' आणि प्रतापगडावर, शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला! – InMarathi

आणि प्रतापगडावर, शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावनखिंड सिनेमा कालच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, थिएटरमध्ये प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे ज्यांचा बाकी आहे ते ओटीटीवर पाहू शकतात. आता पावनखिंडीनंतर या सिनेमाच्या दिग्दर्शकाने आपल्या पुढील सिनेमाची झलक सोशल मीडियावर टाकली आहे तो सिनेमा म्हणजे शेर शिवराज हैं, अफजल खान वधावर हा सिनेमा बेतला आहे, आजच्या लेखात या वधाबद्दल जाणून घेणार आहोत.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज! ह्यांचे नुसते नाव जरी घेतले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमानाची भावना आणि अंगावर रोमांच उभे राहतात. महाराज म्हणजे समस्त महाराष्ट्राचे खरे तर हिंदू माणसाचे दैवत! त्यांच्यासारखा राजा कधी झाला नाही आणि परत होणारही नाही.

त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे, त्यांच्या त्यागामुळे, कष्टामुळे आज प्रत्येक भारतीय ताठ मानेने उभा आहे.

राजमाता जिजाऊ ह्यांनी घडवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात अनेक पराक्रम केले. त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही घराघरांत लहान मुलांना सांगितली जाते. त्यातीलच एका पराक्रमाची गाथा सांगणारा दिवस म्हणजे शिवप्रताप दिन!

महाराजांच्या अतुल्य शौर्याची गाथा सांगणारा हा दिवस दर वर्षी प्रतापगडावर साजरा केला जातो. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूर अफझलखानाचा वध केला तो दिवस आपण शिवप्रताप दिन म्हणून आपण साजरा करतो.

 

prtapgad fort inmarathi

 

प्रतापगडची लढाई माहिती नाही असा मराठी माणूस सापडणे विरळाच! महाराष्ट्राच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्वाची लढाई आहे. इतिहासातील सर्वात रोमांचक क्षणांपैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध होय.

हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट बनून आलेल्या अफझलखानाला अत्यंत शौर्याने व चतुराईने ठार करून तसेच त्याच्या सैन्याचा पराभव करून महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या शौर्याने व गनिमी काव्याने अनेक गड, किल्ले व प्रांत जिंकून उत्तरेत मुघलांना तसेच दक्षिणेत आदिलशहाला पळता भुई थोडी केली होती. महाराजांना थांबवण्याचा कुठलाच उपाय मिळत नसल्याने शेवटी आदिलशहाच्या आईने बडी बेगमने विजापूरच्या भर दरबारात आवाहन केले होते की जो सरदार शिवाजी महाराजांना कैद करून आणेल त्याला मोठे इनाम दिले जाईल.

 

afzal khan inmarathi

 

ही कामगिरी करणे त्या दरबारातील कुणालाही शक्य वाटले नाही तेव्हा एक उंच धिप्पाड सरदार पुढे आला व त्याने ही कामगिरी करण्याचा विडा उचलला.

तो सरदार होता क्रूर, धूर्त अफझल खान! त्याला हरविणे इतके सोपे नव्हते. तो आदिलशाहीतील एक उत्तम योद्धा होता व सर्व रणनीतींमध्ये पारंगत होता.

अफझलखानाने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांची ह्यांची हत्या केली होती आणि आदिलशाही दरबारात त्याचे व शहाजी राजांचे वैर होते. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून अफझलखान मोठे सैन्य घेऊन विजापूर हुन १६५९ साली निघाला.

 

mughal-inmarathi
army.com

 

अफझलखानाच्या सैन्यात सिद्दी हिलाल, मुसाखान, अंबरखान, याकूतखान तसेच प्रतापराव मोरे, पिलाजी मोहिते हे मोठ मोठे पराक्रमी सरदार होते.तसेच बारा हजार घोडदळ, दहा हजार पायदळ, अनेक तोफा व बंदूकधारी सैनिक सुद्धा होते.

मजल दरमजल करत येत असताना त्याने इस्लामी प्रथेप्रमाणे अनेक देवळे उध्वस्त केली, मूर्तिभंजन केले. गावातील लोकांवर अत्याचार केले.

शिवाजी महाराजांनी खानाच्या येण्याची बातमी ऐकल्यावर त्यांचा मुक्काम राजगडावरून दुर्गम असलेल्या घनदाट जंगलातील प्रतापगडावर हलवला. अफझलखानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा विध्वंस केला आणि नंतर त्याने आपला रोख महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या देवळाकडे वळवला.

त्याचा असा कावा होता की अश्या प्रकारे देवळे उध्वस्त केल्यावर शिवाजी महाराज चिडतील आणि त्याच्याशी युद्ध करायला मैदानात उतरतील.

परंतु महाराजांनी गनिमी कावा खेळत बचावात्मक पवित्रा घेतला. खानाने जंजिऱ्याच्या सिद्दीशी हातमिळवणी केली आणि कोकणच्या बाजूने सुद्धा आपली पकड मजबूत केली.

