भारतीयांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या असामान्य स्त्री व्यक्तिरेखा आपण विसरणेच शक्य नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक: चैतन्य देशपांडे

===

सगळीकडे नवरात्रीची धुमधाम सुरु झाली आहे. देवळांवर रोषणाई सजली आहे. मंदिरांमध्ये आणि मंदिराबाहेर कमालीची गर्दी वाढलीय. काही घरांमध्ये अखंड दिव्यांची उब जाणवू लागली आहे. एकूणच सगळीकडे उत्साहाचं, मांगल्याचं आणि पवित्रतेचं वातावरण आहे. हिंदू धर्म हा सुरवातीपासूनच शक्तिपूजक म्हणून ओळखला जातो. शक्ती म्हणजेच स्त्री.

भारत देश हा नेहमीच मातृसत्ताक देश होता.. पण काही चुकीच्या चालीरीतींमुळे आणि प्रथांमुळे बरेच वर्ष स्त्रिया मागासलेल्या राहिल्या… !! त्यांची प्रतिभा चूल आणि मुल ह्यातच अडकली..!!

पण ह्या काही वर्षांमध्ये हे चित्र पार उलट झालंय.. परिस्थिती कमालीची बदललीय..  स्त्रिया म्हणजे केवळ रांधा-वाढा-उष्टी काढा, सातच्या आत घरात, किंवा मुलगी शिकली प्रगती झाली ह्या सगळ्यांचे दिवस सरलेत.

शिक्षणामध्ये मुलींचाच पहिला क्रमांक असतो. प्रत्येक शाखेमध्ये मुलीच बाजी मारत आहेत. जवळपास बहुतांश मोठ्या कंपन्या, संस्था, बँकांच्या महत्वाच्या जागेवर स्त्रियांचा सहज वावर आपल्याला दिसतो. विज्ञानामधेही स्त्रिया अग्रेसर आहेत हे आपण मंगलयानाच्या यशस्वी उड्डाणा दरम्यान बघितलंय.

 

indian pilot women-inmarathi02
malayalamnewsdaily.com

कुठलंही कठीण काम/इव्हेंट हे मॅनेज करणं पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त सोपं जातं..! त्यामुळे व्यवस्थापनामधेही स्त्रियाच आपल्याला पुढे दिसतात.

ह्या बदलाची दखल भारतीय सिनेमा नेहमीच घेत आलेला आहे….!! खरंतर भारतातील सिनेमा हा भारतातल्या बदलत जाणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा खूप जवळचा साक्षीदार मानायला हवा. बदलत जाणारा भारत आपल्याला ह्या सिनेमांमधून दिसून येतो.

आज आपण जाणून घेणार आहोत काही सिनेमांतल्या छाप सोडून जाणाऱ्या निवडक स्त्री व्यक्तीरेखा.

१. राधा – मदर इंडिया

“मै एक औरत हू. मैं अपना बेटा दे सकती हू! लाज नही दे सकती!”

गरिबीने अन दुःखाने पिचलेली. घरात खायला दाणा नाही. दोन लहान मुलं. जमीन पिकवायला ती एकटीच. नांगर चालवायला बैलजोडी द्यायला कोणी तयार नाही.

त्याही परिस्थितीमध्ये संकटांशी झगडून वेळप्रसंगी स्वतःच्या खांद्यावर नांगर ठेऊन शेत नांगरणारी. घाम गाळून शेतीमध्ये सोनं पिकवणारी. येईल त्या परिस्थितीमध्ये मुलांना योग्य संस्कार देऊन मोठं करायचं हे स्वप्न उराशी बाळगणारी राधा ही स्वातंत्रोत्तर काळात समस्त स्त्रियांचा आदर्श बनली होती.

काहीही झालं तरी, अगदी स्वतःच्या पोटच्या मुलाला जीवानिशी मारून टाकावं लागलं तरी स्वत्वाशी, सत्याशी तडजोड होऊ द्यायची नाही ही तिची उर्मी नवीन ऊर्जा देऊन गेली.

