३१ डिसेंबर साजरे करण्याच्या ह्या कल्पना अगदी बोअरिंग माणसाला सुद्धा उत्साहित करतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

३१ डिसेम्बरच्या रात्री आपण सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत अगदी धुमधडाक्यात करतो. अर्थात काही लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करायला आवडत नाही उलट शांतपणे घरच्या घरी निवांत वेळ घालवायला आवडतो.

तसेही ३१ डिसेम्बरच्या संध्याकाळी हॉटेल्स, मॉल्स आणि हॅपनिंग ठिकाणी भरपूर गर्दी असते.

शिवाय भरपूर ट्रॅफिक आणि हॉटेल्स मध्ये वेटिंगची मोठी लाईन ह्यामुळे सुद्धा वैताग येतो. तसेच लहान मुलांना घेऊन गर्दीच्या ठिकाणी, मोठ्या आवाजात आपण जास्त काळ थांबू शकत नाही.

 

31dec-inmarathi
TravelTriangle.com

ह्या दिवसात कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे घरातल्या उबदार वातावरणातून बाहेर थंडीत जावेसे वाटत नाही. म्हणूनच आपल्या मित्रमंडळींना, नातेवाइकांनाच घरी बोलावून निवांत घरीच आपण मज्जा करू शकतो.

काही लोकांना ३१ डिसेम्बरच्या रात्री घरातच वेळ घालवणे म्हणजे कंटाळवाणे वाटते.

पण असे नाही. नीट योजना केली तर तुम्ही कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर न्यू इयर्स ईव्ह घरातच छान सेलिब्रेट करू शकता.

१. फोटो मुव्ही

 

photo-inmarathi
realplayer.com

आपण आपल्या सुंदर आठवणी कायम आपल्याबरोबर राहाव्यात म्हणून खास क्षणांचे फोटो काढून ठेवतो. असंख्य आठवणी कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो आणि नंतर विसरून जातो.

३१ डिसेम्बरच्या रात्री आपल्या कुटुंबाबरोबर जुने फोटो, व्हिडीओज, घरातील मुलांचे लहानपणीचे फोटो, आजी आजोबांचे तारुण्यातले फोटो बघून काही क्षण छान जुन्या आठवणींत रमू शकतो.

सिलेक्टेड फोटोंचा स्लाईड शो बनवून, तो टीव्ही वर लावून आवडत्या खाऊ आणि गप्पा ह्यांसह जगाच्या गोंगाटापासून लांब फक्त आपल्या कुटुंबाबरोबर असे निवांत सेलिब्रेशन करू शकतो.

२. गेट टुगेदर

 

get-together-inmarathi
mylaporetimes.com

महिलांना एरवी घरातल्या कामातून स्वत:साठी वेळच मिळत नाही. ह्या वेळी मात्र तुम्ही आपापल्या घरांतल्या महिलावर्गाला थोडा ब्रेक देऊन त्यांनाही मज्जा करता यावी म्हणून घरातल्या महिला वर्गासाठी एक गेट टुगेदर ठरवू शकता.

मैत्रिणींनो तुम्ही आपल्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी भेटून तिथेच जेवून खाऊन रात्री कॉफी, गप्पा आणि आवडते संगीत किंवा आवडते चित्रपट ह्याचा आनंद लुटू शकता. काही खेळ खेळू शकता.

रात्रभर मैत्रिणींबरोबर गप्पा आणि मज्जा करून सकाळी परत आपापल्या रुटीनला लागू शकता.

३. शेकोटी

 

fire-inmarathi
traweller.com

तुमच्या चांगल्या नशिबाने जर तुमच्या घरी अंगण असेल तर तुम्ही कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा आनंद लुटू शकता.

अंगण मोठे नसेल मित्रमंडळींना बोलावून घरातल्या गच्चीवर सुद्धा शेकोटी भोवती गप्पांचा फड रंगवू शकता.

शेकोटीबरोबर हुरडा पार्टी, किंवा कोळश्याच्या शेगडीवर घरातल्या घरात बार्बेक्यू तयार करून चमचमीत चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

घरातले पुरुष हे करून एक दिवस का होईना स्वतः मास्टरशेफ बनून घरातील महिला वर्गाला एक दिवस आराम देऊन स्वतःची पाककला आजमावू शकता. ३१ डिसेम्बरच्या रात्री शेकोटीची उब, चटपटीत जेवण आणि गप्पा किंवा संगीत हे उत्तम सेलिब्रेशन होऊ शकते.

४. संगीत संध्या

 

singing-inmarathi
youtube.com

तुमच्या कुटुंबातील कुणी गायक असेल किंवा वादक असेल तर घरातच मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना बोलावून संगीताची मैफिल जमवू शकता.

हल्ली तर कराओकेमुळे घरातील सगळेच गायनाचा आनंद घेऊ शकतात. आपले आवडते गाणे सिलेक्ट करून ते म्हणू शकता.

लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच संगीताचा आनंद लुटू शकता. किंवा घरातील गायक, वादक कलाकार मंडळी आपली कला घरातल्या मंडळींपुढे सादर करून ३१ डिसेम्बरची संध्याकाळ संगीतमय करून आनंद घेऊ शकतात.

५. थीम पार्टी

 

theme-party-inmarathi
india.com

तुमच्या घरात किंवा कुटुंबात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी एक थीम पार्टी करू शकता. मोठ्यांसाठी सुद्धा एक थीम पार्टी आयोजित करता येऊ शकते.

ह्यात तुम्ही सिक्सटीज थीम, एखाद्या रंगाची थीम वगैरे वेगवेगळ्या थीम ठेवू शकता. त्याप्रमाणे पार्टीमधील जेवणाचे पदार्थ सुद्धा ठरवू शकता.

म्हणजे जर पांढऱ्या रंगाची थीम असेल तर सगळे पदार्थ पांढऱ्या रंगाचे, सगळ्यांनी पांढऱ्या रंगाचे पण क्रिएटिव्ह कॉश्यूम घालायचे असे काहीतरी ठरवू शकता.

रोजच्या धावपळीतून असेच मज्जा म्हणून किड्स थीम ठेवून परत लहान मूल होणे अनुभवू शकता.

ह्याशिवाय फटाके उडवण्यास परवानगी असेल तर फटाके उडवू शकता. डान्स आवडत असेल तर घरातच आवडीची गाणी लावून डान्स नाईट एन्जॉय करू शकता. (ज्याला नाचणे आवडत नाही त्याला डीजे बनवून कामाला लावू शकता).

 

party-inmarathi
Uwishunu.com

आवडीचे जुने सिनेमे बॅक टू बॅक बघू शकता. त्याबरोबर आवडीचे खाणेपिणे करू शकता.

तुम्हाला बुद्धीबळ किंवा कॅरमची आवड असेल तर घरातल्यांबरोबर ते खेळू शकता किंवा ज्यांना हे आवडत नाही ते घरातल्यांबरोबर पत्त्यांचा डाव टाकू शकतात.

ह्याप्रकारे तुम्ही तुमच्या घरातल्यांबरोबर ३१ डिसेम्बरला बाहेर थंडीत, गर्दीत न जाता घरातच निवांत सेलिब्रेट करू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “३१ डिसेंबर साजरे करण्याच्या ह्या कल्पना अगदी बोअरिंग माणसाला सुद्धा उत्साहित करतील!

 • December 21, 2018 at 8:44 am
  Permalink

  सुरेख

  Reply
 • December 21, 2018 at 9:15 am
  Permalink

  छानच कल्पना.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?