काही लोकांना उंचीची जास्त भीती का वाटते? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अनेक लोकांना अनेक प्रकारचे फोबिया असतात. काही लोकांना आगीची भीती वाटते, काहींना विशिष्ट प्राण्यांची, कीटकांची भीती वाटते, काहींना बंद जागेची भीती वाटते तर काहींना उंचावर जाण्याची भीती वाटते.

उंच डोंगरावर गेल्यानंतर, विमानात बसल्यानंतर, उंच इमारतीत गेल्यावर खिडकीतुन किंवा गॅलरीतून खाली बघितल्यास चक्कर येते, रक्तदाब वाढून किंवा कमी होऊन माणूस बेशुद्ध सुद्धा पडू शकतो. ह्या उंचीच्या भीतीला वैज्ञानिक भाषेत ऍक्रोफोबिया असे म्हणतात.

 

 

ह्या स्थितीत उंचावर गेल्यानंतर खाली बघितले की आपण खाली पडू अशी तीव्र भीती वाटते. ज्यांच्या शरीरातील बॅलन्स सिस्टीम कमकुवत आहे किंवा त्यात दोष निर्माण होतो, अश्या लोकांना ऍक्रोफोबिया असण्याची शक्यता जास्त असते.

ज्यांना ऍक्रोफोबिया आहे अश्यांना टीव्हीवर किंवा एखाद्या व्हिडिओत किंवा चित्रपटात हिरो उंच इमारतीवरून खाली उडी मारताना बघून किंवा उंच इमारतीवर चढताना बघून सुद्धा त्रास होऊ शकतो. हे लोक अश्यावेळी सुप्तपणे त्या व्हिडिओत स्वतःची त्या परिस्थितीत कल्पना करतात त्यामुळे त्यांना हा त्रास होऊ शकतो.

तसे म्हटले तर फार उंच ठिकाणहुन कुठल्याही सामान्य माणसाने खाली बघितले तर त्याला भीती वाटतेच. परंतु ऍक्रोफोबिया असलेल्या व्यक्तींमध्ये ही भीती तीव्र स्वरूपाची असते. त्याचा त्यांच्या तब्येतीवर व शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

ऍक्रोफोबिया म्हणजे काय?

ऍक्रोफोबिया म्हणजे उंचीची तीव्र आणि अतिशय जास्त स्वरूपाची भीती असणे. ही भीती असणारी व्यक्ती उंचावर गेल्यांनतर विचित्र वागते. जरी ती व्यक्ती धोकादायक ठिकाणी उभी नसली, किंवा अत्यंत सुरक्षित ठिकाणी उभी असली तरीही त्या व्यक्तीला तीव्र स्वरूपाची भीती वाटणे, टेन्शन येणे, अँझायटी किंवा अगदी मोठा पॅनिक अटॅक येणे असे प्रकार घडू शकतात.

ऍक्रोफोबिया हा शब्द दोन ग्रीक शब्दांचे मिश्रण आहे. ऍक्रो म्हणजे शिखर किंवा टोक आणि फोबिया म्हणजे भीती.

साहजिकच आपण इतक्या उंचावर असताना आपल्याला जर पॅनिक अटॅक आला तर त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्याला जर तीव्र स्वरूपाचा ऍक्रोफोबिया असेल तर त्याला साधे खुर्चीत उभे राहणे सुद्धा जमत नाही.

उंचावर वाटणारी भीती म्हणजे खरे तर मृत्यूची भीती आहे. दृष्टीवर जीवन अवलंबून असलेल्या कुठल्याही जीवाला आपण खाली पडून मरणार आहोत ही कल्पना सुद्धा भीतीदायक आहे.

 

hight1-inmarathi
techlordz.com

प्राचीन काळातील माणूस सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालत नसे, उंचावरल्या किंवा डळमळीत असलेल्या जागांवर सहसा जात नसे. हीच भीती पिढ्यानुपिढ्या आपल्या मनावर कोरली गेली आहे. म्हणूनच जगातील अनेक माणसे अति उंचावरच्या जागांवर जायला घाबरतात.

जवळजवळ सर्वच माणसे उंच ठिकाणी गेल्यावर काठावर उभी राहायला घाबरतात किंवा त्या ठिकाणहून खाली बघितले की त्यांना अस्वस्थ वाटते. कारण ह्या ठिकाणहून पाय घसरला, बॅलन्स गेला तर खाली पडून मरण निश्चित आहे हाच विचार सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात येतो.

