' काशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : "त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी...!"

काशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

=== 

लेखक : अनुपम कांबळी

===

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगापासून मला या लेखाची सुरुवात करायची आहे. अप्रतिम अशा त्या शेवटच्या प्रसंगात दिग्दर्शक अभिजित देशपांडेने सांगितले आहे,

काळाची पाने आपण पुन्हा परतायची म्हटली तर आपल्याला काय दिसत…? डॉ. काशिनाथ घाणेकर हे रंगभूमीवर आले नसते तर ते कदाचित उत्कृष्ट डेंटिस्ट म्हणून आपला उदरनिर्वाह अतिशय उत्तमरीत्या चालवू शकले असते…

आपल्या वडीलांचे आवडते अपत्य असते… आपल्या पत्नीचा आदर्श पती ठरले असते… अगदी आपल्या मुलीचा आदर्श पिता देखील असते पण… पण… ते डॉ. काशिनाथ घाणेकर नसते…!

 

kashinath1-inmarathi

 

आयुष्यातील उलथापालथीनंतर, विक्षिप्त स्वभाव असूनही मिळालेल्या यशापयशानंतर त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात जो आपला कायमस्वरूपी ठसा उमटविला… तो त्यांना कधीच उमटवता आला नसता…!!

मराठी रंगभूमीच्या इतिहासाचे एक सोनेरी पान, जे त्यांनी केवळ स्वतःसाठी राखून ठेवले आहे, ते त्यांच्या वाटेला कदापि आले नसते. नव्हे… त्या पानावर त्यांचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेलेच नसते…!!!

अगदी थोडक्यात सांगायचे तर डॉ. काशिनाथ घाणेकर हे तुमच्या-आमच्या प्रमाणे सामान्य माणसाच आयुष्य अगदी सुखाने जगू शकले असते पण त्याच वेळी ते इतिहास घडवू शकले नसते.

इतिहास घडवता येतो… इतिहास बदलता येतो… इतिहास नव्याने लिहिता देखील येतो… परंतु इतिहास वाचण्यापेक्षा आणि इतिहास पाहण्यापेक्षा आपण इतिहास घडवणारे व्हाव, ही काळाची सर्वात मोठी गरज आहे. डॉक्टरांनी तेच केल…!

राज ठाकरे आपल्या भाषणात नेहमी सांगत असतात की, मला दुसरं काही जमत नाही म्हणून मी राजकारण करत नाही तर राजकारण ही माझी पॅशन आहे. आज राज ठाकरे राजकारणात नसते तर ते कदाचित आंतरराष्ट्रीय किर्तीचे व्यंगचित्रकार देखील झाले असते.

त्यांना स्वतःविषयी नेमके काय सांगायचे आहे ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहायचे असेल तर ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा.

कोणतीही व्यक्ती ही गुण-अवगुणांनी बनलेली असते पण काही व्यक्तिमत्वे ही त्या-त्या क्षेत्रासाठीच जन्माला आलेली असतात. त्यांच्यातील गुण-अवगुण त्यांच्या कारकिर्दीवर चांगले-वाईट परिणाम जरूर करतात.

पण सरतेशेवटी त्या व्यक्ती आपण निवडलेल्या क्षेत्रावर स्वतःचा असा काही ठसा उमटवतात की त्यांची कामगिरी पाहून सगळे जग स्तिमित होते. मला वाटत डॉ. काशिनाथ घाणेकर आणि राज ठाकरे या दोन्ही व्यक्तींचा समावेश त्या श्रेणीमध्ये होतो.

पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे हे इतर सर्व नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने सरस वाटतात. त्यांच्याकडे एका नेत्याला आवश्यक असलेली उत्कृष्ट वक्तृत्वशैली आहे, आपल्या सडेतोड भाषणाने लोकांच्या भावना पेटवण्याची अफाट क्षमता आहे.

राज्यातील प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती आहे, विकासाची दूरदृष्टी आहे, फक्त दूरदृष्टीच नव्हे तर नाशिकचा विचार करता ते व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्याची धमक देखील त्यांच्यात आहे.

त्यासाठीच त्यांनी स्वतःच्या ताकदीवर नवीन पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवली आणि तेही फोडाफोडीचे राजकारण न करता…! मात्र आज तोच पक्ष कुठेतरी चाचपडल्यासारखा वाटतोय. त्याला कारणीभूत आहेत राज ठाकरेंचे उपजत स्वभावगुण…!!

सकाळी उशीरा उठणे, अनावश्यक संताप बाळगणे, एखाद्या नेत्याचा अथवा कार्यकर्त्याचा चारचौघात अपमान करणे, जुना कार्यकर्ता न टिकवणे इत्यादी अनेक स्वभावदोषांमुळे हा नेता काळाच्या ओघात खुप मागे पडलाय. पण त्यांच्यातील क्षमतेवर कुणी विरोधक देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाहीत.

अगदी बाळासाहेबांचा वारसा उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेच अधिक समर्थपणे चालवू शकले असते! उद्धवना बाळासाहेबांनी राज्याच्या तळागळात उभारलेली रेडीमेड संघटना उपलब्ध करून दिली, असा देखील एक मतप्रवाह आपल्याला सभोवताली पाहायला मिळतो.

बाळासाहेबांच्या पश्चात उद्धवना संघटना रेडीमेड मिळाली हे सांगताना त्यांनी बाळासाहेबांचा तो कडवा शिवसैनिक तितक्याच तत्परतेने व आपुलकीने जपला आहे, या गोष्टीचा कुठेतरी अशा मंडळींना विसर पडतो.

उद्धवनी वडिलांकडून वारसा म्हणून मिळालेली संघटना फक्त टिकवलीच नाही तर अनेक ठिकाणी ती वाढवली सुद्धा आणि मोदींच्या त्सुनामीत ते मोठ्या धैर्याने पाय रोवून उभे राहिले, ही वस्तुस्थिती आहे.

राजकीय नेता म्हणून उद्धवपेक्षा अनेक गोष्टीत कितीतरी पटीने वरचढ असलेल्या राज ठाकरेंना त्यांचा काहीसा तुसडा स्वभाव पाहता बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक टिकवता आला असता का, या प्रश्नाच उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असच द्याव लागेल.

 

raj-thakre-inmarathi

 

मला ‘उद्धव विरुद्ध राज’ या वादावर भाष्य करायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की राज ठाकरेंच्या स्वभावात अनेक दुर्गुण असतीलही पण ते व्यक्तिमत्व हे राजकारणासाठीच जन्माला आले आहे. आणि तीच तऱ्हा डॉ. काशिनाथ घाणेकरांची होती…!

काशिनाथ घाणेकरांनी बी.डी.एस. पदवी युनिवार्सिटीचे ‘गोल्ड मेडलिस्ट’ म्हणून मिळवली. मुंबईसारख्या शहरात त्यांना दातांचा दवाखाना टाकून बक्कळ पैसा कमावता आला असता.

एकीकडे करीयरचा सुवर्णकाळ डॉक्टरांची वाट पाहत होता. मात्र त्यांना त्या सोनेरी वाटेपेक्षा रंगभूमीचा काटेरी मार्गच अधिक आकर्षित करत होता. त्यांच्यातील कलाकाराने डॉक्टरवर केव्हाच मात केली होती. त्यामुळेच त्यांची पाऊले प्रॅक्टिस सोडून अगदी अनाहूतपणे रंगभूमीकडे वळू लागली.

त्याला कारण देखील तसच होत. डॉक्टरकी हा घाणेकरांसाठी फक्त ‘पेशा’ होता, मात्र रंगभूमी हा त्यांचा ‘आत्मा’ होता. एखादा माणूस आपला ‘पेशा’ बदलू किंवा सोडू शकतो परंतु ‘आत्मा’ सोडून राहू शकत नाही.

त्यासाठीच रंगभूमीच्या प्रेमात आकंठ बुडालेला हा डॉक्टर आपला दवाखाना सोडून इकडे रंगभूमीवर प्रोम्पटिंगसारखी क्षुल्लक कामे अगदी उत्साहाने करत होता. रंगभूमी हीच त्याची पॅशन होती आणि त्यावरील कोणतेही काम तो अगदी आत्मीयतेने करायचा.

