'पाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम

पाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : प्रसाद देशपांडे

===

विशेष सुचना: कुठल्याही प्रकारचं विश्लेषण करण्याआधी काँग्रेस कार्यकर्ते आणि त्यांचे स्थानिक नेते ह्यांचं मनापासून अभिनंदन करतो.

निवडणुका ह्या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात हे २०१४ नंतर पार विसरून गेलेल्या काँग्रेस पक्षाला आज लक्षात आलं असेल. सीट किती आल्या कोण निवडुन आलं ह्यापेक्षा निकालानंतर सरकार कोण बनवतो आहे हा रोकडा सवाल असतो.

विशेष अभिनंदन राहुल गांधींचं कारण अपयशाचे खापर राहुल ह्यांच्यावर फुटत असेल तर यशाचं श्रेयही त्यांनाच द्यायला हवं. पुनःश्च अभिनंदन!! हा मोठा लेख भाजप कार्यकर्त्यांसाठी आहे, तुमच्या सेलिब्रेशन मध्ये आडकाठी नको म्हणुन आधीच अभिनंदन देऊन मोकळं करतोय!! Enjoy your Day, you deserve it.

 

rahul-gandhi-marathipizza
indianexpress.com

आपण भारतीय फार भावनिक आणि श्रद्धाळू असतो. कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला देव मानलं की त्याच्यावर आपल्या अपेक्षा आणि समस्या ढकलल्या की आपण मोकळे. ह्याला भाजपचे नेते का अपवाद असतील??

मोदींना विष्णूचे अवतार ठरवणारे स्थानिक भाजप नेते ह्या देशात असतील तर भाजपचा पराभव काही मोठी बाब नाही. जिथे इंदिरा गांधींना पराभव स्विकारावा लागला आहे तिकडे मोदी अजेय कसे असतील?? ह्या निवडणुकांमधून सगळ्यात महत्वाचा धडा मोदी समर्थक आणि विरोधक ह्यांना हा घेता येईल की मोदी-शहा अपराजय वीर नाहीत!!

त्यांचाही पराभव होऊ शकतो. एकदा ही बाब मान्य केली की बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. मेहनत करण्याची वृत्ती आणि सोबतीला लागणारी जिद्द सोपी होऊन जाते. ही गोष्ट जो कंपू लक्षात घेईल तो विजयाच्या मार्गावर चालेल.

 

modi shah inmarathi

 

२ दिवसांपुर्वी मी माझ्या गट फिलिंग बद्दल पोस्ट लिहिली त्यानंतर अनेक भाजप समर्थकांचे काळजीयुक्त मॅसेज आले. काहींनी माझ्या गट फिलिंग मागची भावना जाणुन घेतली, काहीनीं पटेल राजीनामा आणि निकाल ह्यांचा संबंध विचारला, किरकोळ लोकांनी मला वेड्यात काढलं.

अर्थात काल निकालात एकतरी राज्य आलं असतं तर मला आनंदच झाला असता. पण दुर्दैवाने मी डोळेझाक करू शकत नाही, जी माहिती वेगवेगळ्या सोर्सेस कडुन येत असते ती प्रत्येकच लिंक मी शेअर करू शकत नसलो तरी काही बातम्या ह्या अस्वस्थ नक्कीच करतात.

येणाऱ्या निकालांची पुसटशी भनक विजयादशमीला आली होती, ती मी मित्र अनुप ला बोलुन देखील दाखवली होती. पण प्रचारादरम्यान माझी ती शंका खोटी ठरतेय असं वाटलं. पण मतदान झाल्यावर त्याचे आकडे बघितल्यावर परत शंकेची पाल चुकचुकली होती आणि त्यावर उर्जित पटेल ह्यांच्या राजीनाम्यानंतर मी स्वतःपुरतं शिक्कामोर्तब केलं की भाजपचा तीनही राज्यात पराभव निश्चित आहे.

अपेक्षेप्रमाणे तो झाला. लोकसभेची सेमी फायनल भाजप पराभुत झाला पण म्हणुन फायनलला कुणी सेमी फायनलचीच समीकरणं लावणार असतील तर त्यांना आपण का थांबवावे?? ज्यांना ती लावायची आहे त्यांना लावु देत, आपण मात्र स्वयंसिद्धता वाढवुयात.

  • पराभवाची कारणं

काही लिंक्स कशा लागतात बघा, फेब्रुवारी महिन्यात नागपुरात एका मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये मध्यप्रदेश मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी (त्यांचा नाव आणि हुद्दा मुद्दाम सांगत नाहीय) ह्यांची अनावधानाने भेट झाली.

