' बाळ ठाकरे : आधुनिक महाराष्ट्राचा मानबिंदू... आणि शोकांतिका पण !

बाळ ठाकरे : आधुनिक महाराष्ट्राचा मानबिंदू… आणि शोकांतिका पण !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : दिल्लीकर

===

मुंबईच्या मराठी समाजाचे सेनापती ते व्यंगचित्रकार, रॉबिनहूड ते हिंदू हृदयसम्राट अशा विविध ओळखी असलेले बाळ ठाकरे, यांनी तमाम भारताच्या मन-मस्तिष्कावर हुकुमत केली आहे.

महाराष्ट्राबाहेर मराठी माणसाला दोन व्यक्तींबद्दल कुतूहलाने विचारले जाते, पाहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळ ठाकरे!

माझ्या आठवणीतले पहिले बाळ ठाकरे म्हणजे १९९२ ते १९९५ मधले. बाबरी मस्जिद उध्वस्त झाली होती आणि सगळीकडे दंगली पेटल्या होत्या.

शाळांना सुट्ट्या दिलेल्या आणि आम्ही कॉलनीतील मुले बिनधास्त क्रिकेट खेळत होतो. कारण आमचा एरिया शिवसेनेमुळे सुरक्षित होता.

पुढे मला कामानिमित्त मुंबईच्या गल्लीबोळात (जरी-मारी, असल्फा, बेहरामपाडा वगैरे) फिरण्याची संधी मिळाली, तेंव्हा हीच गोष्ट प्रत्येक जण बोलून दाखवत होता, की ‘मुंबई सेनेने वाचवली’!

नेहरूंच्या मर्जीविरुद्ध मुंबई-सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे राज्य मराठी असेल असे आश्वासन खुद्द यशवंतराव चव्हाणांना द्यावे लागले!

 

Brife History Pandit Nehru InMarathi 13
The Hindu

पण पुढच्या काही वर्षात असे घडले नाही. एकीकडे कॉंग्रेसचे राष्ट्रीय राजकारणातले लक्ष्य, आणि दुसरीकडे डावे/समाजवाद्यांच्या वैचारिक लढाईत मराठी अस्मितेचा मुद्दा मागे पडत गेला.

बाळ ठाकरेंनी नेमका हाच मुद्दा ‘मार्मिक’तेने उचलला. हळूहळू बाळ ठाकरे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांची व्यंगचित्रे गाजायला लागली; सभांना प्रचंड गर्दी होऊ लागली.

१९६६च्या दसरा मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ‘व्यंगचित्रां’चे रुपांतर ‘शिवसेने’त झाले!

‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’, ‘राजकारण म्हणजे गजकर्ण’, ‘हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’च्या टाळ्या मिळवणाऱ्या गर्जना केल्या गेल्या.

शिवसेनेचे राजकारण-समाजकारण आपल्याला कदाचित संधिसाधू किंवा बनावट वाटत असेल. पण शिवसेनेच्या कुठल्याही शाखेचा नव्वदीतला इतिहास शोधला तर ह्यातले ८० टक्के समाजकारण सहज कळेल.

१९८०-९० च्या काळात प्रत्येक छोट्या-मोठ्या नगरात, खेड्यांमध्ये बड्या काँग्रेसी घराण्यांची सत्ता असायची.

घरात नेहरू-इंदिरा-राजीव सोबतचे फोटो दर्शनी भागात लावलेले असायचे. अशा वातावरणात शिवसेनेचे युवा नेतृत्व उभे राहत होते.

कुणी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असेल तर डब्बा पोचवणार, रक्तदान करणार, अपघात झाला तर धावपळ करणार, दंगलींच्या काळात ‘बंदोबस्त’ करणार, गणपतीच्या दिवसात तडीपार असणार. आणि एरीयातील सगळ्या महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार तरुणांची विचारपूस करणार;

हे युवा नेतृत्व म्हणजे १९९० च्या दशकातील सेना!

सेनेच्या स्थापनेनंतर मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची एक शाखा उभी राहिली. प्रत्येक शाखेत ५० ते १०० तरुण क्रियाशील झाले.

‘शाखाप्रमुख’ हे वलयांकित पद निर्माण झाले. शाखा आणि शाखेसमोर लागणारा फळा ह्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली.

आजही पुण्या-मुंबईत हे फळे दिसतात, त्यातला मजकूर लक्षणीय असतो. सेनेचे खरे बळ हे त्यांच्या शाखेत आहे.

तक्रार मांडण्या साठीचे व्यासपीठ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, रोजगार मार्गदर्शन केंद्र ते आजकाल सेटिंग केंद्र अशा विविध ओळखी शाखेने जोपासल्या.