संभाजीच्या ऑडिशनसाठी सहा फुट उंची हा क्रायटेरीया अभिनय नसानसात भिनलेल्या डॉक्टरांना कदापि मान्य नव्हता. “संभाजी म्हणजे बेदरकार…! नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक की ज्याची जरब खुद्द औरंगजेबलाही बसेल…!”

डॉक्टरांचा हा क्रायटेरीया मास्टर दत्ताराम यांनी “हा संताप… ही बेफिकरी… हाच तुमचा संभाजी…” असे म्हणून मान्य करत त्यांना रंगभूमीवरील पदार्पणाची संधी उपलब्ध करून दिली.त्यानंतर ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या पदार्पणाच्याच नाटकात डॉक्टरांनी साकारलेल्या ‘संभाजी’ने अक्षरशः इतिहास घडवला.

त्यांचा अभिनय पाहताना “हा पोरगा भल्याभल्यांची दुकाने बंद करणार” हे मास्टर दत्ताराम यांच्या तोंडी आलेले आपसूक उद्गार होते. “आजपासून काशिनाथ पर्व सुरू झालंय” अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांची केलेली मनमोकळी प्रशंसा यावरून हे पदार्पण किती दमदार असेल याची आपल्या सर्वांनाच कल्पना येईल.

एखादा राजमार्ग सोडून आपण स्वतःची पॅशन म्हणून काटेरी मार्गाची निवड करण आणि त्या पॅशन म्हणून निवडलेल्या काटेरी मार्गावर देखील अगदी पदार्पणातच घवघवीत यश मिळवण ही खरोखरच स्वप्नवत वाटचाल असते. याबाबतीत देखील डॉ. काशिनाथ घाणेकर आणि राज ठाकरे या दोघांमध्ये कमालीचे साम्य आढळते.

राज ठाकरेंनी पक्षस्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे १३ आमदार निवडून आणण्याची किमया करून दाखवली होती. तर डॉ. काशिनाथ घाणेकरांनी डॉक्टरकीचा पेशा सोडून रंगभूमीवर पदार्पण करत पहिल्याच नाटकाचे शंभर प्रयोग अगदी हाऊसफुल म्हणून यशस्वी करून दाखवले.

यश म्हणजे यापेक्षा आणखीन वेगळ काय असत…? एका हाडाच्या कलाकाराला तरी आणखीन काय वेगळ हव असत…??

डॉक्टरांचा स्ट्रगलचा काळ आता संपला होता आणि त्यांनी पॅशन म्हणून निवडलेल्या क्षेत्रात ते यशाच्या उत्तुंग शिखरावर होते. वसंत कानेटकरांचा सल्ला ऐकला असता तर एव्हाना ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे हजार प्रयोग करून डॉक्टर मराठी रंगभूमीचा इतिहास देखील अगदी सहजरीत्या बदलू शकले असते.

पण इथेच तर खरी मेख आहे. जेव्हा यश येत तेव्हा ते षडरिपूना सोबत घेऊन येत. फार थोड्या लोकांना यशाची ही धुंदी सांभाळता आली आहे.

अगदी मोजक्या शब्दात सांगायचं तर ज्यांना यशाची ही नशा सांभाळता आली त्यांचा सचिन तेंडुलकर झाला. जे यशाच्या नशेत वाहवत गेले ते विनोद कांबळी म्हणून इतिहासजमा झाले. डॉक्टरांना हे यश काही पचवता आले नाही.

या चित्रपटात सुलोचना दीदींच्या तोंडी एक अप्रतिम वाक्य आहे- “नट होण्याकरता जे कसब अंगी असावं लागतं, त्यापेक्षा जास्त त्या नटाला सांभाळून घेण्याकरता लागतं.” काशिनाथ आपल्यातील नटाला कधीच सांभाळून घेऊ शकले नाहीत.

अहंकार, उद्दामपणा, हेकेखोरपणा, मुजोरपणा, घमेंड, बेबंदशाही, दारू-सिगारेटची नशा, बाईची चटक, मग्रुरी, इत्यादी यशाचे बाय-प्रॉडक्टस असतात.

काही ठराविक अपवाद वगळले तर प्रत्येक यशस्वी माणसामध्ये यापैकी एक वा अधिक गुण कमी अधिक प्रमाणात आढळून येतात.डॉक्टरांमध्ये यातील सर्वच गुणांचा प्रमाणापेक्षा जास्तच भरणा झाला होता.

साखर अधिक झाली म्हणून चहा भिरकावून देणे असेल, प्रयोगाच्या वेळी दारू पिणे असेल किंवा सोबत काम करणाऱ्या स्त्री कलाकाराने योग्य जागी डोके ठेवले नाही म्हणून भर रंगमंचावर तिच्या पोटाला चिमटा काढणे असेल या सर्व गोष्टी त्यांनी यशाच्या धुंदीतच केल्या.

या गोष्टींमुळे आपल्या स्वप्नवत अशा प्रवासाला कायमस्वरूपी ग्रहण लागू शकते याची कल्पनाच त्यांना आली नव्हती असेही नाही. त्यांना सर्व गोष्टी कळत होत्या पण कळल्या तरी वळवता येत नव्हत्या.

मी डॉ. काशिनाथ घाणेकर आहे… मी या रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार आहे… त्यामुळे मी कसाही वागलो तरी समोरच्याला खपवून हे घ्यावच लागेल… हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव बनला होता.

प्रभाकर पणशीकरांच्याच भाषेत सांगायचं झाल तर “तुझं म्हणजे वर्गातल्या सर्वांत ब्रिलियंट मुलासारखं आहे… जो मस्ती हे दाखवण्यासाठी करतो की आपलं कधीच कुणी काही वाकडं करू शकत नाही.”

मात्र त्यामुळे डॉक्टरांच आणि मराठी रंगभूमीच कधीही भरून न येणार नुकसान झाल. आपल्या बिनबोभाट वागण्याने “काशिनाथ घाणेकर ही मराठी रंगभूमीला लागलेली कीड आहे” अस म्हणायची वेळ त्यांनी निर्मात्यांवर आणली.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे व्यक्तिगत आयुष्य देखील त्यांच्या रंगमंचावरील भूमिकांप्रमाणे वादळी होते. डॉक्टर असलेल्या इरावतीने डॉ. घाणेकर हे पेशाने डॉक्टर असल्याने त्यांच्याशी लग्न केले पण डॉक्टरांचे मन कधी आपल्या पेशात रमलेच नाही.

त्यांनी नेहमीच रंगभूमीचा विचार केला. त्यांच्या या वेडाला इरावतीने आपल्या परीने विरोध केलाही असेल पण कधी टोकाचे भांडण केले नाही. स्त्री-रोग तज्ञ असलेल्या इरावतीने एकहाती संसाराची सगळी जबाबदारी पार पाडली.

डॉक्टरांना वेगवेगळ्या बायका उपभोगण्याची चटक लागली होती. त्याची इरावतीला माहिती देखील होती. पण तिने मोकळ्या मनाने त्यांच्या या सवयीचा स्वीकार केला.

“दुसऱ्या बाईसोबत गेलेला माणूस रात्री घरी परत येतो पण नाटकात वाहवत गेलेला माणूस पुन्हा परत येत नाही” या वाक्यातून तिच्या मनाच्या विषण्णतेची आपल्याला कल्पना येईल.

डॉक्टर दुसऱ्या स्त्री-सोबत शय्यासोबत करतात ही गोष्ट जरी इरावतीने मान्य केली असली तरी, कांचन सोबतच्या प्रेमाची डॉक्टर तिच्या समोर कबुली देतात तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते. यात इरावती समस्त स्त्री-जातीचे प्रतिनिधित्व केले आहे.

