' मोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश – InMarathi

मोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : अनूप कुंभारीकर

===

भारतासारख्या विकसनशील देशात सरकारने सगळ्याच गोष्टींची जबाबदारी घ्यावी असा सगळ्यांचाच समज. मग ती शेतकऱ्यांची कर्ज माफी असो, गॅस,पेट्रोल ह्यावरील सबसिडी असो, सरकारी नोकऱ्या असोत किंवा कर्मचाऱ्यांची पगार वाढ असो. आणि त्यासाठी आंदोलन, उठाव नेहमीचंच.

पण आपल्या देशामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढावी किंवा टॅक्समधून सरकारला मिळणारा महसूल वाढावा ह्यासाठी एखादं आंदोलन, उठाव झाला असं आलंय कधी कानावर? नाही!

असं काही कधी झालंच नाहीये मग कानावर येणार तरी कसं? इतकेही अच्छे दिन अजून आले नाहीत.

म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या आणि इन्कम टॅक्समधून मिळणारा महसूल ह्या गोष्टी वाढवण्याची जबाबदारी सरकारचीच. ह्याच संबंधी एक सुखद बातमी सोमवारी म्हणजे २२ ऑक्टोबरला इन्कम टॅक्स विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांमधून मिळाली.

 

income tax return.marathipizza2
indianexpress.com

पुढे जाण्याआधी थोडी माहिती.

प्रत्यक्ष कर(Direct Tax) म्हणजे उत्पन्नावर भरला जाणारा टॅक्स. जो वैयक्तिक उत्पन्नावर (Personal Income Tax) आणि व्यवसायांच्या उत्पन्नावर (Corporate Income Tax) भरावा लागतो.

तसेच अप्रत्यक्ष कर (Indirect Tax) वस्तू आणि सेवा विकत घेतांना/विकतांना लागतो. ज्यामध्ये येतो Goods and Services Tax (GST) किंवा वस्तू व सेवा कर. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर मिळून सरकारला जे उत्पन्न होतं त्याला म्हणायचं टॅक्स रेव्हेन्यू.

सुखद बातमी प्रत्यक्ष कराबद्दल आहे. चला पाहुयात काय आहे ती.

१. Tax Returns भरणाऱ्यांची संख्या २०१३-२०१४ मध्ये जी ३.७९ कोटी होती ती वाढून २०१७-२०१८ च्या वित्तीय वर्षात ६.८५ कोटी एवढी झाली. म्हणजेच ४ वर्षात ८०% ची उंच उडी. ह्या ३.७९ कोटी Tax Returns मधील घोषित उत्पन्न होते २६.९२ लाख कोटी रुपये जे वाढून आता झाले आहे ४४.८८ लाख कोटी रुपये. म्हणजेच तब्बल ६७% टक्यांची वाढ.

२. २०१६-२०१७ या वित्तीय वर्षात १,४०,००० लोकांनी आणि कंपन्यांनी जाहीर केलं की त्यांचं उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. १,४०,००० या आकडयाचे महत्व असे की याआधी म्हणजे २०१३-२०१४ या वित्तीय वर्षात फक्त ८७,५०० लोकांनी आणि कंपन्यांनी त्यांचे उत्पन्न १ कोटी रुपये पेक्षा जास्त आहे असं जाहीर केलं होते.

 

income tax return.marathipizza3
indianexpress.com

म्हणजे ३ वर्षात ६०% ची उडी. या १,४०,००० पैकी ८१,३४४ व्यक्ती आहेत तर उरलेल्या कंपन्या. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घोषित करणाऱ्या लोकांमध्ये २०१३-२०१४ च्या तुलनेत ६८% ने वाढ झाली आहे.

३. प्रत्यक्ष कर(Direct Tax) देशाच्या GDP च्या (देशात बनणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य) किती टक्के आहे हे सांगते Direct Tax-GDP गुणोत्तर (Direct Tax to GDP Ratio). या गुणोत्तराने गेल्या १० वर्षातील उच्चांक गाठला आहे.

५. ९८% म्हणजेच जवळजवळ ६% झाला आहे. कुठलाही Ratio किंवा गुणोत्तर तेव्हाच वाढते जेव्हा ज्याला भागतो (Numerator) त्याचे वाढण्याचे प्रमाण ज्याने भागतो (Denominator) त्याच्या वाढण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असते.

म्हणजेच Direct Tax-GDP Ratio चे वाढते प्रमाण हे दर्शवतो की प्रत्यक्ष कर महसूल हा देशाच्या GDP पेक्षा जलद गतीने वाढत आहे. जरा उपरोधिकच आहे पण हे शक्य झालं ते टॅक्स चुकवणाऱ्यांनी तो भरायला सुरुवात केल्यामुळे.

हे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे Demonetisation किंवा नोटबंदी, आधार आणि पॅनची लिंकिंग, मोठ्या नगदी व्यवहारांवरील निर्बंध, ऑनलाईन पेमेंट्स अशा गोष्टींमुळे टॅक्स डिपार्टमेंटला मिळत असलेल्या लोकांच्या उत्पन्नाच्या धाग्या-दोऱ्यांमुळे टॅक्स चुकवणाऱ्यांना वाटणारी भीती.

नोकरी करणाऱ्या लोकांना Tax Deduction at Source असल्या कारणाने सहसा उत्पन्न लपवता येत नाही आणि त्यामुळे Tax भरावाच लागतो.

 

income-tax-inmarathi
youtube.com

पण Self-employed लोक मग तो चौकात वडापाव विकून दिवसाला हजारो रुपये कमावणारा व्यक्ती असो किंवा मजबूत प्रॅक्टिस चालणारा डॉक्टर अथवा वकील असो. पैसे घेऊन बिल न देणारे आणि त्यामुळेच उत्पन्न पूर्णपणे लपवणारे किंवा कमी उत्पन्न दाखवून टॅक्स चोरी करणारे पुष्कळ सापडतील.

नोकरी करणाऱ्यांमध्येही खोटं बिल दाखवून मी कसा कमी टॅक्स भरला अशी हुशारी सांगणारेही मिळतीलच.

आपल्या देशाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजेच एकत्रित टॅक्स हा GDP च्या जवळपास १६% आहे. तुलना करायची झाली तर US चा २७%, UK चा ३९% तर फ्रांस चा ४५%. हे झाले  विकसित देश पण ब्राझील, चीन सारख्या विकसनशील देशात हा आहे ३४% आणि २२% टक्के.

म्हणजे आपल्या देशाचा टॅक्स महसूल हा अजूनही तसा खूप कमी आहे. आशा हीच करावी एकतर टॅक्स चोरणाऱ्या लोकांना सुबुद्धी मिळावी (खुळी आशा) किंवा सरकार आणि टॅक्स डिपार्टमेंटची भीती अशीच वाढत जावी. कारण टॅक्स भरणाऱ्यांची संख्या आणि टॅक्स महसूल वाढणे अत्यंत गरजेचे आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?