' “उरी” आणि “एक्सिडेंटल..” : ह्या खास कारणांमुळे हे दोन्ही “अतिशय विशेष” चित्रपट ठरतात – InMarathi

“उरी” आणि “एक्सिडेंटल..” : ह्या खास कारणांमुळे हे दोन्ही “अतिशय विशेष” चित्रपट ठरतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

“उरी” आणि “द एक्सिडेंटल प्राईममिनिस्टर” या दोन सिनेमांनी या आठवड्यात मल्टीप्लेक्सचा पडदा व्यापून टाकला आहे. पठाणकोट येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्या सत्यकथेवर उरी हा चित्रपट आला आहे.

तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची युपिए सरकारच्या अलाटली दहा वर्षाची कारकीर्द “द एक्सिडेंटल प्राईममिनिस्टर” द्वारे पडद्यावर आणण्यात आली आहे.

या दोन्ही चित्रपटांवर अभ्यासक, राजकीय विश्लेषक सौरभ गणपत्ये यांनी लिहिलेले लेख इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत..

===

“उरी”

भावनिक सिनेमे मला अजिबात आवडत नाहीत. भारत माता की जय म्हणणारे आणि काळा पैसा अफाट दडवणारे लोक लक्षात यायला लागल्यावर ही घोषणाही मला व्यक्ती व्यक्तीप्रमाणे बोगस वाटायला लागली.

सैनिकी सिनेमांमध्ये तर ओथंबून ओथंबून देशभक्ती वाहत असते.

बॉर्डर तर सगळ्यात भंपक (चीड यावी इतका भंपक) सिनेमा होता. गुंड असल्यासारखा पाकिस्तानच्या पोस्टवर जाऊन परत येणारा सनी, ‘हिंदू हूं, तब ही तो अपना करम कर रहा हूं’ सारखे फालतू डायलॉग्स आगीतून कुराण वाचवताना मारणारा सुनील शेट्टी, हा सिनेमा टप्प्याटप्प्यांमध्ये अत्याचार होता.

अक्षय खन्नाने जे पात्र उभं केलंय ते पात्र खऱ्या आयुष्यात सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा लष्करात उच्च पदावर कार्यरत होतं.

 

akshaye-khanna-border-inmarathi
india.com

सगळ्यात मोठा अत्याचार म्हणजे त्यातलं शेवटचं गाणं. ‘मेरे दुश्मन, मेरे भाई, मेरे हमसाये’फुल वैताग. त्यामुळे सैनिकी सिनेमे थिएटरमध्ये जाऊन आवर्जून पाहायचे नाहीत, आणि संजू बिंजू घरी लागला तरी वेळ घालवायचा नाही हेच मी करतो.

तिथून पुढे ‘सैनिकी सिनेमा’ म्हटलं की मी जपूनच असतो. पण ‘उरी’ नक्कीच एक सुखद धक्का निघाला.

सैनिक म्हटला की तो राकट तगडा जवान, देशभूमीसाठी वाट्टेल ते करणारा वगैरे अशी अशी मनात भावना असते.

पण सैनिक म्हटलं की तो अत्यंत बुद्धिमान, देशावर असलेलं वेड्यासारखं प्रेम (आणि स्वतःचा परिवार रास्तपणे) सोडलं, तर अजिबात भावनिक नसणारा, कमालीचा स्मार्ट, आणि शक्य तितकं थंड डोकं ठेऊन मैदानातल्या चाली रचणारा, भरपूर विचार करून कृती आखणारा, आणि ती करण्याची वेळ आली की अजिबात पुढे मागे ना पाहणारा, दुष्टांशी जितका निर्दय तितकाच निरपराध्यांशी समंजस आणि प्रेमळ.

 

uri-inmarathi
india.com

निव्वळ या क्षेत्रात उरी बाजी मारून जातो. कथा सांगायची गरज नाही इतकी सर्वांना तोंडपाठ आहे. यापेक्षा अधिक डिटेल्स म्हणजे सरळ सरळ डॉक्युमेंट्री झाली असती.

