' १४ वर्षात १५ बदल्या, असं करतात तरी काय मुंढे साहेब? – InMarathi

१४ वर्षात १५ बदल्या, असं करतात तरी काय मुंढे साहेब?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या कार्यशैलीने तुकाराम मुंढे यांनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

सामान्य जनतेला आपलेसे वाटणारे तुकाराम मुंढे राजकारणी आणि कंत्राटदार यांना मात्र नकोसे वाटतात. असं का?

याचाच नुकताच प्रत्यय आला असून नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे

या प्रश्नांच उत्तर त्यांच्या कार्यशैलीतून मिळतं. राजकारणी आणि भ्रष्ट कंत्राटदार यांची अभद्रयुती सर्वांना माहीतच आहे  त्याचे होणारे वाईट परिणाम सर्वसामान्य जनता भोगत असते.

अशावेळी त्यांच्या विरोधात उभे राहणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे जनतेसाठी नायकच ठरतात. 

बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या गरीब कुटुंबात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला. ३ जून १९७५ रोजी जन्मलेले तुकाराम मुंढे आणि त्यांची भावंडं यांचं दहावी पर्यंतच शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं.

पुढे त्यांनी इतिहास आणि समाजशास्त्रातून बी. ए. ही पदवी मिळवली तर राज्यशास्त्रातून एम. ए. चे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी पुढील अभ्यासाला सुरुवात केली. आधी एमपीएससी मार्फत वित्तीय सेवेचे गट ब अधिकारी म्हणून निवड झाली.

 

tukaram-munde-inmarathi
deshdoot.com

 

त्याच दरम्यान त्यांनी जळगाव येथे अध्यापनाचे कार्य देखील केले.

एमपीएससी परीक्षेत निवड झाल्यानंतर पुणे येथील “यशदा” या संस्थेत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत असते तेव्हाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. त्यात ते देशातून विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

२००५ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला होता.

आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती सोलापूर येथे झाली. तुकाराम मुंढे प्रशासकीय अधिकारी म्हणून कसे काम करतील याची झलक सुरुवातीलाच पाहायला मिळाली.

मसुरी येथे आपले पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली नियुक्ती झाली त्यानंतर तीनच महिन्यात त्यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्धार व्यक्त केला आणि कारवाईला सुरुवात केली.

साहजिकच आहे काही व्यक्तींचे हितसंबंध यात दुखावले गेले आणि परिस्थिती चिघळली. पण तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहत त्यांनी ३ ते ४ दिवसात कारवाई पूर्ण केली.

काही जण जसे विरोध करत होते तर आता विरोध केला तरी उपयोग होणार नाही म्हणून कारवाई संपली तोपर्यंत अनेकांनी आपले अतिक्रमण स्वतः हून काढून घेतले.

प्रचंड दबाव असतांना देखील एक नवीन अधिकारी आपली जबाबदारी पूर्णत्वाला नेतो ही खरोखरच कौतुकास्पद बाब होती.

पण हे प्रकरण इथेच थांबले नाही. पुढच्या दिवशी काही महिला त्यांना भेटायला दालनात येणार होत्या परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना येऊ दिले नाही.

थोड्या वेळात तुकाराम मुंढेंना कळले की त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि त्यासाठी खूप लोक आणि विशेषतः महिला पोलीस स्टेशनला जमल्या आहेत.

 

tukaram

 

विनयभंग आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलांकडून झाली होती. असा प्रयत्न पुन्हा एकदा झाला पण तुकाराम मुंढे डगमगले नाहीत. पण नियुक्तीनंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात असा प्रसंग घडतो, त्यावेळी त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल?

कारवाई जनतेच्या हिताची होती का? तर होती.  त्यासाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात आली का? तर हो राबविण्यात आली.

मग फक्त काही जणांचे हितसंबंध दुखावले जातात म्हणून ही कारवाई टाळावी आणि तसे नाही केले तर त्याचा त्रास अधिकाऱ्याला भोगावा लागेल.

