' ॲसिड हल्ल्याचं जळजळीत वास्तव : पुरुषांवरील ॲसिड हल्ले दुर्लक्षित राहताहेत…! – InMarathi

ॲसिड हल्ल्याचं जळजळीत वास्तव : पुरुषांवरील ॲसिड हल्ले दुर्लक्षित राहताहेत…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दीपिका पदुकोण साकारत असलेल्या “छपाक” चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? अंगावर काटे उभे राहतात ना? दुर्दैवाने हा चित्रपट एका भीषण सत्यघटनेवर आधारित आहे.

घरगुती भांडणातून, मतभेदातून कुणावर तरी भयानक ॲसिड हल्ला झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. आपल्याला अनेक उदाहरणं सापडतील ज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून नैराश्य येऊन मुलांनी मुलींवर ॲसिड हल्ला केला आणि या दुष्कृत्यामधून मुलीचं पूर्ण आयुष्यच बरबाद झालं.

विचार करण्यासारखी गोष्ट ही की, मुलांसोबत असं होतं  की नाही? होय..! आज तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न सदर लेखामध्ये मांडण्यात येतोय.

तुम्हाला माहिती आहे का? एकूण हल्ल्यांपैकी ३० ते ४० टक्के अँसिड हल्ले पुरुषांवरही होतात! आम्हाला याची खात्री आहे की, आपल्यापैकी खूप कमीजणांना याबद्दल माहिती असेल.

कारण आपल्याला “हा गुन्हा फक्त महिलांसोबतच होतो” असंच माहिती आहे, किंबहुना आपला तसा गैरसमज झाला आहे.

 

women-inmarathi
india.com

 

पण या सगळ्या प्रकरणात पुरुषही काही प्रमाणात बळी पडताना दिसत आहेत, या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्या लक्षात येईल. पण या घटनांकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. कारण महिलांवर होणाऱ्या याप्रकारच्या अत्याचाराचे प्रमाण प्रचंड आहे.

आपण या लेखात काही पुरुषांबाबत माहिती घेऊयात ज्यांच्यावर अशा प्रकारचे ॲसिड हल्ले झाले पण त्यांच्याकडे कोणी या दृष्टीतून बघितलेच नाही. ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

पहिलं उदाहरण आहे फिरोज खान याचं. फिरोज त्यावेळी २७ वर्षांचा होता. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

तो बघत होता की, त्याचा भाऊ त्यांना जाब विचारत होता आणि अचानक त्याच्यावर दुसऱ्या शेजाऱ्याने अँसिडने भरलेली बादली रिकामी करायला सुरुवात केली.

त्याने स्वतःला हातपंपाच्या मागे लपून वाचवण्याचा प्रयत्न केला पण जे घडायचं ते घडून गेलं होतं. या घटनेबाबत त्याने असं सांगितलं की ‘मी हातपंपाच्या पाण्याच्या धारेखाली बसलो होतो, पण माझ्या शरीरात होणाऱ्या वेदना काही कमी झाल्या नाहीत. त्वचा वितळण्यास सुरुवात झाली आणि क्षणार्धात मला प्रचंड वेदना होऊ लागल्या.’

 

feroz-acid-inmarathi
indiatoday.com

 

आज फिरोज ४२ वर्षांचा आहे, पण आजही ही घटना आठवल्यावर त्याच्या शरीरावर शहारे उभे राहतात.

दुसरं उदाहरण आहे आदित्य राज. अडीच वर्षांचा हा बालक दिल्लीतील नव्हे तर देशातील ॲसिड हल्ल्यात वाचणारा सर्वात तरुण व्यक्ती आपण म्हणू शकतो.

आदित्यला त्याच्या आईच्या प्रियकराने किडनॅप केले. पुढच्या दिवशी पोलिसांना आदित्य रस्त्यावर सापडला तेव्हा त्याची त्वचा जळालेली होती. तो फक्त उजवा डोळा झाकु शकतो, कारण त्याच्या डाव्या डोळ्यांच्या पापण्यांवर ॲसिडचा खूप वेगात विघातक परिणाम झाला आहे.

त्यानंतर नाव येतं ते उपेन्द्रकुमारचं. उपेन्द्रकुमार एक १४ वर्षाचा तरुण. त्याच्या काही मित्रांच्या पालकांनी त्याला त्याच्या मित्रांशी मैत्री ठेवण्याबाबत समजावले. त्याला सांगितलं की, तू आमच्या मुलांशी मैत्री ठेवू नकोस, त्यांच्यासोबत खेळत जाऊ नकोस, पण उपेंद्रने ऐकले नाही.

