' स्वातंत्र्यवीर सावरकरांचा “तथाकथित” माफीनामा, अपप्रचार आणि सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट सत्य – InMarathi

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा “तथाकथित” माफीनामा, अपप्रचार आणि सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वातंत्र्यवीर सावरकर  तसा कायमच एक धगधगता विषय म्हणून ओळखला जातो, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सावरकरांबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. ते असं म्हणाले की ‘महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावकरांनी ब्रिटिशांनकडे दयेचा अर्ज केला होता’, गांधींबद्दलचे असे विधान केल्यामुळे आता नक्कीच गदारोळ होणार आहे. 

 

rajnath singh saarc marathipizza

 

सावकारांच्या माफीनामा नक्की काय होता, त्यात काही गूढ होते का? याबद्दल सविस्तर माहिती या लेखातून घेऊयात…

===

लेखक : संकेत कुलकर्णी

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.

===

१९२० साली ‘द सेकंड कमिंग’ कवितेत डब्ल्यू बी यीटस ह्या इंग्लिश कवीने एक वाक्य लिहीले आहे – तो म्हणतो

“… The best lack all conviction, while the worst are full of passionate intensity…”.

हुशार आणि विचारवंत मंडळी काहीश्या संभ्रमात आहेत तर बिनडोक मंडळी कसल्यातरी फाजील आत्मविश्वासात आहेत. सध्या भारतातल्या लोकांची अशीच काहीतरी अवस्था झालेली आहे. नाही का? आणि हे का होतंय?

तर कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि सवंग प्रसिध्दीसाठी कोणत्यातरी मोठ्या माणसावर आत्मविश्वासाने चिखलफेक करतो. त्याची पिलावळ त्याचीच भलावण आणि पुढे अनुकरण करते. एकाचे दोन आणि दोनाचे दहा होतात. हे पुढेपुढे वाढतच जातं.

पण जे सुशिक्षित सारासार विचार करणारे लोक आहेत ते हे सर्व आजूबाजूला पाहून अजूनच कोषात जातात. कारण? त्यांना माहीत असतं की जे चाललंय ते चुकीचं आहे. मोठ्या माणसांबद्दल जे काही बोललं जातय ते चुकीचं आहे. हे कुठेतरी बदलायला हवंय असं वाटत असतं. पण हे नुसतं वाटून काय फायदा? त्यांच्याजवळ काहीच पुरावे किंवा अभ्यासाची साधने नसतात आणि बोलणारे तर ह्या अविर्भावात बोलत असतात की जणू तेच नवा इतिहास पुढे आणत आहेत.

पण खरंच असं होत असतं का? तर नाही. जसं हुशारीला मर्यादा असते पण मूर्खपणाला नसते – त्याप्रमाणेच कितीही कळकळीने सांगितलं तरीही खरा इतिहास सांगायला मर्यादा आहेत – पण खोट्या कंड्या पिकवायला मात्र स्काय इज द लिमिट!

सावरकरांचे माफीनामे हे त्यातलंच एक प्रकरण.

संपूर्ण स्थावरजंगम मालमत्तेची जप्ती आणि ५० वर्षांसाठी अंदमानात दोन जन्मठेपा – ह्या शिक्षा संपूर्ण भारताच्या इतिहासात फक्त आणि फक्त ह्या एका माणसाला झालेल्या आहेत. नुसत्या माफीनाम्यांवर हे सगळं परत द्यायला इंग्रज सरकार इतके बिनडोक होते का? बरं इतकी शिक्षा होऊनही हा माणूस खचत नाही. नाउमेद होत नाही. शिक्षा सोसतो.

ती भोगत असताना ह्याच्या मनांत एकच सल असतो की आपल्याला मातृभूमीची सेवा करता येत नाहीये. तुरुंगवासात वेळ वाया जातोय. आयुष्य वाया जातंय कारण ते देशकार्यासाठी कामाला येऊ शकत नाहीये. काहीही करून पुन्हा भारतभूमीत जाणं भाग आहे.

 

Savarkar_Inmarathi

हे ही वाचा – राजू परुळेकर यांचा ‘मी आणि सावरकर’ हा लेख आवर्जून वाचवा असा आहे

अंदमानात इतरही राजबंदी आहेत. देशद्रोह केला म्हणून इंग्रजांनी त्यांनाही अंदमानात पाठवलेले आहे. जर ही सगळी मंडळी इथेच खितपत पडली तर सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व कोण करणार? त्यांना योग्य तो मार्ग कोण दाखवणार?

ह्यासाठी काही अटींवर का असेना पण कसंही करून पुन्हा भारतात जाणे क्रमप्राप्त आहे. इतका सरळ विचार आणि मग त्यासाठी प्रयत्न.

“कारागृहात राहून जी करता येत आहे त्याहून काही प्रमाणात अधिक, प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल, अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे, तर समाजहिताचे दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे”

– असं सावरकर स्वत: ‘माझी जन्मठेप’ मध्ये लिहीतात!

