' लहान मुलांच्या पाठपुस्तकात “कामातुर, मिलन, कौमार्यभंग” सारख्या शब्दांची पेरणी का केली जातीये? – InMarathi

लहान मुलांच्या पाठपुस्तकात “कामातुर, मिलन, कौमार्यभंग” सारख्या शब्दांची पेरणी का केली जातीये?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पहिली ते पाचवीच्या वर्गात असणार मूल फार फार तर साडेपाच ते अकरा वर्षे वयामधील असते. मुक्त बालपणाचा अनमोल ठेवा साकारायचे आणि स्वच्छंदी जगायचं हे एक महत्वाचं वय.. नात्यागोत्याची बंधने, शिष्टाचाराचे पाश,

“..कोल्हा मंतर छू” असा म्हणून मोठ्यातल्या मोठ्या दुःखाला त्या एका फुंकरेसरशी उडवून लावून फक्त सुखाची जाणीव ठेवणारं अतिशय अवखळ वय.. आयुष्यात वेगवेगळे धडे याच वयात गिरवले जातात. यात “इंद्रियसुख’ असतं का हो?

काय उडालात की काय ? प्रश्न नाही चुकलाय.. खरंच विचारला..असतात का असे धडे? नाही ना?

अहो आहेत.. बघा की जरा पुस्तक उघडून..

हो आपल्या माननीय शिक्षणमंत्र्यांनी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमात अशा काही गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे पोरं तर डोकं खाजवत बसली आहेतच पण शिक्षकांच्या तोंडच पाणी पळालं आहे.

 

book-inmarathi

यात असलेल्या “बाल नचिकेत” नावाच्या पुस्तकात “मिलन, कामातुर… कौमार्यभंग” अश्या काही शब्दांचा उल्लेख असल्याने हे “बाल (?) नचिकेत” पुस्तक त्या छोटुकल्यांना इंद्रियसुखाचे धडे तर देण्याच्या मार्गाला लागले नसावे ना असा प्रश्न पडतो.

यात असे प्रत्यक्षपणे सर्व काही लिहिले नसले तरी रतिसुखाशी निगडित असलेल्या शब्दांचा भडीमार करण्यात आला आहे ज्याचा अर्थ समजण्याच्या कोणत्याच आशा आपण त्या चिमुकल्यांकडून ठेवू शकत नाही.

gay म्हणजे आनंदी, ass म्हणजे गाढव या अर्थाने जग पाहणाऱ्या निष्पाप जीवाला कौमार्यभंग समजणं किंवा समजावणं म्हणजे वाळूचे कण रगडून तेल काढण्यासारखे आहे.

पौराणिक इतिहासातील किंवा काल्पनिक प्रेमकथा वगैरे मधील उतारा असावा अश्या काही वाक्यरचना यात आढळून आल्या असून ते वाचून नक्कीच डोळ्याचे पारणे फिटेल!

अंकगणित सोडविण्यासाठी मेंदूला तारेवरची कसरत करायला लावणारे हे पिटुकले असल्या संदर्भाच्या गोष्टी स्पष्टीकरणासहित देखील समजू शकणार नाहीत.

किशोरावस्थेत असताना देखील ययाती एकदा वाचून समजत नाही हो.. ‘विडंबन’ या शब्दाचा अर्थ समजावतानाही तोंडाला फेस येऊ शकतो.. मग इंद्रियसुखाचा अर्थ त्यांना बाल्यावस्थेत काय समजणार?

 

school-inmarathi

पण प्रश्न असा आहे की, अशा शब्दांचा किंवा अशा गोष्टींचा अट्टाहास कशासाठी?

पंचतंत्र सारख्या पुस्तकांमधून उंदीर, मांजर, हत्ती, सिंह, अस्वल इत्यादी प्राणी किंवा काही ठराविक पात्रांच्या मदतीने अगदी आशयपूरक गोष्टी दिलेल्या असतात, ज्यात तात्पर्य समजण्याइतपत गोष्ट सोपी आणि साधी असते.

प्राणी पक्षी आणि निसर्गाच्या माध्यमातून जिथे संस्कार होऊ शकतात तिथे घडलेल्या काही गोष्टी बुरसटलेल्या किंवा बाटलेल्या शब्दांचा वापर करून रंगवून त्या नकळत्या वयात सांगण्याचा प्रयत्न कशासाठी ? अजून विषय किंवा अवांतर वाचनयोग्य माहिती नसावीच का?

पौगंडावस्थेतील मुलांना लैंगिक शिक्षण देत असताना ते चुकीच्या मार्गाने दिले जाऊ नये किंवा त्याचा गैर अर्थ घेतला जाऊ नये यासाठी पालक, शिक्षक बरीच धडपड करत असतात.

