' निवडणूक निकालांनी उभे केलेले हे ५ प्रश्न २०१९ च्या निवडणुकांचा निकाल ठरवतील! – InMarathi

निवडणूक निकालांनी उभे केलेले हे ५ प्रश्न २०१९ च्या निवडणुकांचा निकाल ठरवतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : निखील सरदेशमुख

===

तर शेवटी एकदाचे सगळ्यांच्याच उत्कंठा शिगेला पोहोचवल्या ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले…”२०१९ ची प्रिलिम” म्हणून सगळ्यांनीच प्रतिष्ठेचा विषय केलेल्या या निवडणुकीला अनेक कंगोरे होते…यात २०१४ च्या मोदीलाटेचा आजच्या काळातला relevance तपासाला जाणार होता.

भारताच्या राजकीय पटलावरच्या दोन प्रमुख पक्षांच्या युद्धतयारीची चाचपणी होणार होती, अँटी इन्कबंसी होती.

जीएसटी ते नोटबंदीपर्यंतच्या वेगवेगळ्या सरकारी निर्णयांबद्दलची सर्वसामान्य जनतेची मानसिकता तपासली जाणार होती आणि राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाचे म्हणजे अजूनही कुंपणावर असलेल्या छोट्या प्रादेशिक पक्षांना आपल्या पुढील वाटचालीचा मार्ग निश्चित करण्यासाठी कालच्या निकालातल्या जनादेशाच्या संदर्भाची गरज होती.

एकूणच ह्या निवडणुका म्हणजे ढीगभर पॅनॅलिस्ट बोलवून सतत “analysis” च्या पाकळ्या खुडणाऱ्या भारतीय मीडियाचे नंदनवनात पडलेले एक सुखद स्वप्न होते.

पण कालच्या सगळ्या घडामोडींमध्ये, चर्चा-उपचर्चा-कारणीमिमांसा इ.इ. मध्ये ४-५ राज्यातल्या निवडाणुकांचा संकुचित विचार करताना सत्तेच्या overall सारीपाटाकडे बघायला जवळपास कुठल्याच चैनलवाल्याला, त्याच्या अँकर्सना किंवा पॅनलवरच्या विश्लेषकांना फुरसत मिळाली नाही याचं विशेष वाटतंय.

 

indian voters inmarathi
indiatoday.in

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणूका आणि राजकीय बुध्दीबळाच्या दृष्टीने विचार केला तर कालच्या निकालांनी एकाच दगडात ५ पक्षी मारले आहेत.

१. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मुद्दा कुठलाही असला तरी निकालानंतर प्रत्येक वेळी पराभवाचे खापर इव्हीएम वर फोडण्यात आले आहे. मग त्या जाहीर सभा असोत, पत्रकार परिषदा असोत कि टीव्हीवरच्या चर्चा असोत.

प्रत्येकवेळी पराजीताच्या बोलण्यात, आरोपात इव्हीएम डोकावून गेले आहे. अगदी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून, त्यांनी “या आणि इव्हीएमशी छेडछाड करून दाखवा…” असे जाहीर आव्हान दिल्यावर मात्र कुणीही पुढे आले नव्हते.

तरी सतत “आमचा बाब्या तसा हुशार आहे पण मास्तर चीटिंग करून त्याला नापास करतात हो….” ही कुजबुज सतत सुरूच होती.

पण अगदी कालपरवा पर्यंत इव्हीएमला लाखोली वाहणाऱ्यांना काल पुर्ण निकाल लागेपर्यंतही वाट न बघता जल्लोश करताना बघुन “इव्हीएम चा झोल” हा मुद्दा आता कायमचा निकालात निघाला आहे असे मानायला हरकत नाही. कारण जिंकल्यावर आपल्या “नेत्याच्या नेतृत्वा”ला श्रेय देणाऱ्या कार्यकर्त्यांनी पराभव समोर दिसताच इव्हीएम ला दोष देण्याची हिपोक्रसी जनता आता २०१९ मध्ये खरंच खपवुन घेईल ?

२. २०१४ च्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कमालीचा आक्रमक झाला होता. मग तो गोव्याचा “चान्स पे डान्स” असो, युपीचा दणदणीत विजय असो कि महाराष्ट्रातला “तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना” केलेला संसार असो, भाजपचा अश्वमेध चौफेर उधळला होता.

 

bjp-inmarathi
thesouthasiantimes.info

२०१६-१७ मध्येच भाजपचे नेते २०१९च काय, २०२४ चे इमले बांधत होते. मोदींचा करिष्मा आणि स्थानिक संघटनेच्या जोरावर आजवर कुठेही न अडखळता जमिनीच्या दशांगुळे वर धावणारा भाजपचा विजयी वारू शेवटी जनतेने जमिनीवर आणला.

राजस्थानात फिरताना आपल्या हवेलीतून “राज्य करणाऱ्या” राणीची सर्वसामान्य जनतेशी तुटलेली नाळ स्पष्ट जाणवत होती.

