'"मुंबईचं पुणे" असलेली डोंबिवली, छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठी झालेली...

“मुंबईचं पुणे” असलेली डोंबिवली, छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठी झालेली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : शैलेंद्र कवाडे

===

प्रत्येक शहराचा एक स्वभाव असतो, एक गुण असतो. आपण त्या शहरात रुळतो म्हणजे आपल्या मनात त्या शहराच्या स्वभावाला जागा देतो. हे साधले की आपण त्या शहराचे होऊन जातो.

घाई हा मुंबईचा स्वभाव आहे. स्वस्थ बसलेला मुंबईकर दिसणे हे स्थिर उभा असलेला उंदीर दिसण्याइतके दुर्मिळ आहे.

दिसलाच तर असा मुंबईकर शक्यतो लोकल पकडण्यासाठी दबा धरून बसलेला असतो. आत गेला की परत चुळबुळ सुरू..

पुणे हे स्वभावानेच महान आहे. पुण्यात सगळं महान. इथली हवा महान, पाणी महान, गाणी महान, मस्तानी पण महान (प्यायची, बघायची नाही). असो. जन्मजात गुणांबद्दल काय बोलणार.

 

Pune_collage-inmarathi
punediary.com

मी डोंबिवलीत वाढलो. डोंबिवलीला मुंबईचे पुणे म्हणतात, म्हणतात म्हणजे डोंबिवलीकरच म्हणतात. इतर कुणी डोंबिवलीवाल्याना आपल्यात घेत नाहीत. मुंबईकर तुम्ही मुंबईचे नाही म्हणतात आणि पुणेकर तुम्ही मुंबईचेच म्हणून हिणवतात (पुण्यात शक्यतो अशा गोष्टी म्हणताना हिणवून म्हणण्याची महान परंपरा आहे).

तर डोंबिवली, मुंबईच पुणं आहे आणि पुणे महान असेल तर डोंबिवली लहान आहे. डोंबिवलीचा सगळा स्वभावच “लहान” ह्या गुणवैशिष्टाने भरलेला आहे.

सुरवात होते स्टेशनपासून. डोंबिवलीत कोणत्याही गोष्टीची सुरवात शक्यतो स्टेशनपासूनच होते. मागच्या शंभरेक वर्षात रेल्वेने अनेकदा डोंबिवली स्टेशन मोठे करण्याचा प्रयत्न केला पण डोंबिवलीकरांनी एकजुटीने तो हाणून पाडलाय.

जशी एखादी रेष न पुसता लहान करताना, शेजारी मोठी रेष काढतात, तसंच प्रत्येक नव्या विस्तारीकरणाला डोंबिवलीकरांनी स्वतःचे संख्याबळ वाढवून उत्तर दिलंय.

सकाळी आठ ते नऊ ह्या काळात तर आपल्या पायाखाली जिना आणि आकाशात देव आहे, ही श्रद्धा ठेवून माणसं चालत असतात, कारण तो दिसत कुणालाच नसतो.

 

Mumbai-Local-inmarathi
india.com

काल होता म्हणजे आजही असेलच ह्या आठवणीवर लोकं पुढे सरकत असतात. हे जिने इतके लहान आहेत की ते रोज न झाडता, कानाकोपऱ्यातही चकचकीत असतात. लोकं स्वतःच्या अंगांनी त्याचे रेलिंग पुसून काढतात.

आता डोंबिवलीकरांबद्दल पण माझं निरीक्षण आहे. शक्यतो हट्टाकट्टा, सहा साडेसहा फुट उंच माणूस डोंबिवलीत राहायला येतं नाही, आलाच तर टिकत नाही.

त्यामुळेच पंजाबी, सिंधी, मुसलमान ह्यांना डोंबिवली सोसत नाही. गुजराती लोक डोंबिवलीत राहतात तसेच घाटकोपरलाही राहतात. पण डोंबिवलीचा गुजराती आणि घटकोपराचा गुजराती यांत साधं मांजर आणि पर्शियन मांजर इतका फरक आहे.

डोंबिवलीचा गुजराती खाकरे खातो कमी, विकतो जास्त. घाटकोपरचा गुजराती मात्र जलेबी, फाफडा, खमण ह्या पौष्टिक पदार्थांची यथायोग्य चव घेत असावा.

डोंबिवलीत राहणारे इतर पब्लिक म्हणजे काटक (असं उगीच म्हणायचं आपण) मराठी आणि साऊथ इंडियन. ह्या दोघांतही रेल्वेच्या चिंचोळ्या दरवाजात घुसायचं कसब जन्मजातच असतं. डोंबिवली त्यांना आपलं म्हणते.

 

rush in local Inmarathi

आमच्या डोंबिवलीतले भाई लोकंही असे आडदांड, बलदंड वगैरे नसतात. सडसडीत किरकोळ लोकांनाही डोंबिवलीने भाई, दादा म्हणून आपलं म्हटलंय.