राडे, दंगे, हाणामाऱ्या ह्यातून शिवसेनेच्या स्टाइलचा जन्म झाला. प्रस्थापित विचार, राजकारण आणि व्यक्ती ह्यांना प्रथम आव्हान रस्त्यांवरच निर्माण होते; शिवसेनेने ते केले.

 

shivsenapramukh-inmarathi
i.pinimg.com

हिंसा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सारे प्रश्न सेनेच्या ह्या स्टाइलमध्ये गौण होते. मुंबईतील कामगार संघटनांच्या नावाखाली कम्युनिस्टांची वैचारिक अरेरावी, काँग्रेसचे इंदिरा-केंद्रित राजकारण आणि मुंबईत वाढणारी भाईगिरी ह्यांच्या पोकळीत शिवसेना फोफावली.

आणि बाळ ठाकरे मुंबईतील चाकरवर्गाचे, महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाचे आराध्य झाले.

बाळ ठाकरेंची आणि शिवसेनेची आणखी एक उपलब्धी म्हणजे राजकारणातून प्रस्थापित लोकांना बाजूला सारून त्याला खरा लोकतांत्रिक रंग देणे.

शिवसेना आणि लोकतांत्रिक, हे बऱ्याच जणांना न पटणारे आहे. पण हे सत्य आहे.

ज्यावेळी मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच हे प्रस्थापित जमीनदार परिवारातून किंवा ठराविक जातींचे (Dominant Castes) असायचे, अशावेळी शिवसेनेने इतर समाजातल्या आणि गल्लीतल्या युवा ‘नेतृत्वाला’ थेट विधिमंडळात पोचवले.

पानपट्टी वाला, हप्ता वसूल करणारा दादा, हातगाडी ओढणारे, अर्धशिक्षित, अल्पशिक्षित नगरसेवक झाले, मंत्री झाले. शिवसेनेचे हे उभरते नेतृत्व जातीपातीच्या गणिताच्या पलीकडे जाणारे होते.

समाजातील बिनचेहऱ्याच्या तरुणांमधले नेतृत्व बाळ ठाकरेंनी शोधले होते. ह्या नेतृत्वाने पुढे काय केले, हा प्रश्न वेगळा आहे, पण मुळात महाराष्ट्राच्या नेतुत्वाचा पिंड बदलला तो ठाकऱ्यांमुळे आणि शिवसेनेमुळे.

शिवसेनेचे सुरुवातीचे राजकारण जाणून घ्यायचे असेल तर दिल्लीतील आम आदमी पार्टीचा आलेख बघावा लागेल.

आपचे दिल्लीतील राजकारण हे शिवसेनेशी तंतोतंत जुळते. वैचारिक रिक्तता, वेगवेगळ्या क्षेत्रातून एकत्र आलेला जमावडा, उद्देश्यांबद्दल गोंधळलेले कार्यकर्ते, अरे ला कारे करायची घाई, रस्त्यावरचे राडे ह्यात तंतोतंत साम्य.

ह्यात वेगळेपणा आहे, सेनेच्या खास अशा स्टाइलचा, आणि नंतर ओघाने आलेल्या हिंदुत्वाचा.

 

balasaheb-thakrey-inmarathi
anielpezarkar.wordpress.com

बाळ ठाकरेंची लोकप्रियता अभूतपूर्वच होती. आधुनिक महाराष्ट्रात एवढा लोकप्रिय नेता दुसरा झालाच नाही.

त्यांच्या एवढी प्रचंड अंत्ययात्रा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कुणाचीही निघाली असेल किंवा होईल असे वाटत नाही.

बाळ ठाकरेंची तेवढीच लोकप्रियता मिडिया आणि पत्रकारांमध्ये पण होती. येथे पण दिल्ली आणि बाळ ठाकरेंमध्ये एक साम्य आहे.

दिल्लीमध्ये ज्याला आपण ल्युटनस मिडिया म्हणतो त्यांचा एक वर्ग आहे. ह्या वर्गाला नेहरू-गांधी परिवार, नेहरूवियन विचारासरणी बद्दल अतीव लोभ, आणि संघ परिवाराबद्दल प्रचंड राग आहे.

ह्या वर्गाने नेहरू-गांधी परिवाराबद्दल एक भलेमोठे वलय निर्माण करून ठेवले आहे.

असाच एक वर्ग मुंबईत किंवा मराठी मिडियामध्ये पण आढळतो. फरक एवढाच आहे की ह्या वर्गाला बाळ ठाकरेंच्या विचारधारेबद्दल लोभ नव्हता ना त्यांच्या विरोधी पक्षाबद्दल राग.

