' राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल! – InMarathi

राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतमातेच्या थोर सुपुत्रांपैकी एक आहेत. देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचे , भोगलेल्या त्रासाचे शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. रक्ताचे पाणी करून, अनेक हालअपेष्टा भोगून, काळ्यापाण्याची खडतर शिक्षा भोगून त्यांनी स्वातंत्र्याची कास धरली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

ते व त्यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यसेनानी होते म्हणूनच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. परंतु काही लोक मात्र ह्या थोर लोकांची महती जाणून न घेताच त्यांच्यावर टीकास्त्र सोडून आपली टीकेची भूक भागवून घेत असतात.

काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी ह्यांनीही इतिहास जाणून न घेता असेच बेजबाबदार वक्तव्य करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे.

 

 

छत्तीसगडमधील जगदलपूर येथील एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी ह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक अपमानजनक वक्तव्य केले. राहुल गांधी ह्यांनी असा आरोप केला की,

“सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागून अंदमानातून सुटका करून घेतली तर काँग्रेसचे नेते मात्र त्यावेळी तुरुंगात होते.”

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राहुल गांधी प्रचाराच्या कार्यात व्यस्त आहेत. छत्तीसगडमध्ये झालेल्या एका सार्वजनिक प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे.

ह्या वक्त्यव्यानंतर राहुल गांधींवर सर्वत्र टीका होत आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक लोकांच्या भावना राहुल गांधींनी दुखावल्या आहेत ह्या भीतीने काँग्रेस वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत ह्यासाठी काळजी घेण्याबद्दल सुचवीत आहेत.

वीर सावरकर हे संघाचे कार्यकर्ते नव्हते तरीही राहुल गांधी व त्यांच्या गटातील लोक सावरकरांवर दोषारोप करून पर्यायाने भाजपा व संघावर टीका करीत आहेत.

भाजपा व संघ वीर सावरकरांच्या विचारांचा आदर करतात, त्यांना आदर्श मानतात. म्हणूनच कदाचित वीर सावरकरांना राहुल गांधी ह्यांनी लक्ष्य केले आहे. परंतु सावरकरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ह्याआधीही काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा सावरकरांवर यथेच्छ टीका केली आहे.

 

Rahul-Gandhi-inmarathi
wikileaks4india.com

२००४ साली काँग्रेसनेते मणिशंकर अय्यर ह्यांनी सावरकरांचा असाच अपमान केला होता तेव्हा पक्षाने मात्र हे मणिशंकर अय्यर ह्यांचे खाजगी मत आहे असे जाहीर करून हात वर केले होते. संसदेत स्वातंत्र्यवीरांच्या फोटो लावण्यासही काँग्रेसने विरोध केला होता.

आता परत राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य करून एका नव्या वादाला जन्म दिला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

राहुल गांधींवर चहूबाजूंनी टीका होत आहे. ह्या अपमानाची दखल घेऊन व्यथित झालेले वीर सावरकरांचे पणतू व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर ह्यांनी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात ह्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

तसेच भारतीय दंड संहिता ५००च्या अंतर्गत राष्ट्रीय क्रांतिकारकांचा अपमान केल्यावरून राहुल गांधी ह्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

savarkar-inmarathi

 

रणजित सावरकरांचे म्हणणे आहे की,

“राहुल गांधींचे वक्तव्य हे स्वातंत्र्यवीरांच्या अपमान करणारे आहे. त्यांनी अंदमानात कोलू ओढला, ब्रिटिशांचे अनंत अत्याचार सहन केले , रक्ताचे पाणी करून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. भारताला ब्रिटिशांच्या जाचातून मुक्त करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.त्यांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती.”

रणजित सावरकर पुढे असेही म्हणाले की,

“काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने तुरुंगात १५ वर्षे काढली हे राहुल गांधींनी सिद्ध करून दाखवावे. पंडित नेहरू ज्या तुरुंगात होते तेथे त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या. ह्याउलट सावरकरांना ब्रिटिश सरकारने १४ वर्ष तुरुंगात व नंतर १३ वर्ष रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते.अंदमानात तर त्यांना कोलू ओढावा लागत होता. सावरकरांचा अपमान करण्याची सध्या फॅशनच आली आहे.”

पोलिसांनी कारवाई केली नाही तर राहुल गांधी ह्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही रणजित सावरकर ह्यांनी सांगितले आहे. राहुल गांधींविरुद्द जी तक्रार करण्यात आली आहे तिचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे.

===

प्रति

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई.

विषय : महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दि. १२ नोव्हेंबर २०१८ ला केलेली बदनामी

महोदय,

मी, रणजित विक्रम सावरकर , वय ५२, धंदा व्यवसाय, राहणार कमलकुंज, शिवसेना भवन पथ, दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८ खालील प्रमाणे गुन्हा दाखल करू इच्छितो.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राहुल गांधी ह्यांनी काल म्हणजे १२/११/२०१८ रोजी छत्तीसगड येथील जगदलपूर येथे जाहीरसभेत “स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली” असे धादांत खोटे विधान करून त्यांची बदनामी केली आहे.

एका थोर क्रांतिकारकाचा आणि राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी विनंती करत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला. त्याचबरोबर असंख्य क्रांतिकारकांनीही अंदमानात यमयातना भोगल्या. सावरकरांनी केवळ आपलीच नव्हे तर अन्य क्रांतिकारकांचीही सुटका व्हावी असे अर्ज केले होते. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही केवळ सावरकरच नव्हे तर सर्व क्रांतिकारकांची रणनीती होती.

 

savarkar-inmarathi
images.asianage.com

सावरकरांप्रमाणेच सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली व पुढे कामही सुरु ठेवले. सावरकर अंदमानात असतानाच त्यांचा युरोपातील क्रांतिकारकांशी संपर्क असल्याचा ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे.

तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावकारांच्या अर्जात कुठलाही खेद अथवा खंत नसल्याने नोंदवत सावरकर अत्यंत धोकादायक कैदी असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचे म्हटले आहे.

त्याप्रमाणे ब्रिटिशांनी सावरकरांना एकूण १४ वर्षे कारागृहात आणि नंतर १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते.

असे असतानाही राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली” असे खोटे विधान करून या महान देशभक्ताचा अपमान केला आहे. त्यांच्या या विधानाने सर्व देशभक्त जनतेची मनं दुखावली आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे माझे आजोबा डॉ. नारायण दामोदर सावरकर ह्यांचे ज्येष्ठ बंधू होते.

राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केल्यामुळे सर्व सावरकर कुटुंबियांना तीव्र मनस्ताप झाला आहे.

 

savarkar-inmarathi

 

ही बातमी मी माझ्या दादर येथील निवासस्थानी दूरदर्शनवर पाहिली असल्याने आणि माझे निवासस्थान आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने ही तक्रार आपल्याकडे नोंदवत आहे. तरी आपण राहुल गांधी, अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, ही विनंती.

आपला विश्वासू,
रणजित सावरकर
कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

===

सावरकरांवर टीका करणे हे सोपे आहे. पण सावरकर समजून घेणे, त्यांचे विचार अंमलात आणणे हे मात्र कठीण आहे आणि राहुल गांधींनी निवडणुकीच्या प्रचारात हा सोपा मार्ग अनुसरून असंख्य भारतीयांच्या श्रद्धास्थानावरच आघात केला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?