मानसिक आणि भावनिक दोन्ही पातळ्यांवर लढताना समोर शत्रूचा खात्मा करणारे सैनिक, एखाद्याच्या भावनांनाही सकारात्मक पद्धतीने वापरून घेणारे सैनिक आणि ‘हे जर साध्य झालं तर आम्ही परवा रात्री तुमच्याबरोबर डिनर करणार’ असं सरळ पंतप्रधानाला सांगणारे सैनिक.

छान जमून आलाय सिनेमा. कॅमेरा वर्क, ध्वनी संयोजन फसणं इथे पाप असतं. रणांगणातला कठोर सैनिक आणि लहान मुलांशी अतिशय प्रेमळ असलेला मनुष्य विकी कौशलने छान साकारला आहे.

 

uri-film-inmarathi
OpIndia.com

पॅरा फोर्सेसमध्ये दाढी ठेवायची मुभा असते. आणि विकी कौशलच्या सावळ्या चेहऱ्यावरचा कमालीचा गोडवा आणि डोळ्यात असलेली प्रचंड निरागसता यामुळे त्याच्यावर मेहनत घेणं भाग होतं.

ते त्याने केलं. निव्वळ केसाची ठेवण बदलून फक्त देहबोलीमधून व्यक्तिमत्व वेगळं वाटायला कोणी ह्रितिक रोशन नाही..

तेवढाच आवडून जाईल तो आपला ‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैना.

सिनेमात टचकन दिल खोल के डोळ्यात पाणी येतील असे दोन क्षण आहेत. पण सिनेमा थांबत नाही. प्लॅन करून जायला हरकत नाही.

 

uri-inmarathi
thelallantop.com

आणि शेवटचं, या सिनेमात मी परेश रावल पाहिलाच नाही. तिकडे ते महान पात्रच फिरत होतं. हॅट्स ऑफ मॅन, हॅट्स ऑफ.

सरदार, बाबुराव गणपत राव आपटे, आँखे मधला इलियास अशी अनेक कामं आणि आता ही भूमिका.

टेन्शन, दडपण, कटकट आणि त्यातही असलेली मूळची धमक. या सरकारबद्दल कोणाला मुळातच अंगावर शेण पडल्याचा फील येणार नसेल त्याला नक्की आवडेल ही भूमिका.

कारवाईचा शेवट थोडा फिल्मी होता. पण शेवटी तो चित्रपट आहे.. एवढं चालणारच!

===

“द एक्सिडेंटल प्राईममिनिस्टर”

‘द अपघाती पंतप्रधान’ हा सिनेमा सामान्य लोकांसाठी नाही. यात अनेकांना अपमान वाटून गेला तरी चालून जाईल. ज्यांना ‘त’ वरून ताकभात समजतो, ज्यांना इशारे समजतात, किंवा ज्यांना राजकारणात नकार किंवा होकार काहीच नसतो आणि तसा तो स्पष्ट दिला गेला असला तरी त्याचा अर्थ घ्यायचा नसतो इतकी मोठी समज आहे अश्या लोकांना हा सिनेमा आवडून जाईल.

 

prime-minister-inmarathi
newsd.com

अभ्यासू वगैरे आहे असं म्हणायची गरज नाही कारण एक हाडाचा पत्रकार तिकडे साक्ष म्हणून असताना घडलेल्या घटनांची जंत्री यात आहे. पहिला अर्धा भाग म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाऊन पाया पाडाव्यात असा झाला आहे.

सगळ्यात आवडून गेलेला भाग म्हणजे पंतप्रधान झाल्यावर एकेका खोलीसमोरून जात असताना स्वतःलाच अर्थ खात्याचा सचिव, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर जनरल आणि पुढे अर्थमंत्री म्हणून वाढत गेलेला मानमरातब आणि त्या एका क्षणासाठी अनुपमशेठनी शारीरभाषेत दाखवलेला बदल सुंदर.

