अरुणा ढेरे पुरोगामी दहशतवादाला बळी पडताहेत काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

यंदाचं मराठी साहित्य संमेलन, नेहेमीप्रमाणेच, वादग्रस्त ठरत आहे. सुरुवातच उदघाटनासाठी निमंत्रित असलेल्या नयनतारा सहगल ह्यांच्या “निमंत्रण रद्द” करण्यापासून झाली. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी सहगल ह्यांचं निमंत्रण रद्द करताच सकल मराठी विचारवंत विश्वात एकच हलकल्लोळ माजला.

विचारवंत, पत्रकार, स्तंभलेखकांनी सरकारवर कठोर आसूड ओढण्यास सुरुवात केली. चर्चा रंगल्या. आणि सरकारने “डिसेंटिंग व्हॉइसेस” दाबण्यासाठी आयोजकांवर असा दबाव आणला आहे म्हटल्यावर असा आक्रोश व्यक्त व्हायलाच हवा. नाही का?

गंमत ही की – सरकार ने असा कुठलाही दबाव आणलाच नव्हता.

हे प्रकरण समजून घ्या –

एक स्थानिक नेता, जो सत्ताधारी पक्षाचा नाही वा पक्ष समर्थक ही नाही, साहित्य संमेलनाला विरोध करतो. कोण हा नेता? देव आनंद पवार. ज्यांची काँग्रेस प्रणित “शेतकरी न्याय हक्क” नावाची संघटना आहे. हा नेता – “शेतकरी आत्महत्या होत असलेल्या भागात साहित्य संमेलनावर खर्च नको” – अशी मागणी करतो.

पुढे आपला जुना मुद्दा बाजूला सारून, उद्घाटकांना विरोध करतो. “मराठी साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यिक का? मराठी साहित्यिक कमी आहेत का?” अशी अस्मिता देखील चेतवतो.

 

 

मराठी अस्मिता हा ज्या पक्षाचा मुद्दा आहे, त्या पक्षाच्या दुसऱ्याच एका स्थानिक नेत्याला ह्यात उडी घ्यावीशी वाटते. हा नेता, इंग्रजी-मराठी कारणावरून विरोध तर करतोच, शिवाय संमेलन उधळून लावण्याची धमकी ही देतो.

ह्या सगळ्या वातावरणात, उगाच गोंधळ नको, असा विचार करून सदर निमंत्रितांचं निमंत्रण, आयोजक रद्द करतात.

मराठी अस्मिता महत्वाचा मुद्दा वाटणाऱ्या पक्षाचे प्रमुख अधिकृत भूमिका घेतात की “त्यांची सदर साहित्यिकास उद्घाटक म्हणून बोलवण्यास हरकत नाही”. पुढे हे ही म्हणतात की “स्थानिक नेत्यांनी माझ्याशी चर्चा केल्याशिवाय अश्या प्रकरणांत भूमिका घेऊ नये.”

 

raj thakre nayantara sehgal sahitya sammelan inmarathi

 

आणि समस्त पत्रकार, लोकशाहीवादी विचारवंत वगैरे वगैरे लोक कुणाला झोडपत सुटतात?

सरकारला! आणि सत्ताधारी पक्षाला!

बरं, ह्या सगळ्यात सरकारची भूमिका काय आहे? तर – सरकारतर्फे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी आधीच “सहगल ह्यांना होत असलेला विरोध अयोग्य आहे” अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

 

vinod tawde sehgal sahitya sammelan inmarathi

 

इतकंच नव्हे, मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून पत्रक काढून ह्यावर स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलं आहे. ह्या पत्रकात म्हटलं आहे की :

अ. भा. मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते.

Devendra-Fadnavis-marathipizza
mid-day.com

पुढे पत्रकात असं ही म्हटलं आहे, की –

यवतमाळ येथे आयोजित अ.भा. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरुन वाद उभे केले जात असून, राज्य सरकारला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न सुध्दा काही माध्यमे करीत आहेत. अ.भा. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मा. मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो.

अर्थात, इतकं स्पष्टपणे कळूनदेखील शांत बसतील ते विरोधक कसले? त्यांचा अपप्रचार सुरूच आहे.

परंतु आता दुसरी एक बातमी कळाली आहे, जी अधिकच चिंताजनक आहे. ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. ह्या बातमीतून असं लक्षात येतंय की –

ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, अरुणा ढेरे, पुरोगामी दहशतवादाच्या लेटेस्ट बळी ठरणार आहेत.

घडलं हे आहे की – पुरोगामी समूहाने, एकत्र येऊन, ढेरेंना घरी बोलावून, त्यांनी त्यांच्या “अध्यक्षीय भाषणात काय बोलावं, कोणते मुद्दे निवडावेत” ह्यावर “टिप्स” (वाचा: तंबी) दिल्या आहेत.

सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी ही अशी :

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना सोमवारी (ता. 10) असीम सरोदे यांच्या पुणे येथील घरी अनोखा पाहुणचार देण्यात आला. यवतमाळ येथील प्रसिद्ध “बुढीचा चिवडा’, विदर्भातील सांबारवडी, दहीभात, गाजराचा हलवा असा बेत होता. यावेळी यवतमाळच्या बुढीच्या चिवड्याची चव चटकदार असल्याचे अरुणा ढेरे म्हणाल्या.