काही माणसे मात्र ह्यावर मात करून बंजी जम्पिंग किंवा स्काय डायव्हिंग ह्या साहसी खेळात भाग घेऊ शकतात.

 

bungy-jumping1-inmarathi
seektheworld.com

ऍक्रोफोबिया असलेल्या माणसाच्या मनात असे पक्के बसलेले असते की आपण उंचावरच्या ठिकाणी गेलो आणि तेथे उभे राहिलो तर आपण निश्चितच खाली पडणार आणि पडलो की मृत्यू निश्चित आहे. उंचीचा संबंध थेट मृत्यूशी जोडला जातो आणि साहजिकच मरणाची भीती कोणालाही वाटतेच.

लहान मुलांना ह्या खाली पडून नंतर होणाऱ्या परिणामांची कल्पना नसते त्यामुळे त्यांना सहसा उंचीची भीती वाटत नाही. परंतु एका प्रयोगा दरम्यान काही लहान मुलांना व्हिज्युअल क्लिप्स दाखवण्यात आल्या. त्यानंतर त्या लहान मुलांनी पारदर्शक काचेच्या फ्लोरिंगवरून चालण्यास नकार दिला.

ह्या काचेच्या फ्लोरिंगखाली काही मीटर्सची “फॉल स्पेस” होती. ती बघून त्यांना त्यांना आपण तिथून पडू शकतो अशी भीती वाटली आणि त्यांनी तेथे चालण्यास नकार दिला.

ह्यावरून असे लक्षात येते की ज्या ठिकाणहून पडण्याची शक्यता वाटते तेथे गेल्यास लहान मुलांनाही अस्वस्थ वाटते. जेव्हा की त्यांना पडल्यानंतर काय होईल ह्याची कल्पनाही नसते. खाली पडण्याची भीती ही आपल्या मेंदूतच कोरलेली असते.

आपल्या शरीरात शरीराचा बॅलन्स कायम ठेवण्यासाठी एक यंत्रणा असते. ही यंत्रणा म्हणजे व्हेस्टिब्यूलर सिस्टीमचा मेंदूमधील क्लस्टर व्हिज्युअल संकेतांसह एकत्रित केला जातो. ज्या व्यक्तीच्या शरीरातील ह्या यंत्रणेत दोष निर्माण होतो, त्या व्यक्तिमध्ये ऍक्रोफोबिया असण्याची शक्यता खूप जास्त असते.

कारण त्यांच्या शरीराचा नीट बॅलन्स होत नाही म्हणून त्यांना कायम आपण पडतो आहोत अशी भावना होत असते. ते सपाट जमिनीवर नीट सरळ उभे असले तरीही त्यांना आपण पडतो आहोत असे वाटते. साहजिकच अश्या लोकांना उंचावरील जागा म्हणजे मोठे संकटच वाटते.

अशा लोकांना थोडेही उंचावर गेले किंवा डळमळीत ठिकाणी उभे राहिले तर घाबरल्यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो.

ऍक्रोफोबिया हा काही असाध्य आजार नाही तर ती एक मानसिक अवस्था आहे. आणि ह्यावर उपचार करणे देखील शक्य आहे.

कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) हा ह्यावरील प्रभावी उपचार आहे. ह्या उपचार पद्धतीत व्यक्तीची ही भीती कमी करण्यासाठी त्याला उंचावरील जागेचे अनुभव देऊन त्याची भीती घालवण्याचे प्रयत्न केले जातात.

 

glass-skywalk1-inmarathi
lifeisreallybeautiful.com

उंचावरील ठिकाणी जाऊन सुद्धा त्याची मानसिक आणि भावनिक अवस्था कण्ट्रोल करायला शिकवले जाते. कधी कधी तीव्र प्रकारच्या केसेसमध्ये काही औषधे सुद्धा दिली जातात. अँटी अँझायटी औषधे म्हणजेच बेन्झोडायझेपाइन्स आणि अँटी डिप्रेसंट औषधे ह्या व्यक्तींना फायदेशीर ठरतात.

अति उंचावर गेल्यानंतर अस्वस्थ वाटणे, भीती वाटणे अगदी सामान्य आहे. काही अपवाद सोडल्यास प्रत्येकालाच ४०व्या मजल्यावरून खाली बघितल्यास भीती वाटते.

जर सायकॉलॉजिक कारणामुळे ऍक्रोफोबिया असेल तर तो उपचारांनी कंट्रोल होऊ शकतो. कारण आपण मनात पक्के ठरवल्यास माणूस कुठल्याही भीतीवर मात करू शकतो. मन खंबीर असले तर अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?