एका स्त्री-साठी तिचा नवरा हाच सर्वस्व असतो. आपण सोबत असताना त्याने परस्त्रीकडे पाहू नये अशी तिची इच्छा असते पण काही कारणास्तव नवरा हाताबाहेर गेलाच तर ती रागावते. पण त्या सर्व गोष्टींची कालांतराने सवय झाल्यानंतर त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करते.

त्याची इतर बायकांसोबत असलेली शय्यासोबत देखील सहन करते. अनेकदा प्रतिष्ठित किंवा उच्चपदस्थ व्यक्तींच्या बायकांना ही सल सहन करावीच लागते.

मात्र त्याच रंगेल नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी एखादी स्त्री जेव्हा बायको म्हणून प्रवेश करू पाहते… तिची सवत बनू पाहते… तिची त्याच्या आयुष्यातील जागा घेऊ पाहते… तेव्हा मात्र तिचा अहंकार दुखावतो. त्यावेळी कोणतीही बायको खऱ्या अर्थाने बैचैन होते.

घरात बायको असताना नवऱ्याने अनेक बायकांसोबत शय्यासोबत करण आणि त्याने दुसऱ्या कोणत्या स्त्रीला आपली बायको म्हणून दर्जा देऊ पाहण, या दोन गोष्टीमध्ये जी पुसटशी रेषा असते ती डॉ. इरावतीनी या चित्रपटात अधिक गडद करून दाखवली आहे.

एकीकडे डॉक्टरांसारखा बेभान नवरा मिळालेला असताना दुसरीकडे तिला मुलबाळ होत नव्हते. त्यात करून डॉक्टरांना मुलांची आवड असल्यामुळे तिचा जीव अधिकच कासावीस होत होता. तेही दुःख इरावतीने निमुटपणे सहन केले.

जेव्हा डॉक्टरांचे वागणे अगदीच आवाक्याबाहेर गेले तेव्हा मात्र तिने त्यांची साथ सोडली. दुसऱ्यासोबत लग्न करून नवीन संसार सुरु केला. त्यात पुढे ती सुखी सुद्धा झाली. मात्र डॉक्टरांचा तिने कधीच द्वेष केला नाही.

डॉक्टरांसारख्या रंगेल, बेभान परंतु त्याच वेळी कर्तुत्ववान अशा पुरुषासोबत संसार करण म्हणजे साक्षात वादळासोबत संसार करण्यासारख असतं. डॉक्टरांसोबत दुसर लग्न करू पाहणाऱ्या कांचनला देखील इरावतीने याची अगोदरच कल्पना दिली.

कांचन ही खर तर सुलोचना दीदींची मुलगी…! एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा तिला वारसा मिळाला होता. डॉक्टर तिच्यासाठी काकांच्या वयाचे होते. त्यांच्या कुटुंबाला ती ओळखत होती.

डॉक्टरांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मध्ये साकारलेल्या संभाजीच्या ती प्रेमात पडली. डॉक्टरांचा अभिनय व त्याला प्रेक्षकांकडून मिळणारी टाळ्यांची दाद तिला प्रचंड आवडत होती. ती त्यांची निस्सीम चाहती बनली होती आणि त्या आकर्षणाचेच रुपांतर प्रेमात झाले होते.

‘नाथ हा माझा’ या कांचन घाणेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकावरच हा सिनेमा बेतला आहे. त्यात त्यांनी लिहून ठेवले आहे-

“डॉक्टरांचे निळे टपोरे डोळे आरपार वेध घ्यायचे. त्यांचे एखाद्या लहान मुलासारखे खळाळून हसणे पाहत रहावेसे वाटे. त्यांचा भावदर्शी चेहरा मोहित करायचा.

पण ज्याच्यासाठी मी वेडावून जावे असे त्यांच्याजवळ विशेष असे काय होते…? घरीदारी, कॉलेजमध्ये त्यांच्याहूनही देखणी मंडळी मी पाहत होते. शिवाय ते सर्व माझ्या बरोबरीच्या वयाचे होते, अविवाहित होते. मग डॉक्टरांचेच इतके आकर्षण मला का वाटत होते…?

आणि मग एकच उत्तर डोळ्यांसमोर येत होते – ‘डॉक्टरांचे कलंदर व्यक्तिमत्व’, ‘सो व्हाट?’ अस बेदरकारपणे विचारणारा त्यांचा बेधडक स्वभाव. त्यांच्या रांगडेपणाने, धूसमुसळ्या स्वभावाने मला मंत्रमुग्ध केले होते. माझ्या उपजत आवडींना डॉक्टरांची ही सगळी स्वभाव वैशिष्ठ्ये आकर्षून घेत होती.”

कांचन घाणेकरांनी आपल्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिली तीच खरी प्रेमाची भाषा आहे. प्रेमाचे माहात्म्य याअगोदरही आपण अनेक वेळा ऐकले असेल पण एखाद्या व्यक्तीच्या ठराविक गुणांवर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा जात, धर्म, वर्ण, वय या गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात.

कांचन दिसायला लोभस होती. तिच्यापाशी रसरशीत असे तारुण्य होते. सुलोचना दीदी व भालजी पेंढारकरांची पुण्याई उराशी होती . अशा मुलीला एका वयस्कर, दारूच्या नशेत वाया गेलेल्या, बेभान आणि मुख्य म्हणजे इरावतीसारख्या सर्वगुणसंपन्न स्त्रीसोबत नीट संसार करू न शकलेल्या डॉक्टरांशी लग्न करावेसे का वाटले असेल?

हीच तर खरी प्रेंमाची किमया होती. कांचन व काशिनाथच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा प्रभावच इतका जास्त होता की काशिनाथ विवाहित होता आणि आपल्या काकांच्या वयाचा होता, या दोन्ही गोष्टीचा कांचनच्या त्यांच्याप्रती असलेल्या प्रेमावर काहीच फरक पडला नाही.

तिने आपल तारुण्य, सौंदर्य आणि अगदी आपल सर्वस्व डॉक्टरांवर उधळून दिल. तिला फक्त त्यांचा सहवास हवा होता. बाकी कोणतीही गोष्ट तिच्यासाठी महत्वाची नव्हती. दुसरीकडे डॉक्टर सुद्धा कांचनसाठी दारूची सवय सोडायचा आटोकाट प्रयत्न करीत होते.

जेव्हा आईकडून कांचनच्या लग्नाला कडाडून विरोध झाला तेव्हा भालजीनी एक वर्ष दूर राहण्याची कांचनला अट घातली. त्या दोघांवरील आदर व प्रेंमाखातर तिने ती मनापासून स्वीकारली.

मात्र ही गोष्ट जेव्हा ती डॉक्टरांना पटवून देण्यासाठी गेली तेव्हा त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला. या वर्षभरात आपली तरुण प्रेयसी हातातून निसटली तर या भीतीने त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी हॉटेलमधील सगळ्या लोकांसमोर कांचनचा पाणउतारा करून तो संताप बोलून देखील दाखवला.

मात्र जेव्हा एक स्त्री पुरुषावर मनापासून प्रेम करते, त्याच्यावर आपल सर्वस्व उधळून टाकते, तेव्हा या जगातील कोणतीही गोष्ट तिच्या मार्गात अडथळा बनू शकत नाही. डॉक्टरांनी अनेक बायका उपभोगल्या असतील पण कांचनच्या प्रेमाची खोली त्यांना समजू शकली नव्हती.

त्यानंतर आई लग्नाला पाठिंबा देत नाही म्हणून तब्बल दहा वर्षे कांचन एकाकी जीवन जगली पण तिच्या मनातील डॉक्टरांच्या जागेला तिने अन्य कुणाला साधा स्पर्श देखील करू दिला नाही. एका डॉक्टरांखातर तिने आपल सगळ तारुण्य अगदी हसत-हसत उधळून दिल.

त्यांचा विक्षिप्त स्वभाव, बेभानपणा आणि बेवडेगिरी माहिती असूनही…! तिच्या हट्टापुढे नमते घेत अखेर सुलोचना दीदीनीच तिच लग्न डॉक्टरांसोबत लावून दिल. कांचनची दहा-बारा वर्षांची तपश्चर्या फळाला आली होती.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी रंगभूमीकडे कधीही उत्पन्नाचे किंवा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिले नाही.