ते त्या वयातही त्यांच्यासाठी अवघडच असते. कळत्या वयात दिलेले लैंगिक शिक्षणाचे धडे जिथे मुलांच्या डोक्यावरून जातात तिथे या पिल्लांच्या डोक्यात हे अवजड शब्द जातील अशी अपेक्षा कशी ठेवली जाऊ शकते?

आपण आणि आपल्या समाजाने प्रत्येक क्षेत्रातील काही गोष्टी समजण्यासाठी एका ठराविक वयाची अट घालून दिलेली आहे.

 

school-student-inmarathi

यात स्वशरीराची ओळख म्हणजे हात, पाय, नाक, तोंड, गळा, डोळे , ई. वयाच्या ६व्या वर्षापर्यंत आणि नंतर त्याचे उपयोग इतकं शिकवलं जाऊ शकतं. फार तर पुढे हस्त, पाद:, नासिक, मुख, ई शब्द समजण्याइतपत त्यांची उडी पोहोचेल पण यापुढे मेंदूची पोहोच तर सोडाच पण गरज तरी आहे का हो ?

रामायण घडले तेव्हा,

-रावणाने सीतेला उचलून नेले..
-का?
-कारण सुंदर सीता रावणाला आवडली होती, बेटा..
-ती मम्मा सारखी सुंदर होती का?

यात कोणत्या वाईट शब्दांचा उल्लेख नव्हता ती कदाचित समजायला सोपी असू शकते, पण…

रामायण घडले तेव्हा,

-रावणाने सीतेला उचलून नेले..
-का?
-कारण सुंदर सीता पाहून रावणाची वासना जागृत झाली होती, बेटा..
-वासना म्हणजे ?

आता वासना म्हणजे…. काय सांगणार? भूक? कशाची ?

प्रसंगात शब्द हे त्या त्या वयोमानानुसार वापरले पाहिजेत तर ते चपखलपणे बसू शकतील.

कारण लहान मुले म्हणजे प्रश्नांचं भांडार असतं. एक पिल्लू सांभाळताना नाकीनऊ येत असताना, “कौमार्यभंग किंवा विषयलोलुपता” असा शब्द वाचल्यावर ५० मुलांचे मिळून १०० डोळे प्रश्नचिन्ह घेऊन आपल्याकडे टकमक पाहत असताना कोणत्या शिक्षकाच्या घशाला कोरड पडत नसेल?

 

konta-school-students-inmarathi

वरती नमूद केलेल्या पुस्तकात असलेल्या काही आक्षेपार्ह वाक्यांची यादी-

“माझे कौमार्यभंग झाल्याने मला कोण स्वीकारेल?” “रात्रसदृश गहन व दाट धुक्यात त्यांचे मिलन झाले” “विवाह करूनही विषयलोलुपता आणि इंद्रियसुख दुर ठेवता येते…” “तिचे सौन्दर्य, नितळ कांती, शरीराच्या होणाऱ्या हालचाली पाहून पराशर ऋषींचे चित्त चंचल झाले” “देवी! नग्न होऊन तू आम्हास भोजन द्यावे!”

यातल्या कोणत्या वाक्याच्या मूळ अर्थासह वाक्य समजावून सांगण्याची धमक असेल कोणात?

अरे…. वय किती? विषय काय? आशय काय?

शिक्षक तर याची फोड करून सांगणारही नाहीत, ते सांगण्यासारखेही नाही. पालक देखील याचा निष्कर्ष काढू शकणार नाहीतच.

आता यात काही उत्साही छोटे कार्यकर्ते असतील तर इंटरनेट सोबत बरेच मैत्रीपूर्ण संबंध झाल्यामुळे त्यांचे अर्थ शोधण्यासाठी त्यांच्या गूगलबाबा ची मदत ते नक्कीच घेऊ शकतील.

आणि हो…. तिथे कसलेच बंधन नाही बरं का..

 

School-Being-Marathi-inmarathi

वैदिक गणित, संशोधन, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासाठी मुलांचा पाया अगदी लहानपणी पक्का करायचा असतो तर त्या वयात अवांतर वाचन म्हणून “इंद्रियसुखाचे धडे” देण्यापेक्षा ‘इंद्रधनुचे’ धडे जास्ती परिणामकारक असतील.

तर मुळात मुद्दा फक्त इतकाच आहे की इतक्या अतिशय लहान वयात या अवजड आणि रंजक शब्दांची गरज नसून त्यांना समजतील असे आणि संस्कार घडण्यास पूरक अश्या गोष्टींची, प्रयोगाची किंवा इतर माहितीची पुस्तके त्यांचा अभ्यासक्रमात असावीत.

कारण आधीच पौगंडावस्था आणि त्यांची प्रश्न सोडवत असताना हा नाकापेक्षा जड असलेला मोती सावरणे अवघड होऊन बसायचे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?