' “बा देवेन्द्रा! तू पुरून उरलास… जिंकलास भावा…!” – InMarathi

“बा देवेन्द्रा! तू पुरून उरलास… जिंकलास भावा…!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : त्रिकाल अडसड

===

असेच हिवाळ्याचे दिवस होते. सायंकाळी न्यूज चॅनल्सवर जळजळीत डिबेट्स चालायच्या. निखिल वागळे दोन्ही हात निखळून कॅमेरामनच्या गळ्यात पडतील की काय इतक्या वेगाने खांदे उडवत हातवारे करत चर्चा घडवायचे. अशातच भारतीय जनता पक्षाची बाजू मांडायला एक चाळीशीत तरुण यायचा.

कधी कधी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह घालतात तसा खांद्यावर पट्ट्या असलेला शर्ट घालून यायचा.

गोड, गोंडस, निरागस चेहऱ्याचा तो तरुण वरपक्षी पोरसवदा दिसत असला तरी बोलायला लागला की विरोधकांची मुद्देसूद धुलाई करायचा.

कदाचित पक्षाचे महामंत्री (सरचिटणीस) पद असेल त्याच्याकडे, पण त्याला पाहून सुशिक्षित तरुणाई आकर्षित व्हायची.

विशेषतः नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेली व राष्ट्रवादीच्या गुंडगिरीला व दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या घोटाळ्यांच्या बातम्यांना विटलेल्या आयटीवाल्या तरुणाईला या व्यक्तीचे विलक्षण आकर्षण वाटायचे.

“ये बंदा जरूर कुछ कर के दिखाएगा!”, “इसको सीएम बनना चाहीये!”

अशा चर्चा कँटीनवर रंगायला लागल्या. अतिशय संतुलीत शब्दांमध्ये चेहऱ्यावर निरागस स्मित ठेवून तो भल्या भल्या दिग्गज मिडिया पॅनलिस्टची धूळधाण उडवून द्यायचा!

कुणाला साधी कल्पनाही नव्हती की प्रसिद्धी झोतापासून शेकडो हात दूर राहणारा हा नागपुरी तरुण आमदार भविष्यात राज्याचा मुख्यमंत्री बनेल.

पण तरुणाईला मात्र कायम तो आपला नेता किंवा युथ आयकॉन वाटायचा.

 

dev-fadanvis-inmarathi

 

पुढे देशात सत्तांतराचे वारे वाहू लागले आणि या तरुणाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली. त्याने संपूर्ण राज्य पिंजून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.

===

हे ही वाचा – दुसरी लाट फक्त महाराष्ट्रातच आहे काय?? कारण राजस्थानात चक्क हेल्मेट वाटप होतंय!

===

केंद्रात मोदींच्या नेतृत्वात सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर राज्यातही सत्तापरिवर्तनाची लाट आली व बलाढ्य काँग्रेस-राष्ट्रवादीला उध्वस्त करून गेली. विविध वृत्तवाहिन्यांनी सर्व्हे केले.

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?” हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात घोंगाऊ लागला. परंतु वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्व सर्व्हेत अन्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत मुख्यमंत्री पदासाठी त्या तरुणाच्या नावाला ४०% हुन अधिक लोकांनी आपली पसंती दर्शविली.

नव्यानेच पंतप्रधान बनलेल्या मोदींनीही जनभावना जाणत मुख्यमंत्री पदाची माळ या तरुणाच्या गळ्यात टाकली व तरुणांचा लाडका देवेंद्र, युवा कार्यकर्त्यांचे लाडके देवेनभाऊ राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस बनले.

“मुख्यमंत्री पदाचे मुकुट काटेरी असते रे बाबा!”, हीच देवेंद्रजींच्या आईंची पहिली प्रतिक्रिया होती आणि त्यांचे भाकीत पुढे खरे ठरले.

२०१४ साली मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचा एकही दिवस सुखाचा गेला नाही. दररोज नवनवे आव्हान त्यांच्या सिंहांसनाला धडका देत होते.

