' भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या यादीत गडकरी असण्यामागचं त्यांचं हे कर्तृत्व जाणून घ्या – InMarathi

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या यादीत गडकरी असण्यामागचं त्यांचं हे कर्तृत्व जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०१८ मधील चार राज्यात झालेल्या निवडणुकींच्या निकालानंतर भाजपच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल उलटसुलट चर्चा होऊ लागल्या होत्या. अमित शहांना या निवडणुका हाताळता आल्या नाहीत असे अनेकांचे मत होते.

यादरम्यान ‘अमित शहा नाहीतर कोण’ या प्रश्नावर सहज मिळालेले उत्तर म्हणजे नितीन गडकरी. त्यांचे नाव या चर्चेत अग्रस्थानी येण्याला त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांनी केलेली कामे कारणीभूत आहेत. गडकरी यांच्या त्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत..

आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत कामांचा मोठा धडाका लावणारे आणि त्यामुळे संपूर्ण देशात आपली एक ओळख निर्माण करणारे नेते म्हणजे नितीन गडकरी! देशात मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे त्याचे श्रेय अर्थात नितीन गडकरींचे आहे.

हीच कार्यक्षमता त्यांनी आधी महाराष्ट्रात युती सरकारमध्ये मंत्री असतांना सुद्धा दाखवली होती.

त्यांची ओळख मात्र काही एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. आपल्या बेधडक बोलण्यामुळे, त्यांच्या खवय्येगिरीमुळे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास नेहमीच उत्सुक असणारे म्हणून परिचित आहेत.

त्यांचा आजवरचा प्रवास पाहिला तरी त्यांच्या खमक्या स्वभावाची साक्ष मिळते. हा प्रवास कठीण होता मात्र आपल्याला हवं ते करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात होती.

तीच जिद्द त्यांनी कारकिर्दीतील उच्च स्थानावर असतांना सुद्धा दाखवली आहे. त्यांच्या ‘विद्यार्थी नेता’ ते आजपर्यंतचा कारकिर्दीचा लेखाजोगा मांडणारा हा लेख…

 

nitin-gadkari-marathipizza

 

१९५७ चा जन्म असलेले नितीन गडकरी हे तरुण वयापासूनच संघाशी जोडले गेले होते. त्यांच्या आई भानुताई यादेखील जनसंघाच्या कार्यात सहभागी होत्या. त्यांचा नितीनजींवर मोठा प्रभाव होता.

लहानपणापासूनच नागपुरात वावरलेले नितीन गडकरी कार्यकर्ता म्हणून आपल्यावर जी काही जवाबदारी येईल ती अत्यंत निष्ठेने पार पाडीत.

त्यामुळेच प्रचाराची भिंत रंगवण्यापासून ते पोस्टर चिटकवण्यापर्यंत आणि रिक्षावरून घोषणा देण्यापासून ते वक्तृत्वापर्यंत अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या ते मोठ्या आवडीने पार पाडत. त्यांचे शिक्षण बी.कॉम आणि एल. एल. बी असे झाले आहे.

आधी ते शास्त्र शाखेचे विद्यार्थी होते पण नापास झाले आणि मग कॉमर्स शाखेकडे वळले. अभ्यासाच्या दुर्लक्षाचे कारण अर्थात “कार्यकर्तापण” हेच होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भाचे सचिव अशी त्यांच्याकडे जबाबदारी होती. यावेळेस त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकाही लढवल्या. काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआय तर्फे श्रीकांत जिचकार यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले.

 

nitin-inmarathi

हे ही वाचा – अंबानींचं महागडं कंत्राट नाकारून गडकरींनी कमी खर्चात एक्सप्रेसवे बांधून दाखवला

पुढे वयाच्या चोविसाव्या वर्षी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. एव्हाना राजकारणाशी ते पूर्णपणे जोडले गेले होते. १९७५ च्या आणीबाणीतही त्यांनी चळवळीत काम केले.

इथून पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि नितीन गडकरी भाजप नागपूर शहराचे सचिव झाले.

इथपासून ते आजपर्यंत न त्यांनी कधी पक्ष सोडला ना पक्षाने कधी त्यांना अंतर दिले. १९८९ मध्ये म्हणजे वयाच्या ३२ व्या वर्षी ते नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून दिले.