आजही भारतातली एक आदर्श स्त्री व्यक्तीरेखा म्हणून मदर इंडिया म्हणजेच राधाचं नाव अबाधित आहे. नर्गिस म्हटलं की लोभवसवाणा चेहरा डोळ्यांसमोर येण्याऐवजी राधाचा दारिद्र्याने पिचलेला पण तेवढाच निग्रही चेहरा डोळ्यांसमोर येतो हेच नर्गिसच यशच म्हणावं लागेल.

 

Mother-India-inmarathi

 

२. श्यामची आई

श्यामची आई म्हटल्यावर नजरेसमोर उभी राहते एक करुणामयी आदर्श आई…!! साने गुरुजींच्या प्रेमळ अन सात्विक लेखणीतून रेखाटलं गेलेलं हे मातृचित्र अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आई होऊन बसलं.

आचार्य अत्र्यांनी ह्याच पुस्तकावर श्यामची आई हा सिनेमा बनवला आणि आत्तापर्यंत पुस्तकात वाचलेली आई नंतर पडद्यावर दिसली. जेवढी लोकप्रियता तिला पुस्तक रूपात मिळाली त्याहून कीतीतरी जास्त लोकप्रिय ती चित्रपटाद्वारे झाली.

कितीही संकट आले, किती हालअपेष्टा भोगाव्या लागल्या तरीही आपल्या मुलांवर योग्य तेच संस्कार व्हायला हवेत ह्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारी स्त्री ही आजही आदर्श आई म्हणून ओळखली जाते. वनमालाबाईंनी ह्या भूमीकेला अक्षरशः जिवंत केलंय.

 

shamchi-aai-inmarathi

 

३. बिंदू – मंथन

आपण ज्या गावात राहतो तिथल्या प्रतिष्ठित म्हणवल्या गेलेल्या लोकांशी, समाजाशी, समाजकंटकांशी झगडून गावामध्ये दुग्धसंघ सुरू करून गावकऱ्यांचं राहणीमान बदलण्याचा निश्चय करणारी बिंदू..!!

आपल्या हक्काचा पैसा दुसऱ्यांच्या खिश्यात न जाऊ देण्यासाठी, समाजातील विषमतेची दरी मिटवण्याची सुरवात स्वतःच्या गावातून सुरू करणारी बिंदू तेव्हाच्या दुग्धक्रांतीची धग आपल्याला जाणवून देते.

नवीन ऊर्जा, नवीन उर्मी घेऊन येईल त्या संकटांचा सामना करत करत नवभारताला बनवण्यासाठी बिंदूसारख्या अनेक स्त्रिया खंबीरपणे उभ्या आहेत. स्मिता पाटीलने सोनं केलेली ही भूमिका आजही प्रत्येकाच्या मनात रुंजी घालते.

 

manthan-bindu-inmarathi

 

४. सुलभा महाजन – उंबरठा

चार भिंतींच्या बाहेर पडून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करताना बाईला अनेक अडचणी येतात. अनेक संकटं येतात.

अशीच संकटं उंबरठा मधल्या सुलभा महाजनवरही येतात. समाजासाठी काहीतरी करायचं हा ध्यास घेतलेल्या तिला सगळीकडून रोखण्यात येतं. घरच्यांकडूनही तिच्या मार्गात अडसर आणला जातो.

पण प्रवास चालू ठेवण्यासाठी ती वेळप्रसंगी घराबाहेरही पडते. समाजासाठी काम सुरू करते.. ते करताना समाजकारण, राजकारण ह्या सगळ्यामधल्या अनुचित प्रथांवर बोट ठेवते. त्यांच्याशी झगडत आणि तीचं इप्सित साध्य करते.

आजही एक खंबीर स्त्री व्यक्तिरेखा म्हणून सुलभा महाजन म्हणजेच स्मिता पाटील यांची  व्यक्तिरेखा प्रसिद्ध आहे.

 

umbartha-smita-inmarathi

 

५. शांता – वास्तव

मुलगा रघु म्हणजेच संजय दत्त. अनावधानाने खून करतो आणि गुन्हेगारी विश्वात ओढला जातो. इतका ओढला जातो की स्वतः प्रयत्न करूनही तो बाहेर पडू शकत नाही.

आई शांता म्हणजेच रीमा लागू त्याच्या प्रत्येक चुकेला प्रत्येक कृत्याला शांतपणे आणि समंजसपणे समजून घेते. त्याच्या ह्या गुन्ह्यांना निग्रहाने विरोध करते. पण सत्तेची नशा जिभेला लागल्यामुळे रघु तीचं ऐकत नाही.. आणि गुन्ह्यांमध्ये बरबटत जातो..