पण बाळ ठाकरेंचे प्रत्येक वाक्य उचलून धरणे; त्यांचा पेहराव, सिगारेट, बोलणे ह्याचे कौतुक; मातोश्रीच्या भेटीच्या अनेक दंतकथा उधृत करत राहणे; अगदी शेवटच्या दिवसातील चिकन सूप आणि तेलकट वडे ह्यावर पण स्टोरीज केल्या गेल्या.

बऱ्याच पत्रकारांचे करियर हे केवळ बाळ ठाकरे ह्या एका व्यक्तीच्या भोवती घडले. पण ह्या नेत्याची शोकांतिका आहे ती ह्या पुढे.

मुंबईतील सत्ता, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रियता, देशभर असलेली उत्सुकता ह्याचा एका थ्रेशोल्डच्या पलीकडे कुठलाही सकारात्मक फायदा ना बाळ ठाकरेंना झाला, ना सेनेला, ना महाराष्ट्राला.

एवढी लोकप्रियता असूनही शिवसेनेचा विधानसभेतला उच्चांक केवळ ७३ (१९९५) आणि लोकसभेतला केवळ १८ (२०१४) च्या पुढे गेला नाही.

ज्या दशकांमध्ये देशात राष्ट्रीय पक्षांचे नरेंद्र मोदी, दिग्विजय सिंह, शिवराज सिंह चौहान, डॉ रमण सिंह, वाय एस राजशेखर रेड्डी, अशोक गेहलोत, वसुंधरा राजे;

अथवा प्रादेशिक पक्षांचे चंद्राबाबू नायडू, एच डी देवेगोड्डा, मुलायम-अखिलेश, मायावती, ममता, नवीन पटनाईक, नितीश कुमार ह्यांच्या सारखे नेतृत्व उभे राहिले;

ज्यांनी केवळ एकट्याच्या जीवावर सत्ता खेचून बहुमतच मिळवले नाही, तर ५-१० वर्ष अनभिषिक्त सत्ता गाजवली; अशावेळी बाळ ठाकरेंचे नेतृत्व केवळ मातोश्री-मुंबई-मराठी यामध्ये अडकून पडले.

शिवसेनेची सुरुवात मराठी आणि मराठी माणसांच्या हक्कांच्या रक्षणार्थ झाली. नंतर त्याला हिंदुत्वाच्या रुपात भव्यताही मिळाली. पण शेवटी ठाकरे प्राइवेट लिमिटेड, मातोश्रीचे निहित हक्क (vested interest) आणि मुंबई कोणाची ह्या प्रश्नाभोवती घुटमळत राहिली.

१९८२ मध्ये त्यावेळी केवळ महासचिव असलेल्या राजीव गांधीनी एयरपोर्टवर मुख्यमंत्री अंजैय्या यांचा चारचौघात अपमान केला होता. त्यावरून आंध्रात रण पेटले आणि एन टी रामारावांनी तेलुगु ‘आत्मगौरव’ यात्रा काढली.

तेलुगु देसम पक्षाने इंदिरा गांधीच्या हत्येनंतरच्या १९८४ निवडणुकीत सहानभुतीच्या लाटेमध्येही आपला तेलुगु गढ शाबूत ठेवला होता. तेलुगु रक्षणापासून सुरू झालेली ही चळवळ आज माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे प्रतिक झाली आहे.

सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ह्यांची ओळख तंत्रज्ञान पूरक म्हणून निर्माण झाली. एवढेच नाही तर दिल्लीच्या राजकारणात पण चंद्राबाबूंनी आपले एक स्थान निर्माण केले आहे.

 

Regional-Leaders-inmarathi
24*7news.com

शिवसेना चुकली ती इथे. मराठीचा मुद्दा जरी योग्य असला तरी त्याच्या प्रकटीकरणाची आणि प्रश्नाचे उत्तर शोधून पुढचा मुद्दा हातात घेण्याची कुवत सेनेने कधीच निर्माण केली नाही.

सेनेने आपली पूर्ण शक्ती आणि सर्जनशीलता, मराठीचा मुद्दा कसा गंभीर आहे हे सांगून भावनेचा खेळ करण्यातच खर्ची केली.

मिडियामधल्या आपल्या ताकदीवर बाळ ठाकरेंनी मथळे बरेच दिले, ‘बांडगुळ’ पत्रकारांनी त्यावर लेखही बरेच रखडले. पण त्यात content आणि narrative ह्या दोन्हींचा अभाव होता.

‘एकदा सैन्य बाळ ठाकरेंच्या हातात देऊन बघा’ अशा तावातावाने गप्पा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मारलेल्या आहेत, लहानपणापासून ऐकल्या आहेत.

पण ह्याच शिवसेनेच्या हातात ‘सुरक्षित’ असलेल्या मुंबईतील मराठी माणसाची लढाई एयरपोर्ट-मॉल मधल्या क्लास थ्री-फोर नौकऱ्या, बँकेतील क्लर्क, वडा पावची गाडी आणि कल्याण-डोंबिवली ते वसई-विरार एवढीच मर्यादित झाली आहे.

