' “अमित शहा जी, मला ‘मेकॉले’ शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो! आणि त्यामागे “ही” कारणं आहेत” – InMarathi

“अमित शहा जी, मला ‘मेकॉले’ शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो! आणि त्यामागे “ही” कारणं आहेत”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : डॉ. अभिराम दीक्षित 

===

भाजपा अध्यक्ष अमित शहांनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर टीका करून जुन्या वादाला नवे तोंड फोडले आहे.

मी स्वत: मेकॉलेपुत्र आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र शिकलो त्यामुळे बरे आयुष्य जगू शकतो. नाहीतर कुठल्यातरी वेद्पाठशाळेत उघडाबंब अवस्थेत शेंडी ठेवून जुनाट ऋचा घोकत बसलो असतो.

 

ahmed patel and amit shah-inmarathi03
livemint.com

 

बर मी एकटा मेकॉलेपुत्र नाही. तुम्ही सारे वाचक मेकॉलेपुत्र आहात. गांधीजी, नेहरू, सावरकर, आगरकर, आंबेडकर, टिळक हे सारे मेकॉलेपुत्रच आहेत. ब्यारिस्टर आहेत, वकील आहेत, पदवीधर आहेत. आधुनिक शिक्षणाने ही व्यक्तिमत्वे उभी राहिली आहेत.

मेकोलेपुत्रांनी भारताला स्वातंत्र्य मिळवुन दिले. ब्रिटिशांच्या गुलामीचे उद्गाते वेदांती पेशवे दुसरे बाजीराव होते. इतकेच काय दस्तुरखुद्द अमित शहा सुद्धा मेकॉलेपुत्र आहेत. वेदपाठशाळेतील याज्ञीक नव्हे.

मेकोलेने संस्कृत वेदपाठशाळा बंद केल्या नाहीत. त्याला सरकारी अनुदान थांबवले. तसाही संस्कृत वेदपाठशाळेत किती % हिंदुना प्रवेश होता? आणि वेद घोकून देशाचे काय भले होणार होते? मेकोलेने या शिवाय अरबी मदरशांचेही अनुदान बंद केले होते.

पुन्हा नीट ऐका – मेकोलेने इस्लामी मदरशांचे सरकारी अनुदान बंद केले होते. याचा अर्थ समजतो का?

मदरसे आणि वेद पाठशाळा याचे महत्व कमी करून, धार्मिक शिक्षणाची मर्यादा ओलांडुन, मेकोलेने भारतासाठी भविष्याची दारे उघडी केली होती. लोर्ड मेकॉले या आधुनिक भारताच्या भाग्य विधात्याला शत्रू मानणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे.

 

lord-macaulay-inmarathi
the-wire.com

चौदा विद्या व चौसष्ठ कला कोण शिकवत होते? भारतात जे वेद्पाठशाला सोडुन इतर शिक्षण होते त्याचे काय? तक्षशीला आणि नालंदा इत्यादी विद्यापीठात काय शिकवले जात होते. हृदयावर हात ठेवून ऐका.

त्यापेक्षा अधिक चांगली शिक्षण व्यवस्था लॉर्ड थॉमस बॅिबग्टन मेकॉले याने भारतात आणली. या विषयातील तज्ञ रा. भा. पाटणकर यांनी या विषयावर बरेच संशोधन आणि अभ्यास केला आहे. रा. भा. पाटणकरांनी भारतातील प्राचीन आणि अर्वाचीन शिक्षण पद्धतीचा सखोल वेध घेणारे पुस्तक लिहिले आहे. अपुर्ण क्रांती असे त्या पुस्तकाचे नाव आहे.

त्यांनी भारतातील जुनी शिक्षण व्यवस्था (वेदपाठशाला सोडुन इतर) किती मागास होती याचा योग्य वेध घेतला आहे. आणि मेकोलेच्या शिक्षण पद्धतीला अधिक आधुनिक आणि उपयुक्त करण्यासाठी काय बदल केले पाहिजे याचाही वेध घेतला आहे.

प्राचीन भारतात इतिहास हा विषय कोण्या राजकुमारांनी शिकला होता का? भूगोल हा विषय राजे महाराजांनी अभ्यासला होता काय? साध्या नकाशा या शब्दाला संस्कृत शब्द का मिळत नाही?

पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर डोलते असे उत्तर पेशवाईच्या अंतापर्यंत तज्ञात एकमत होते. बीजगणित भूमिती दैनंदिन हिशेबापलिकडे गेली होती काय? उत्तर नाही असे आहे.

पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र हे तर विषय नाम सुद्धा इंग्रजीतून भाषांतरीत आहे. मेकोलेने हे सर्व विषय आणि रूपरेखा भारतात आणल्या पण या बोडसभक्तांना वेदातली काल्पनिक विमाने दिसतात. प्रत्यक्षातले ज्ञान दारिद्र्य नाही. दुर्दैव!

तथाकथित भारतीय शिक्षण पद्धतीत काही वैगुण्य असल्याशिवाय भारत गुलाम झाला का?

आता राहिला प्रश्न मेकॉले यांच्या नावावर खपवल्या जात असलेल्या भारत विरोधी उताऱ्यांचा. ते साफ खोटे आहे. शुद्ध थाप. त्यातला पहिला इंग्रजी शिक्षणामागील तथाकथित कुटिल हेतूबाबतचा उतारा हा मेकॉले यांचा नाहीच.

हा उतारा ३५चा, पार्लमेन्टमधल्या भाषणातला, असे सांगण्यात येते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणाऱ्या भाषणांच्या संग्रहाला हॅन्सार्ड असे म्हणतात. त्याच्या कोणत्याही प्रतीतील कोणत्याही तारखेत हा उतारा नाही. कसा असणार?

 

british-parliament-inmarthi
Fanastasiasyvanych.blogspot.com

१८३३ ला मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते भारतात होते. शिवाय या मूळ इंग्रजी उताऱ्यातील विचार तर सोडाच, भाषाही त्यांची नाही. ती फारच अलीकडची आहे. तेव्हा हा उतारा बनावट आहे. मग तो कोठून आला?

बाकी आधुनिकता आणि विज्ञान यात स्वकीय परकीय वगैरे काही नसते. मदर तेरेसा अंधश्रद्ध प्रतिगामी आहे म्हणून तिचा विरोध करा. मदर तेरेसा आणि न्यूटन यांना एका मापात मोजू नका. विज्ञान युरोपात जन्मले ते शिकले पाहिजे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राष्ट्रवादाचा आधुनिक विचारही युरोपियन फ्रेंच राज्यक्रांतिचे अपत्य आहे. मी स्वत: राष्ट्रवादी आहे. इथे राहणाऱ्या सर्व माणसांचे हित असा माझ्या राष्ट्रवादाचा आशय आहे. पण आधुनिकतेचा निषेध करत संस्कृतीचे पाढे घोकणे हा तुमचा राष्ट्रवाद असेल तर या राष्ट्रवादाचा देशाला काहीही उपयोग नाही.

मेकोलेच्या वरील सर्व खोट्या आरोपांचा समाचार घेणारे विस्तृत अभ्यासपूर्ण पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. डॉ. जनार्दन वाटवे, डॉ. विजय आजगावकर या लेखक द्वयीने अतिशय अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. निर्वाचन आयोग बंद करून ते वाचले पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?