' अमृतसरच्या या वस्तुसंग्रहालयात दडलेत भारताच्या फळणीशी संबंधित अज्ञात दुवे

अमृतसरच्या या वस्तुसंग्रहालयात दडलेत भारताच्या फळणीशी संबंधित अज्ञात दुवे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अगणित क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर, स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षातून भारताचं स्वातंत्र्याचं स्वप्न साकार होऊन सत्तर पेक्षा जास्त वर्षे झाली. हे स्वातंत्र्य म्हणजे झोळी पसरवल्यानंतर टाकण्यात आलेली भीक नव्हती. भारताच्या शेकडो सुपुत्रांनी जीवाची बाजी लावत स्वतःच्या हिमतीवर खेचून आणलेली विजयश्री होती ती.

१४ ऑगस्टच्या त्या मध्यरात्री ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या युनियन जॅक खाली उतरला आणि भारताचा तिरंगा दिमाखात फडकू लागला ते दृश्य पाहून भरतीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःच्या शब्दात भरतीयांच्याच भावना लाल किल्ल्यावरून बोलून दाखवल्या.

 

Indian-Independence-inmarathi
wishesh.com

“Long years ago, we made a tryst wiyh destiny..” असं म्हणत त्यांनी सुरुवात केली आणि शेवटी भारत आता सार्वभौम, स्वातंत्र्य राज्य असल्याचे जाहीर केले. इतिहासाच्या पनापनावर सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा असा हा क्षण!

एकीकडे हा विजयाचा जल्लोष चालू होता, पण दुसरीकडे अगदी याच्या विरुद्ध जे चालू होतं ते थरकाप उडवणार होतं. स्वातंत्र्याचा मुकुटमणी भारताचे डोक्यावर चढवला न चढवला तेव्हाच भारताच्या छातीवर एक जखम भलभळत होती आणि तिने उग्र रुप धारण केले होते.

ती जखम म्हणजे भारताची फाळणी आणि त्यासोबत झालेल्या हजारो लाखो निरपराध नागरिकांच्या कत्तली. स्वातंत्र्याच्या लक्ष लक्ष उषकालीच या यातना भारताच्या वाट्याला याव्यात याउपर दुर्दैव कुठलं?!

भारताचा उत्तर पश्चिम बाजूचा एक तुकडा आणि दक्षिणेकडच्या एक तुकडा तोडून पाकिस्तान हा नवीन देश बनत होता. फाळणीची अपरिहार्यता लक्षात आल्यानंतर देशाच्या नेतृत्वाने ती स्वीकारली तर खरी, पण या सगळ्यात बळी जाणार होता तो सामान्य माणूस, निरपराध, निर्दोष!

 

partition india inmarathi
फाळणीचं क्षणचित्र

शेवटी जे व्हायचं ते झालं आणि त्याची किंमतही आपण चुकवली. कित्येक कुटुंबे उध्वस्त झाली. कित्येक लहान मुले, स्त्रिया जीवानिशी मारल्या गेल्या. प्रेतांचा खच इतका की पाहणाऱ्याचा थरकाप उडेल. फाळणीची प्रक्रिया आणि त्यानंतर दोन्ही भागात इकडून तिकडे स्थलांतर करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे नागरिक. एकमेकांच्या जीवावर उठलेले.

फाळणी झाली. या सगळ्या गदरोळातून सावरायला भारताला बराच काळ जावा लागला. नव्हे आजही आपण त्या बिकट प्रसंगाच्या जखमा उराशी बाळगून आहोत. हा इतिहास रक्तरंजित आहे.

पण रक्तरंजित इतिहासाची जण असेल तर पुढच्या पिढीला तसा इतिहास घडण्यापासून वाचवता येऊ शकते हे कुणीही नाकारणार नाही. त्यामुळेच आपण इतिहास अभ्यासत असू. झालेल्या चुकांतून धडा घेण्यासाठी आणि विजयांतून प्रेरणा घेण्यासाठी..

फाळणीचा हाच इतिहास जिवंत करणारे एक संग्रहालय अमृतसरमध्ये उभारले गेले आहे. अमृतसर शहराच्या दक्षिण भागात टाऊन हॉल मध्ये हे संग्रहालय उभारले गेले आहे. फाळणीचा समग्र इतिहास जाणून घेता येईल या उद्देशाने हे संग्रहालय उभारले गेले. त्याचं नाव आहे Amrutsar Partition Musium.

