' डॉ. मनमोहन सिंगांचे पक्षांतर्गत काँग्रेसी दमन आता मोठया पडद्यावर

डॉ. मनमोहन सिंगांचे पक्षांतर्गत काँग्रेसी दमन आता मोठया पडद्यावर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

येणाऱ्या वर्षात ११ जानेवारी रोजी “द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहे. परवा या चित्रपटाचा आडीच मिनिटांचा ट्रेलर प्रसिद्ध झाल्याने राजधानी दिल्लीमध्ये भूकंप झाला.

एखाद दुसरा अपवाद वगळता भारतात ताज्या राजकीय घडामोडींवर चित्रपट बनत नाहीत.

राजकीय नेत्यांच्या आयुष्य़ावर किंवा ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनले तर त्यांवर बंदी घातली जाते किंवा सेंसॉर बोर्डाने मंजूर करुनही त्या त्या पक्षाच्या नेत्यांना तो दाखवून त्यांनी सुचवल्याशिवाय बदल (कट) केल्याशिवाय ते प्रदर्शित होऊ शकत नाहीत.

खासकरुन नेहरु-गांधी घराण्यातील लोकांचा विषय असतो तेव्हा एरवी देशात असहिष्णुतेत वाढ झाल्याची उच्चारवात टिव टिव करणारे, सामाजिक भान असलेले अभिनेते-दिग्दर्शकही मौन-मोहन बनतात.

ट्रेलर प्रदर्शित होताच ते भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन शेअर केले गेले तर कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आम्हाला दाखवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. (सविस्तर वृत्त)

 

 

या चित्रपटातील मुख्य भूमिका बजावणारे अनुपम खेर यांची पत्नी भाजपा खासदार असल्याने या चित्रपट निर्मितीत भाजपाचाच हात आहे असा त्यांचा आरोप आहे.

गंमत म्हणजे देशात पुरस्कार वापसीची चळवळ सुरू करणाऱ्या नयनतारा सेहगल या नेहरु-गांधी कुटुंबातील असून पंडित नेहरुंची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांची कन्या आहेत ही बाब ते झाकून ठेवतात.

हा चित्रपट, वरिष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि संपुआ १ काळात डॉ. सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेल्या संजय बारु यांच्या “द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अ‍ॅड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग” या पुस्तकावर बेतला आहे.

ते गेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर, म्हणजेच ११ एप्रिल २०१४ रोजी प्रसिद्ध झाले होते.

काय आहे या पुस्तकात?

हे पुस्तक संपुआ राजवटीत मनमोहन सिंग यांचे स्थान एखाद्या मुखवट्याप्रमाणे होते आणि खरी सत्ता नेहमीच सोनिया गांधी आणि त्यांच्या सल्लागारांकडे होती या आरोपांची पुष्टी करते.

सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या असताना त्यांचे सचिव म्हणून काम करणारे पुलोक चॅटर्जी यांची मनमोहन सिंग पंतप्रधान कार्यालयात नेमणूक करण्यात आली.

कशाप्रकारे ते नियमितपणे; जवळपास दररोज सोनिया गांधींना भेटत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती देत आणि त्यांच्या सूचनांनुसार महत्त्वाच्या फायलींवर पंतप्रधानांकडून सही करवून घेत हा या पुस्तकातील सर्वात खळबळजनक दावा आहे.

 

the-accidental-prime-minister-inmarathi
timesofindia.com

सरकारने केलेल्या अनेक नियुक्त्यांमध्ये मनमोहन सिंग यांना भूमिका नव्हती. सोनियाजींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल पंतप्रधान कार्यालयात येऊन पुलोक चटर्जींच्या माध्यमातून सरकारी महामंडळं, सार्वजनिक कंपन्या आणि बॅंकावर कॉंग्रेसला जवळच्या लोकांच्या नियुक्त्या करवून घेत असत.

पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय सल्लागार समिती पंतप्रधान कार्यालय आणि योजना आयोगाला डावलून अनेक धोरणात्मक निर्णय घ्यायची.

हे निर्णय पंतप्रधानांना अमान्य असले तरी ते हतबल होते.

कशा प्रकारे संपुआतील अनेक मंत्र्यांनी आपली निष्ठा पंतप्रधानांऐवजी सोनियाजींच्या चरणी वाहिली होती; हेच मंत्री अनेकदा आपापसात भांडत आणि आपण काम करत असलेल्या सरकारविरूद्धं भूमिका घेत.

