' 'बॉर्डर' मध्ये सनी देओलने ज्यांची भूमिका केली, ते ब्रिगेडियर निवर्तले, आपल्याला त्याचा पत्ताच नाही!

‘बॉर्डर’ मध्ये सनी देओलने ज्यांची भूमिका केली, ते ब्रिगेडियर निवर्तले, आपल्याला त्याचा पत्ताच नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : समीर गायकवाड

===

वास्तवातला नायक विजनवासात खितपत राहिला तरी आपण त्याच्याकडे बघत नाही. मात्र त्याची भूमिका करणारा वा त्याची नक्कल करणारा सदा लाईमलाईटमध्ये राहतो. मुळात आपल्यालाच त्याचे काही देणेघेणे नसते. आपला अभिनिवेश हा दिखाऊ स्वरूपावर जास्त भर देणारा असल्यामुळे असे असू शकते.

हे सूत्र सर्व क्षेत्रास लागू पडते. अगदी अटेन्शन पॉइंट झालेल्या राष्ट्रभक्तीस देखील हे लागू पडते.

आम्ही कजारियाच्या टाईल्स वापरून देशभक्ती सिद्ध करू शकतो इतकं उथळ स्वरुप आपण त्याला दिलेय.

आज ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे निधन झालेय त्याची नोंद अत्यल्प प्रमाणात घेतली गेलीय. माझा प्रश्न आहे, का दखल घ्यावी ? माध्यमे त्याच बातम्या दाखवतात ज्या लोकांना पाहायला आवडतात. टीआरपीवरून हे ठरते.

आपण जे आवडीने पाहतो ते दाखवण्याकडे कल ठेवत आपली मते लोकांच्या माथी मारणे हा वाहिन्यांचा आवडता उद्योग. मग कुलदीपसिंगांच्या मृत्यूचे आम्हालाच घेणेदेणे नसेल तर वाहिन्या वा अन्य माध्यमे त्याला प्रसिद्धी कशी देतील ?

 

kuldeep-inmarathi
thehansindia.com

मुळात आम्हाला हे कुलदीपसिंग कोण आहेत तेच ठाऊक नसेल तर पुढचा प्रश्न येत नाही.

थोडं सोपं करून सांगतो. हे तेच ब्रिगेडियर चांदपुरी होत ज्यांच्या भीमपराक्रमावर सनी देओलची भूमिका बेतली होती आणि त्या सिनेमाचे नाव होते ‘बॉर्डर’! आता सगळ्यांच्या ट्यूब लख्ख पेटल्या असतील नाही का! हेच तर मला सांगायचे आहे!

कल्पना करू की त्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे काही बरेवाईट झाले असते तर एव्हाना सोशल मिडीया ‘RIP’च्या ठाशीव पिंकांनी भरभरून वाहिला असतो.

या अभिनेत्यास दीर्घायुष्य लाभो असेच सर्वांचे म्हणणे असेल तसेच माझेही आहे. मात्र या अभिनेत्यासोबतच आम्हाला कुलदीपसिंग चांदपुरीही माहित असायला हवेत ते माहित नाही. इथे आमचा पोकळपणा काही अंशी का होईना सिद्ध होतो. असो…

 

wagle-inmarathi
abplive.com

१९७१ मध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताने विजय मिळवला. या विजयात भारतीय जवानांनी जे शौर्य गाजवले त्यात मोलाचा वाटा असलेले तत्कालीन युद्धात मेजर पदावर असलेल्या कुलदीपसिंग चांदपुरी यांचे आज निधन झालेय. त्या पराक्रमाबद्दल कुलदीपसिंग यांना महावीर चक्र सन्मानाने गौरवण्यात आले होते.

कुलदीपसिंग यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४० ला शीख कुटुंबात झाला होता. पंजाबमध्ये वास्तव्यास असलेले त्यांचे कुटुंब नंतर बालाचौरमधील चांदपूरमध्ये स्थायिक झाले. १९६२ मध्ये होशियारपूर गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केल्यावर ते भारतीय लष्करात दाखल झाले.

१९६३ मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या पंजाब रेजिमेंट २३व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.

१९६५ मध्ये झालेल्या पाकविरुद्धच्या युद्धातही त्यांनी कामगिरी केली होती. या युद्धानंतर जवळपास वर्षभर ते इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर होते.

पाकिस्तानने लोंगेवालमध्ये हल्ला केला कुलदीपसिंग मेजर पदावर होते. १९७१ मध्ये भारत-पाकदरम्यानचे युद्ध संपण्याच्या टप्प्यात होते. यादरम्यान पाकची एक मोठी सैन्य तुकडी लोंगोवाल चौकीच्या दिशेने येत असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली. या वेळी लोंगोवाल चौकीवर तैनात तुकडीचे नेतृत्व कुलदीपसिंग यांच्याकडे होते.

लोंगोवाल चौकीवर पाकने हल्ला केला तेव्हा या चौकीवर १२० जवान गस्तीवर होते. या सैनिकांच्या बळावर पाकच्या २००० सैनिकांशी लढा देऊन चौकीचे रक्षण करण्याचे आव्हान कुलदीपसिंग यांच्यासमोर होते. तरी निडरपणे या जवानांनी पाकचा हा हल्ला शर्थीने परतावून लावला.

 

kuldeep-singh-inmarathi
thestatesman.com

लोंगोवाल चौकीवर ताबा मिळवून रामगढहून थेट जैसलमेरवर धडक मारण्याचा पाकिस्तानचा डाव होता. मात्र, कुलदीपसिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीने पाकचे स्वप्न धुळीस मिळवले. ५ डिसेंबर१९७१ च्या पहाटे भारतीय जवानांच्या मदतीला हवाईदल आले आणि विमानांनी पाकचे रणगाडे उद्ध्वस्त केले. पाकच्या सैनिकांना माघार घ्यावी लागली.

६ डिसेंबरला भारतीय हवाई दलाची हंटर विमाने पाकवर अक्षरशः तुटून पडली. यात पाकचे ३४ रणगाडे उद्ध्वस्त झाले. सुमारे ५०० जवान जखमी झाले, तर २०० जवानांचा मृत्यू झाला.

आज या कारनाम्याच्या महानायकाचा वार्धक्याने मृत्यू झालाय आणि आम्ही बेदखल आहोत. पण याची भूमिका करणारया रील नायकाचे काही जरी झाले असले की त्याची बातमी आम्ही चवीने चघळत असतो.

एकंदर काय तर आमचे दाखवायचे देशप्रेम वेगळे आणि खरे वेगळे आहे. कुलदीपसिंग चांदपुरी सिनेनायक असते आणि सनी देओल सेनानायक असता तर चित्र कदाचित उलटे दिसले असते. असो… ब्रिगेडीयर कुलदीपसिंग चांदपुरी तुम्ही आमच्या स्मरणात सदैव राहाल अशी भाबडी आशा व्यक्त करतो.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो अशी प्रार्थना करतो. योग्य दखल न घेतल्याबद्दल त्यांनी जमल्यास आम्हाला माफ करावं असं आर्जवही करतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “‘बॉर्डर’ मध्ये सनी देओलने ज्यांची भूमिका केली, ते ब्रिगेडियर निवर्तले, आपल्याला त्याचा पत्ताच नाही!

  • November 22, 2018 at 9:06 am
    Permalink

    जय हिंद.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?