शिवाय राजस्थानचा मागच्या २०-२२ वर्षांचा इतिहासही भाजपच्या पुनः सत्तास्थापनेच्या शक्यतेच्या विरोधात होता, छत्तीसगढ मधले निकालही काहीसे “अतर्क्य ना घडले काही, जरी अकस्मात” असले तरी मध्यप्रदेशच्या “निकाला”ने भाजपच्या चाणक्यांना सणसणीत चपराक मारुन २०१९ च्या गुलाबी स्वप्नरंजनातुन खाडकन् जागं केलं आहे.

भाजपच्या धुरिणींनी कुणालाही आणि कशालाही गृहीत न धरता कामाला लागावे असा हा स्पष्ट संकेत आहे.

आपल्या काहीश्या “उजव्या” मध्यमवर्गीय मतदारांचे निवडणुक औदासिन्य कमी करुन २०१९ मध्ये भाजप त्यांच्या एकगठ्ठा मतांची मोळी बांधु शकेल?

३. काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा कॉग्रेसचा विजय नसून भाजपचा पराभव आहे ह्याची जाणीव असतानाही अचानक कॉग्रेसमध्ये म्याच संपता संपता ५ सिक्स मारुन रनरेट आवाक्यात आल्याचा आत्मविश्वास बळावला आहे. जयपरजायची कारणीमिमांसा काहीही असली तरी “जो जिता वही सिकंदर होता है…!” या न्यायाने हे निकाल म्हणजे २०१९साठी काँग्रेसला अनपेक्षितरित्या मिळालेला एक पॉवर बूस्टर आहे.

 

congress-bjp-inmarathi
nationaljanmat.com

या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश भरून लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागले तर २०१९ ची लढत हि अत्यंत चुरशीची होणार आहे.

काँग्रेसचे संघटन कौशल्य आणि pro active नेतृत्व कालचे निकाल खरंच राहुल-काँग्रेससाठी नवसंजिवनी ठरवतील की शहा-मोदींची चाणक्यनीती पुन्हा काँग्रेसला उताणे पाडेल?

४. काल अनपेक्षितरित्या कॉग्रेसचा जीर्णोद्धार होत असताना भाजप विरोधी महागठबंधनचं power-dynamics मात्र पुर्णतः ढवळुन निघालं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढत्या प्रभावाला उत्तर म्हणून आपापसातले हेवेदावे बाजूला ठेऊन (विसरून नाही!!) एकत्र आलेल्या प्रादेशिक पक्षांच्या आपापल्या महत्वाकांक्षा आहेत.

त्यातल्या प्रत्येकाचा सर्वोच्च नेता कधी ना कधी पंतप्रधान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. काँग्रेस बरीचशी निष्प्रभ झालेली असताना “सर्वांना सामान वागणूक मिळावी” आणि वेळप्रसंगी आल्या नेत्याचं घोडं पुढे दामटवता यावं या उद्देशाने केवळ नाईलाज म्हणून एकत्र आलेल्या इतर प्रादेशिक पक्ष कॉग्रेसचा हा वाढता प्रभाव मान्य करणार का?

काल “नरेंद्र मोदीची जादु संपली..” म्हणणारी ममतादिदी, मुलायम, शरद यादव, लालू, केजरीवाल इ. इ. दिग्गज नेते आता कालच्या निकालानंतर २०१९ मध्ये राहुल गांधींना आपला नेता मानणार का?

२०१९ ची निवडणुक पुन्हा राहुल वि. मोदी होणार का कि त्याला खऱ्या अर्थाने कुरुक्षेत्राचे रूप येणार? ज्या कारणासाठी भाजपची साथ सोडली त्याच बाबतीत कपाळमोक्ष झालेले चंद्राबाबु २०१९च्या आधी परत घरवापसी करणार का? महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष या नवीन घडामोडीनंतर काही अनपेक्षित भूमिका घेणार का?

 

modivscongress-inmarathi
www.newsx.com

५. या निवडणुकांमध्ये लाखो मतदारांनी प्रस्तावित उमेदवारांपेक्षा नोटा निवडणे अधिक योग्य मानले आहे. हि बाब एकूणच मतदारांचे औदासिन्य आणि राजकारणातल्या गुणात्मक बदलाची गरज अधोरेखित करणारी आहे.

जर हाच ट्रेंड २०१९ मध्ये कायम राहिला तर लोकसभेच्या निवडणुकीत यह नोटा किसे भारी पडेगा ? Food for thought…!!

या निवडणुकीच्या निकालाने भाजपचे काही मोक्याचे मोहरे गिळले, कॉग्रेसला नवा आत्मविश्वास दिला आणि महागठबंधनच्या इतर नेत्यांना बसल्याजागी शह दिला आहे.

५ उपप्रश्न तर सोडवले पण १० नवीन तयारही केले आहेत. मुळातच गूढ असलेलं राजकीय पाणी आता अधिकच गढूळ झालं आहे. येणाऱ्या काळाच्या गर्भातच आता या सगळ्या कमालीच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तर आहेत. तोवर, जागते रहो बावा… दिवसरात्र दोन्ही वैऱ्याचे आहेत…सगळ्याच पक्षांसाठी….

बाकी काहीही असलं तरी,या निकालांचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर , “इस शहरमें तेरी जीतसे ज्यादा तो चर्चे हमारी हार के हैं..!!”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?