ज्येष्ठ सामाजिक विचारवंत विद्या बाळ, डॉ. विश्‍वंभर चौधरी, डॉ. मंगल दुकले तसेच ऍड. असीम सरोदे, रमा सरोदे आणि त्यांचा मुलगा रिशान अशा कौटुंबिक वातावरणात यवतमाळच्या पाहुणचाराचा आनंद पुणेकर अरुणा ढेरे यांनी घेतला.

aruna dhere aseem sarode vishwambhar chaudhari inmarathi

 

आता ह्यात आक्षेपार्ह काय? काहीच नाही…नाही का?!!!

खरी गोम पुढे आहे.

विदर्भातील फ्लोरिसिसच्या आजाराचा प्रश्‍न, पिण्याच्या पाण्याची बिघडलेली व प्रदूषित भूजल पातळी, कुमारीमाता व अन्यायाचे वास्तव, खारपाण पट्टा व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासी समाजातील कुरुमघर प्रथा आणि पाळीदरम्यान स्त्रियांवर होणारे अन्याय तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयवार त्यांनी उद्‌घाटनपर भाषणात बोलावे, आदी विषयांवर चर्चा झाली.

— आणि —

कारण जर डोक्‍याची, मनाची स्वस्थता नसेल तर साहित्य ऊर्मी कुंठित होते, असा मुद्दा ऍड. असीम सरोदे यांनी मांडला.

म्हणजेच – अरुणा ढेरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय बोलावं, कोणते विषय निवडावेत, कोणते मुद्दे उचलावीत – हे तथाकथित लोकशाहीवादी विचारवंत आणि कार्यकर्ते ठरवणार आहेत…!

मुळात साहित्यिक आणि “राहुल गांधी हेच लोकशाही व पुरोगामीत्वचे पिढीजात दावेदार आहेत” असं विविध ठिकाणी उघडपणे म्हणणारे, अफवा पसरवणारे, फेक न्यूज शेअर करणारे, अपप्रचार करणारे ‘कार्यकर्ते’, ‘विचारवंत’ ह्यांचा संबंध काय? अर्थात, संबंध ठेवा. सर्वांशी संबंध ठेवण्याचा हक्क आहे तुम्हाला. शिवाय ही मंडळी लेखक ही आहेत. विविध ठिकाणी ह्यांचं लिखाण प्रसिद्ध देखील होत असतं.

पण –

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने, त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय बोलावं, कोणते मुद्दे निवडावे हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला ह्या प्रचारकांना?

पण ह्यांना जाब विचारतो कोण ना! जाब विचारण्याचा अधिकार ह्यांनाच! उत्तरं देण्याचा अधिकार ह्यांनाच! निर्णय घेण्याचा अधिकारही ह्यांनाच! हे लोक पोलिसांच्या तपासाला जुमानत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नाहीत, तुम्ही समोर ठेवलेल्या फॅक्टसनाही जुमानत नाहीत. स्वतःच ठरवून ठेवतात नि त्यानुसार प्रचाराची राळ उडवत रहातात.

मग तिथे तुमच्या-आमच्या प्रश्नाना काय जुमानणार?

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी, त्यांच्या भाषणात राजकीय मुद्दे घ्यावेत हे सुचणारे हेच आणि पुन्हा इतरांना “साहित्याच्या प्रांतात राजकारण नको” असा उपदेश करणारेही हेच. सदर भेट छान “पाहुणचार” करण्यासाठी होती हा देखावाच आहे. अरुण ढेरे, ज्या साहित्याच्या प्रांतातील एक आदरणीय नाव आहेत, त्यांच्यावर वैचारिक दबाव टाकणे नि आपल्या सोयीचा र्हेटरीक रुजवणे – हाच खरा हेतू.

अश्याच दबावाला झुगारून, वस्तुनिष्ठपणे सत्य समोर ठेवणाऱ्या एका व्रतस्थ विचारवंतांचं नाव – प्रा शेषराव मोरे! मोरे सरांनी साहित्य संमेलनाच्याच व्यासपीठावरून, ह्याच वैचारिक दहशतवादाला वाचा फोडली होती. आणि त्याला सार्थ नामाभिधान दिलं होतं – पुरोगामी दहशतवाद!

अरुणा ढेरेंच्या बाबतीत जे घडलं आहे ते बघून हेच म्हणावंसं वाटतं की –

एकंदरीत, पुरोगामी दहशतवाद काल ही होता, आज ही आहे, उद्या सुद्धा असणारच आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 193 posts and counting.See all posts by omkar

2 thoughts on “अरुणा ढेरे पुरोगामी दहशतवादाला बळी पडताहेत काय?

 • January 8, 2019 at 12:46 am
  Permalink

  हे

  Reply
 • January 8, 2019 at 4:02 pm
  Permalink

  उत्तम लेख

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?