चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

‘परीयेरूम पेरूमल’ सुरू होतो आणि पुढच्या दहाच मिनिटात तो पुढे काय दाखवणार आहे याची प्रचिती मिळते. अगदी सुरुवातीपासून हा चित्रपट जातीयवादावर ठळकपणे बोट ठेवतो आणि प्रत्येक फ्रेमगणिक अस्वस्थ करत राहतो.

जे केवळ पाहणेच असह्य होते, ते सहन करणाऱ्यांच्या बाबतीत केवळ विचारच केलेला बरा. अश्यानेच, त्यांच्या मनावर त्या घटनांचे कधी न पुसलेले घाव कोरले जातात ते कायमचेच.

‘परीयेरूम पेरूमल’,  हा खालच्या जातीतला एक तरुण, कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गावातून बाहेर पडून तिरुनेलवेल्लीला येतो.

कायद्याचा नावाखाली होत असलेली आपल्या समाजाची फसवणूक थांबवण्याच्या उद्देशाने त्याला वकील बनायची इच्छा असते.

 

Pariyerum-Perumal-inmarathi
TheNewsMinute.com

डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने तो कॉलेजमध्ये दाखल होतो, पण इथली जातीयवादाची परिस्थिती त्याहून वाईट आहे, हे एका घटनेने त्याला समजते.

हळुवारपणे त्याचे प्रेमाचे बंध त्याच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या उच्चवर्णीय ज्योतीशी फुलू लागतात, ज्याचे परिणाम त्याला भोगायला लागतात, तेही तिच्याशी सर्व संबंध तोडण्याच्या ताकीदसहित.

तो ते करायला तयार होतोही पण त्यानंतरही त्याला आणि त्याच्या परिवाराला हिणवले जाते, ज्याची किंमत त्याला मोजावी लागते, हे वेगळे सांगायला नको.

अखेरीस, दोघांचे प्रेम सफल होते की जात जिंकते, हे चित्रपटात पाहणेच उचित ठरेल.

 

विषयानुरूप, मारी सेल्वाराजचा स्वतंत्रपणे दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न दाद देण्यासारखा आहे. चित्रपटात दाखवलेले बरेचसे अनुभव आणि पात्रे ही त्याच्या पाहण्यातली आहेत. चित्रपटातील गाव आणि तिथून लॉसाठी नायकाचे शहरात जाणे, हा भाग त्याने प्रत्यक्ष अनुभवला आहे.

अगदी वैयक्तिक नसली तरी ही कथा त्याच्या अनुभवांची बायोग्राफी म्हणता येईल.

‘परीयेरूम पेरूमल’ हे नाव ठेवण्यामागेही एक सुंदर धागा आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये या नावाच्या देवाला सगळ्या जातीतले लोक पूजतात.

हेच चित्रपटाच्या मेन पात्राचे नाव ठेवून कमी लेखल्या जाणाऱ्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यालाही समाजात स्थान मिळावं, हा अनुल्लेखित संदेशही यात आहे.

 

perumal-inmarathi
Scroll.in

कथीरने मेन लीडमध्ये सुंदर काम केलंय. हा चित्रपट त्याचाच आहे. सुरुवातीपासूनच त्याने त्याची अगतिकता, हतबलता आणि अस्वस्थता नेमकेपणाने मांडली आहे. अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या काही गाण्यांच्या शब्दांत आणि चित्रीकरणातही ती रागावाटे ठळकपणे उठून दिसते.

आनंदी आणि त्याच्यामधील हळुवार फुलणारे प्रेम, हे थंड हवेच्या झुळुकेप्रमाणे किंचित दिलासा देणारं ठरतं. ते सोडलं तर इतर वेळी पडद्यावर जातीयवादाची आग कधीही विझलेली दिसत नाही.

खालच्या जातीच्या लोकांना केवळ आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेसाठी जीवानिशी मारणारे गावामधील एक कपटी म्हाताऱ्याचे पात्र, ही मानसिकता किती खोलवर गेली आहे, याचा प्रत्यय देते.

आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे पात्र म्हणजे करुप्पी नावाचा कुत्रा, ज्याचा स्क्रीनटाईम थोड्या वेळ आहे, पण त्याचे ठसे पूर्ण चित्रपटात दिसत राहतात.

 

Karuppi-inmarathi
thehindu.com

प्रगत शहरांच्या आणि चकाचक इमारतींच्यापल्याड अजूनही काही बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती आहेत.

आजही, बऱ्याच ठिकाणी, खालच्या जातीच्या लोकांकडे पाहण्याचा उच्च समाजाचा मागासलेला दृष्टिकोन, त्यांना हिणवले जाणे, वेगवेगळ्या प्रकारे नाहक त्रास देणे, वेळोवेळी त्यांना स्वतःची जागा दाखवून देणे हे प्रकार सर्रास होतात.

ज्याच्या बातम्या शहरातील वर्तमानपत्राच्या कुठल्याश्या कोपऱ्यात येतात किंवा येतही नाहीत. कदाचित जीव गेल्यानंतरही चार ओळींसाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई चालूच राहते.

जातीयवाद हा जणू काही त्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भागच असावा, आणि कुणी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला परत त्याची लायकी दाखवण्यात येते.

 

mumbai_inmarathi
justdial.com

यातून तो पेटून उठला तर चुकीच्या मार्गावर तरी जातो आणि शांत राहिला तर निमूटपणे जन्मभर शांतच राहतो, ही शोकांतिका आहे.

बेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”

  • December 13, 2018 at 11:35 am
    Permalink

    सिनेमा बघितल्यावर विचार मांडू.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?