चर्चेत निवडणुकांचा मुद्दा निघाला तेंव्हा त्यांनी दोन ओळीत तो संपविला होता “सरकारी कर्मचारी प्रचंड नाराज आहे कारण त्यांचे पगार वेळेवर होत नाहीय, वरून मुख्यमंत्री म्हणतात की कोई माई का लाल आरक्षण खत्म नही कर सकता, सरकारला स्वतःलाच पुन्हा सत्तेत यायचं नसेल तर आम्ही तरी लष्कराच्या भाकऱ्या का भाजायच्या??”

अर्थात तेंव्हा मी ऐकण्याच्या भूमिकेत होतो आणि ह्याचा फारसा अर्थ लावला नव्हता. आज तो अधिकारी नेमकं काय बोलला ह्याचा अर्थ लावला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. ही बाब कदाचित राजस्थानसाठी देखील लागु होते.

भाजपचा कोअर मतदार हा मध्यमवर्गीय हिंदू आहे, कुणी काहीही म्हणा पण कितीही आपटली तरी हाच मध्यमवर्ग शेवटी भाजपला आतापर्यंत मतदान करत आला आहे. त्याला किती गृहीत धरावे?

 

election-inmarathi
hindustantimes.com

आणि देशहित ह्या नावाखाली तो भरडला जात असेल, वरून मोदी पूर्ण बहुमतात सत्तेत येऊन सुद्धा ज्या राम मंदिराचं स्वप्न तो बाळगुन होता. (श्रद्धा आणि भावना ह्या गोष्टी विकासा इतक्याच महत्वाच्या असतात कोणी कितीही नाकारल्या तरी) ते मोदींच्या ह्या कार्यकाळात पूर्ण होईल की नाही ह्यावर शंका उत्पन्न होत असेल तर अशा गोष्टी घडत असतांना तो देशहितासाठी कुठवर स्वतःची शेकून घेईल ह्यावर नक्कीच मर्यादा येणार.

जर हा हक्काचा मतदार घराबाहेर पडला नाही किंवा नोटाकडे वळला तर स्वाभाविकच मतदानाची टक्केवारी अपेक्षितरीत्या वाढणार नाही. ह्या गोष्टींवर मोदी सरकार येणाऱ्या काळात गांभीर्याने विचार करून डॅमेज कंट्रोल करेल ही अपेक्षा आहे. डॅमेज कंट्रोल काय करेल हा इथे चर्चेचा मुद्दा नाही.

Anti Incumbency हा एक मोठा फॅक्टर ह्या निवडणुकीमध्ये होता. छातीला माती लावुन कसंबसं गुजरात वाचविल्यामुळे मोदी-शहा जोडगोळी कडुन अपेक्षा जरूर होत्या. मला विचाराल तर माझा अंदाज होता की राजस्थानमध्ये भाजपला फारफार तर ४० आणि मध्यप्रदेश मध्ये ८५ मिळतील. छत्तीसगढ थोडी लढत देईल अशी अपेक्षा होती.

अपेक्षेपेक्षा बरीच चांगली लढत भाजपने मप्र आणि राजस्थान मध्ये दिली. छत्तीसगढचा अनपेक्षितरीत्या झालेला दारुण पराभव मात्र जिव्हारी लागलाय!!

अजुन एक मुद्दा जो फारसा चर्चेत आला नाही तो म्हणजे स्थानिक स्तरावर नवे नेतृत्व आणि फळी उभी करण्यात आलेलं अपयश. भाजपसारख्या कॅडर बेस पक्षात स्थानिक नेतृत्वाची वानवा जाणवावी?? नव्या चेहऱ्यांना कधी पुढे आणलं जाणार आहे??

किती वर्ष शिवराज, डॉ रमणसिंग, वसुंधरा ह्यांनाच पुढे करणार आहात?? अमित शहा ह्यांच्यासारखा धोरणी नेता वसुंधरा समोर का लाचार होत असावा?? गेल्या २-३ वर्षात राज्यवर्धन ह्यांचं नेतृत्व का पुढे आणले गेले नाही??भलेही मुख्यमंत्री प्रोजेक्ट करू नका पण निदान लोकांना विश्वास तर बसला असता की भाजप जिंकली तर राजे पुन्हा ५ वर्ष मानगुटीवर बसणार नाही.

आता जर तर ला अर्थ नाही, पण निदान आतातरी नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीला पुढे आणावं. नवीन चेहरे द्यावेत, बिनधास्त हेड ऑन. हीच लोकं ५ वर्षात तयार होऊन पुढील विधानसभेसाठी तयार होतील. सध्याच्या राज्यस्तरीय नेतृत्वाला दुसरी जबाबदारी देण्यात यावी, आणि फारच कुरकुरत असतील सरळ मार्गदर्शक मंडळात घ्यावे.