कशाप्रकारे जे काही थोडे मंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या जवळचे होते, ते उगवत्या सूर्याला नमस्कार या तत्वाला अनुसरून सोनिया आणि राहुल यांच्या गोटात गेले. अशा अनेक गोष्टी या पुस्तकाद्वारे बाहेर येतात.

या खुलाशांचे महत्त्वं काय आहे?

भारताच्या संविधानानुसार पंतप्रधान हा देशाचा सर्वोच्च नेता व मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. त्याचे स्थान सत्ताधारी पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्यापेक्षाही मोठे असते.

पंतप्रधान व मंत्रिमंडळाने गुप्ततेची शपथ घेतली असल्याने आपण घेणार असलेले निर्णय किंवा त्यासंबंधी फायली सरकारबाहेरच्या कोणालाही, अगदी पक्षाध्यक्षांनाही दाखवणे हे शपथेचा अवमान करणारं आहे.

 

sonia-manmohan-inmarathi
theindianexpress.com

देश स्वतंत्र झाला तेव्हा आचार्य कृपलानी हे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. सरकारची महत्त्वाची धोरणं आणि मंत्रिमंडळाचे निर्णय याबाबत मला विश्वासात घ्यायला पाहिजे अशी मागणी जेव्हा त्यांनी केली तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरूंनी ती साफ धुडकावून लावली.

त्यानंतर नेहरूंनी कृपलानींना बिनखात्याचे मंत्रिपद देऊ करून तोडगा काढायचा प्रयत्नं केला पण कृपलानींनी त्यापेक्षा राजीनामा देणे पसंत केले.

एवढेच कशाला अमेरिकेशी अणुकरारावरून जेव्हा २००८ साली डाव्या पक्षांनी जेव्हा सरकारचा पाठिंबा काढला तेव्हा त्याचे तात्कालिक कारण होते की, सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय अणु-उर्जा संस्थेशी (IAEA) करण्यात येणाऱ्या वाटाघाटींमध्ये सादर करण्यात येणारा मसुदा डाव्या पक्षांना बघायचा होता.

सरकार घेत असलेले निर्णय बाहेरच्या कोणालाही दाखवायचे नसतात अशी सडेतोड भूमिका तेव्हा डॉ. मनमोहम सिंग यांनी घेतली आणि त्यापायी बहुमतही पणाला लावले.

मात्र इतर बाबतीत आपण घेत असलेले निर्णय १० जनपथमधून मंजूर करवून घेताना पंतप्रधानांनी आपली तत्वं तसेच गुप्ततेची शपथ गुंडाळून ठेवली असं हे पुस्तक सूचित करतं.

पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून त्यांच्या दोन प्रमुख जबाबदाऱ्या होत्या. पहिले म्हणजे पंतप्रधानांचे कान, नाक आणि डोळे बनून त्यांना बाहेरच्या जगातील बित्तंबातम्या द्यायच्या. दुसरी म्हणजे पंतप्रधानांची जनमानसातील प्रतिमा उंचावायची.

 

manmohansing-inmarathi
india.com

सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी निवडलं कारण मोठी जबाबदारी घेण्याची क्षमता, स्वच्छ चारित्र्यं आणि गांधी घराण्याच्या अर्पण केलेली निष्ठा असे सर्व गुण डॉ. सिंग यांच्या ठायी होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच त्यांना कॉंग्रेसमधील महत्त्वाकांक्षी तसेच गांधीनिष्ठ नेत्यांकडून विरोध होत राहिला.

डॉ. सिंग यांची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्नं बारू करत असल्यामुळे त्यांच्याविरूद्धं १० जनपथचे सतत कान भरून त्यांची उचलबांगडी करण्याचे प्रयत्नं सातत्याने केले गेले.

“मनरेगा” या योजनेचं खरं श्रेयं तेव्हाचे ग्रामीण विकास मंत्री रघुवंश प्रसाद व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे जातं.

पण कॉंग्रेसच्या नियमानुसार ते सोनिया व राहुल गांधींना दिलं गेलं. संपुआ १च्या अखेरीस राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची योजना होती. पण बाहेर आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि अमेरिकेशी अणुकरारामुळे मुस्लिम मतदारांचा रोषामुळे सत्ता जाऊ शकेल अशी भीती कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना होती.

त्यामुळे निवडणुकांत मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केलं गेलं. पण डॉ. सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेसच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन संपुआचा विजय झाला.