(१९८९, १९९०, १९९६,२०००) या काळात त्यांनी विधान परिषदेत अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या.

महाराष्ट्रात त्यांचे नेतेपण सिद्ध झाले ते युती सरकारच्या कार्यकाळात. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि ५५ उड्डाणपूल ही त्यांची कामे त्यांना सर्वदूर ओळख मिळवून देणारी ठरली.

१९९९ मध्ये युतीची सत्ता गेली मात्र त्यांचं काम पाहून अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांना राष्ट्रीय ग्रामीण रस्ते विकास समितीत निमंत्रित करण्यात आले.

त्या समितीचा अहवाल स्वीकारला गेला आणि वाजपेयी सरकारची एक मोठी उपलब्धी असणारी “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना” अस्तित्वात आली. रस्ते निर्मितीत बांधा-वापरा – हस्तांतरीत करा ही योजना त्यांनीच पहिल्यांदा राबविली.

 

gadkari-inmarathi

 

याशिवाय “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ” स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता.

नितीन गडकरींच्या या कामाच्या धडाक्यामुळे ते “पुलकरी” या नावानेही ओळखले जाऊ लागले.

२००४ मध्ये केंद्रातून भाजपची सत्ता गेली. या काळात भारतीय जनता पक्षात मोठ्या नेत्यांची उणीव भासू लागली होती. अशातच फारशी कुणाला अपेक्षा नसतांना २००९ मध्ये नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आणि दुसरे मराठी अध्यक्ष (पहिले मराठी अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे) तर महाराष्ट्रातून भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष या अर्थाने ही निवड लक्षणीय होती.

२००९ मध्ये लोकसभा निवडणूक गमावल्यानंतर पक्षात एक मरगळ आली होती. एका कठीण टप्यातून पक्ष जात होता. मात्र राष्ट्रीय स्तरावर ते नवखे असले तरी लवकरच त्यांनी आपली पकड निर्माण केली.

२०१३ मध्ये त्यांनी पूर्ती कारखान्यावर झालेल्या आरोपांवरून या पदाचा राजीनामा दिला. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. पक्षाला नवसंजीवनी मिळाली होती. नागपूर लोकसभा मतदार संघातून तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतांना देखील मोठ्या फरकाने निवडणूक जिंकत खासदार झाले.

 

nitin-gadkari-inmarathi

 

पक्षाने त्यांच्या कामाचा आदर राखत त्यांना त्यांचे आवडते खाते दिले. आज त्यांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे तो पाहता त्यांनी देखील आपल्या पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ते नवनवीन प्रकल्प हाती घेत गेले.

यावरूनच त्यांच्या कामाची धडाडी लक्षात येते. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून जी कामे पूर्ण केली आहेत त्यामुळे देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.

भारतीय जनता पक्ष असेल किंवा नितीन गडकरी यांना सुरुवातीच्या काळात हेटाळणीला सामोरे जावे लागत असे.

नागपूरची संत्री नागपुरातच खपते, या टोमण्यांना आज त्यांनी असे उत्तर दिले आहे की गडकरी आणि नागपूरची संत्री यांनी देशभरात आपले स्थान निर्माण केले आहे.

२०१४ पूर्वी निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान गडकरींना दिले जात असे.

 

gadkari_inmarathi

 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा जवळजवळ तीन लाख मतांनी पराभव करत त्यांनी विरोधकांना आपले स्थान दाखवले आहे. मात्र या आरोप -प्रत्यारोपांच्या खेळातही त्यांनी दाखवलेली खिलाडूवृत्ती लोकांना अधिक भावते.

सत्तेसाठी सेवा करणारे नेते आपल्या देशात कमी नाहीत मात्र “सेवेसाठी सत्ता” हा मार्ग आपल्या कामातून दाखवणारे नितीन गडकरी हे यशस्वी कार्यकर्त्याचे एक मोठे उदाहरण आहेत.

तर असा आहे नितीन गडकरी यांचा राजकीय प्रवास! त्यांची आजवरची कामे आणि विविध मंत्रालयातून, विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी केलेली लोकोपयोगी कामे पाहता त्यांचे नाव पर्याय म्हनून सर्वात आधी घेतले गेले होते हे फारसे आश्चर्यकारक नाही असेच म्हणावे लागेल.

===

हे ही वाचा – ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ नितीन गडकरींनी अमिताभला झापलं…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?