एका बाजूने त्याचे शत्रू आणि दुसऱ्या बाजूने पोलीस मारायला आलेले असताना तो आईजवळ परत येतो. तिने वाचवावं म्हणून विनवण्या करतो. शेवटी त्याचीच बंदूक घेऊन शांता स्वतःच्या मुलाच्या कपाळावर बंदूक ठेऊन त्याला मारून टाकते.

मुंबईमध्ये ज्याकाळी गँगवॉर, गुन्हेगारी, गुंडंशाही त्याच्या चरमसीमेवर होती त्याकाळी रघूच्या आईची भूमिका नक्कीच बराच प्रभाव ठेऊन गेली. मदर इंडियाच्या जवळपास जाणारी ही व्यक्तिरेखा रीमा लागूंच्या सर्व व्यक्तिरेखांमधे सर्वोत्तम मानली जाते.

 

vaastav-reemalagoo-inmarathi

 

६. विद्या बागची – कहानी

पोटामध्ये बाळ असलेली स्त्री कलकत्त्यासारख्या मोठ्या शहरात आपल्या हरवलेल्या पतीचा माग काढत काढत येते. येईल ते संकट पार पाडत पोलिसांना हाताशी धरून पतीचा शोध सुरू ठेवते. अनेक गौप्यस्फोट होतात.

तब्बल अर्ध्या सिनेमानंतर आपल्याला जबर धक्का बसतो. ती तिच्या नवऱ्याच्या खुनाचा बदला घेण्याकरता आलेली असते.

जिच्या सोबत आपण संपूर्ण कलकत्ता शहर फिरतोय. जिच्या पोटातल्या बाळासाठी हळहळतोय ती खरतर पोटुशी नसतेच. नकली ओळख घेऊन विद्या बागची आपल्या पतीच्या मारेकऱ्याला मारून निघूनही जाते. आपण मात्र अवाक होऊन बघत राहतो.

हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. एक बाई, अनोळखी शहर, अनोळखी लोक तरी ती एवढं मोठं धाडस एकटी करते ही गोष्टच थ्रिलिंग आहे. ह्या सिनेमाच्या बॅकग्राऊंडला अमिताभच्या धीरगंभीर आवाजमध्ये एकला चलो रे हे मधुर गीत ऐकायला मिळतं.

संपूर्ण सिनेमाची थीम दुर्गाशक्ती आहे. जिचा प्रभाव आपल्याला शेवटपर्यंत जाणवत राहतो.

 

kahaani-vidya-inmarathi

 

७. रानी – क्वीन

घरातल्यांची लाडकी, फुलासारखी जपलेली मुलगी. तीचं लग्न ठरतं.. सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार होतं. ती सुद्धा स्वतःच्या भविष्याबद्दल अनेक स्वप्नं सजवते.

घरी लग्नाची लगबग सुरू होते. पाहुणे येतात, जेवणावळी सुरू होतात आणि कळतं की मुलाने लग्नाला नकार दिला आहे. मुलीचे आई- बाप उन्मळून पडतात, जीचं लग्न तुटलं ती राणी म्हणजेच कंगना रनौत देखील स्वतःच्या नशिबाला दोष देत खोलीमध्ये स्वतःला डांबून घेते.

पण किती दिवस असं अंधारलेल्या खोलीत स्वतःला कोंडून ठेवायचं. किती दिवस आपल्या न केलेल्या चुकीची शिक्षा भोगायची म्हणून निघते एकटीच स्वतःच्या हनीमूनला. एकटी कधी शहराबाहेर न पडलेली ती एकटी परदेशात जाते आणि दुःखाला मागे ठेऊन एक नवीन आयुष्य जगून येते.

 

queen-kangana-inmarathi

 

२०१४ मध्ये आलेला क्वीन बदललेल्या स्त्रियांचं प्रमुखतेने प्रतिनिधित्व करतो असे चित्रपटाचे समीक्षक म्हणतात. आजही ह्या सिनेमाचे सीन्स आणि डायलॉग्स प्रसिद्ध आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?