एकतर “खाकी चड्डीवाल्यांच्या हाती देश देणार का?” हा सवाल विचारणाऱ्या दिग्गजांची एक बामनाच पोर मुख्यमंत्री बनलंच कस, या प्रश्नाने झोपच उडाली.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही “हा चाळीशीत तरुण आपलं काय वाकडं करेल?”, असेच वाटले होते.

देवेंद्रजींनी सत्ता हाती घेतली तेव्हा मित्रपक्ष तसेच मंत्रीमंडळातील बेबनाव, अधिकाऱ्यांची मुजोरी, विरोधकांनी उपसलेले जातीचे हत्यार, हे सारं चित्र पाहता नागपूरचा सर्वात तरुण महापौर मुख्यमंत्री पदाची खुर्ची फार काळ टिकवू शकेल असे वाटले नव्हते.

पण हळूहळू तो तरुण मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर स्थिरावला व त्याने प्रशासनावर आपली पकड घट्ट केली.

 

fadanvis-inmarathi

 

हा काल परवा आलेला पोरगा आपलं काय वाकडं करेल याच गुर्मीत विरोधक असताना देवेंद्र फडणवीसांनी पारदर्शक राज्यकारभारातून आपला स्वतंत्र ठसा उमटवायला सुरुवात केली.

मंत्रालयात दलालांची होणारी गर्दी बंद झाली, प्रशासन गतिमान झाले. सत्तेची सूत्र घेतली तेव्हा अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळलेला होता, मराठवाड्यातील जनता पाण्याविना देशोधडीला लागली होती, सिंचन घोटाळ्यामुळे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प रखडलेले होते.

परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येवर नामी शक्कल शोधून काढली.

“पाणी अडवा, पाणी जिरवा” ही तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची योजना होती. परंतु आघाडी सरकारने कधी त्याकडे लक्षच दिले नाही.

मुखमंत्र्यांनी अव्वाच्या सव्वा किमती वाढलेल्या सिंचन प्रकल्पांमध्ये निधी वाया न घालविता लोकसहभागातून सूक्ष्म व लघु सिंचनाचे प्रयोग स्वतः पुढाकार घेऊन राज्यभर सुरू केले.

‘जलयुक्त शिवार’, ‘मागेल त्याला शेततळे’ या माध्यमातून झालेल्या कामांचे सकारात्मक परिणाम पुढच्या पावसाळ्यातच दिसू लागलेत व ‘जलयुक्त शिवार’ ही एक लोकचळवळ बनली. गावेच्या गावे, नामांकित संस्था, लोकप्रिय सिने कलावंत या अभियानात सहभागी झाले.

हा देवेंद्र फडणवीसांच्या पारदर्शक राज्यकारभाराचाच परिणाम होता की लोक भरभरून मुख्यमंत्री सहायता निधी फंडाला आर्थिक पाठबळ देऊ लागले.

देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक मुख्यमंत्री सहायता निधी राज्याच्या तिजोरीला मिळवून देणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील आणि ही जनतेने त्यांच्या प्रामाणिकपणाची दिलेली पावतीच होती.

पाहता पाहता देवेंद्र फडणवीस नावाचा झंझावात भल्या भल्या अभेद्य किल्ल्यांना धडका देऊ लागला. कधी नव्हे ते पश्चिम महाराष्ट्रातही सर्वत्र कमळ फुलू लागले.

भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागल्या. अनेक वर्षे सत्ता भोगून मदमस्त झालेल्या विरोधकांची त्यामुळे झोपच उडाली.

देवेंद्र फडणवीस नावाचे वादळ रोखायचे कसे यासाठी कटकारस्थान शिजू लागले. येनकेन प्रकारेण फडणवीसांना खुर्चीतून खाली खेचायचे यासाठी विरोधकांची क्रयशक्ती खर्ची पडू लागली.

