' १०० तोळ्याचा नाग आणि मराठ्यांच्या भूतांनी ‘मंतरलेल्या’ अभेद्य किल्ल्याची गोष्ट – InMarathi

१०० तोळ्याचा नाग आणि मराठ्यांच्या भूतांनी ‘मंतरलेल्या’ अभेद्य किल्ल्याची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलाढ्य स्वराज्याला जमेची साथ लाभते ती सह्याद्रीमध्ये वसलेल्या अनेक किल्ल्यांची! डोंगर दऱ्या, घनदाट जंगले, चुकवणाऱ्या वाटा यांनी वेढलेल्या प्रदेशांमध्ये वसलेल्या महाराजांच्या किल्ल्यांनी स्वराज्याच्या प्रत्येक शत्रूला बेजार करून टाकले.

स्वराज्यातील किल्ले हस्तगत करण्याची मोहीम एखाद्या सरदाराने काढली की त्यासोबत जाणाऱ्या इतर सैनिकांच्या मनात धडकी भरे.

कारण शिवाजी महाराजांचे किल्ले जिंकण्यास जाणे म्हणजे पुन्हा परतु की नाही याची देखील या सैनिकांना आशा नसायची…!

 

shivaji-war-inmarathi

 

ज्याप्रमाणे या गिरिदुर्गांनी शेवटपर्यंत स्वराज्याचे रक्षण केले त्याचप्रमाणे किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त शौर्य दाखवले एका गिरीदुर्गाने!

नाशिक जवळचा असा एक गिरिदुर्ग आहे ज्याने स्वराज्याच्या रक्षणार्थ सलग ५ वर्षे शत्रूचे वार झेलले. पण त्यांच्या समोर हार पत्करली नाही. तो गिरिदुर्ग म्हणजे नाशिक जवळील आशेवाडीचा किल्ले रामशेज होय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या किल्ल्यासोबत लढणाऱ्या स्वराज्याच्या मावळ्यांनी निकराने लढा देत इंचभर जमीन देखील मोघलांच्या हाती जाऊ दिली नाही.

पण दुर्दैव हे की या थोर पराक्रमाची गाथा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाण्यापासून मात्र वंचित राहिली. आणि परिणामी या किल्ल्याचे शौर्य इतिहासासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अज्ञातच राहिले.

 

ramshej-fort-marathipizza01

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्य काबीज करण्यासाठी पुन्हा कंबर कसली. १६८२ साली त्याने आपल्या पराक्रमी सरदारांच्या साथीने स्वराज्यावर आक्रमण करण्याची मोहीम आखली.

मोहिमेमध्ये कोणकोणते किल्ले काबीज करायचे ते ठरले आणि त्यानुसार प्रत्येकाला जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

या किल्ल्यांमध्ये लहानग्या रामशेज किल्ल्याचा देखील समावेश होता आणि औरंजगजेबाने रामशेज किल्ला सर करण्याची जबाबदारी सोपवली होती शहाबुद्दीन खानावर !

या शहाबुद्दीन खानाने १६६४ साली देखील रामशेज मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळस त्याला यश आले नाही.

पराभवाची सल अजूनही त्याच्या मनात होती आणि म्हणूनच औरंगजेबाने पुन्हा एकदा त्याला या मोहिमेवर धाडले. यावेळेस रामशेज किल्ला हस्तगत करायचाच या जिद्दीने शहाबुद्दीन खानाने तब्बल दहा हजार सैन्यांच्या साथीने रामशेज किल्ल्याला वेढा घातला.

यावेळी रामशेज किल्ल्यावर अवघ्या सहाशे मावळ्यांच्या साथीने किल्लेदार सूर्याजी जेधे तैनात होते. (सूर्याजी जेधेच नक्की त्याकाळी किल्लेदार होते का याबद्दल अनेकांचा संभ्रम आहे.) यावेळेस शहाबुद्दीन खानाने पारंपरिक चढाई तंत्र न वापरता एका वेगळ्याच अजब युद्धतंत्राचा वापर केला.

तो अजब प्रकार पाहून क्षणभर सूर्याजी जेधे देखील बुचकळ्यात पडले .

शहाबुद्दीन खानाने रामशेज किल्ल्याच्या उंची एवढा लाकडी बुरुज बनवला. त्याला “धमधमा” म्हटले जायचे आणि त्यावरून त्याने रामशेजवर तोफांचा मारा सुरु केला. परंतु रामशेज किल्ला इतका अभेद्य  की शहाबुद्दीनची ही  खेळी त्याने सफल होऊ दिली नाही.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी  सूर्याजी जेधे यांच्याकडे लोखंडी तोफा नव्हत्या, पण ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी आपली शक्कल लढवत लाकडी तोफा तयार केल्या आणि त्याला चामडे जोडून दगडांच्या सहाय्याने शत्रूवर जोरदार हल्ला चढविला…!