इतकंच कशाला केरळ सारख्या राज्यात आज जिथे भाजपला अनुकूल परिस्थिती आहे तिकडे देखील वानवा हीच आहे की मतदार भरभरून द्यायला तयार आहे पण स्थानिक नेतृत्वाची झोळीच फाटकी आहे. मतदारांवर नाईलाज आणणं भाजपलाच महागात पडेल.

मोदी सरकार सत्तेत आल्यावर फार कमी लोकांनी हे मत मांडलं होतं की नवीन सरकारने सगळ्यात पहिलं काम हे प्रशासकीय स्वच्छता करणं हे आहे. काँग्रेस ह्याबाबतीत चुका करत नाही. प्रशासकीय लागेबांधे बरंच नुकसान करू शकतात हे एव्हाना भाजपच्या लक्षात आले असेल.

केंद्र सरकारच्या योजना राज्यात जमिनी स्तरावर राबविल्या जात आहेत की नाही हे बघण्याची जबाबदारी ही भाजपच्या राज्य सरकारांची होती. महाराष्ट्रातही काही ठिकाणाहून ह्या तक्रारी आल्या आहेत, मला स्वतःला अनुभव आहेत. सरकारी अध्यादेश असुन सुद्धा त्याच सरकारचे बाबु मात्र त्याला बांबू लावतात.

ह्याबद्दल केंद्र आणि राज्य ह्यात समन्वय वाढवावा लागेल. अजुनही वेळ आहे फक्त योग्य पावलं उचलण्याची गरज आहे.

  •  २०१९ कसं असेल?

२०१९ साठी दोन मुद्दे सगळ्यात महत्वाचे असतील महागठबंधन आणि नागपुरचा कौल!! मी काल पोस्टवर म्हटलं होतं की हे निकाल बघुन आज सगळ्यात आनंदी एक व्यक्ती असेल ती व्यक्ती म्हणजे बसपा प्रमुख मायावती!!

मायावतींच्या राजकारणाकडे नीट बघितले तर त्यांना किंग होण्यापेक्षा किंगमेकर होण्यात अधिक रस आहे. त्याकरीता त्या महागठबंधन मध्ये सहभागी होऊन आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत नाहीत. चंद्रबाबु नायडूंनी जी राजकीय आत्महत्या केली ती मायावती करणार नाही.

 

Mayawati-inmarathi
thehindu.com

त्यापेक्षा निवडणुक आघाडी न करता निर्णायक लढत देवुन हाती येतील त्या जागांचा वापर हत्यारासारखा करणं हे मायावतींनी अचुक ओळखलं आहे. आता ह्या परिस्थितीत महागठबंधनचं भविष्य काय?? काँग्रेस प्रणित महागठबंधन मधील इतर लोकांना काय पर्याय शिल्लक राहतोय??

एकतर राहुल गांधी ह्यांचं नेतृत्व (मांडलिकत्व) मान्य करा किंवा सरळसरळ स्वतःवर भाजपची बी टीम (KCR ह्यांच्या TRS वर तेलंगणा मध्ये राहुल गांधींनी भाजपची बी टीम म्हणुन आरोप केला होता) म्हणुन आरोप सहन करून घ्या. सगळ्याच पक्षांना मायावतींनी खेळलेला जुगार खेळण्याचे धारिष्ट्य नसतं.

काँग्रेसचं मांडलिकत्व मान्य करणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व गमविणे हे एव्हाना चंद्रबाबू नायडूंना उमगले असावे का?? म्हणुन मायावती असो वा चंद्रशेखर राव, किंवा अखिलेश असो वा ममता ह्या सगळ्या गोतावळ्याला महागठबंधन ह्याचा नेमका अर्थ ह्या निकालांमधुन राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने लाऊड अँड क्लिअर सांगितला आहे.

त्यामुळे महागठबंधनचं भविष्य काय ह्याचं उत्तर प्रादेशिक पक्षांना स्वतंत्र अस्तित्व हवंय की त्या त्या राज्याची सुभेदारी ह्यात दडलं आहे. आणि येणाऱ्या काळात ते उलगडेलच की. काँग्रेस हा जरासंध नावाचा राक्षस आहे जो क्षेत्रीय पक्षांचा फडशा पाडुन आपली पोट भरतो.

भाजप आणि काँग्रेस मधील मूलभूत फरक हाच आहे, शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ही दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या कार्यशैलीची उदाहरणे आहेत.

काही अतर्क्य गोष्टी ज्या समोर आल्या त्यातली सगळ्यात महत्वाची होती ती की मध्यप्रदेश मध्ये कोअर संघ विचारांचा पगडा असलेल्या भागात भाजपचे उमेदवार काही हजारांच्या फरकाने पडले आहेत. ह्याचा अर्थ काय असावा??

