क्रूरतेचा नंगा धिंगाणा…’झेलम एक्स्प्रेस’; दिल्ली-पुणे…२,३ नोव्हें. १९८४

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : वासंती खांडेकर-घैसास 

===

सकाळी ११.३० ची ‘झेलम’ दीड तास उशीरा येत असल्याचा फलक नवी दिल्ली स्टेशनवर लागला होता. दीड तासाचा उशीर हळू हळू वाढू लागला.

एरवी झेलम आधी येणारी ‘फ्रॉन्टिअर मेल’ दुपारी तीन वाजता आली. तशी रिकामीच;’झेलम’ साठी थांबलेल्या काहींनी ती येते की नाही; या भीतीपोटी ‘फ्रॉन्टिअर’ मध्ये जागा मिळवली. नंतर असं समजलं की जमाव आल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेण्यास नकार दिला गेल्याने ते लोक घाबरून परत खाली उतरले.

 

anti-SIKHRIOTS1-inmarathi
thehindu.com

प्लॅटफॉर्मवर एक केळी सोडली तर इतर काही खायला नव्हतं. झेलमची वाट बघण्याखेरीज दुसरा काही उद्योग नसल्याने ‘पोट’ आपल्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देत होतं. मुलं तर सारखी भूक, भूक करत होती.

दुपारी साडेतीनला ‘झेलम’ एकदाची अवतरली. आमच्या आरक्षित डब्यामध्ये काचांचा खच पडला होता. डब्याच्या दारातच एकाला मारून टाकलं होतं. तसंच सामान आत चढवलं. डबा साफ करायला बराच वेळ कोणी फिरकलंच नाही.

दारातच अस्ताव्यस्त पडलेल्या मृत व्यक्तिचे ते भयाण दृष्य पाहून आमच्या डब्यातील एक १०-१२ वर्षाचा मुलगा एवढा घाबरला की पुण्याला न जाता परत दिल्लीतील आजोबांच्या घरी जाण्यासाठी हटून बसला.

आजचं रिझर्वेशन सोडलं तर पुढच्या ८-१५ दिवसांची आरक्षणं अगोदरच संपली असल्याने दिल्लीतच अडकून पडावं लागलं असतं. त्याची कशीतरी समजूत काढून उतरवायला लावलेलं सामान पुन्हा वर चढवलं.

‘फ्रॉन्टिअर’ बरेच मृतदेह घेऊन आली असावी. ते बाहेर काढून, त्यांवर चादर वगैरे न घालता, उघडयानेच हात गाडीवरून नेण्यात येत होते. स्टेशनवर पोलिस वा सैनिकांच्या अस्तित्वाचा मागमूसही नव्हता.

 

1984_delhi1-inmarathi
IndiTV.com

झेलम सुटणार की नाही;कधी? याबद्दल कोणीच खात्रीशीर सांगू शकत नव्हतं. सायंकाळी कर्फ्यू सुरु होण्याच्या आत भाऊजींना घरी पोहोचणं भाग असल्याने गाडी सुटेपर्यंत न थांबता त्यांना परतावं लागलं.

जम्मूहून आलेले काही सहप्रवासी गाडीत घडलेल्या रणकंदना विषयी सांगत होते.

ज्या काही खून, मारामा-या झाल्या त्या दिल्लीच्या आधी; सोनपतला. संतापाने बेभान झालेले लोक जीवे मारतात हे कळल्यावर कोणी सरदारजी गाडीत नव्हता. आमच्या डब्यातील एकाला त्याच्यावर सामान रचून सहप्रवाशांनी वाचवलं. थोड्या काहींनी दाढी-मिशा काढून टाकल्या.

भाऊजींची पाठ वळली आणि इकडे मात्र ‘झेलम’ रद्द होत असल्याची घोषणा करण्यात आली. आता घरी कसं पोचायचं या घोर विवंचनेने धाबं दाणाललं. डब्यातच ठिय्या देऊन बसायचं ठरवलं.

एवढयात एकजण डॉ. घैसासांचा शोध घेत आला. या गाडीने प्रवास करत आहेत, हे त्याला कसं कळलं याचं आश्चर्य वाटलं. एका मुलाखतीसाठी तो दिल्लीला आला होता. महात्प्रयासाने आलेल्या ‘कॉल’ची तारीख बदलून घेण्यासाठी त्याला दिल्लीला थांबणं भाग होतं.