सूर्याजी जेधे यांचे अजब युद्धतंत्र पाहून काय करावे हे शहाबुद्दीन खानाला सुचेना.

स्वराज्याच्या इतिहासात जेवढ्या लढाया झाल्या तेवढ्या लढायांमध्ये केवळ किल्ले रामशेजच्या युद्धप्रसंगात लाकडी तोफांचा वापर आढळतो ही विशेष गोष्ट !

 

ramshej-fort-marathipizza02

 

एकीकडे सूर्याजी जेधे लाकडी तोफांमधून सतत दगडांचा मारा करत होते आणि दुसरीकडे शहाबुद्दीनच्या सैन्याची चांगलीच तारांबळ उडाली होती.

या हल्ल्यामध्ये शहाबुद्दीन खानाचे कित्येक मोगल अधिकारी आणि हजारोच्या संख्येने सैन्य मारले गेले. त्याचवेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी रामशेजच्या भोवतालचा शत्रूचा वेढा फोडण्यासाठी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना पाठवले.

त्यांनी वारंवार हल्ले चढवून खानाच्या फौजेला अगदी बेजार करू सोडले होते. दोन्ही बाजूकडून शहाबुद्दीन पुरता अडकला होता.

दरम्यान मोगलांना नाशिकमधून येणारी रसद लुटण्याचे काम संभाजी महाराजांची एक तुकडी करत होती…!

sambhaji-maharaj-inmarathi

 

शहाबुद्दीन खानाची ही  परिस्थिती औरंगजेबाला कळताच त्याने १२ मे १६८२ रोजी खानाच्या  मदतीसाठी आपला सावत्रभाऊ खानजहाँ बहाद्दूर कोकलताश याला पाठविले. कोकलताश खानाच्या मदतीला येऊन देखील काहीही उपयोग झाला नाही.

दोन्ही सरदार किल्ला पाडण्यासाठी नवनवीन कल्पना आखत होते. तर वरून सूर्याजी जेधे त्यांना चोख प्रत्युत्तर देत होते.

जवळपास दोन वर्षे शहाबुद्दीन खान वेढा देऊन  बसला होता. एक साधा किल्ला दोन वर्षानंतर देखील हाती येत नाही हे पाहून तो चवताळला होता.

“रामशेजवर मराठा सैन्याची भुते आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला विजय मिळत नाही!” ही बातमी कोकलताश याला कळली आणि त्या विद्वानाने त्यावर विश्वास देखील ठेवला. या भुतांना  पळवून लावावे म्हणून त्याने मांत्रिकाला पाचारण केले.

मांत्रिकाने १०० तोळे सोन्याचा नाग बनवून आणण्यास सांगितले. तेव्हाचे ३७,६३० रुपये खर्च करून बनवलेला तो नाग घेऊन  मांत्रिक किल्ला चढू लागला.

त्याच्या मागोमाग मोघल सैन्य देखील चढू लागले. किल्ल्याच्या मध्यावर आल्यावर गोफणीतून सुटलेल्या एका दगडाने मांत्रिकाचा अचूक वेध घेतला आणि मुघल सैन्य वाट मिळेल तिकडे पळू लागले…!

 

ramshej-fort-marathipizza03

 

अशाप्रकारे पुढे जवळपास अजून तीन वर्षे औरंगजेबाने किल्ला हस्तगत करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.

या काळात बहाद्दूर खान, फतेह खान, कासीम खान किरमानी यांसारख्या कित्येक मोघल सरदारांनी रामशेज जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, पण पराभवा व्यतिरिक्त त्यांच्या हाती काहीच आले नाही.

अखेर नाईलाजाने औरंगजेबाने रामशेजवरचा वेढा उठवला आणि रामशेज काबीज करण्याचा नाद सोडून दिला.

१६८२-१६८७ या पाच वर्षांच्या काळात रामशेज कित्येक वार झेलून देखील अभिमानाने मान उंचावून उभा होता. सलग पाच वर्षे किल्ला लढविण्याच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी किल्लेदार सूर्याजी जेधे यांचा रत्नजडित कडे, चिलखत पोशाख आणि द्रव्य देऊन जंगी सत्कार केला.

 

ramshej-fort-marathipizza04

 

असा आहे या लढाऊ रामशेज किल्ल्याचा ऐतिहासिक इतिहास ! वेळ काढून या ऐतिहासिक किल्ल्याला नक्की भेट द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 —

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?