२०१४ च्या निवडणुकांमध्ये संघाचा थेट सहभाग होता. त्याचे डिटेल्स मी देत नाही पण सारांश हा होता की मतदानाची टक्केवारी सबंध देशभरात वाढविण्यात संघाचा सिंहाचा वाटा होता. टक्केवारी वाढण्याचा आणि तो मतांमध्ये परिवर्तित होण्याचा थेट निकाल हा नरेंद्र मोदी सत्तेत येण्यात होता.

 

RSS-InMarathi01
scroll.in

१९ च्या पार्श्वभूमीवर संघाची भूमिका काय असणार आहे?? सरसंघचालकांची मागची काही विधानं आणि सध्याचे निकाल ह्यावर थोडा तिरकसपणे नजर फिरविली तर कळेल. ‘नागपुर’ नेमकं काय विचार करतंय??

मला विचाराल तर नागपुरची भुमिका निर्णायक असेल. एक संघ स्वयंसेवक म्हणुन मी अगदी विश्लेषणात सुद्धा ह्यावर काहीही भाष्य करणार नाही, ह्या विषयावर अंदाज असले तरीही. फक्त एक मनापासुन वाटतं की हे संबंध अटलजी-सुदर्शनजींच्या संबंधांपेक्षा मधुर असावेत!!

भाजपकरिता काय सांगणार, ह्या निवडणुकांमुळे मोदी-शहांसाठी एक मोठी उपलब्धी आहे Club 160 चा पूर्णपणे बिमोड!! निदान लोकसभेसाठी Club 160 डोकं वर काढणार नाही ह्याची पूर्ण व्यवस्था मोदी-शहा ह्यांनी करून ठेवली आहे.

राहता राहिला प्रश्न ह्या क्लबच्या निमंत्रकाचा तर त्याला पूर्णपणे थंड केलं आहे असं निदान आतातरी दिसतं आहे. मतांची टक्केवारी Tale Saving आहे, ह्या टक्केवारीवरून लोकसभेचं गणित आखण्यात मदत होईल.

मोदी-शहा दुकलीशिवाय भाजपला पर्याय नाही हा ह्या निवडणुकीपुरता भाजप समर्थकांना मिळालेला मोठा धडा असावा. म्हणजे मोदी म्हणजे काही महाभारतातील भीष्माचार्यांसारखे अपराजय वीर नाहीत पण महायुद्ध जिंकायचं असेल तर वनवास पत्करलेला गांडीवधारी ‘अर्जुनच’ लागतो, ‘आदर्शवादी’ युधिष्ठिर किंवा ‘बाहुबली’ भीम पुरेसे ठरत नाहीत.

अर्थात हा अर्थ समजुन घ्यायचा असेल तर. पण कालपासून एकूण भाजप समर्थकांची जी चलबिचल आणि निराशा बघतोय ह्यावरून असं वाटतं आहे की ते अजुनही धडा शिकण्याच्या परिस्थिती नाहीय. आपण पराभुत झालो आहोत हे खुल्या दिलाने मान्य करूयात आणि काही दिवस आपापल्या अनावश्यक पोस्टरूपी टकळीला कुलूप लावूयात.

लोकांवर तुमच्या पराभवाचा राग काढत असाल तर लक्षात ठेवा ६ महिन्यांनी त्यांच्याच दारापुढे तुम्हाला मत मागायला जावे लागणार आहे. मूर्खासारख्या पोस्ट टाकुन स्वतःच आणि पर्यायाने आपल्या पक्ष नेत्यांचं हसं करू नका.

पुन्हा एकदा काँग्रेसचं मनापासुन अभिनंदन. शेजाऱ्याच्या घरात खप वर्षांनी पोर झालं म्हणुन फुकटच नाचणाऱ्या ‘इतर’ लोकांचे देखील अभिनंदन. २०१९ मध्ये मजा येणार हे नक्की, केक वॉक मध्ये ती मजा नाही जी झगडून मेहनत करून मिळविलेल्या विजयात आहे.

पराभवाने चवताळलेले मोदी-शहा आणि ह्या विजयाने संजीवनी मिळालेला काँग्रेस पक्ष ह्यांची लढत रंगतदार होणार हे नक्की.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम

  • December 13, 2018 at 10:57 am
    Permalink

    मी 3 वर्षापूर्वी राजस्थान मध्ये होतो . दोन महीन्यामधे असे लक्षात आले की वसुंधराराजेंचा कारभार ठिक नव्हता. राजस्थान पत्रिका नावाचे वृत्तपत्र मी रोज वाचत होतो. त्यामधे वसुंधराराजेंचे वाभाडे रोज निघत असे. त्यावरून मी अंदाज काढला की पुढच्या निवडणूकीत भाजपाचा पराभव अटळ आहे. आज ते सत्यात उतरले आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?