आता तरी आपण धडा घेऊन ही स्थळे पुनरुज्जीवित केली पाहिजेत, त्यांचे संवर्धन केले पाहिजे, तेव्हाच जगातील सर्वांपर्यंत आणि आपल्या देशातील पुढच्या पिढीपर्यंत आपल्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा वारसा पोचेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?