रस्त्यांवर राडे करून शिवसेना विधिमंडळात, मंत्रिमंडळात पोचली. पण पुढे काय ह्याचे उत्तर लाल किल्ल्यावर भगवा फडकावण्याच्या आणि संसदेत मराठीत शपथ घेण्याच्या पलीकडे गेले नाही.

रणनीतीक गोंधळ दिसतो तो येथे. रस्त्यांवर राडे करून प्रश्न जरी मांडता येत असला तरी त्याचे उत्तर विधिमंडळात शोधण्याचे कसब सेनेच्या स्टाइल मध्ये बसणारे नव्हते.

सैनिकांचे कार्यकर्त्यामध्ये आणि कार्यकर्त्यांचे राज्यकर्त्यामध्ये रुपांतर करण्याची व्यवस्था सेनेने निर्माणच केली नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरचे सैनिक राज्यकर्ते म्हणून मिरवायला लागले आणि दिल्लीत आलेले राज्यकर्ते सैनिक झाले.

दिल्लीतून महाराष्ट्राकडे बघतांना आपला खुजेपणा लगेच जाणवतो.

मुलायम सिंह यादव, मायावती, लालू प्रसाद यादव, शरद यादव, थांबिदुराई, डेरेक ओब्रायन, तथागत सत्पती, जय पांडा, मैत्रेयन सारखे नेते जेंव्हा काही बोलतात तेंव्हा दिल्ली त्याची दखल गांभीर्याने घेते.

पण तुलनेत महाराष्ट्रचा राजकीय खुजेपणा उघडा पडतो. ह्याला एनसीपीपण अपवाद नाही.

आज बाळ ठाकरेंना जाऊन ६ वर्ष झाली. बाळ ठाकरे आणि शिवसेना हे दोन्ही विषय मराठी माणसाला हळवे करणारे आहेत. पण भावनेच्या पलीकडे जाऊन त्याचे महत्त्व व अवगुण आपल्याला मान्य करायला हवेत.

जातीपातींच्या पलीकडचे नेतृत्व उभे करणारे, शाखा-आधारित पक्ष उभे करणारे कुशल संगठक आणि प्रस्थापित राजकारणाच्या अरे ला कारे करणारे बाळ ठाकरे ‘पुरोगामी महाराष्ट्राने’ केवळ ‘हिंसक’ आणि ‘अर्वाच्य’ म्हणून नाकारले.

तर सेनेचा वैचारिक गोंधळ, राजकीय उद्देश्यांचा खुजेपणा आणि रणनीतीक अज्ञान याकडे ‘मराठी माणसाने’ केवळ मराठी म्हणून दुर्लक्ष्य केले. ह्यासारखी शोकांतिका आधुनिक महाराष्ट्राची दुसरी नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “बाळ ठाकरे : आधुनिक महाराष्ट्राचा मानबिंदू… आणि शोकांतिका पण !

 • November 23, 2018 at 11:37 am
  Permalink

  बाळासाहेबांवरील लेख वाचला परंतु बाळासाहेबांच्या सुरवातीच्या काळात त्यांना उभारी देणारे त्यांना घडवणारे नाशिकचे कै. वि. मा. दी. पटवर्धन यांचा उल्लेख आपल्या लेखनात पाहीजे होता.

  Reply
 • November 29, 2018 at 6:54 pm
  Permalink

  tas Pan brobar Ahe as mahnta yennar nahi

  Reply
 • January 24, 2019 at 7:43 pm
  Permalink

  Not agree with “जातीपातींच्या पलीकडचे नेतृत्व”. Whole Maharashtra knows what was his stand for “Marathwada Vidyapeeth Naamantar or Namvistaar Aandolan”. Nor he neither any other political leader did anything in the name of Shivaji, everyone used Shivaji for politics. Its pity to see Shiv-Vada, Shivneri, Shivshahi etc things.

  Reply
 • August 24, 2019 at 9:46 pm
  Permalink

  पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हे हुशार आणि विचारी लोकसंख्या असलेलं राज्य आहे. इथे राजकारणात वैयक्तिक यश मिळवणं हे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल इ. सारख्या राज्यांप्रमाणे सोपं नाही. या राज्यांमधील बहुतांश लोकसंख्या ही अशिक्षित आणि अविचारी आहे. जो स्वताची हवा करेल, बोलबच्चन करेल तो प्रसिद्धीस पावेल आणि राजकारणात घवघवीत यश संपादन करेल असे घडत आले आहे. महाराष्ट्रात तुलनेने उलट परिस्थिती आहे. थोडा अभ्यास वाढवा म्हणजे गोष्टी लक्षात येतील.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?