त्यांच्यासाठी मराठी रंगभूमी हाच प्राण होता. रंगभूमीवर भूमिकेत वावरत असताना प्रेक्षकांनी मारलेल्या शिट्ट्या व टाळ्या हेच त्यांचे टॉनिक होते. त्यासाठीच ते नाटकांचे प्रयोग करायचे. मराठी नाटकांच्या थिएटरमध्ये यापुर्वी गाण्यांसाठी शिट्ट्या मारल्या गेल्या होत्या पण एखाद्या नटाच्या डायलॉगसाठी पहिली शिट्टी वाजली ती डॉक्टरांसाठीच….!

डॉक्टरांनी हिंदी चित्रपटसृष्टीत राजेश खन्नाचा प्रभाव असलेल्या काळात मराठी नाटकांच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांना अगदी खेचुन आणले. त्याअगोदर मराठी नाटकांसाठी एक ठरलेला वर्ग येत असे.

डॉक्टरांचे आगळ्यावेगळ्या शैलीतील डायलॉग ऐकण्यासाठी कॉलेजमधील तरुणवर्ग थिएटरकडे वळला. “आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय…. इंटरव्ह्यू एकदम टॉप… एकदम कड्डक”, “उसमे क्या है…?” हे टाळ्या घेणारे डायलॉग पुन्हा-पुन्हा ऐकण्यासाठी हेच तरुण तिकीट खिडकीवर परत-परत येऊ लागले. ‘हाऊसफुल’चा बोर्ड हा डॉक्टरांसाठी नेहमीचाच बनला.

मात्र आपल्याला लोक दाद देत आहेत, आपली प्रशंसा करीत आहेत म्हणून आपल्या नाटकाचा त्यांनी कधी बाजार मांडला नाही. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’च्या निर्मात्यांनी तसा प्रयत्न केला, तेव्हा डॉक्टरांमध्ये दडलेला हाडाचा नट जागा झाला.

त्यांनी निर्मात्यांना आपण संभाजी महाराजांची भूमिका साकारत असताना तुम्ही या नाटकातून गल्ला भरू पाहताय तेव्हा ‘जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’ असे खडेबोल सुनावले. तात्विक मतभेदांपोटी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले नाटक शंभर प्रयोग पुर्ण केल्यानंतर अर्धवट सोडून दिले.

डॉक्टरांसाठी संभाजी महाराज ही केवळ एक भूमिका नव्हती. त्यांनी संभाजी आपल्या नसानसात भिनवला होता आणि त्यामुळेच त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. आपल्या या कलेचा कुणी बाजार मांडू पाहतंय ही कल्पनाच त्यांना सहन होणे कदापि शक्य नव्हते.

त्यांच्या अवगुणांसाठी किंवा विक्षिप्त स्वभावासाठी आपण त्यांना दोष देणार असू तर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली तत्व कधी सोडली नाहीत किंवा आपल्या कलेसाठी आणि तत्वांसाठी प्रसंगी आपली संपुर्ण कारकीर्द पणाला लावली याकरीता त्यांची प्रशंसा ही करावीच लागेल.

खर तर रंगभूमीपेक्षा चित्रपट इंडस्ट्रीत अधिक पैसा होता. डॉक्टरांकडे तरुणींना भुरळ पाडणारे राजबिंडे रूप होते आणि अभिनय तर त्यांना दैवी देणगी म्हणून मिळाला होता. ही व्यक्ती मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने इतिहास घडवू शकली असती.

त्यामुळे त्यांना आपल्या कलेतून भरपूर पैसा देखील मिळाला असता पण मराठी चित्रपटसृष्टीत डॉक्टरांचे मन कधीच रमले नाही. जणू त्यांची नाळच मराठी रंगभूमीशी जुळली होती. ते मराठी रंगभूमीसाठीच जन्माला आले होते. त्यांना प्रेक्षकांच्या टाळ्या व शिट्ट्या यांचा कैफ चढायचा.

तो टाळ्या-शिट्ट्यांचा अनमोल नजराणा चित्रपट इंडस्ट्रीमध्ये नव्हता. ‘शूर आम्ही सरदार’ गाण्याच्या शुटींगनंतर आजूबाजूच्या स्टाफने टाळ्या वाजवल्या नसल्याने पुन्हा रि-टेक करुया का? अस भाबडेपणाने भालजी पेंढारकरांना विचारणारे डॉक्टर प्रेक्षकांकडून मिळणारी दाद त्यांच्यासाठी किती महत्वाची होती हे अधोरेखित करतात.

त्यांना हा टाळ्या-शिट्ट्यांचा कैफ नेहमी हवाहवासा वाटायचा. त्या कैफातच ते सदैव डूबलेले असायचे.

अगदी अपयशाच्या गर्तेत सापडलेले असताना एका प्रयोगादरम्यान “उसमे क्या है” या त्यांच्या प्रसिद्ध डायलॉग नंतर प्रेक्षकांनी मनसोक्त दाद दिली नसल्याने एखाद्या लहान मुलासारखे मायबाप प्रेक्षकांवरच रुसणारे डॉक्टर त्यांच्यासाठी प्रेक्षकांच्या टाळ्या व शिट्ट्या हेच सर्वस्व होत, या गोष्टीवर शिक्कामोर्तब करतात.

डॉक्टरांच्या वडीलांनी त्यांना ही दाद कधीच दिली नाही. अगदी सगळ्या मराठी रंगभूमीने त्यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधील संभाजी उचलून घेतला. शंभराव्या प्रयोगाला उपस्थित असलेल्या वडीलांनी लेखकांपासून सगळ्यांचे कौतुक केले परंतु आपल्या मुलाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली नाही.

डॉक्टरांचे त्यांच्या वडिलांसोबत खरोखरीच वितुष्ट होते की नाही याबाबत मला फारशी माहिती नाही परंतु अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला सहजा-सहजी कौतुकाची थाप देत नाहीत कारण त्याने उत्तरोत्तर याहून अधिक चांगली कामगिरी करावी अशी भावना त्यामागे असते.

डॉक्टरांच्या वडीलांचा हा देखील दृष्टीकोन असू शकेल. अगदी डॉक्टरांना प्रिय असलेल्या कांचनने देखील तिला त्यांचा अभिनय मनापासून आवडत असताना डॉक्टरांना अभिप्रेत असलेली दाद केव्हाच दिली नव्हती.

शेवटी चित्रपटात सांगितल्याप्रमाणे “दाद हा कलाकाराला सरस्वती मातेने दिलेला शाप आहे.”

याबाबतीत रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडूलकर या गुरु-शिष्यांची गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. सगळ्या जगाने सचिनच्या फलंदाजीचे तोंड भरून कौतुक केले असेल पण रमाकांत आचरेकर सरांनी त्याला कधीच शाबासकी दिली नव्हती.

सचिन जेव्हा क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाला तेव्हा आचरेकर सरांनी त्याला जवळ घेतले. त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले- “वेल डन, सचिन”! खर तर आचरेकर सरांनी कौतुक करावे या महत्वाकांक्षेपोटीच त्यांचा प्रिय शिष्य सचिन क्रिकेटच्या मैदानावर उत्तमोत्तम कामगिरी करत राहिला. सरतेशेवटी अनेक विक्रमांची नोंद त्याच्या नावावर झाली.

 

sachin-tendulkar-ramakant-achrekar-inmarathi

 

डॉ. काशिनाथ घाणेकर व डॉ. श्रीराम लागू या दोन डॉक्टरांचे युद्ध या चित्रपटात ज्या पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे, त्यामुळे आपसूकच चित्रपटाला चार चांद लागतात. चित्रपटांच्या ग्लॅमरस दुनियेचं आकर्षण बऱ्याच दिग्गजांना वाटत आलंय आणि डॉक्टर्स लोक त्याला नक्कीच अपवाद नाहीत.