भाई होण्यासाठी तुम्हाला फक्त विशिष्ट भाषेत बोलता आलं पाहिजे आणि तुमच्याकडे पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढरी चप्पल पाहिजे. पांढरे गॉगल कोणत्याच कंपनीने काढले नाही, नाहीतर आम्ही त्यालाही आश्रय दिला असता. ते एक असो..

डोंबिवलीचे रस्ते हा एक वेगळा विषय आहे. डोंबिवलीकर चारचाकी वाहनधारक जो रोड टॅक्स भरतो तो डोंबिवलीबाहेर गाडी चालवण्यासाठी आहे ही अट त्याने मान्य केलेलीच असते.

डोंबिवलीत उच्च मध्यमवर्गीय लोकांत चारचाकी घेणे आणि ती रस्त्यावर उभी करणे ही जुनी फॅशन होती. काही काळाने ती गाडी साधारण रस्त्याच्याच रंगांची व्हायची आणि आसपासची लोकं आपल्या घराचा पत्ता सांगण्यासाठी तिचा वापर करायचे.

वर्षानुवर्षे जागेवर उभ्या राहिलेल्या अशा अनेक फियाट, ओम्नी, मारुती इथे नांदल्या आणि रस्ता रुंद होताना इथूनच भंगारात गेल्या.

ह्या परंपरेला नखं लावू पाहणारी पार्किंग नावाची संस्कृती हल्ली प्रत्येक नव्या बिल्डिंगीत बोकाळतीये. पण तिथेही २० बिऱ्हाडात ६ पार्किंग देऊन रस्ते रिकामे राहणार नाही, परंपरा अगदीच संपणार नाही ह्याची तजवीज डोंबिवलीचे बिल्डर करतातच.

रस्त्यांचे लहानपण मोठंच होतं जाईल हे पाहणे ही त्यांची जबाबदारीचं आहे.

 

road-inmarathi
hindustatimes.com

डोंबिवलीची वैशिष्ट्ये म्हणून पूर्वी लोकं दोन गोष्टींची नावं घ्यायची. एक म्हणजे गटार आणि दुसरं त्याच्या पोटात जन्मणारे डास. त्यातही डोंबिवलीने आपलं लहानपण जपलं होतं. पूर्वी इथे उघडी गटारं होती, म्हणजे गटार वगैरे असं काही वेगळं बांधलं जायचं नाही, पाण्याला मार्ग मिळेल तिथून ते वाहायचं आणि त्याला आम्ही गटार म्हणायचो.

दोन समांतर पर्वतरांगात पडलेला पाऊस जसा दोन वेगळ्या नद्यांचे रूप घेतो तसंच मागच्या पुढच्या दोन बिल्डिंगच्या पाईपमधून वाहणारे सांडपाणी दोन वेगळी गटारे बनून वाहायचे.

शक्यतो ह्या गटारांची रुंदी लहान मुलालाही सहज ओलांडता येईल इतकीच असायची. मुंबईच्या पावसात गटारात पडून माणसं वाहून जातात ही त्याकाळात आम्हांला कविकल्पना वाटायची.

आमचा क्रिकेटचा बॉलही कधी आमच्या गटारांनी हरवला नाही. शेजारच्याच मातीत सुकवून आम्ही तो परत वापरायचो.

डोंबिवलीच्या गटारांत जन्मलेले डोंबिवलीकर डासही कुपोषितच असायचे. गटारगंगेचा उगम असलेला नळ कधीही सुकेल आणि आपली जीवनसरिता आटून जाईल, ह्या भीतीने डासीनी कमी दिवसाची पिल्लं जन्माला घालत असाव्या.

हे किरकिरे डास कोणतेही मोठे विषाणू वाहून न्यायला असमर्थ होते. ह्या डासांचा, त्यांच्या चावण्याचा उपयोग डोंबिवलीकराना विविध आजारांच्या लसी टोचण्यासारखा व्हायचा.

जुन्या डोंबिवलीत कुणी डोंबिवलीकर डास चावून आजारी पडल्याची नोंद नाही. नंतर नगरपालिकेने अचानक मोठी गटार बांधली आणि त्यामुळे डोंबिवली फिवर नावाचा रोग आला.

अर्थात नगरपालिकेला आपली चूक ध्यानात आल्याने, एकाच वर्षात ती साथ नाहीशीही झाली. डोंबिवलीत आजारही असे लहानच असतात.

ह्या लहानपणाच्या अजूनही काही नोंदी आहेतच, पण त्या परत कधीतरी..

 

Ganesh mandir Dombivali inmarathi

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved

One thought on ““मुंबईचं पुणे” असलेली डोंबिवली, छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठी झालेली…

  • January 7, 2019 at 12:03 am
    Permalink

    डोंबिवली….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?