सुखरूप असल्याचा निरोप घरी तारेने कळवावा म्हणून तो पोस्ट ऑफिस मध्ये गेला; तेव्हा त्याला “तुम्ही आणि तार पुण्याला एकदमच पोचाल” उत्तर मिळाल्याने घरी निरोप देण्यासाठी एक डॉक्टर नक्की मदत करेल, म्हणून त्याने रिझर्वेशन लिस्ट मधून नाव शोधून काढलं होतं.

मध्यमवर्गीय प्रवाशांचे अतोनात हाल झाले. स्टेशनजवळच्या हॉटेल्समध्ये जागा नाही; बॅंक्स बंद म्हणून ‘ट्रॅव्हलर चेक्स’ना कोणी विचारेना. त्यातल्या त्यात सुरक्षित अशा रेल्वे फलाटावर ब-याच लोकांना मुक्काम टाकावा लागला. परंतु तेथूनही नंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं म्हणे. काय करावे,कोठे जावे; कोणाला काही कळेना.

आमचं दैव बलवत्तरच म्हणायचं. तेथेच ठाण मांडून बसल्याने परत झेलम सुटत असल्याची घोषणा करण्यात आली. सायंकाळी साडेसहाला एकदाची गाडी हालली; पण नि:श्वास टाकायच्या आत पुन्हा थांबलीही. कोणा एकाला भोसकलं होतं म्हणे.

बाईंच्या अंत्यदर्शनासाठी रेल्वेने फुकटात जाता येईल, अशी अफवा पसरल्याने हजारोंच्या संख्येने लोक दिल्लीत आले होते. त्यांनी आता परतण्यासाठी गर्दी केली होती. रिझर्वेशन, तिकीट नसलेल्या ब-याच लोकांना टी.सी.ने खाली उतरवलं.

 

anti-sikh-riot1-inmarathi
deccanchronicle.com

काहीजणं जागेवरून हालायला नकार देत, तसेच टिच्चून बसून राहिले. बिचारा एकटा टी.सी.हतबलपणे बघण्याखेरीज काय करणार? खाली उतरवले गेलेल्यांनी चिडून डब्यावर दगडफेक करायला सुरुवात केली.

ट्रेन कंडक्टरने डब्याच्या दारं, खिडक्या बंद करून घ्यायला लावल्या. बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून, तासाभराच्या गोंधळानंतर दिल्लीबाहेर पडलो. नंतरही कुठेही “डब्याच्या दारं, खिडक्या उघडू नका” सूचना दिली गेली.

बरोबर आणलेलं जेवण कधीच संपलं होतं. केळ्यांवरही रेशनिंग करावं लागलं. मुलांना ‘खाऊ नका’ म्हणणं जीवावर येत होतं. एखाद्या स्टेशनवर गाडी थांबल्यावर खिडकी किलकिली केली तर प्लॅटफॉर्मवर अडकून पडलेले शेकडो प्रवासी दिसत. एखादा जवान “अंदर सब ठीक है ना, कुछ गडबड तो नही ?” विचारून जाई.

‘झेलम’ अधून मधून सारखी विश्रांती घेत होती. स्टेशनवर न थांबता वाटेतच कुठे तरी थांबे. गाडीतील ‘डायनिंग कार’ कधीच रिकामी झालेली. सकाळचा ‘चहा’ सोडा, पण बरोबरच्या प्यायच्या पाण्याचा साठाही संपत आलेला. पोरं भुकेने पार कासावीस होऊन गेली.

३ तारखेला दुपारी एक वाजता ‘इटारसी’ आलं. मिळालेली पुरी-भाजी ‘अमृतावणी’ लागून अधाशासारखी चोपली. ‘झेलम’ अजूनही सारखी थांबत थांबत अस्ते अस्ते पुढे सरकत होती. वाटलं होतं रात्रीपर्यंत पुण्यात पोचू. पण तेही नाही. रात्रीचं अजून एक जेवण वाढलं.

 

anti-sikh-riots1984_inmarathi (1)
thelogicalindian.com

मुख्य म्हणजे आमचं सर्व सामान चंदीगडला अडकल्याने बरोबर पांघरुणही नव्हतं. आणखी एक रात्र कुडकुडत काढवी लागली. अखेर खडतर तपश्चर्या संपून १८ तासांच्या विलंबाने का होईना, ४ नोव्हेंबर, ८४ ला पहाटे ४ वाजता आम्ही पुणे स्टेशनवर एकदाचे उतरलो.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?