' कोरियन युद्धात अनेक लोकांचे प्राण वाचवणारा शूर भारतीय सैनिक – ‘देवदूतच’ जणू! – InMarathi

कोरियन युद्धात अनेक लोकांचे प्राण वाचवणारा शूर भारतीय सैनिक – ‘देवदूतच’ जणू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

२५ नोव्हेंबर १९५० ह्या दिवशी चीनने आपल्या ३,००,०००. सैनिकांना दक्षिण कोरियावर अचानक चाल करण्यासाठी पाठवले आणि संपूर्ण जगालाच हादरवून टाकले.

एकदम आलेल्या ह्या मोठ्या धक्क्याने फक्त दक्षिण कोरियाच नाही तर दक्षिण कोरियाच्या बाजूने समर्थन करणारे अमेरिका, ब्रिटन, भारत, ह्या ही देशांमध्ये अचानक खळबळ उडाली.

उत्तर कोरियाच्या बाजूने चीन उभा होता. म्हणून तिसरे महायुद्ध पेटण्याची भीती सगळीकडे पसरली होती. युनायटेड स्टेट्स, विरुद्ध चीन ह्या राष्ट्रांमध्ये जुंपली होती.

 

1950 war inmarathi
BT.com

 

अमेरिकेच्या वारंवार दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांनी चीन पेटला होता आणि दक्षिण कोरियात असलेल्या अमेरिकी सैन्यावर अचानक चाल करून आला होता.

अमेरिकेने अनेक वेळा न्यूक्लिअर बॉम्बच्या धमक्या चीनला दिल्या होत्या.

चीनचा हुकूमशहा माओ यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेला सांगितले की तुमच्या न्यूक्लिअर बॉम्बने एवढ्या मोठ्या चीन च्या भूमीला किरकोळ खड्डा पडेल आणि असंख्य लोकसंख्या असलेल्या पैकी काही लोक मारले जातील.

तुमच्या ह्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. दोन्ही देशात शांतता राहावी म्हणून भारतानेही प्रयत्न केला. नेहेरू चीनच्या माओ यांना भेटून शांत राहण्यासाठी विनंती केली. पण ती माओ नी जुमानली नाही.

 

neharu-mao-meet1-inmarathi
HSINHUA-NEWS-AGENCY.com

 

चीन ने हल्ला करण्यापूर्वी नेहेरूंनी अमेरिकेला चीन अचानक हल्ला करेल अशी जाणीव करून दिली होती पण वॉशिंग्टनने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ह्या अचानक हल्ल्याला सामोरे जावे लागले.

हे कोरियाचे युद्ध म्हणजे एकमेकात सुरू असलेल्या वैचारिक संघर्षातून निर्माण झालेले शीत युद्ध.

हे राजकीय कुरघोड्या, जळफळाट, आणि काही प्रमाणात मूर्खपणा ह्या गोष्टींमुळे पेटले गेले आणि त्याचा हा मोठा घातक परिणाम जगापुढे उभा राहिला.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजे १९४५ साली कोरियाचे दोन भाग पडले एक म्हणजे “सोविएत युनियन” आणि दुसरा “युनाटेड स्टेट्स” असे ओळखले जाऊ लागले.

एक झालं कम्युनिस्ट राष्ट्र, आणि दुसरं लोकशाही राष्ट्र. उत्तर कोरिया चा हुकूमशहा होता किम संग-२रा. जो सध्या असलेला हुकूमशहा किम जोनचा आजोबा त्याच्या डोक्यात कोरिया युनायटेड स्टेट्स आपल्या ताब्यात घेण्याचा विचार सतत घोळत होता.

 

kim-sung_inmarathi
telegraph.co.uk

 

आणि त्यासाठी त्याने त्याच्या सैन्याच्या तुकड्या अचानक दक्षिण कोरियावर हल्ला करण्यासाठी पाठवल्या कारण युनायटेड स्टेट्सने पण लगेचच युद्धला सुरुवात करावी म्हणून त्याने हे आक्रमण केले.

लगेचच युनायटेड स्टेट्स ने सुद्धा “युनायटेड नेशन्स” ह्या बॅनरखाली युद्धात उडी घेतली . सोविएत देश उत्तर कोरियाला मदत करत होते तर युनाटेड स्टेट्स दक्षिण कोरियाला मदत करत होते.

एकूण २१ राष्ट्रे ह्या युद्धात सामिल झाली होती. आणि ह्या युद्धाला सुरुवात झाली ती तारीख होती २५ जून १९५०.

भारत सुद्धा ह्या दोन्ही कोरियाच्या युद्धात जबरदस्तीने सहभागी झाला होता. पण भारताने ह्या युद्धात मदत म्हणून दक्षिण कोरियाला आपली वैद्यकीय फौज आणि अनेक डॉक्टरांचा ताफा पाठवला होता.

कारण भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. आणि लगेचच आपल्या शेजारी राष्ट्रांच्या विरोधात युद्ध करण्याची इच्छा नव्हती.

त्यामुळे कैद्यांना, किंवा जखमींना मदत म्हणून ३४६ जणांची एक वैद्यकीय तुकडी आणि अनेक तज्ञ डॉक्टरांची मोठी फौज दक्षिण कोरियात दाखल झाली.

ह्यात ४ सर्जन, दोन अनेस्थेशीयालॉजिस्ट तसेच एक डेंटिस्ट अशी टीम पाठवली गेली. ह्या टीमचे नेतृत्व करत होते लेफ्टनंट कर्नल ए.जी. रंगराज.