 

devendra-fadanvis-inmarathi

 

स्वतःच्या डोक्यावर विविध घोटाळ्यांच्या चौकशीची टांगती तलवार असल्याने दिग्गज नेत्यांना फडणवीसांविरुद्ध थेट आघाडी उभारता येईना, त्यामुळे त्यांनी छोट्या छोट्या परिचित/अपरिचित संघटनांना पाठबळ दिले.

पहिला हल्ला केला तो “शेतकरी कर्जमाफीचे” निमित्त करून.

राज्य सरकार कसे शेतकरी विरोधी आहे हे समाजमनावर बिंबवण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न सुरू झाले.

पण देवेंद्र फडणवीसांनी सर्व शेतकरी मोर्चे अत्यंत संयमाने व संवेदनशीलपणे हाताळले आणि राज्यात कधी झाली अशी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली.

एवढंच नव्हे तर शेतमालाची विक्रमी खरेदी केली. शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या बाजार समित्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. विरोधकांची खेळी अपयशी ठरली, देवेंद्र जिंकले, बळीराजा सुखावला.

मग डाव्या संघटनांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली आदिवासी बांधवांच्या वनपट्ट्याच्या मागणीचे हत्यार उपसले, मोर्चा विराट दिसावा म्हणून गुजरातहून माणसे आणल्या गेली, मिडीयाने भरपूर प्रसिद्धी दिली.

परंतु मध्यरात्रीच मंत्री गिरीश महाजन स्वतः मोर्चेकऱ्यांसोबत पायी चालले व दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकर्यांच्या मागण्या निकाली काढल्या.

“मुख्यमंत्री प्रत्येकाचे ऐकतात” हे चित्र निर्माण झाल्याने इतकी वर्षे प्रलंबित असलेले विविध विषय जे आघाडी सरकारने कधीच सोडविले नाही, ते फडणवीस सरकार नक्की सोडवेल हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला.

मग शिक्षकांचा संप असो, कर्मचाऱ्यांचा संप असो, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संप असो वा अन्य काही, प्रत्येक आंदोलनाला सरकारने अत्यंत सकारात्मकपणे प्रतिसाद दिला व आपली विश्वासार्हता प्रस्थापित केली.

जनतेच्या मुख्यमंत्री व सरकारवर वाढत चाललेल्या विश्वासामुळे हैराण झालेल्या विरोधकांनी नामी युक्ती लढविली, ती म्हणजे आरक्षणाची.

एखाद्या समाजाला नव्याने आरक्षण देणे अत्यंत किचकट प्रक्रिया असते, त्यात मराठा आरक्षणाची मागणी ही अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मराठा आरक्षणाचे हत्यार उपसून मुख्यमंत्र्यांना खुर्चीतून खाली खेचता येईल असा विरोधकांचा आशावाद होता.

 

Maratha Karnti Morcha

===

हे ही वाचा – ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ नितीन गडकरींनी अमिताभला झापलं…

===

मराठा समाजाच्या नेत्यांना इतकी वर्षे राजकीय सत्ता व प्रतिनिधित्व मिळूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. तरीही निर्लज्यपणे मराठा आरक्षणाचे हत्यार उपसून मुख्यमंत्री जातीने ब्राम्हण असल्याने ते मराठा आरक्षण विरोधी असल्याचा कांगावा करून फडणवीसांना खुर्चीत खाली खेचण्याची नामी शक्कल विरोधकांनी लढविली व राज्यभर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ विराट मोर्चे निघू लागले.

विरोधकांनी पेटवलेली आग मराठा समाजात घुमसत गेली व संपूर्ण मराठा समाज स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरला.

सामाजिक आपुलकीचा आव आणत सर्व मोर्च्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची माणसे शिताफीने पेरल्या गेलेली होती, भाजपमधील मराठा कार्यकर्त्यांना अलगदपणे बाजूला करण्यात आले.

कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे विरोधकांचे मुळात उद्दिष्टच नव्हतं, फक्त मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा कट शिजत होता.