या विजयाचे प्रमुख मानकरी असूनही स्तुतीपाठकांनी सारे श्रेय पुन्हा एकदा सोनिया व राहुल गांधी यांना दिलं. बारू यांनी मनमोहन सिंग यांना २००९ साली लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता.

 

sonia-rahul-inmarathi
digest.com

लोकसभेवर निवडून गेले असते तर मनमोहन सिंग यांना जनतेचं बळं प्राप्त झाले असते. पण त्यांना राज्यसभेवर जाणं भाग पाडलं गेलं असावं. २००९ सालच्या सुरूवातीपासूनच योग्यं वेळ साधून राहुल गांधींच्या पंतप्रधान बनवण्याच्या योजना त्यांच्या समर्थकांकडून आखल्या जात होत्या.

त्यासाठी पद्धतशीरपणे मनमोहन सिंग यांचे खच्चीकरण केले गेले. मनमोहन सिंग यांना संजय बारू यांना आपला माध्यम सल्लागार नेमण्याची इच्छा असूनही कॉंग्रेसने त्यांना तसं करू दिलं नाही.

राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली लढल्या गेलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशसह अन्य महत्त्वाच्या निवडणूकांत कॉंग्रेसला धूळ खावी लागून त्यांचा राज्याभिषेक सातत्त्याने लांबणीवर पडला. तरीही मनमोहन सिंग यांच्या खच्चीकरणाचे उद्योग काही थांबले नाहीत.

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडून सिंग यांना अभिप्रेत आर्थिक धोरणाला विसंगत निर्णय घेतले जाणे ते राहुल गांधींचा सरकारी अध्यादेश फाडण्याचे प्रकार सर्वांसमोर आहेत.

त्यांचे वर्णन बारूंनी पुस्तकाच्या समारोप प्रसंगी केले आहे.

मौन-मोहनांचा पुस्तकी बदला?

पाच वर्षांपूर्वी, निवडणुकांच्या तोंडावर, जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा संपुआ २ च्या काळात पंतप्रधान कार्यालयात संजय बारू यांची वर्णी न लागल्याने त्याचा बदला घेण्यासाठी संजय बारुंनी हे पुस्तक लिहिल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला.

 

sanjay-baru-inmarathi
nova.com

डॉ. मनमोहन सिंग यांनी आताप्रमाणेच तेव्हाही मौन बाळगले असले तरी त्यांची मुलगी उपिंदर यांनी या पुस्तकाची “पाठीत सुरा खुपसणं”, “प्रचंड विश्वासघात” आणि “अनैतिक, खोडसाळ प्रयत्नं” अशी संभावना केली होती. हे पुस्तक वाचले असता, स्वस्त प्रसिद्धीसाठी बारूंनी असं केलं असावं असं वाटत नाही.

पुस्तकाच्या ८०% हून अधिक भागात बारू यांनी मनमोहन सिंग यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्नं केला आहे.

संपुआ १ च्या काळात घडलेले अनेक दहशतवादी हल्ले, भ्रष्टाचाराची प्रकरणं, चुकीचे आर्थिक निर्णय ते अगदी अणुकराराच्यावेळेस अल्पमतातील सरकार वाचवण्यासाठी “कॅश फॉर व्होट” सारखे प्रकार बारू यांनी जवळून पाहिले असून त्याबद्दल सविस्तर वर्णन करायचे टाळले आहे.

त्यामुळे हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा बारु यांची १००% स्वतःची आहे का त्याला डॉ. मनमोहन सिंग यांचा मूक पाठिंबा आहे हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर अशिक्षित आणि अल्पशिक्षित लोकसंख्या असलेल्या देशात व्यावसायिक चित्रपटाचा परिणाम पुस्तकाहून कैकपट मोठा असतो.

बारुंनी या पुस्तकात मांडलेल्या सत्याला थोडीशी काल्पनिकता, थोडीशी नाट्यमयता आणि दिग्गज अभिनेत्यांची जोड देऊन हा चित्रपट बनवला आहे असे त्याच्या ट्रेलरवरुन वाटते. २००४ ते २०१४ या काळात सरकार कशा पद्धतीने काम करत होते, हे समजून घ्यायचे असेल तर हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “डॉ. मनमोहन सिंगांचे पक्षांतर्गत काँग्रेसी दमन आता मोठया पडद्यावर

 • January 1, 2019 at 4:31 pm
  Permalink

  फकत सरकार ची चापलुसी बंद करा . . . . खंर ते लिहा

  Reply
 • January 31, 2019 at 7:18 am
  Permalink

  लेख अर्धवट आणि असंबद्ध आहे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?