' ६० वर्षांच्या दिरंगाईनंतर अखेर भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले हे भव्य स्मारक! – InMarathi

६० वर्षांच्या दिरंगाईनंतर अखेर भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले हे भव्य स्मारक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“जेव्हा तुम्ही घरी जाल, तेव्हा त्यांना आमच्याविषयी सांगा की तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान पणाला लावला आहे!”

असे सैनिकांबद्दलचे वाक्य आपण नेहमीच वाचतो व ऐकतो!

आपण आपापल्या घरांत शांत व सुरक्षित आयुष्य जगू शकतो कारण आपल्या शहरात पोलीस व सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून आपले व देशाचे रक्षण करीत असतात.

कडाक्याच्या उन्हात किंवा रक्त गोठेल अश्या थंडीत सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून देशाची सेवा करीत असतात. 

 

Indian army's Bulletproof Jacket.Inmarathi2
allindiaroundup.com

 

सण असो की कुठला समारंभ, त्यांना कायम ड्युटीवरच राहावे लागते. प्रसंगी प्राणाची आहुती देऊन ते आपले कर्तव्य बजावत असतात. अश्या ह्या आपल्या शूर सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग खूप मोठा आहे.

त्यांच्या उपकारांतून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही.

वेळोवेळी त्यांचा त्याग मनात ठेवून त्यांच्या उपकारांची जाण ठेवून जबाबदार नागरिक म्हणून वागणे इतकेच आपण करू शकतो आणि वेळोवेळी त्यांना धन्यवाद म्हणू शकतो.

सामान्य नागरिक म्हणून आपण कमीत कमी इतके तरी करूच शकतो.

शासनाने सुद्धा सैन्यातील जवानांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. पण हे सगळे करण्यात शासन व आपण एक नागरिक म्हणून सुद्धा कुठेतरी कमी पडतो.

गेल्या वर्षी सैनिकांचा गौरव म्हणून एक स्मारक निर्माण केले जात होते.”द नॅशनल वॉर मेमोरियल” हे अखेर बांधून पूर्ण झाले आहे.

ह्या स्मारकाची योजना साठ वर्षांपूर्वीच सशस्त्र सेनेनी तयार केली होती. परंतु इतकी वर्षे हे स्मारक उदासीन सरकारी कामकाजात व शासनाच्या फायलींतच अडकले होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात अनेक लहान मोठ्या युद्धांत, चकमकीत ज्या २२,६०० वीरपुत्रांना हौतात्म्य आले होते त्यांचा मृत्यूपश्चात गौरव करण्यासाठी व त्यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून ह्या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे.

 

army-inmarathi
tosshub.com

 

संरक्षण अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की,

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी जागतिक दर्जाच्या स्मारकाचे उदघाटन केले होते. राजधानी नवी दिल्लीत भव्य राजपथावर असलेल्या इंडिया गेटच्या बाजूलाच हे स्मारक उभारण्यात आले आहे.

येत्या २५ जानेवारी रोजी ह्या स्मारकाचे उद्घाटन होईल.

सैन्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले की,

“मोठ-मोठ्या देशांपैकी बहुतेक फक्त भारतातच हे नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक आजवर नव्हते. भारतीय सैनिकांच्या जीवाची किंमत कवडीमोलच आहे बहुतेक!

म्हणूनच इतक्या वर्षांत हे स्मारक दिल्लीच्या बाहेर लांब कुठेतरी शहराबाहेर हलवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते. आता इतक्या वर्षापासूनची सशस्त्र दलाची ही मागणी नॅशनल वॉर मेमोरियलच्या रूपाने पूर्ण होते आहे.”

 

war memorial featured inmarathi
ajay123.blogspot.com

 

आजवर अनेक अनाम वीरांनी देशासाठी आपले प्राण दिले आहे.

त्यात १९४७-४८ साली झालेल्या जम्मू काश्मीर येथील कारवाईत ११०४ सैनिकांना वीरमरण आले. तर १९६२ सालच्या भारत- चीनच्या युद्धात ३२५० सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले.

१९६५ सालच्या भारत- पाकिस्तान युद्धात आपण आपले ३२६४ वीरपुत्र गमावले. तर १९७१ सालच्या बांगलादेश मुक्ती संग्रामात आपल्या तब्बल ३८४३ सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.

१९८७ सालच्या श्रीलंकेतील ऑपरेशन पवन दरम्यान ११५७ सैनिकांना वीरमरण आले. १९९९ सालच्या कारगिल युद्धात ५२२ सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले.

