'खुनशी गँगस्टरच्या भूमिका साकारणाऱ्या गुणी कलाकाराची, सच्ची आणि हळवी प्रेमकथा...

खुनशी गँगस्टरच्या भूमिका साकारणाऱ्या गुणी कलाकाराची, सच्ची आणि हळवी प्रेमकथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पंकज त्रिपाठी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतो तो गँग्स ऑफ वासेपूर मधला सुलतान कुरेशी.

पंकज त्रिपाठीने इतक्या सहजतेने ही भूमिका हाताळली की सुलतान म्हणून दुसरा कुणी अभिनेता ही कल्पनाही करवत नाही.

खरंतर ही भूमिका सहाय्यक कलाकाराची होती. पण असे असूनही पंकज त्रिपाठीने स्वतःचा वेगळाच ठसा या चित्रपटातून उमटवला.

याचे कारण म्हणजे त्याची आजवरची मेहनत आणि अभिनयातला नैसर्गिकपणा.

 

 

आपल्याला जरी हा गुणी अभिनेता २०१२ च्या गँग्स ऑफ वासेपूर नंतर माहिती झाला असला तरी त्याने या क्षेत्रात फार पूर्वीच पाऊल टाकले होते.

२००४ मध्येच त्यांनी चित्रपटात भूमिका करण्यास सुरुवात केली होती. पण अभिनयापेक्षा रुपाला जास्त महत्त्व असणाऱ्या इंडस्ट्रीत या अभिनेत्याला स्वतःची ओळख निर्माण करायला कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला.

हे झाले त्यांच्या अभिनयातील संघर्षाबद्दल. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांनी असाच संघर्ष केलाय. तो ही चक्क स्वतःचे प्रेम मिळवण्यासाठी.

एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा अनोखी आणि अचंबित करणारी अशी ही कथा. पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नी म्रीदुला यांच्या वैवाहिक जीवनाला चौदा वर्ष झाली आहेत. त्यांना एक मुलगीही आहे.

 

pankaj-tripathi-family-inmarathi1
notednames.com

बॉलीवूडच्या विविध कार्यक्रमांत हे जोडपे तुम्हीही बरेचदा बघितले असेल.

लग्नाच्या एवढ्या दिवसांनतरही त्यांच्या नात्यात किती गोडवा आहे हे बघताक्षणी जाणवते. पण या गोड नात्यामागे मोठी गोष्ट आहे.

खरंतर पंकज यांना खूप लहानपणापासूनच वेगळे काहीतरी करण्याची आवड होती. त्यामुळेच त्यांच्या वडीलांची त्यांनी डॉक्टर व्हावे अशी इच्छा असतानाही त्यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

तसेच त्यांनी दहावीतच असताना ठरवले होते की मी कधीच हुंडा घेणार नाही.

शिवाय त्यांच्या गावात कधीच कुणीच प्रेमविवाह केलेला नव्हता. त्यामुळे तेव्हाच त्यांनी हा ही निर्णय घेऊन टाकला होता की ते प्रेमविवाहाच करतील.

पण प्रेम ही गोष्ट काही ठरवून होत नसते. तसेच त्यांच्याही बाबतीत झाले. पत्नी म्रीदुला यांच्या प्रेमात ते अगदीच अनपेक्षितपणे पडले. तेही पहिल्याच नजरेत. आहे की नाही एखाद्या सिनेमासारखी गोष्ट.

याबाबत बोलताना पंकज त्रिपाठी सांगतात की,

ते त्यांच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी त्यांना तिथून बाल्कनीत उभी असलेली मुलगी दिसली. ही मुलगी कोण असावी या विचारात ते पडले.

जरा वेळाने ती मुलगी खाली आली आणि एखाद्या हरणीप्रमाणे तिने त्यांच्याकडे हळूच वळून बघितले आणि ती निघून गेली.

पंकज म्हणतात त्याच क्षणी मी ठरवले की हीच माझी आयुष्यभराची सोबती असणार.

त्यांना त्यावेळी त्या मुलीचे नाव, गाव माहिती नव्हते. शिवाय ती आपल्या या निर्णयात साथ देईल की नाही याचीही त्यांना कल्पना नव्हती. पण बघताक्षणी प्रेमात पडल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

 

pankaj-tripathi1-inmarathi1
thebetterindia.com

कालांतराने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण त्यावेळी पंकजजी दिल्लीत अभिनय शिकण्यासाठी गेले होते. म्रीदुलाजी मात्र कलकत्त्यातच होत्या. त्यांच्या फार मोठे अंतर होते.