मात्र या दोन डॉक्टरांनी मराठी रंगभूमीचा चेहरा-मोहराच बदलला. दोघांनीही आपापला काळ गाजवला. जंगलाचा एक नियम असतो की तिथे वाघ हा एकटाच राजा असतो. तो राजा बनल्यानंतर अनेक वर्षे जंगलावर राज्य करतो.

तोपर्यंत उदयाला आलेला सूर्य मध्यान्हीपर्यंत पोहोचलेला असतो आणि त्यानंतर त्याचा अस्ताकडे प्रवास सुरु होतो. मध्यान्ह ते अस्त या प्रवासादरम्यान निसर्गनियमाप्रमाणे त्याच जंगलात आणखीन एक तरणाबांड वाघ जन्म घेतो.

कालांतराने तरणाबांड वाघ व वार्धक्याकडे झुकत चाललेला वाघ यांच्यात द्वंद्व होण स्वाभाविक असत. सुरुवातीच्या द्वंद्वात जुना वाघ तरुण वाघाला नक्कीच भारी पडतो पण दिवसागणिक तरुण वाघ अधिक ताकदवान होत राहतो.

एका निर्णायक क्षणी अंतिम युद्धात म्हाताऱ्या वाघाला चारी मुंड्या चीत करून स्वतः जंगलाचा राजा बनतो. जंगलाचा हाच नियम कमी अधिक फरकाने सर्वच क्षेत्रांना लागू पडतो.

 

kashninath ghanekar inmarathi

 

डॉ. काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमी वरचे पहिले सुपरस्टार म्हणून नावारूपाला आले. त्यांची स्वतःची अशी वेगळी शैली होती.

डॉ. घाणेकरांच्या उदयापूर्वी मराठी नाटकांनी आपली अशी स्वतंत्र चौकट तयार केली होती. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन अभिनय करायचा प्रयत्न कलाकार सहसा करत नसत. त्यामुळे मराठी नाटकांचा प्रेक्षकवर्ग देखील अभिरुचीसंपन्न असलेला परंतु मर्यादित असाच होता.

त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीत राजेश खन्नासारखा सुपरस्टार अवतरला तेव्हा मराठी रंगभूमी उसासे टाकू लागली. डॉ. घाणेकरांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने ही चौकट सर्वप्रथम मोडून काढली.

एन्ट्रीला होणारा टाळ्यांचा कडकडाट असो किंवा प्रत्येक डायलॉगगणिक मिळणाऱ्या उत्स्फूर्त शिट्ट्या असो या सर्व गोष्टी मराठी रंगभूमीसाठी नवीनच होत्या. त्यामुळे प्रेक्षक लोहचुंबकासारखा नाट्यगृहांकडे पुन्हा आकर्षित होऊ लागला.

त्यात कॉलेजच्या मुलांचा समावेश अधिक असल्याने मराठी नाटकाच्या प्रेक्षकवर्गाची कक्षा रुंदावली. आणि या सर्वासाठी कारणीभूत ठरले डॉ. घाणेकरांचे अफाट अभिनयकौशल्य…!

मात्र डॉ. श्रीराम लागू हे व्यक्तिमत्व वेगळ्या प्रांतातील होते. त्यांना हा डॉ. घाणेकरांचा धागडधिंगाणा अजिबात पसंत नव्हता. त्यांना डॉ. घाणेकरांनी मोडलेली ती मराठी रंगभूमीची चौकट पुनर्स्थापित करायची होती.

डॉ. लागुंच्या नाटकांचे विषय हे अतिशय गंभीर व वैचारिक असायचे. त्यांचा प्रेक्षकवर्ग देखील सुशिक्षित व प्रगल्भ या प्रकारातला होता. त्यांनी केलेले नवीन प्रयोग लोकांना आवडू लागले होते पण डॉ. घाणेकरांना मात्र डॉ. लागुंची ही लोकप्रियता मान्यच नव्हती.

डॉ. घाणेकरांसाठी लोकप्रियतेचा एकच निकष होता, तो म्हणजे – प्रेक्षकांकडून उत्स्फुर्तपणे मिळालेल्या टाळ्या व शिट्ट्या…! डॉ. लागुंच्या मते त्यासाठी तमाशा हा प्रकार अगोदरपासून अस्तित्वात होता. रंगभूमीवर या गोष्टी करायची काहीच गरज नव्हती.

हे दोघेही दिग्गज आपापल्या जागी योग्य होते. त्यांचा चाहतावर्ग देखील वेगळा होता. त्यामुळे त्यांच्यातील ही स्पर्धा निकोप असायला हवी होती पण डॉ. घाणेकरांनी आपल्या उर्मट आणि अहंकारी स्वभावामुळे या स्पर्धेला वैयक्तिक द्वेषाची किनार दिली.

डॉ. लागु प्रेक्षकांसोबत नाट्यगृहाबाहेर बोलत असताना स्वतः मुद्दामहून त्या ठिकाणी जाऊन सर्व प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेणे असो वा डॉ. लागुंचा प्रयोग सुरु असताना विनाकारण त्या थिएटरमध्ये एन्ट्री घेऊन स्वतःसाठी प्रेक्षकांच्या टाळ्या व शिट्ट्या घेणे असो…

अशा कृत्यांमुळे डॉ. घाणेकर आपल्या उथळ स्वभावाचे प्रकटीकरण करत डॉ. लागुंना आजही आपली लोकप्रियता ही तुमच्यापेक्षा कैकपटीने जास्त आहे, हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.

मात्र त्यांच्या मनाने डॉ. लागुंच्या अभिनयाचा मोठेपणा कुठेतरी मान्य केला होता. त्यांना याची कल्पना आली होती की डॉ. लागुंनी आपल सुपरस्टार पद आपल्याकडून केव्हाच हिरावून घेतलंय पण कळत असूनही ही गोष्ट त्यांना वळत नव्हती.

त्याला कारणीभूत होता डॉ. घाणेकरांमध्ये असलेला उच्च कोटीचा अहमभाव…! याच अहंकारापोटी त्यांनी आपल्या नावामागे ‘आणि’ शब्द लावायची प्रथा फार पुर्वीच सुरु केली होती.

एखाद्या नाटकातले किंवा चित्रपटातले सर्वात महत्वाचे पात्र असेल त्याच्या नावामागे ‘आणि’ शब्द लावला जातो. डॉ. काशिनाथ घाणेकरांनी एक काळ ‘आणि’ शब्द स्वतःच्या नावाआधी लावून स्वतःचीच लाल करून घेतली होती.

ते नेहमी सांगायचे की “जोपर्यंत आपण आपली स्वतःची लाल करून घेत नाही ना तोपर्यंत लाल्या होत नाही.” यावरून त्यांच्यातील अहंकार किती उच्च कोटीला जावून पोहोचला होता हे समजेल.

आता वेळ खांदेपालट करायची होती. डॉ. घाणेकरांनी जरी ‘आणि’ शब्द स्वतःच्या नावामागे लावायची प्रथा सुरु केली असली तरी आता त्यांच्या नावाची जागा डॉ. लागुंनी घेतली होती. ‘आणि डॉ. श्रीराम लागू’ हे शब्द वाचून डॉ. घाणेकरांचा अहंकार दुखावला जात होता.

त्यातून आलेल्या वैफल्यामुळेच ते डॉ. लागुंचा द्वेष करू लागले. शेवटी या दोघांची तुलना करणे म्हणजे राजकारणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. मनमोहन सिंग यांची किंवा क्रिकेटच्या पिचवर महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडच्या फलंदाजीची तुलना करण्यासारखे आहे.

नरेंद्र मोदींच्या भाषणाला लाखोंची गर्दी जमत असली आणि डॉ. मनमोहन सिंगांना ऐकायला शंभर लोक देखील जमत नसले तरी डॉ. मनमोहन सिंगांच महत्व कधीच कमी होत नाही.