एका संध्याकाळी जेव्हा उपेंद्र मित्रांसोबत खेळून परत येत होता त्यावेळी दोन व्यक्तींनी येऊन त्याच्यावरती ॲसिड टाकले. या हल्ल्यात उपेंद्रचे डोळे कायमचे गेले.

आज उपेंद्रचे वडील उपेंद्रला शिकवण्यासाठी काबाडकष्ट करत आहेत आणि त्याला शिकवण्यासाठी सरकार त्यांना काही मदत करेल या अपेक्षेकडे ते डोळे लावून बसले आहेत.

 

upendra-acid-inmarathi
dailymail.co.uk

 

चंद्रहास मिश्रा मेरठ येथे राहतात. त्यांच्यावर त्यांच्या घरमालकाच्या मुलाने बादलीभर ॲसिड घेऊन हल्ला केला. कारण असं सांगण्यात आलं की, त्यांनी एका महिलेची छेड काढली, आणि या सर्व प्रकारानंतर आरोपीने मिश्रा यांना धमकी दिली की, तू कुठे तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस.

या हल्ल्यामध्ये मिश्रा ४०% जळाले. ज्यामध्ये त्यांचे डोके, चेहरा आणि हात गंभीर जऴाले. मिश्रा एक लघुउद्योजक होते. त्यांनी प्लास्टिक सर्जरीच्या अंतर्गत अनेक प्रकारचे उपचार करवून घेतले.

“पुरुषांवर होणारे ॲसिड हल्ले कमी प्रमाणात असतीलही पण त्यांना तेवढ्याच गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे. या हल्ल्यांतील पीडित व्यक्तींनाही तेवढ्याच मानसिक आणि शारीरिक वेदनांतून जावं लागतं.

पुरुषांवर झालेले हल्ले कुठलीही सामाजिक संस्था गांभीर्याने घेताना दिसत नाही. याउलट महिलांवर झालेले हल्ले मात्र प्रसार माध्यमे चढाओढ करून दाखवतात” असा मिश्रा यांचा आरोप आहे.

 

chandrahas-acid-inmarathi
topyaps.com

 

या सर्वांवर मिश्रा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्यांना शेवटी न्याय मिळाला, पण न्यायालयाने निकाल देऊनही मिश्रा यांचा संघर्ष संपला नव्हता.

कारण हा खटला लढण्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करायला लागले.. पण याहीपेक्षा वाईट काहीतरी मिश्रा यांच्या सोबत घडण बाकी होतं. 

 नुकसानभरपाईच्या आकडेवाडीसाठी ज्यावेळेस ते सरकारी इस्पितळात गेले तेव्हा डॉक्टरांनी या सगळ्या आकडेमोडीत १० महिन्यांचा कालावधी वाया घातला. या सर्वांचा तसाही काही फायदा झालाच नाही.

शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांना तीन लाखांचा मोबदला देण्याचा आदेश सरकारला दिला. पण राज्य सरकारच्या नियमानुसार या सर्व बाबतीत फक्त महिलांनाच आर्थिक सहाय्य करायचं अशी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली होती.

शेवटी तब्बल पाच वर्षानंतर २०१६ मध्ये मिश्रा यांना फक्त एक लाख एवढाच मोबदला देण्यात आला. या एका लाखासाठी पण मिश्रा यांना अनेक नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटावे लागले आणि खूप संघर्षानंतर त्यांना हा मोबदला मिळाला.

 

india.com

 

हा एक प्रकारचा लैंगिक भेदभाव नाही का? लैंगिक भेदभावाच्या गप्पा मारणाऱ्या पुरोगाम्यांनी यावर कधीही भाष्य केलेले नाही किंबहुना लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हेच त्यांचं शेवटचं लक्ष्य आहे असं जाणवतं. 

महिलांवरील होणारे ॲसिड हल्ले हे निश्चितच निषेधार्ह आहेत. जर कोणी महिलांवर ॲसिड हल्ला केला तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी न्यायव्यवस्थेने लक्ष दिलंच पाहिजे…

पण पुरुषांना या सर्वात लैंगिक भेदभावाला सामोरे जाण्याची वेळ भारतात येऊ नये म्हणजे मिळवलं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?