 

partition-museum-inmarathi
www.partitionmuseum.org

फाळणीशी संबंधित कागदपत्रे, छायाचित्र, वर्तमानपत्रातील फाळणीच्या बातमीची आणि त्या दरम्यानच्या घटनांच्या बातमीची कात्रणे, असंख्य लोकांनी फाळणीशी संबंधित ज्या वस्तू दान केल्या त्या, एवढी सर्व साधने या संग्रहालयात गेल्यानंतर फाळणीचा जिवंत इतिहास अक्षरशः बोलू लागतात.

पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या व्यक्तीवर जमावाने हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सोबत आणलेलं त्याचं घड्याळ, एखाद्या हिंदू कुटुंबाने पाकिस्तानमधून भारतात येताना तिथल्या विणकराने आपुलकीने भेट दिलेली स्थानिक कलाकुसर असलेली शाल, फाळणीनंतर पाकिस्तानात राहिलेल्या हिंदू कुटुंबाची नंतर झालेली वाताहत त्या कुटुंबाने भारतातील नातेवाईकांना कळवण्यासाठी लिहिलेले पत्र… आणि असं भरपूर काही.

फाळणीच्या कत्तलीत कित्येक लोक मारले गेले, अंदाजे दीड लाख लोक स्थलांतरित झाले. हे आकडे ऐकताना सोपे वाटत असले तरी दीड लाख लोक इकडून तिकडे जात असल्याची, येत असल्याची कल्पना करा. डोळ्यासमोर चित्र उभे राहिल.

त्या लोकांनी किती आठवणी उराशी बाळगून ठेवल्या असतील? त्यातल्या अगदी थोड्या उपलब्ध असणाऱ्या लोकांकडच्या साहित्याचे संकलन या ठिकाणी करण्यात आले आहे.

 

partition-museum1-inmarathi
www.partitionmuseum.org

वेगवेगळ्या दालनात वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. एका दृक्श्राव्य सभागृहात तर फक्त फाळणी अनुभवलेल्या लोकांनी केलेलं अनुभव कथन पडद्यावर दाखवलं जातं.

या संग्रहालयाच्या सीईओ मल्लिका अहलुवालिया या प्रकल्पबद्दल बोलताना म्हणतात,

“तुम्ही जगातील अनेक प्रगत देशात पहा. त्यांच्या इतिहासातील बऱ्या वाईट सर्व प्रसंगाच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांनी काही न काही केले आहे. त्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या प्रसंगांची त्यांनी भव्य स्मारके, प्रदर्शने उभारली आहेत.

पण भारताच्या, नव्हे आशिया खंडाच्या इतिहासात घडून गेलेली इतकी महत्वाची घटना की जिने देशांचे नकाशे बदलवले, त्या घटनेची आठवण करून देणारं एकही स्मारक भारतात नव्हतं. हे संग्रहालय ती उणीव भरून काढेल. संघर्षाच्या गर्तेतुन भरारी घेत ज्या पिढीने भारताचं भविष्य घडवलं, त्या पिढीच्या कर्तृत्वाची यशोगाथा हे संग्रहालय येणाऱ्या पिढ्यांना सांगत राहील.”

शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे या संग्रहालयाच्या चौदाव्या दालनात आकारास आलेली सुरेख कल्पना. या दालनाला ‘गॅलरी ऑफ होप’ असं नाव देण्यात आलं आहे. या दालनात संग्रहालयाला भेट देणारे लोक त्यांचे संदेश लिहितात. काही कृत्रिम झाडे बनवून येथे ठेवण्यात आले आहे. पानाच्या आकाराच्या हिरव्या रंगाच्या कागदावर तो शांती आणि प्रेमाचा संदेश लिहून तो कागद झाडाच्या फांदीला चिकटवतात.

 

partition-museum3-inmarathi (1)
https%3A%2F%2Fwww.asianaffairs.in

अशी अनेक झाडे त्या दालनात आहेत. इतका नरसंहार झाल्यानंतर तरी दोन देशाच्या, धर्माच्या लोकांनी त्यातून धडा घेऊन बंधुभावाने राहिले पाहिजे या महत्वाच्या नोटवर संग्रहालय पाहून आपण बाहेर पडलेलो असतो..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?