अशावेळेस अधिकारी संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष करतात. पण एवढे होऊनही तुकाराम मुंढे थांबले नाहीत, तर जनतेच्या हिताचं असेल तर निर्णय घेण्यास ते कचरणार नाहीत हाच संदेश त्यांनी आपल्या कामातून दिला.यानंतरही वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला

एव्हाना त्यांच्या कार्यशैलीची चर्चा झालीच होती. २००८ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना त्यांनी काही जिल्हा परिषदेच्या शाळांचा दौरा केला.

त्यात त्यांना शिक्षकच शाळेत गैरहजर आढळले. दुसऱ्या दिवशी त्या सर्व अनुपस्थित शिक्षकांना त्यांनी निलंबित केले होते. तेव्हापासून या प्रकारांना चाप बसला तो कायमचाच !

जिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना डॉक्टर अनुपस्थित दिसले तर त्यांनी डॉक्टरांना पण निलंबित केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने डॉक्टरला निलंबित करण्याचे हे पहिलेच प्रकरण होते.

त्यानंतर आता तुकाराम मुंढे आणि बदली हे एक समीकरणच होऊन बसले आहे. तेरा वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत बारा वेळा तरी बदली झाली आहे.

 

tukaram mundhe inmarathi

 

तुकाराम मुंढे जिथे जातील तिथे वाद देखील नेहमी निर्माण होतांना दिसतात. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांनी काही रचनात्मक काम केले नाही.

जालना येथील रखडलेला पाण्याचा प्रश्न त्यांनी अवघ्या तीन महिन्यात सोडवून जालनाकरांची तहान भागवली.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी वारकऱयांसाठी २१ दिवसात तात्पुरत्या शौचालयांची निर्मिती केली.

त्याचसोबत मुख्यमंत्री सोडून इतर व्हीआयपी लोकांची खास दर्शनव्यवस्था बंद केली.

सोलापूर जिल्ह्यातील तहानलेल्या २८२ गावांचा पाण्याचा प्रश्न असो वा टँकरमुक्त गावांच्या संख्येतील घट असो त्यांनी आपली कार्यक्षमता नेहमीच सिद्ध केली आहे.

तत्कालीन विक्री विभागात महसूल अनेक पटींनी वाढविण्याची किमया देखील त्यांच्या कार्यक्षमतेची प्रचिती देऊन जाते.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतांना त्यांनी सुरु केलेला “वॉकी विथ कमिशनर” हा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे जनतेच्या समस्यांना प्राधान्यक्रम देऊन त्या सोडवल्या गेल्या.

मग मुंढे साहेब जिकडे जातात तिकडे राजकारण्यांना डोकेदुखी ठरतात! असं काय करतात साहेब? या प्रश्नाच उत्तर त्यांच्या कार्यशैलीतूनच मिळतं.

 

tukaram-inmarathi
abpmaza.abplive.com

 

वाद नको म्हणून ठराविक कामातच कार्यक्षमता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यापैकी तुकाराम मुंढे नाहीत. ते स्पष्टवक्ते आहे. जे काम कायद्याच्या चौकटीत बसत नसेल त्याला ते स्पष्ट शब्दात नाही सांगतात.

 

Tukaram Mundhe InMarathijpg

 

यामुळे अनेक जण दुखावले जातात, काहींचा अहंकार दुखावतो. पूर्वी फोन वर होणारी काम आता प्रत्यक्ष भेटून होत नाही.

भ्रष्ट लोकांनी निर्माण केलेल्या साखळीवर सतत वार होतात. तेव्हा त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला जातो. त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव येतात. पण सामान्य जनता उत्स्फूर्तपणे त्याविरुद्ध जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा मुंढे साहेब प्रामाणिकपणे काम करत असल्याची पावतीच मिळते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?