मनमोहन सिंग यांचा अर्थशास्त्रावर जो गाढा अभ्यास आहे त्यावरील त्यांचे भाषण ऐकण्याची लाखो लोकांची बौद्धिक कुवतच नसेल तर तिथे दर्दी असलेले शंभर लोकच भाषण ऐकायला बसणार आहेत. त्या भाषणात कुठेही टाळ्या अथवा शिट्ट्यांचा समावेश नसणार म्हणून डॉ. मनमोहन सिंगांना नाव ठेवता येत नाही.

 

manmohan--singh-marathipizza03

 

त्याचप्रमाणे मोदींच्या भाषणाला टाळ्या पडत असतील पण त्यांना अर्थशास्त्राची तेवढी माहिती नसेल तर त्यांना टोमणे द्यायची पण काहीच गरज नाही कारण भाषणातून लोकांची नस पकडण्याची कला त्यांना इतर कुणापेक्षाही चांगलीच अवगत आहे.

श्रेयस आणि प्रेयस यांच्यातील हा संघर्ष पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्यात कुणाचीच हार अथवा जीत होत नाही.

ज्या डॉ. लागुंना लोकप्रियता नाही असे म्हणून डॉ. घाणेकर नाक मुरडत होते त्याच डॉ. लागुंच्या ‘नटसम्राट’ या नाटकाने लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक गाठला, ही गोष्ट डॉ. लागुंचे नाणेदेखील तितकेच खणखणीत होते यावर शिक्कमोर्तब करण्यासाठी पुरेशी आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर व प्रभाकर पणशीकर यांच्यातील निखळ मैत्री या चित्रपटात ज्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे त्याने मैत्रीची नवीन परिभाषा लिहीली गेली. सगळी दुनिया विरोधात गेली तरी हरकत नसते पण त्यावेळी पुर्ण दुनियेचा सामना करायला एक जिगरी दोस्त तुमच्या पाठीशी असावा लागतो.

डॉक्टरांच्या आयुष्यात ती जागा प्रभाकर पणशीकरांची म्हणजे पंतांची होती. प्रभाकर पणशीकरांचा उल्लेख केल्याशिवाय ‘काशिनाथ पर्वा’ची समाप्ती होऊच शकत नाही.

मुळात डॉक्टर व पंत हे समकालीन नट होते. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये अनेकदा स्पर्धा पाहायला मिळते. अनेकदा ती स्पर्धा निकोप असते पण ती असतेच असते…! या दोघांची मैत्री याला अपवाद होती.

म्हणूनच मी म्हणालो की डॉक्टरांनी व पंतांनी मैत्रीची व्याख्या नव्याने लिहिली.

सगळ्यांनी डॉक्टरांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा पाहिला. पंत एकटेच होते ज्यांनी या विक्षिप्त स्वभावामागे दडलेला हाडाचा कलाकार पाहिला. डॉक्टर जरी त्यांचे मित्र असले तरी त्यांच्यात असलेल्या उपजत अभिनय कौशल्याचा पंतांना नितांत आदर होता.

या आदरापोटीच पंतांनी डॉक्टरांचा रंगेलपणा, नशेबाजपणा निमुटपणे सहन केला. भर प्रयोगाच्या वेळी दारू पिऊन रंगमंचावर धुडगूस घालणाऱ्या डॉक्टरांमुळे पंताना प्रचंड मानसिक, आर्थिक व व्यावसायिक त्रास सहन करावा लागला परंतु या मित्राला त्यांनी त्याची कधी साधी जाणीव देखील करून दिली नाही.

 

मैत्रीपोटी डॉक्टरांच्या असंख्य चुका ते पोटी घालू लागले. डॉक्टर यशाची शिखरे अनेकदा चढले आणि तितक्याच वेळा त्या शिखरावरून ते कोसळले देखील पण ते जेव्हा-जेव्हा कोसळले तेव्हा प्रत्येक वेळी पंतांनी त्यांना सावरले. त्या अपयशातून बाहेर पाडण्यासाठी आपला हात पुढे केला. डॉक्टरांना कधीही अपयशाच्या गर्तेत अडकू दिले नाही.

‘शोले’ चित्रपटात ‘वीरू’साठी ‘जय’ आपल्या प्राणांची आहुती देतो, तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.

पडद्यावर मैत्रीखातर बलिदान देणे सोपे असते पण खऱ्या आयुष्यात आपला मित्र संकटात असताना प्रत्येक वेळी स्वतःच सर्वस्व पणाला लावून त्याला त्या संकटातून बाहेर काढणे तितकेच कठीण असते.

पंतांनी खऱ्या आयुष्यात डॉक्टरांना संकटातून बाहेर काढण्याची किमया अनेकदा केली. त्यामुळेच त्यांच्या उल्लेखाशिवाय डॉक्टरांचे चरित्र पुर्ण होऊच शकत नाही.

डॉ. काशिनाथ घाणेकर व वसंत कानेटकर…! एक पट्टीचा नट तर दुसरा सिद्धहस्त लेखक…!! दोघांनाही आपापले अहंकार कुरवाळत बसण्याची सवय आणि घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहायची सवय…!!!

या दोन ध्रुवांवरच्या मंडळींना एकत्र आणले ते प्रभाकर पणशीकरांनी आणि त्यानंतर ‘अश्रूंची झाली फुले’ सारख्या जबरदस्त कलाकृतीने जन्म घेतला. डॉक्टरांना त्यांची ओळख निर्माण करून देणारा ‘लाल्या’ याच नाटकात सापडला.

 

तत्वनिष्ठ प्राध्यापक हेच ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा गाभा होते आणि ही भूमिका प्रभाकर पणशीकर साकारत होते.

‘लाल्या’ हे त्या नाटकातील एक पात्र होते. टवाळ पोराच्या या पात्रात डॉक्टरांनी असा काय अभिनय ओतला की नाटकाचे प्रमुख पात्र असलेले प्राध्यापक बाजूलाच राहिले आणि डॉक्टरांनी साकारलेला लाल्या मराठी रंगभूमीवर एखाद्या वादळाप्रमाणे धडकला.

त्याच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट होत होता. प्रत्येक डायलॉगगणिक शिट्ट्या वाजत होत्या. कॉलेजच्या पोरांनी नाटकांच्या थिएटरचा रस्ता धरला आणि या नाटकाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतरही डॉक्टरांनी ‘गारंबीचा बापू’ सारख्या अनेक भूमिका साकारल्या पण हा ‘लाल्या’ त्यांना खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीच्या इतिहासात अजरामर करून गेला.

दारूची नशा ही कधीही वाईट असते पण यश आणि अपयश हे तुमचे नेहमीचे साथीदार असतात, तेव्हा ती अधिक वाईट असते. आणि तुमचा स्वभाव जर डॉक्टरांसारखा बेफान असेल तेव्हा हीच नशा तुम्हाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यास पुरेशी ठरते.

डॉक्टरांसारख्या अहंकारी व स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसाला अपयश पचवण्यासाठी व झालेले अपमान गिळून टाकण्यासाठी हीच दारू अमृतासमान वाटू लागली. डॉक्टरांसारख्या एका ईश्वरदत्त देणगी मिळालेल्या कलाकाराचा अस्त या दारूने केला.

फक्त पंतांसारखा काळजीवाहू दोस्त सोबत होता म्हणून डॉक्टरांची संपुर्णपणे वाताहात लागली नाही परंतु जी व्हायची ती पडझड झालीच. ती पंत नाही रोखू शकले. पंत आणि डॉक्टर या मित्रांची ही आगळीवेगळी जोडी पाहिल्यावर आपल्यातील कुणालाही सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

त्यावेळी सचिन तेंडूलकर सुद्धा विनोद कांबळीला दारूचे व्यसन करण्यापासून रोखू शकला नाही आणि विनोद कांबळीरुपी तारा क्रिकेटच्या क्षितीजावर उदयाला येण्याअगोदरच अस्ताला गेला.

पुन्हा एकदा सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी ही तुलना मला करायची नाही पण भारतीय संघात सर्वात जास्त वेळा पुनरागमन करणारा खेळाडू हा विक्रम आजही विनोद कांबळीच्या नावावर आहे.