खानाने हळूहळू पुढे प्रवास करीत वाई येथे मुक्काम टाकला. त्याला ह्या प्रदेशाची चांगली माहिती होती कारण पूर्वी तो वाईचा सुभेदार होता. ह्या ठिकाणहुन त्याला खेळी खेळणे सोपे जाईल म्हणून त्याने वाईलाच मुक्काम ठोकला. युद्धाच्या आधीच शिवाजी महारांना ठार मारायचा खानाचा कावा होता.

 

shivajiafzal khan 2 inmarathi

 

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे महाराजांचे मत असल्याने त्यांनी गनिमी काव्याने खानाचा हल्ला परतवण्याचे ठरवले. शिवाय युद्धात नुकसात झाले असते म्हणून महाराजांनी खानाकडे आपले दूत पाठवले व त्याला आपण घाबरलो असल्याचे दाखवले.

आपण घाबरलो आहोत व आपल्याला युद्ध करायचे नाही उलट तह किंवा समझोता करायचा आहे हे दूतांकरवी खानाला कळवले.

खानाने महाराजांना वाईला भेटायला बोलावले. परंतु महाराजांनी वाईस जाण्यास नकार दिला कारण घातपात होण्याची दाट शक्यता होती. म्हणूनच महाराजांनी आपण फारच घाबरलो असल्याचे भासवत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्यास सांगितले. खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास तयार झाला.

भेटीदरम्यान दोन्ही पक्ष कुठलेही हत्यार वापरणार नाही असा नियम ठरला. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील आणि त्यातील एक शामियान्याच्या बाहेर थांबेल व इतर अंगरक्षक लांब राहतील असे ठरले.

भेटीचा दिवस १० नोव्हेंबर १६५९ हा ठरला.

 

afzal_shivaji mharaj inmarathi

 

भेटीच्या दिवशी अफझलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजी महाराजांनी जाणूनबुजून अतिशय भव्य आणि सुंदर शामियाना तयार करवून घेतला होता. नि:शस्त्र भेटायचे ठरले होते तरीही खानाने दगा करण्याचे ठरवले असल्याने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता.

खान शंभर टक्के दगाफटका करणार हे महाराजांना ठाऊक असल्याने त्यांनी अंगरख्याखाली चिलखत घातले होते आणि वाघनखे हातात लपवली होती. महाराज शामियानात आल्यानंतर अफझलखानाने महाराजांना आलिंगन देण्यास बोलावले.

उंच धिप्पाड अफझलखान आणि मूर्ती लहान पण महान कीर्ती असलेले महाराज आलिंगन देण्यास सरसावले. धिप्पाड अफझलखानाने महाराजांना आलिंगन देताच आपल्या काखेत दाबून महाराजांवर बिचव्याचा वार केला.

परंतु महाराजांनी चिलखत घातलेले असल्याने त्यांना काहीही इजा झाली नाही आणि खानाने दगा केल्याने महाराजांनी वाघनखे काढली आणि खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला.

 

 

अनपेक्षित हल्ल्याने घाबरलेल्या खानाने ‘दगा दगा” असा आक्रोश केला. त्यामुळे त्याचे अंगरक्षक सावध झाले. इतर अंगरक्षक व महाराजांचे अंगरक्षक ह्यांच्यात लढाई जुंपली. सय्यद बंडाने महाराजांवर वार केला परंतु जिवा महालाने तो वार आपल्यावर झेलला आणि महाराजांचा रास्ता मोकळा केला.

खान जखमी अवस्थेत त्याच्या पालखीत स्वर झाला परंतु संभाजी कावजीने पालखी वाहणाऱ्या भोईंच्या पायांवर वार केला आणि जखमी अफझलखानाला ठार करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले.

महाराजांनी त्याचे हे शीर जिजाऊंना भेट म्हणून पाठवले. महाराजांन नंतर लगेच किल्ल्यावर परत गेले आणि तोफांनी सैन्याला अफझलखानाच्या सैन्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले.

महाराजांच्या सैन्याच्या तुकड्या प्रतापगडाच्या घनदाट जंगलात आधीच दबा धरून बसल्या होत्या. तोफांचे आवाज ऐकताच त्यांनी अफझलखानाच्या सैन्यावर आक्रमण केले.

 

Pinterest.com

 

खानाचे सैन्य बेसावध होते. कान्होजी जेधे ह्यांनी बंदूकधार्यांवर आक्रमण केले. मुसाखान पळून गेला. अफझलखानाच्या सैन्याची वाताहत झाली. सुमारे ५००० सैनिक मारले गेले आणि ३००० सैनिक युद्धबंदी म्हणून पकडले गेले आणि आदिलशाहीच्या सैन्याचा दारुण पराभव झाला.

परंतु महाराजांच्या सैन्याने कुणावरही अत्याचार केले नाहीत. हाच मराठे व इतर ह्यांच्यातला मोठा फरक होता.

अशी ही महाराजांची शौर्यगाथा जिच्या स्मरणार्थ शिवप्रताप दिन साजरा केला जातो.

शिवरायांचे आठवावे रूप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा साक्षेप ।

भूमंडळी ।।

निश्चयाचा महामेरू ।

बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारु ।

श्रीमंत योगी ।।

हर हर महादेव!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?