परंतु मराठा समाज बांधवांचे खरोखर कौतुक करायला हवे की त्यांनी एकाही लबाड नेत्याला भीक घातली नाही व मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला.

मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मराठा समाजाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता विक्रमी वेळात मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

आरक्षण लागू होईस्तोवर मराठा युवक व विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या.

आज मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबी राज्य सरकारने पूर्ण केल्या असून आरक्षण कुठल्याही क्षणी लागू होऊ शकते. म्हणजे फडणवीसांची खुर्ची तर गेलीच नाही वर त्यांनी मराठा आरक्षण मिळवून दिल्याने विरोधकांनी मराठा समाजाची उरलीसुरली सहानुभूती सुद्धा गमावली.

आज धनगर आरक्षणाचे कामही अंतिम टप्प्यावर आहे.

ज्या समस्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून २०१४ पर्यंत झालेल्या अनेक दिग्गज मुख्यमंत्र्यांनी सोडविल्या नाही त्या किचकट समस्या या नागपुरातल्या अवघ्या चाळीशीतील तरुणाने सोडवून दाखविल्या व महाराष्ट्रातील जनतेचे मन जिंकले.

 

maratha-inmarathi

 

कोपर्डी येथील दुर्दैवी घटना व एल्गार परिषदेतून निर्माण झालेला जातीय विद्वेष यातून असामाजिक तत्वांनी राज्यात दंगली पेटविण्याचे अनेक प्रयत्न केले.

पण मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हे नाजूक प्रकरणही अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत मोठा अनर्थ टाळला.

एवढेच नव्हे तर कोरेगाव भीमा येथे घडलेल्या अनुचीत प्रकाराची सखोल चौकशी करून शहरी नक्षलवाद्यांचे देशात अस्थिरता माजविण्याचे कारस्थानही मोडीस काढले.

राज्यभर मराठा आरक्षणाचा वणवा पेटला असताना सांगली महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळणारे घवघवीत यश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेच्या असलेल्या विश्वासाची पावतीच होती.

आज देवेंद्र फडणवीस हे नाव संपूर्ण राज्यात विश्वासाचे प्रतीक बनलेले आहे. मुख्यमंत्री सामान्यातल्या सामान्य माणसाच्या समस्या संवेदनशीलपणे ऐकून घेतात, त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात हा विश्वास प्रत्येक मराठी माणसाच्या मनात निर्माण झालेला आहे.

आज विधिमंडळात मुख्यमंत्री जेव्हा विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला उभे राहतात तेव्हा ते विरोधकांना चारीमुंड्या चित करतात.

मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की देवेंद्र फडणवीसांच्या समोर नवे आव्हान उभे राहिले नाही.

प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण नवे संकट घेऊन समोर आला.

प्रचंड तणाव, कठीण प्रसंग, परंतु येणाऱ्या प्रत्येक संकटाचा अत्यंत संयमाने सामना करत चेहऱ्यावरचे स्मित व संयम जराही ढळू न देता प्रत्येक संकटावर मात करत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनले.

वार्ड अध्यक्ष ते नगरसेवक, नगरसेवक ते सर्वात तरुण महापौर, महापौर ते आमदार व आमदार ते सर्वात तरुण व गैर काँग्रेसी मुख्यमंत्री सर्वाधिक कार्यकाळ मुख्यमंत्रीपद भूषविणार्या देवेंद्र फडणवीस नावाच्या तरुणाचा प्रवास थक्क करणारा आहे.

केवळ उत्तम नेता अथवा प्रामाणिक शासक एवढीच त्यांची ख्याती नसून देवेंद्र फडणवीस हे सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे नेतेही आहेत.

एक सामान्य कार्यकर्ता किंवा एक सामान्य तरुण म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आजवरचा संघर्ष पाहिल्यावर मुखातून एकच प्रतिक्रिया येते, “जिंकलस भावा!”

===

हे ही वाचा – भाजप समर्थकांनी शरद पवारांना “५०-५५ जागांचे नेते” समजण्याची चूक करू नये…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?