विनोद कांबळीच्या क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेमुळे तो भारतीय संघात आला आणि स्वभावातील अवगुणामुळे तो अनेकदा संघाच्या बाहेर देखील गेला.

मात्र त्याची प्रतिभाच एवढी महान होती की अनेकदा संघातून बाहेर गेल्यावर तो अशी बेजोड कामगिरी करायचा की सिलेक्टर्सना त्याचे स्वभावगुण बाजूला सारून पुन्हा पुन्हा त्याला संघात स्थान देण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक नसायचा.

विनोद कांबळी संपूर्ण करियरमध्ये फक्त १७ कसोटी सामने खेळला आणि त्यात त्याने ४ वेळा शतक व त्यापैकी २ वेळा द्विशतक झळकावले. यावरून त्याच्या असामान्य प्रतिभेचा अंदाज येऊ शकतो.

 

vinod-kambli-inmarathi

 

विनोद कांबळी आणि डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्यात विलक्षण साम्य होते. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी या दोघांच्याही आयुष्यात कधी स्थिर राहूच शकल्या नाहीत.

त्यांच्या क्षमतेमुळे ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचायचे. तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्यातील उपजत स्वभावगुणांमुळे पुन्हा अशी आगळीक करायचे की दुसऱ्या क्षणाला अपयश त्यांच्या सोबत असायचे. यश-अपयशाचा हा विलक्षण खेळ डॉ. घाणेकर आयुष्यभर खेळत राहिले.

त्यांचा हा खेळ पाहून तो काल्पनिक फिनिक्स पक्षी देखील मनातून कुठेतरी ओशाळला असेल. राखेतून पुन्हा झेप घेतो तो फिनिक्स पक्षी असा कल्पनाविस्तार केला जातो. डॉक्टर आपल्या अभिनय क्षमतेमुळे यशाच्या शिखरावर पोहोचले.

आपल्या स्वभावातील दुर्गुणांमुळे अनेकदा त्यांचे हे यश अक्षरशः जळून राख झाले. मात्र त्या राखेतून डॉक्टर पुन्हा पुन्हा उठून उभे राहिले. त्यांच्या या जिद्दीला सलाम करावासा वाटतो.

‘आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाविषयी बोलायचे तर प्रत्येकानेच आपापल्या वाट्याला आलेल्या भुमिका अगदी चोखपणे बजावल्या आहेत.

हे ही वाचा – तुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ!

खास करून प्रभाकर पणशीकरांच्या भूमिकेत असलेला प्रसाद ओक आपला वेगळा ठसा उमटवतो. त्यांची डॉ. घाणेकरांसोबत असलेली दोस्ती ही ‘शोले’ चित्रपटातील जय-वीरूच्या दोस्तीची आठवण करून देते.

सुमीत राघवन डॉ. श्रीराम लागूंच्या भूमिकेत परफेक्ट फिट झालाय. डॉ. लागूंचे ते सौम्य हास्य आणि तत्ववादी चेहरा या सर्व गोष्टी त्याने उत्तमरीत्या दाखवल्या आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे अमृता खानविलकर सोबत केलेल्या ‘नका सोडून जाऊ रंगमहाल’ या गाण्यात तो सेम-टू-सेम डॉ. लागूंसारखा दिसला आहे. अर्थात ‘नका सोडून जाऊ रंगमहाल’ आणि ‘गोमू संगतीन’ या दोन्ही गाण्यांचे जुन्या पद्धतीने केलेले चित्रीकरण हा या चित्रपटाचा आणखीन एक युएसपी म्हणावा लागेल.

‘गोमू संगतीन’ गाण्यात प्राजक्ता माळी छान दिसलीय आणि नाच करणे या गोष्टीशी दुरान्वयेही संबंध नसताना डॉ. घाणेकरांचे भूत अंगात शिरलेला सुबोध भावे अगदी बेभान होऊन नाचलाय.

डॉ. घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारताना नंदिता धुरीने कमालीचा अभिनय केलाय. अशा अवलिया आणि बेभान माणसासोबत संसार करत असताना जी कसरत करावी लागते आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे नव-याचा सांभाळ करावा लागतो हे तिने उत्तमरीत्या दाखवलं आहे.

वसंत कानेटकरांची छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका, त्यांचे डॉक्टरांसोबत असलेले टोकाचे मतभेद तरीपण त्यांच्या एकूणच सुपरस्टार म्हणून झालेल्या वाटचालीतील लेखक म्हणून असलेले कानेटकरांचे बहुमूल्य योगदान, त्यांच्यातील सिद्धहस्त असलेला लेखक दाखवण्यात आनंद इंगळे यशस्वी ठरले आहेत.

सोनाली कुलकर्णीसारख्या दिग्गज अभिनेत्रीला सुलोचना दीदीच्या भूमिकेत फारसा वावच नव्हता. आपल्या मुलीचं आणि काशिनाथचं लफड आहे हे समजल्यावर मुलीची गणना समाज ‘रखैल’ म्हणून करेल या चिंतेने व्याकुळ झालेल्या आईची भूमिका साकारून सोनालीने सुलोचना दीदींच्या व्यक्तिमत्वाचा नवा पदर सर्वांसमोर उलगडवून दाखवला आहे.

मोहन जोशी हे भालजी पेंढारकरांच्या भूमिकेत एखाद्या रत्नपारख्याप्रमाणे काशिनाथमधील अभिनय कौशल्य हेरून त्याला आकार देताना दिसतायेत. तर दुसरीकडे सुलोचना दीदींच्या पतीचे लवकर निधन झाल्यामुळे कांचनला आपली मुलगी मानून तिचे वडील या नात्याने असलेली हळवी जबाबदारी पार पाडत आहेत.

कांचन घाणेकरांची भूमिका ही नवख्या वैदेही परशुरामसाठी आव्हानच होती. सोबत एवढी तगडी स्टारकास्ट असताना ती झाकोळून जाण्याचा धोका अधिक निर्माण झाला होता पण तिने त्या सर्व दिग्गजांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलाय.

सुरुवातीला डॉक्टरांच्या संभाजीवर बेधुंदपणे प्रेम करणारी वयात आलेली मुलगी, त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या नाटकांवर भाळून जाणारी त्यांची चाहती आणि नंतर त्या दोघांमधील आकर्षणाचे प्रेमात रुपांतर झाल्यावर व त्या प्रेमाला आईने विरोध केल्यावर बनलेली कठोर व निष्ठावान प्रेयसी या सर्व भूमिकांना तिने उत्तम न्याय दिलाय.

या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे सुबोध भावे…! सुबोध डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका अक्षरशः जगलाय.

 

subodh-Kashinath1-inmarathi

 

चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा आपण सुबोध भावेला पाहायला जातो परंतु पहिल्या १०-१५ मिनिटातच तो अभिनयाची अशी काही जादुगिरी करतो की आपण सुबोध भावेला पाहत नसून दस्तरखुद्द डॉ. काशिनाथ घाणेकरच आपल्यासमोर पडद्यावर वावरत आहेत आणि आपली कथा लोकांना सांगत आहे असच मनात कुठेतरी वाटत. ही सुबोध भावेच्या अभिनयाची किमया आहे.

आमिर खान हा बॉलीवूड इंडस्ट्रीचा अनभिषिक्त सम्राट समजला जातो. अलीकडच्या १०-१५ वर्षात त्याने अपयशाची चव ही चाखलेलीच नाही.

आजपर्यंत देशातील सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांची यादी पाहिली की पहिल्या १२ चित्रपटात आमिर खानच्या दंगल, पीके, सिक्रेट सुपरस्टार, धुम ३ आणि थ्री इडियटस या ५ चित्रपटांचा समावेश होतो.

आमिर खानचा त्याचा चित्रपट म्हणजे सुपर-डुपर हिट हा प्रघात झाल्याने त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ ही उपाधी सर्वांनी बहाल केली आहे. त्याचा चित्रपट रिलीज व्हायचा असेल तर त्या दिवशी आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात कोणताही निर्माता आपला चित्रपट प्रदर्शित करायची हिंमत करत नाही.