मग हे प्रयत्न कसे करायचे? तर छुप्या क्रांतिकारक मार्गांनी आणि सनदशीर मार्गांनी सरकारला निवेदनं पाठवून. त्यांच्या क्रांतिकारक प्रयत्नाबद्दल सर रेजिनाल्ड क्रॅडॉकने १९१३ मध्येच लिहून ठेवले होते की

“…ते (सावरकर) असे महत्त्वाचे पुढारी आहेत की, हिंदी अराजकवाद्यांचा युरोपियन विभाग त्यांच्या सुटकेसाठी कट करील नि तो कट त्वरेने रचला जाईल…”

पहिल्या महायुध्दाचे पडसाद उमटू लागले होते. ह्याच सुमारास जर्मन युध्दनौका ‘एम्डेन’ही अंदमानभोवती चकरा मारत होती. हा योगायोग नक्कीच नव्हता.

बाहेरून हे प्रयत्न सुरु असताना सावरकरही सरकारला पत्रं लिहून कळकळीने सांगत होते की –

आता काळ बदलतोय. राजबंद्याना जगातली कोणतीही सरकारे तुरुंगात ठेवत नाहीत. मला नाही तर निदान इथल्या इतर राजबंद्यांना सोडा. जर सरकारसाठी मला सोडणे बाकीच्या राजबंद्यांसाठी अडचणीचे ठरत असले तर मला न सोडता बाकी सर्वांना सोडा. माझ्या स्वत:च्या सुटकेइतकाच आनंद मला होईल.

हे ज्यात लिहीलेय ते हे ५ ऑक्टोबर १९१७ चं पत्र (किंवा माफीनामा म्हणूयात) संपूर्ण देतोय. वाचून पहा. कोणत्याही प्रकारे सावरकर असं लिहीत नाहीयेत की “मला सोडा आणि मी तुम्हाला बाकीच्यांची नावे सांगतो किंवा माफीचा साक्षीदार होतो”.

 

 

 

 

 

 

 

काही पढतमूर्खांना ह्यात लिहीलेले मायने “May it please your honour” किंवा “I am your most obedient” हे वाचून आनंदाच्या उकळ्या फुटतील. सावरकर इंग्रजांसमोर लोटांगणं घालत होते किंवा पाय धरत होते असं वाटेल. तसं वाटून घेऊ नये. ही फक्त पत्र लिहायची पध्दत होती.

उदाहरणच द्यायचं झालं तर गांधीनीही कधीही न भेटलेल्या हिटलरला “Dear friend” आणि “I remain your sincere friend” ह्या मायन्याने वर्ध्याहून लिहीलेले पत्र सुप्रसिध्द आहेच. ह्या पत्रामुळे गांधींना ‘नाझी’ ठरवणे जितके हास्यास्पद आहे तितकेच सावरकरांची ही पत्रे किंवा माफीनामे पाहून त्यांना ‘माफीवीर’ ठरवणे आहे.

पुढचा मुद्दा राजकीय कूटनीतीचा. जो ह्या वाचाळवीरांना समजणे मुश्किल आहे.

सिद्दी जौहरच्या वेढ्याच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यालाही अशीच बेसावध करणारी पत्रे पाठवली होती आणि त्याला गाफील ठेवूनच ते वेढ्यातून निसटले. पुरंदरच्या तहावेळीही महाराजांनीही औरंगजेबाच्या अटी – कितीही मनाविरूध्द असल्या तरी – मान्य केल्या.

पण पुढे वेळ आल्यावर त्याला बरोबर इंगा दाखवलाच. मग महाराजांच्या ह्या फक्त दोन पत्रांवरून त्यांचे योग्य मूल्यमापन होऊ शकते का? अजिबात नाही.

महाराज ह्या शाह्या आणि औरंगजेबाच्या डावपेचांना पुरून उरले हाच खरा इतिहास आहे ना?

बरं सावरकरांच्या पत्रांना इंग्रज फसले नाहीत बरं का.

सावरकर भारतातून लंडनला शिकायला यायच्या आधीच भारतातून लंडनला तार गेलेली होती की ह्याच्यापासून सावध रहा आणि बारीक लक्ष ठेवा. मग तुरुंगात आल्यावर काय ते सोडणार आहेत सहजासहजी?

इंग्रज सरकारने सावरकरांना शिक्षेत कोणतीही सूट दिली नाही. एकूण २०-२२ वेळा आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, अन्नत्याग इत्यादी सर्व ‘ॲड ऑन’ शिक्षा सावरकरांनी भोगल्याच होत्या.

नातेवाईकांना सोडाच पण सख्ख्या भावालाही इंग्रजांनी भेटू दिले नाही. ते इंग्रज सरकार काय ह्या माफीनामे आणि निवेदनांनी बधणार होते काय? अजिबात नाही!