मृदू, सज्जन पण प्रसंगी कठोर आणि पक्षाला स्वतःहून अधिक मान देणारे डॉ. मनमोहन सिंग . पहिला भाग म्हणजे लोकांनी टाळ्या वाजवाव्यात असा आहे. (विशेषत: शेर कभी अपने दात साफ करता है क्या? हा संवाद).

पीव्ही नरसिंह राव यांच्या पाय पडायला अवचितपणे वाकणारे मनमोहनसिंग अफाट. पण राव यांच्या अंत्यसंस्काराचा प्रसंगही सुंदर.

 

manmohan-inmarathi
news18.com

तुलनेने दुसरा भाग गुंडाळला गेला आहे. लेखकाची त्या कामावरून बदली झाल्यामुळे ऐकीव माहितीवर बेतल्यासारखा. विशेषतः राहुल गांधी अध्यादेश फाडतात तो प्रसंग अत्यंत मूर्ख आहे. राहुल गांधींनी अध्यादेश फाडला नव्हता तर ‘हा अध्यादेश utter नॉन सेन्स आणि फाडून टाकायच्या लायकीचा आहे” असं विधान केलं होतं.

अर्थातच ते तेवढंच चुकीचं होतं. त्या अध्यादेशाला विरोध करण्याची राहुल गांधींची मानसिकता अजिबातच चुकीची नव्हती. परंतु ज्या पद्धतीने ती व्यक्त झाली ती मोठी चूक होती.

पण मनमोहन सिंगांना ती अध्यादेश मुळात आणायला लावला होता का? आणि त्याला त्यांचा मूळ पाठींबा होता की विरोध?

मग त्यांना एखाद्या कामासाठी भरीस पाडणारा पक्ष आणि ते काम केल्यावर मुर्खात काढणारा पक्षप्रमुखाचा लेक, हे द्वंद्व अजून छान दाखवता आलं असतं. आणि राहुल यांनी विरोध करायच्या आधी राष्ट्रपती प्रणवदा सुद्दा त्या अध्यादेशावर नाराज होते हेही अनेकांना आठवत नाही.

 

rahul-inmarathi
dnaindia.com

अण्णा हजारे एपिसोड तीस सेकंदात गुंडाळणं तितकंच खटकलं . सरकारच्या लोकप्रियतेला खिंडार पाडणारं ते आंदोलन ठरलं. त्यातूनच पुढे नरेंद्र मोदी नावाचा हीमॅन आत घुसला.

मनमोहन सिंग यांची निष्क्रियता, सरकारमध्ये असलेली निर्नायकी आणि त्यातून सरकारबद्दल झालेली नाराजी यातच पुढची अडीच तीन वर्षे गेली.

पण जे प्रेम लेखकाचं डॉ. सिंग यांच्यावर दाखवलंय त्यामुळे लेखकाने हे डिटेलमध्ये लिहायचा मोह टाळला असावा. एकूणच त्यामुळे शेवट चटका लावून जात नाही.

राहुल गांधींचं काम करणारा अभिनेता कुठूनही राहुल गांधी दिसत नाही पण तो बोलायला लागला की दाद द्यावीशी वाटते. तीच कथा सोनियाजींचं काम करणाऱ्या अभिनेत्रीची. पात्र समोर आली तरी सांगावी लागत नाहीत, इतकी अभिनेत्यांची निवड चांगली आहे. अपवाद रमेश भाटकर – पृथ्वीराजबाबा.

अनुपम खेर या भूमिकेसाठी कायम लक्षात राहील. आणि या इंडस्ट्रीत २० वर्षे काढून किती फ्रेश आणि लोभस असावं हे अक्षय खन्ना जाणो.

पहिला भाग राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पहावा. आणि ज्यांना हा सिनेमा पाहता येईल ते पुढे डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर विनोद करणार नाहीत हे नक्की.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?