तर १९८४ पासून सियाचीन ग्लेशियरवर सुरु असलेल्या ऑपरेशन मेघदूत दरम्यान ९३० सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. तर ऑपरेशन रक्षक सारख्या काउंटर इंसर्जन्सी ऑपरेशन्स मध्ये ४८०० सैनिकांचे प्राण गेले.

ह्या सर्व वीरपुत्रांचा गौरव व्हायलाच हवा. त्यांच्या हौतात्म्याची गाथा पुढच्या पिढीपर्यंत देखील पोचायला हवी.

याआधी १९१४ ते १९२१ सालादरम्यान ब्रिटिश सैन्यात असलेल्या व पहिल्या महायुद्धात वीरमरण आलेल्या ८४००० सैनिकांना श्रद्धांजली म्हणून इंडिया गेट हे स्मारक बांधण्यात आले होते.

 

india-gate-marathipizza
culturalindia.net

 

त्यानंतर १९६० साली सशस्त्र दलांनी नॅशनल वॉर म्युझियमची योजना मांडली होती.

१९७१ सालच्या भारत पाक युद्धात हुतात्मा झालेल्या ३८४३ सैनिकांना मानवंदना म्हणून १९७२ साली इंडिया गेटच्या कमानीखाली अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्यात आली.

ह्याशिवाय ठिकठिकाणी सैन्याने सैनिकांना श्रद्धांजली म्हणून १२० पेक्षाही जास्त वॉर मेमोरियल्स बांधली आहेत. पण आजवर नॅशनल वॉर मेमोरियलची निर्मिती करण्यात आली नव्हती.

आजवर प्रलंबित असलेल्या ह्या स्मारकाला अखेर ऑक्टोबर २०१५ मध्ये मंजुरी मिळाली आणि १७६ कोटी रुपये खर्चून हे स्मारक बांधण्यात आले.

ह्या स्मारकाचे उद्घाटन करण्याची तारीख सुरुवातीला स्वातंत्र्यदिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट २०१८ ही ठरली होती. पण स्मारकाचे बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली.

सेंट्रल व्हिस्टा आणि इंडिया गेटचे पावित्र्य व सौंदर्य लक्षात घेऊन हे स्मारक बांधण्यात आले आहे.

४० एकरात पसरलेल्या ह्या स्मारकाच्या लेआऊट मध्ये ४ मोठी वर्तुळे आहेत. ही चार वर्तुळे म्हणजे अमर चक्र, वीर चक्र. त्याग चक्र व रक्षक चक्र आहेत.

 

memorial-inmarathi (1)
architecturelive.in

 

ह्या चार चक्रांमध्ये १५ मीटर उंचीचे दगडी स्तंभ असून त्यावर अखंड ज्योती प्रज्वलित केली आहे.

त्या स्तंभावर ब्रॉन्झ म्युरल्स, ग्राफिक पॅनेल्स, हुतात्मा सैनिकांची नावे व परमवीर चक्र प्राप्त केलेल्या सैनिकांचे अर्धपुतळे आहेत.

ह्या स्मारकाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की,

“हे स्मारक असे बांधण्यात आले आहे की त्यामुळे राजपथावर आधीपासूनच असलेल्या प्रतिष्ठित संरचनांबरोबर ते शोभून दिसेल व त्यांना कुठलाही अडथळा होणार नाही.”

ह्याच ठिकाणी म्हणजे प्रिन्सेस पार्कमध्ये इंडिया गेट कॉम्प्लेक्सच्या सी हेक्सागॉनमध्ये असलेल्या नॅशनल वॉर मेमोरियलला लागूनच नॅशनल वॉर म्युझियमचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

आपल्या शूर सैनिकांच्या धाडसाला सलाम आहे! त्यांच्यासारखा असीम त्याग करणे सामान्य माणसाला शक्य नाही.

अत्यंत कठीण परिस्थितीत ते राहतात, सतत मृत्यूच्या छायेत वावरतात, तरीही आपले कर्तव्य चोख बजावतात. शत्रूंना पळता भुई थोडी करतात.

आज ते सीमेवर अखंड उभे आहेत म्हणून आपण आपापल्या घरांत आपल्या कुटुंबियांबरोबर आरामात व सुरक्षित आयुष्य जगत आहोत.

 

army-inmarathi
legendnews.in

 

त्यांच्या ह्या त्यागासाठी त्यांना मानाचा मुजरा आणि वीरमरण आलेल्या भारतमातेच्या सर्व शूर सुपुत्रांना विनम्र अभिवादन!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?