अत्यंत महत्वाची बाब : ‘amnesty petition’ म्हणजे माफीनामा नव्हे. ‘माफीनामा’ हे त्या शब्दाचे बरोबर भाषांतर नाही.

तेव्हा बाकी सर्व बाजूला ठेऊन काही प्रश्न विचारात घ्यायला हवेत.

सावरकरांनी तो तथाकथित “माफीनामा” खरंच स्वत: साठी लिहीला होता का? मग इंग्रज सरकारच्या कागदपत्रांत त्याची काय म्हणून नोंद आहे?

इंग्रज सरकारने त्या माफीनाम्यावर काही ॲक्शन घेतली का? सावरकरांना त्याचा काही फायदा झाला का? ह्याचा विचार आपण केलाय का?

हे मुद्दे त्या माफीनाम्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. कारण त्यावरून हे नक्कीच ठरवता येऊ शकतं की इंग्रज सरकारच्या मते सावरकर एक निव्वळ ‘माफीवीर’ होते किंवा सावरकरांना सोडायच्या बदल्यात काही गुप्त वाचाघाटी त्यांच्यात आणि इंग्रज सरकारमध्ये झाल्या होत्या – नाही का?

पण त्यांबद्दल कधीच बोललं जात नाही आणि ही कागदपत्रेही कधीच पहायला मिळत नाहीत.

ह्यातली दोन कागदपत्रं बघा. एक आहे ह्या १९१७ च्या माफीनाम्याचं पत्र दिल्लीला ९ जानेवारी १९१८ रोजी पोहोचल्याची पोच.

 

sawarkar amnesty receipt inmarathi

 

दुसरं आहे ४ मार्च १९१८ चं – ह्यात त्या माफीनाम्याबद्दलच्या नोंदी आणि सरकारच्या त्यावरच्या ॲक्शन्स लिहीलेल्या आहेत.

 

 

पहिला फोटोत हायलाईट केलेला भाग पहा. सरळ लिहीलेय की “… general amnesty may be granted to all persons convicted of political offences…” म्हणजे “…सर्व राजबंद्यांना सर्वसामान्यपणे माफी दिली जावी…”.

ह्यात इंग्रज सरकारही कुठेही असं लिहीत नाहीये की – हा सावरकरांचा स्वत:ला सोडण्याबद्दलचा माफीनामा आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

पुढे हे पण लिहीले आहे की “… It is not proposed to take any action on the petition, and V D Savarkar is merely being informed through the Superintendent, Port Blair that his representation is laid before the Government of India” – म्हणजे

“… ह्या माफीनाम्यावर कोणतीही कारवाई करायची नसून पोर्ट ब्लेअरच्या सुपरीटेंडेंटकडून फक्त सावरकरांना सांगण्यात यावं की त्यांचं पत्रं भारत सरकारकडे दिल्लीला पोहोचलं आहे…”.

बरं हे जेव्हा हे पत्र दिल्लीला मार्चमध्ये चर्चेला आलं तेव्हा त्याचा विषय होता –

“…Petition by V D Savarkar for an amnesty to all political offenders (not necessarily including himself)…”  म्हणजे “… सावरकरांकडून आलेला राजबंद्याच्या सुटकेसाठीचा माफीनामा (ज्यात त्यांना माफी मिळालीच हवी असं नाही)…”.

ह्या इंग्लिश कागदांत सरळ लिहीलंय बरं का – माफीनाम्याचा उद्देश सावरकरांना माफी मिळायलाच हवी आहे असा नाही आणि तरीही माफीवीर कोण – तर सावरकर! हा आपला चांगला न्याय आहे!

ह्याच कागदावर पुढे घ्यायची सरकारी ॲक्शनही लिहीली आहे. काय आहे ती? तर “… no action taken upon it…” म्हणजे “… ह्यावर काहीही ॲक्शन घेतली गेली नाही…”.

ह्यातून काय समजायचं? हे मी सांगणार नाही. आपण सगळे इतके सूज्ञ नक्कीच आहोत.

माझं एकच सांगणं आहे. सध्या ‘सुमारांची सद्दी’ आहे. त्याला बळी पडू नका. त्यांच्या फाजील आत्मविश्वासाकडे दुर्लक्ष करा. येन केन प्रकारेण ते प्रकाशझोतात राहू इच्छितात. त्यासाठी ते विचारवंतांचा आव आणतात आणि कसलेही संदर्भ नसलेली किंवा इतिहासाशी संबंध नसलेली विधानं करतात.

ह्यापासून सांभाळून रहा. एखादी खोटी गोष्ट शंभर वेळा सांगितल्याने खरी ठरतं नसते हे पक्कं लक्षात असू द्या.

अधिक काय लिहीणे. लेखनसीमा.

हे ही वाचा – मातृभूमीसाठी असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?