 

a g rangraj inmarathi
news track english

 

लेफ्टनंट कर्नल रंगराज ह्यांच्याबरोबर ६० पॅराफील्ड अँबुलन्सचा ताफा होता. लेफ्टनंट कर्नल रंगराज एक जबाबदार अधिकारी म्हणून नावाजलेले होते.

त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सैन्याबरोबर १९४४ साली जपान विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. पॅराशूट जम्पिंग मध्ये चांगले नाव मिळवले होते. म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती.

ही टीम जेंव्हा दक्षिण कोरियात पोचली त्यावेळी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्या युद्धक्षेत्रांत त्यांना दळण वळणाच्या काहीही सोयी नव्हत्या. त्यामुळे वैद्यकीय सेवेत अडथळे येत होते.

ह्या टीम मधल्या दोन सैनिकांनी तर रेल्वे ट्रेन चालवण्याचा शून्य अनुभव असताना ती ट्रेन ह्या संपूर्ण टीमला घेऊन त्यांनी चालवली आणि एका पुलाच्या पलीकडे सगळे पोचले.

कारण तो पूल कधीही उध्वस्त केला गेला असता. तो उध्वस्त होण्यापूर्वी त्यांना सगळ्यांना पुलाच्या पलीकडे पोचायचे होते आणि ते पोचले.

आता हे ट्रेन चालवण्याचे शिक्षण त्यांना वैद्यकीय शाळेत किंवा आर्मी स्टाफ कॉलेजमध्ये कुठेही दिले गेलेले नव्हते. पण कामगिरी बजावली आणि कामाला सुरुवात झाली.

तोपर्यंत चिनी फौजा युनायटेड स्टेट्सच्या सीमेवरून लढत पुढे येऊ लागल्या होत्या. अनेक सैनिक जखमी होत होते. पण त्यांना ताबडतोब वैद्यकीय सेवा देण्याचे काम भारतीय सेना करत होती.

अतिशय काळजीने आणि प्रेम भावाने तसेच तातडीने भारतीय सेना ही सेवा देत होती त्यामुळे काळजी करण्याचे कारण नव्हते असे कोरियाच्या अधिकाऱ्यांना जाणवत होते.

ते अधिकारी भारतीय सेनेच्या कामगिरीवर खुश होते. कारण सेनेतले सर्जन तातडीने आवश्यक जखमी सैनिकांवर तातडीने उपचार करत होते.

प्रत्येक जखमेवर काळजीपूर्वक उपचार करत होते.

त्या ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीतही हे भारतीय सर्जन त्वरित आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया करून सैनिकांचे प्राण वाचवण्याचे मोठे काम करत होते.

मार्च १९५१ मध्ये युनायटेड स्टेट्स नी अत्यंत घातक शास्त्रांचा वापर करून कापाकापी ला सुरुवात केली होती आणि त्या कापाकापित अनेक सैनिक जखमी होत होते. पण भारतीय टीम सज्ज होती.

ह्या टीमने छोट्या मोठ्या कोणत्याही प्रकारच्या जखमेवर त्वरित उपचार केले आणि जखमींना आधार देऊन सतत सेवा दिली.

 

rangraj1-inmarathi
Indian Military Photos/ Facebook.com

 

ह्या धावपळीत त्या डॉक्टरांनी ६ दिवसात १०३ मोठ्या शस्त्रक्रिया करून जखमींचे प्राण वाचवले हे प्रत्यक्ष कोरियाच्या सेनाप्रमुखाने पाहिले होते आणि भारतीय वैद्यकीय सेवेची स्तुती सुद्धा केली.

त्यामुळे ही टीम अतिशय काळजीने ते काम करत राहिली. असंख्य जखमींवर रोजच्या रोज उपचार होत होते.

२७ जुलै १९५३ ह्या दिवशी लांबलेल्या ह्या युद्धाच्या काही तडजोडी झाल्या आणि युद्धाची झळ कमी झाली. ह्या युद्धाच्या आर्मीस्टिक अग्रीमेंट करण्यासाठी भारतीय सेनेनेही प्रयत्न केले.

भारतीय सेनेचे जनरल के. एस. थिमय्या ह्यांनी आर्मीस्टिक अग्रीमेंटसाठी साह्य करवून युद्धाला विराम देण्याची मोठी कामगिरी केली.

ह्या दरम्यान भारतीय सेनेच्या वैद्यकीय तुकडीने फार मोलाची कामगिरी केली.

एकूण २०००० च्या वर जखमी सैनिकांवर यशस्वी उपचार केले आणि सुमारे २३०० सैनिकांवर रणांगणातच यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले.

१९५० साली दक्षिण कोरियामध्ये मदतीसाठी गेलेली ही टीम १९५४ सालच्या फेब्रुवारी महिन्यात परत भारतात आली. अशी ही दमदार कामगिरी संपूर्ण दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या यशाची भागीदार ठरली.

 

south korea india inmarathi

 

ह्या कामगिरीसाठी दोन ऑफिसर्सना वीरचक्र प्रदान करण्यात आले आणि लेफ्टनंट कर्नल रंगराज यांना महा वीर चक्र प्रदान करण्यात आले. तसेच बाकी सहकारी टीमचा गुणगौरव करण्यात आला.

२०१० साली दक्षिण कोरियाचे प्रेसिडेंट ली म्यून्ग बाक ह्यांनी भारतीय सेनेच्या ह्या कामगिरीची प्रशंसा केली आणि भारत – दक्षिण कोरिया मैत्री अबाधित राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?