अशा वेळी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आणि ‘सदी के महानायक’ अशी ख्याती असलेले अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्रित येतात. त्यांच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या रिलीजसाठी ते दिवाळीचा मुहूर्त निवडतात. या जोडगोळीसमोर बॉलीवूडमधला कोणताही निर्माता उभे राहायची हिंमत करणार नाही. तिकडे मराठी चित्रपट क्या चीज है…?

त्याही परिस्थितीत सुबोध भावे, अभिजित देशपांडे व त्यांची टीम ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सोबत रिलीज करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिली. मराठी चित्रपट बॉलीवूडच्या मानाने अतिशय तुटपुंज्या बजेटमध्ये बनतात.

अशा वेळी हिंदी चित्रपटाच्या त्सुनामीचा फटका मराठी चित्रपटाला बसला तर त्याचा निर्माता व दिग्दर्शक उभ्या आयुष्यात पुन्हा सावरणार नाहीत. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटाचे ३०० कोटी रुपयांचे बजेट आणि समोर आमिर-अमिताभ ही जोडगोळी एका मोठ्या संकटाप्रमाणे उभी होती.

तरीही ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाची टीम रिलीज करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली, तेव्हाच त्यांनी अर्धी लढाई जिंकली होती.

त्यांचा विश्वास त्यांनी निर्माण केलेल्या ‘न भूतो न भविष्यती’ अशा कलाकृतीवर होता. या अजोड कलाकृतीसमोर आमिर खान व अमिताभ बच्चन काय पण साक्षात ब्रम्हदेव जरी अभिनेता बनून उभे राहिले असते तरी ‘आपल नाण एकदम खणखणीतच वाजणार’ हा त्यांचा विश्वास होता.

ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला त्यादिवशी आमिर खान व अमिताभ बच्चन यांचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपट कुठल्या कुठे वाहून गेला.

मराठी चित्रपटांचा दर्जा हा अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटांपेक्षाही निश्चितपणे सुधारतोय. सैराट, नटसम्राट सारख्या चित्रपटांनी चांगली कमाई देखील करून दाखवली आहे पण आजपर्यंत कोणताही मराठी चित्रपट वन-टू-वन लढतीत एखाद्या बिग बजेट हिंदी चित्रपटाला पुरून उरला नव्हता.

आमिर खान आणि अमिताभ बच्चन जोडगोळी, ३०० कोटी बजेट आणि यशराज फिल्म्ससारखा नावाजलेला निर्माता समोर असताना ‘आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाने ते आव्हान स्वीकारलं आणि नुसत स्वीकारलच नाही तर बॉक्स ऑफिसवर एका बिग बजेट हिंदी चित्रपटाची अक्षरशः धूळधाण उडवून नवा इतिहास रचला.

या चित्रपटात डॉ. लागुंच्या तोंडी असलेला डायलॉग या चित्रपटाच्या संपुर्ण टीमलाच लागू पडतो – “सगळेच इतिहास वाचत बसले, तर तो घडवणार कोण…?” या चित्रपटाची टीम मराठी चित्रपटसृष्टीत नव्याने लिहिल्या गेलेल्या इतिहासाची साक्ष बनली तर सुबोध भावे खऱ्या अर्थाने या इतिहासाचा हिरो ठरला.

 

Thugs-of-hindostan-inmarathi

 

त्यादिवशी सोशल मिडीयावर एक व्यंगचित्र पहायला मिळाले आणि ते खुपच बोलके होते. थिएटरमध्ये चित्रपटासाठी लोक बसले आहेत आणि समोर पडद्यावर ‘अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा शेख, कतरीना कैफ’ यांची नावे लहान अक्षरात लिहीली आहेत.

त्या सर्व नावांपुढे मोठ्या अक्षरात ‘आणि’ शब्द लिहून सर्वात शेवटी लिहीले होते – “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर…!”

प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून यावा असे ते व्यंगचित्र होते. शेवटी एक मराठी माणूस संपुर्ण हिंदी फिल्म इंडस्ट्रीला पुरून उरला होता.

“काशिनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीवरचा पहिला नव्हे तर अखेरचा सुपरस्टार आहे” असा डायलॉग या चित्रपटात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता पण योगायोग सुद्धा कसे विलक्षण असतात ना…?

अमिताभ बच्च्चन ७० च्या दशकात आले आणि सुपरस्टार बनले. त्याअगोदर राजेश खन्ना हे सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे.

राजेश खन्नांच्याच काळात डॉ. काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार म्हणून उदयाला आले. त्यांनी राजेश खन्नांच्या त्या सुपरस्टार वलयाचा मोठ्या निकरीने संघर्ष केला पण मराठी रंगभूमी उद्ध्वस्त होऊ दिली नाही.

उलट डॉ. घाणेकरांनी स्वतःच्या अभिनयाने मराठी रंगभूमीला सर्वत्र नवीन ओळख निर्माण करून दिली आणि ते त्याकाळी राजेश खन्नाना पुरून उरले.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्च्चन यांच्यानंतर आमिर खाननेच खऱ्या अर्थाने गेली दोन-तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर साम्राज्य गाजवले. आता कधी नव्हे ते अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे हिंदीतले दोन सुपरस्टार पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्रित यावेत आणि त्याला डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर आधारलेल्या चित्रपटाने खुले आव्हान निर्माण करावे…

त्यात करून आमिर आणि अमिताभचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपट पुर्णपणे फ्लॉप ठरावा आणि डॉक्टरांवरच्या चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळवावी. हा योगायोगच नव्हे का…?

डॉ. काशिनाथ घाणेकर यांची ‘सुपरस्टार’ ही प्रतिमा हिंदी चित्रपटसृष्टीच्या या दोन सुपरस्टारांच्या एकत्रित प्रतिमेला देखील भारी पडली असाच याचा अर्थ होतो ना..!

कदाचित नियतीनेच डॉ. काशिनाथ घाणेकर हे भारतीय रंगभूमीवरचे ‘अखेरचे सुपरस्टार’ म्हणून शिक्कामोर्तब करण्यासाठीच हे विलक्षण योगायोग घडवून तर आणले नसतील ना…???

हे ही वाचा – काशिनाथ घाणेकरांच्या “कडsssक” वरूनच अनिल कपूरच्या “झकाsssस” चा जन्म झाला होता!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

9 thoughts on “काशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…!”

 • November 17, 2018 at 4:11 am
  Permalink

  wonderful,,I am speechless!!!

  Reply
  • November 17, 2018 at 10:29 am
   Permalink

   I can nt control my tears, salaam aahe marathi rangbhumila, Dr.Ghanekaranna, Abhijit Deshpandenna Aani aani Subodh Bhave naa….ekdum KADAKK….

   Reply
 • November 17, 2018 at 7:05 am
  Permalink

  Stupendous article…

  Reply
 • November 17, 2018 at 10:27 am
  Permalink

  I can nt control my tears, salaam aahe marathi rangbhumila, Dr.Ghanekaranna, Abhijit Deshpandenna Aani aani Subodh Bhave naa….ekdum KADAKK….

  Reply
 • November 18, 2018 at 12:28 am
  Permalink

  Extraordinary work by extraordinary person. Acting skills of subhod Bhave truly gave justice to the character played by him of Dr. Kashinath Ghanekar. Mesmerizing movie which portrayed the struggle and true actor Dr. Kashinath Ghanekar.

  Reply
 • November 18, 2018 at 12:13 pm
  Permalink

  अप्रतिम लेख अनुपम जी

  Reply
 • November 21, 2018 at 12:09 am
  Permalink

  One of the best article I ever read.

  The way you describe touches the heart.

  Simply Great!!

  Reply
 • October 1, 2019 at 8:41 am
  Permalink

  Khup Chan lekhan kambli sir….khup Chan likhil aaahe…

  Reply
 • October 1, 2019 at 12:05 pm
  Permalink

  अप्रतिम, आपले अनेक लेख वाचलेत, परंतु हा सर्वांत उत्तम… अतिउत्तम…

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?