शिवाय त्याकाळी आत्ताप्रमाणे मुला मुलीने भेटणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे शक्य नव्हते.

त्यामुळे ते दोघे एकमेकांना पत्र पाठवत. ही पत्रही दहा दिवसांनंतर पोहचत असत. त्यांची भेटही दीड दोन वर्षांतून एकदा होत असत.

म्रीदुलाजी यांनी पंकज यांना सांगितले होते की मी रात्री आठ वाजता होस्टेलच्या फोनवर फोन करत जाईन.

कारण त्यावेळी मोबाईल नसल्याने कधीही कुणालाही फोन करून संवाद साधता येत नसत.

त्यामुळे पंकजजी आठ वाजेच्या आधीपासूनच फोनजवळ जाऊन बसत. आतुरतेने फोनची वाट बघत आणि फोनची रिंग वाजताच घाईने फोन उचलत.  

असा हा दुरावा १९९३ ते २००४ त्यांच्या नात्यात राहिला. तरीही ही अकरा वर्षे त्यांनी मोजक्या संवादाच्या आधारे आपले प्रेम टिकवले.

या दोघांनी लग्न करायचे ठरवल्यावरही बऱ्याच अडचणी आल्या.

म्रीदुलाजी या पंकज यांच्या बहिणीच्या नणंद आहेत. त्यांच्या समाजात ज्या घरी मुलगी दिली त्यांच्या मुलीशी विवाह करता येत नाही.

पण पंकज आणि म्रीदुला आपल्या निर्णयावर ठाम होते. विरोधाला न जुमानता त्यांनी अखेर विवाह केलाच.

विवाह होइपर्यंत आणि त्यानंतरही पंकज फारसे कमवत नव्हते. त्यानंतर त्यांनी काम मिळवण्यासाठी बराच संघर्ष केला.

 

 

पण त्यांना अत्यंत छोट्या भूमिका मिळत गेल्या. त्यांच्या अभिनय कौशल्यांचा सर्वांसमोर येण्याची खरी संधी मिळाली ती २०१२ मध्ये.

तोपर्यंत ते फक्त आणि फक्त झगडत होते. त्यांची कमाई सुद्धा पुरेशी नव्हती.पण याच काळात त्यांच्या पत्नीने त्यांना मोठा आधार दिला.

त्यांनी पंकज यांना अभिनयात करीयर करण्याची मोकळीक तर दिलीच. पण त्यांना कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी कधीच हट्ट केला नाही.

त्यांनी स्वतः नोकरी करत सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. मुलीचे संगोपन आणि पतीला आधार अशा दोन्ही गोष्टी त्यांनी नेहमीच केल्या.

त्यामुळेच पंकज आपल्या पत्नीलाच कुटुंबप्रमुख समजतात.

एवढ्या अडचणींचा सामना करूनही त्यांचे प्रेम अबाधित राहिले हे मात्र आश्चर्यच. खरे प्रेम म्हणजे काय हे यांच्या गोष्टीतून नक्कीच कळते.

कित्येक अडचणी, कितीतरी वर्षांचा दुरावा असतानाही त्यांनी आपले प्रेम टिकवले. एकमेकांना साथ देत, एकमेकांच्या आधाराने त्यांनी आपले प्रेम यशस्वी केले.

म्हणूनच तर लग्नाला एवढी वर्ष होऊनही त्यांचे प्रेम टिकून आहे. किंबहुना त्यात सतत वाढ होतेय.

 

pankaj-tripathi-wife-inmarathi1
scoopwhoop.com

प्रेमात तर कितीतरी लोक पडतात. पण सगळ्यांनाच ते निभावणे शक्य होतेच असे नाही. कारण त्यासाठी मोठे धैर्य आणि त्याग लागतो.

हेच धैर्य आणि त्याग पंकज व म्रीदुला यांनी ठेवला म्हणून तर ते आनंदात सोबत आहेत.

खरंतर तर ही कथा सगळ्या प्रेमी युगुलांनी प्रेरणा घ्यावी अशीच आहे. तुमच्या अथवा तुमच्या मित्र-मैत्रिणी मध्ये आहे का अशी जिगर?
कंमेंट्स मध्ये नक्की कळवा. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?